मांडळच्या २०० वर्षे जुन्या ब्रिटिशकालीन बंधाऱ्याला गळती; दुरुस्तीसाठी डॉ. दीपक पाटील यांची मंत्री गिरीश महाजनांकडे निधीची मागणी
अमळनेर प्रतिनिधी : मांडळ (ता. अमळनेर) येथील पांझरा नदीवरील सुमारे २०० वर्षे जुन्या ब्रिटिशकालीन दगडी बंधाऱ्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी व वाळूची गळती होत आहे. त्यामुळे मांडळसह वावडे व जवखेडा या गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती करून आवश्यक निधी मंजूर करावा, अशी मागणी माजी पंचायत समिती सभापती तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य डॉ. दीपक पंढरीनाथ पाटील यांनी राज्याचे जलसंपदामंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मांडळ गावाजवळ पांझरा नदीवर असलेला हा ऐतिहासिक दगडी बंधारा परिसरातील भूजलसाठा टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या बंधाऱ्यामुळे नदीपात्रात सुमारे पाच किलोमीटर लांबीचा व २० फूट रुंदीचा वाळूचा थर निर्माण झाला असून, परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या विहिरींना त्याचा मोठा आधार मिळत आहे. मात्र, सध्या बंधाऱ्याच्या खालून मोठ्या प्रमाणावर पाणी झिरपत असून, पाण्यासोबत वाळूदेखील वाहून जात आहे. त्यामुळे बंधाऱ्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
बंधाऱ्याची वेळीच दुरुस्ती न झाल्यास त्यामागे साचलेला वाळूसाठा वाहून जाण्याची आणि परिसरातील विहिरींची पाणीपातळी खालावण्याची भीती व्यक्त होत आहे. याचा थेट परिणाम मांडळ, वावडे आणि जवखेडा या गावांच्या पिण्याच्या पाणीपुरवठ्यावर होऊ शकतो. आधीच दुष्काळसदृश परिस्थितीची चिंता असताना या बंधाऱ्याची दुरवस्था ग्रामस्थांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.
या बंधाऱ्याची केवळ तात्पुरती डागडुजी न करता तांत्रिकदृष्ट्या योग्य पद्धतीने संपूर्ण दुरुस्ती करण्यात यावी. तसेच बंधाऱ्यावर दोन फूट काँक्रीटचे काम करून पाणी अडवण्याची क्षमता वाढवावी, अशी मागणी डॉ. पाटील यांनी निवेदनातून केली आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्यापूर्वीच शासनाने या कामाला प्राधान्य देऊन तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, असेही त्यांनी नमूद केले आहे.
या निवेदनाच्या प्रती लघु पाटबंधारे विभाग, धुळे तसेच जिल्हाधिकारी, धुळे यांनाही माहितीस्तव पाठविण्यात आल्या आहेत. बंधाऱ्याची दुरवस्था आणि पाणीगळती दर्शविणारी छायाचित्रेही निवेदनासोबत जोडण्यात आली आहेत.
ऐतिहासिक बंधाऱ्याचे अस्तित्व आणि तीन गावांच्या पिण्याच्या पाण्याचा आधार टिकवण्यासाठी शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी अपेक्षा परिसरातील ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.


