मक्याच्या शेताला आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने अनर्थ टळला
अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर शहरातील नांदगाव रस्त्यालगत असलेल्या मक्याच्या शेताला सोमवारी (दि. १९ ऑक्टोबर) सकाळी १० वाजेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग पूर्णपणे आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.
प्रकाश नवलं पाटील, ज्ञानेश्वर बळीराम पाटील आणि सुधाकर काशिनाथ पाटील यांच्या मक्याच्या शेताला आग लागल्याची माहिती नगरसेवक मुक्तार खाटीक यांनी नगरपरिषदेला दिली. माहिती मिळताच अग्निशमन अधिकारी गणेश गोसावी यांनी नगरपरिषदेचे अग्निशमन वाहन तातडीने घटनास्थळी रवाना केले.
अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तत्परतेने प्रयत्न करून आग पूर्णपणे विझवली. परिसरात आजूबाजूला मका पिकासह कुरण असल्याने आग पसरल्यास मोठे नुकसान होण्याची शक्यता होती. मात्र, अग्निशमन दलाच्या वेळीच केलेल्या कारवाईमुळे संभाव्य धोका टळला.
या मोहिमेत वाहनचालक सत्यन संदानशिव आणि फायरमन मच्छिंद्र चौधरी यांनी सहभाग घेतला.

