भक्तिरसात न्हाऊन निघाले जानवे गाव; आई भवानी मातेच्या अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाची उत्साहात सांगता
अमळनेर प्रतिनिधी : जानवे येथे कुलदैवत आई भवानी मातेच्या मंदिरात आयोजित दहा दिवसीय अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाची भक्तिमय वातावरणात सांगता झाली. गेल्या दहा दिवसांपासून संपूर्ण गावात भजन, कीर्तन, हरिनामाचा गजर आणि अन्नदान यांमुळे भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. ग्रामस्थ, तरुण, ज्येष्ठ नागरिक आणि माता-भगिनींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा सोहळा यशस्वी झाला.
या सप्ताहादरम्यान भजन, कीर्तन आणि हरिनामाच्या माध्यमातून आध्यात्मिक वातावरणाची अनुभूती भाविकांना मिळाली. सप्ताहाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे योगदान देणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे आणि भाविकांचे आभार व्यक्त करण्यात आले.
माऊली भजनी मंडळाचे विशेष योगदान
सप्ताहामध्ये जानवे येथील माऊली भजनी मंडळाने महत्त्वपूर्ण सहकार्य केले. विणेकरी, मृदुंगाचार्य, गायनाचार्य, टाळकरी, भालदार, चोपदार तसेच ध्वनियंत्रणा सांभाळणाऱ्या सदस्यांच्या योगदानाचे कीर्तनकार महाराजांनी विशेष कौतुक केले. गावातील ही भजनपरंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचावी, यासाठी बाल गोपाळ भजनी मंडळातील लहान मुले ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहेत. ही बाब गावासाठी अभिमानास्पद ठरत आहे. मृदुंगाचार्य म्हणून ह.भ.प. जयेश महाराज दुसानेकर यांनी केलेल्या योगदानाचेही कौतुक करण्यात आले.
महाप्रसादाचे मानकरी आणि व्यवस्थापन मंडळाचे कौतुक
महाप्रसादाचे मानकरी म्हणून ग.भा. प्रमिलाबाई तुळशीराम मोरे, ह.भ.प. भिला तुळशीराम मोरे आणि ह.भ.प. सुनीताबाई भिला मोरे यांचे योगदान लाभले. आई भवानी मातेच्या मंदिराच्या व्यवस्थापन मंडळाने दहा दिवसांच्या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन व व्यवस्थापन केले. त्यामुळे व्यवस्थापन मंडळाचे ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती
या धार्मिक सोहळ्याला तालुक्याचे ज्येष्ठ नेते माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, माजी मंत्री तथा विद्यमान आमदार अनिल भाईदास पाटील, माजी नगराध्यक्षा जयश्रीताई पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती श्यामबापू अहिरे यांच्यासह बाहेरगावाहून आलेले मान्यवर आणि पंचक्रोशीतील विविध भजनी मंडळांचे सदस्य उपस्थित होते.
दोन कीर्तन सप्ताहांमुळे जानवेची धार्मिक ओळख
जानवे गावात नवरात्रोत्सवाच्या काळात कुलदैवत आई भवानी मातेचा कीर्तन सप्ताह गेल्या २८ वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे. याशिवाय विठ्ठल-रुक्मिणी माता मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त महाशिवरात्रीच्या पर्वावर गेल्या दोन वर्षांपासून दुसऱ्या संकीर्तन सप्ताहाचे आयोजन केले जात आहे. या दोन्ही सप्ताहांना ग्रामस्थ आणि भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळतो. गावातील धार्मिक परंपरा आणि एकजुटीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बहिरम महाराज यात्रा उत्सवाची परंपरा
जानवे गावाचे ग्रामदैवत श्री बहिरम महाराज यांची यात्रा मार्गशीर्ष महिन्यात भरते. जानवे पंचक्रोशीत या यात्रेला विशेष महत्त्व आहे. यात्रेनिमित्त अमावस्येच्या आदल्या दिवशी कीर्तनाचा जागर केला जातो, तर अमावस्येच्या दिवशी भाविकांच्या वतीने श्रद्धेने महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते.
कृषी क्षेत्रातही गावाचा नावलौकिक
धार्मिक परंपरेबरोबरच जानवे गावाने कृषी क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तालुक्यात कापूस उत्पादनाच्या बाबतीत गावाचा नावलौकिक असून, येथील शेतकरी कष्टाळू आणि मेहनती म्हणून ओळखले जातात. प्रतिकूल परिस्थिती आणि दुष्काळाचे सावट असतानाही शेतकरी शेतीत चांगले उत्पादन घेण्यासाठी प्रयत्नशील असतात. ग्रामस्थ या प्रगतीचे श्रेय कुलदैवत आई भवानी माता आणि ग्रामदैवत बहिरम महाराज यांच्या आशीर्वादाला देतात.
ग्रामस्थांच्या एकजुटीतून भक्ती सोहळा यशस्वी
अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाच्या निमित्ताने अनुभवलेल्या भक्तिभावाचे शब्दांकन साने गुरुजी सार्वजनिक वाचनालय, जानवेचे अध्यक्ष डी. एम. पाटील सर यांनी केले. या सोहळ्याच्या यशामागे गावातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन, माता-भगिनींची निष्ठा, तरुणांचे सहकार्य आणि सर्व ग्रामस्थांची एकजूट असल्याचे त्यांनी नमूद केले. सर्व सहकार्यकर्त्यांचे आभार मानत विठ्ठल चरणी सर्वांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि समाधान लाभावे, अशी प्रार्थना व्यक्त करण्यात आली.

