ब्रेकिंग
अमळनेरचा अधिकृत कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करा; विश्व हिंदू परिषद-बजरंग दलाचा आठ दिवसांचा अल्टिमेटम आठ दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा; नगराध्यक्षांच्या राजीनाम्याचीही मागणी

 

 

अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर नगरपरिषदेच्या अधिकृत कत्तलखान्यात वारंवार गोवंशाची कत्तल होत असल्याच्या तक्रारींची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि सदर कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करावा, अशी मागणी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या अमळनेर प्रखंडाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी १८ नोव्हेंबर रोजी नगराध्यक्ष तथा नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.

 

निवेदनात म्हटले आहे की, नगरपरिषदेच्या अधिकृत कत्तलखान्यात गोवंश कत्तलीसंदर्भात वारंवार तक्रारी समोर येत आहेत. मात्र, नगरपरिषद प्रशासन, संबंधित कर्मचारी आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्रभावी नियंत्रण व नियमित देखरेख होत नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यपालनाची तपासणी करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

 

कत्तलखान्यातील कामकाज, परवाने, पशुवैद्यकीय तपासणी, जनावरांची आवक-जावक तसेच संबंधित नोंदवह्यांची तपासणी करावी. नियमांचे उल्लंघन आढळल्यास कत्तलखाना चालकांसह दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी. तसेच कत्तलखाना बंद करून त्याचा परवाना रद्द करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

 

याशिवाय, कत्तलखान्याची जागा व बांधकाम कायमस्वरूपी निष्क्रिय करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर संबंधित बांधकाम हटविण्यात यावे, अशी भूमिका संघटनेने मांडली आहे. नगरपरिषद कर्मचारी आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर विभागीय व कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

 

आठ दिवसांत लेखी अहवाल देण्याची मागणी

 

नगरपरिषद प्रशासनाने या निवेदनावर केलेल्या कार्यवाहीचा लेखी अहवाल आठ दिवसांच्या आत संघटनेला द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या मुदतीत कत्तलखान्यावर ठोस कारवाई करून तो कायमस्वरूपी बंद करण्याची प्रक्रिया सुरू न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने दिला आहे. तसेच नगराध्यक्षांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

 

या निवेदनावर सचिन माळी, सचिन चौधरी, विश्वनाथ मिस्त्री आणि स्वप्निल पाटील यांच्या स्वाक्षऱ्या असून, गोवंश संरक्षणाच्या प्रश्नावर संघटना ठाम भूमिका घेणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *