ब्रेकिंग
शिरसाळे येथे २३ ऑक्टोबरला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन; आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते उद्घाटन खासदार स्मिता वाघ यांच्यासह शिक्षण, प्रशासन व पोलीस विभागातील मान्यवरांची उपस्थिती; विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेला मिळणार व्यासपीठ

 

अमळनेर (प्रतिनिधी) : पंचायत समिती अमळनेर आणि भिका यशोद चौधरी माध्यमिक विद्यालय व हिरामण जीवन पाटील कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, २३ ऑक्टोबर रोजी शिरसाळे येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनवृत्ती, कल्पकता आणि नवोपक्रमांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने हे प्रदर्शन महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन संजय शिरोडे राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून खासदार स्मिता वाघ, शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, निलेश पाटील, डॉ. अनिल झोपे, डॉ. चंद्रकांत साळुंखे, रागिणी चव्हाण, नरेंद्र चौधरी, सचिन परदेशी, एजाज शेख, प्रतिमा सानप, विजय सरोदे, कविता सुर्वे, कविता चव्हाण, प्रमोद पाटील आणि रावसाहेब पाटील उपस्थित राहणार आहेत.

मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण

विज्ञान प्रदर्शनाच्या बक्षीस वितरण समारंभाला उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे, गटविकास अधिकारी एन. आर. पाटील, तहसीलदार डॉ. उमा ढेकळे, मुख्याधिकारी गणेश शिंदे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम आणि एपीआय साजिद मन्सूरी उपस्थित राहणार आहेत.

चार गटांत विज्ञान उपकरणांचे सादरीकरण

या विज्ञान प्रदर्शनात लहान गट, मोठा गट, शिक्षक गट आणि शिक्षकेतर गट अशा चार गटांत उपकरणांचे सादरीकरण केले जाणार आहे. प्रदर्शनासाठी उपकरणे सादर करणे तसेच शाळांच्या नोंदी करण्याची प्रक्रिया भिका यशोद चौधरी माध्यमिक विद्यालय येथे सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे. दुपारी ४ वाजता बक्षीस वितरण समारंभ होणार आहे.

तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक, विज्ञान शिक्षक आणि गणित शिक्षकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांसह या प्रदर्शनात सहभागी व्हावे. विद्यार्थ्यांनी विज्ञान उपकरणे सादर करावीत तसेच अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रदर्शन पाहण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे आणि मुख्याध्यापक प्रवीण पवार यांनी केले आहे.

आयोजनासाठी विविध समित्यांचे परिश्रम

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी विज्ञान मंडळ, गणित मंडळ, केंद्रप्रमुख, गटसाधन केंद्र, मुख्याध्यापक संघटना तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना परिश्रम घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला चालना देणारे, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणारे आणि ज्ञान-विज्ञानाची गोडी वाढवणारे हे प्रदर्शन ठरणार असल्याने शैक्षणिक क्षेत्रात या उपक्रमाबाबत उत्सुकता व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *