“जागर स्री शक्तीचा ” (विशेष लेख) ▪️आदिमाता निऋतीच्या लेकींच्या कृतज्ञतेसाठी साजरा होणारा नवरात्रोत्सव!
धुळे प्रतिनिधी : सध्या सर्वत्र नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. ठिकठिकाणी देवीची पूजा, आरती, गरबा, दांडिया आणि विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. देवीला साडीचोळी अर्पण केली जाते. तिच्यासमोर दिवे लावले जातात, नवस केले जातात आणि सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते. परंतु हे सर्व करत असताना एक प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. आपण देवीची पूजा करतो, मग आपल्या घरातील महिला, शेतात राबणाऱ्या महिला आणि समाजातील दुर्लक्षित भगिनींना खऱ्या अर्थाने मान-सन्मान देतो का ? हा प्रश्न विचारण्याचे कारण म्हणजे, देवीच्या नावाचा जयघोष करणारा आपला समाज आजही अनेक महिलांच्या कष्टांकडे दुर्लक्ष करतो. घरातील महिला असो, शेतमजूर महिला असो किंवा शेतकरी कुटुंबातील कष्टकरी स्त्री असो, तिच्या कष्टांना अनेकदा योग्य किंमत मिळत नाही. तिच्या कामाचे कौतुक होत नाही. तिच्या मताला महत्त्व दिले जात नाही. मग नवरात्रोत्सव साजरा करण्याचा खरा अर्थ आपण समजून घेतला आहे का, याचा विचार करणे गरजेचे आहे.
*नवरात्रोत्सवाचा आणि कृषी संस्कृतीचा जुना संबंध*
भारताची संस्कृती ही शेती, माती आणि निसर्गाशी जोडलेली आहे. आपल्या पूर्वजांनी निसर्गाला महत्त्व दिले. माती, पाणी, बियाणे, झाडे आणि पिके यांच्याशी माणसाचे नाते जोडले गेले. या कृषी संस्कृतीत महिलांचे योगदान फार मोठे राहिले आहे. प्राचीन मातृसत्ताक परंपरेत स्त्रीला महत्त्वाचे स्थान होते, अशी मांडणी अनेक सांस्कृतिक चर्चांमध्ये केली जाते. आदिमाता निऋती आणि दुर्गा यांच्या परंपरेचा उल्लेखही स्त्रीशक्तीच्या संदर्भात केला जातो. या परंपरांमधून स्त्रीचे कर्तृत्व, तिचे सामर्थ्य आणि तिचे समाजातील स्थान समजून घेण्याची गरज आहे.नवरात्रोत्सव हा फक्त देवीच्या पूजेपुरता मर्यादित नसून, तो शेती, निसर्ग आणि स्त्रीशक्तीशी जोडलेला लोकोत्सव म्हणूनही पाहता येतो. पूर्वी अनेक घरांमध्ये नवरात्रीच्या काळात मातीच्या परडीत वेगवेगळ्या प्रकारची बियाणे पेरली जात असत. नऊ दिवस त्यांची काळजी घेतली जाई. त्या बियाण्यांना अंकुर फुटले की आनंद व्यक्त केला जाई. त्यातून बियाण्यांची उगवण, मातीची ताकद आणि पुढील पिकाच्या हंगामाचा अंदाज घेण्याची परंपरा काही ठिकाणी होती. या परंपरेतून निसर्गाविषयीची जाण आणि शेतीविषयीचे ज्ञान दिसून येते. हे ज्ञान जपण्यात महिलांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.
*शेतात राबणारी महिला हीच खऱ्या अर्थाने अन्नदात्री!*
आपण शेतात पिकलेले धान्य खातो. आपल्या ताटात भाकरी येते. भाजी, धान्य आणि इतर अन्नपदार्थ आपल्या घरापर्यंत पोहोचतात. पण हे अन्न तयार होण्यामागे किती हात राबतात, याचा आपण कधी विचार करतो का? पेरणीपासून निंदणीपर्यंत, खुरपणीपासून कापणीपर्यंत आणि धान्य निवडण्यापासून ते साठवण्यापर्यंत महिलांचे कष्ट असतात. उन्हातान्हात शेतात काम करणे, डोक्यावर ओझे वाहणे, पावसात भिजत शेतीची कामे करणे आणि घरी परतल्यानंतर पुन्हा चूल-मूल सांभाळणे, असा महिलांचा रोजचा दिनक्रम असतो. शेतातील काम संपले तरी तिचे घरातील काम संपत नाही. घरातील सर्वांसाठी स्वयंपाक करणे, मुलांना सांभाळणे, घरातील ज्येष्ठांची काळजी घेणे आणि कुटुंबाच्या गरजा पूर्ण करणे, ही जबाबदारीही ती पार पाडते. शेतात राबणाऱ्या महिलेच्या घामातून धान्य पिकते आणि तिच्या कष्टातून घर चालते. तरीही तिच्या कामाला अनेकदा गृहीत धरले जाते. शेतात काम करणाऱ्या अनेक महिलांच्या नावावर जमीन नसते. जमिनीची कागदपत्रे पुरुषांच्या नावावर असतात. शेतीच्या निर्णयामध्येही अनेकदा महिलांना विचारले जात नाही. शेतात समान कष्ट करूनही मालकी हक्क, आर्थिक स्वातंत्र्य आणि निर्णय घेण्याचा अधिकार यापासून त्या दूर राहतात. मग अशा महिलांना न्याय कधी मिळणार? त्यांच्या कष्टांची किंमत कधी ओळखली जाणार? त्यांच्या हक्कांचा विचार कधी होणार? नवरात्रोत्सवाच्या काळात या प्रश्नांची उत्तरे शोधणे गरजेचे आहे. घरातील महिलेला देवीसारखा मान मिळतो का ? आपल्या घरात आई असते, बहीण असते, पत्नी असते, मुलगी असते. या सगळ्या महिला आपल्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यांच्या कष्टांमुळे घर व्यवस्थित चालते. त्यांच्या त्यागामुळे कुटुंबाला आधार मिळतो. तरीही अनेक घरांमध्ये महिलांना स्वतःच्या आवडी-निवडीप्रमाणे जगता येत नाही. शिक्षण घ्यायचे की नाही, नोकरी करायची की नाही, घरातील महत्त्वाचे निर्णय घ्यायचे की नाही, यासाठी त्यांना इतरांच्या परवानगीवर अवलंबून राहावे लागते. अनेक महिला घरातील सर्वांचे जेवण झाल्यानंतर जेवतात. स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून त्या कुटुंबासाठी राबतात. स्वतःला त्रास होत असला तरी घरातील माणसांची काळजी घेतात. *अशा महिलांच्या कष्टांची जाणीव ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.*
नवरात्रोत्सवात देवीला साडी-चोळी अर्पण केली जाते. तिच्यासमोर नारळ फोडला जातो. पण घरातील आईला दोन प्रेमाचे शब्द बोलण्यासाठी आपण वेळ काढतो का? पत्नीच्या कष्टांचे कौतुक करतो का? बहिणीच्या मताचा आदर करतो का? मुलीला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रोत्साहन देतो का ? देवीच्या मूर्तीसमोर डोके टेकवणे सोपे आहे. पण घरातील महिलेला समानतेने वागवणे ही खरी कसोटी आहे.
*राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचे कार्य विसरून चालणार नाही!*
महिलांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी क्रांतीसुर्य ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांनी मोठा संघर्ष केला. ज्या काळात मुलींना शिकण्याची संधी नाकारली जात होती, त्या काळात त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी शाळा सुरू करण्याचे ऐतिहासिक कार्य केले. ह्या फुले दाम्पत्यांनी समाजातील अन्यायकारक रूढी आणि परंपरांविरुद्ध आवाज उठवला. महिलांना शिक्षण मिळावे, त्यांनी स्वाभिमानाने जगावे आणि समाजात त्यांना समान स्थान मिळावे, यासाठी प्रयत्न केले. आज महिलांना शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. महिला शिक्षण, शेती, सामाजिक कार्य, राजकारण, क्रीडा, सांस्कृतिक, संरक्षण, विज्ञान आणि अंतराळ संशोधन अशा विविध क्षेत्रांत आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत. तरीही काही ठिकाणी मुलगा आणि मुलगी यांच्यात भेदभाव केला जातो. मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य दिले जाते, तर मुलींच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जाते. महिलांच्या मताला कमी महत्त्व दिले जाते. त्यांच्या स्वप्नांना मर्यादा घातल्या जातात. ही परिस्थिती बदलण्यासाठी फक्त भाषणे करून चालणार नाही. मुलींना शिक्षण द्यावे लागेल, त्यांना स्वतःचे निर्णय घेण्याची संधी द्यावी लागेल आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे लागेल. म्हणूनच सावित्रीमाई फुले यांच्या विचारांचा खरा सन्मान त्यांच्या प्रतिमेला हार घालण्यात नाही, तर प्रत्येक मुलीला शिकण्याची आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी देण्यात आहे.
आज महिला घराबाहेर पडताना सुरक्षिततेचा विचार करतात. मुलगी शाळेत किंवा महाविद्यालयात जाताना पालकांच्या मनात काळजी असते. नोकरी करणाऱ्या महिलांनाही अनेकदा वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो. महिलांवरील अत्याचार, छळ, हुंडाबळी, कौटुंबिक हिंसाचार आणि मुलगा-मुलगी यांच्यातील भेदभाव सारख्या समस्या आजही पूर्णपणे संपलेल्या नाहीत. यासाठी फक्त कायदे करून पुरेसे होणार नाही. प्रत्येकाच्या विचारात बदल होणे आवश्यक आहे. मुलांना लहान पणापासूनच महिलांचा आदर करायला शिकवले पाहिजे. मुलगा आणि मुलगी समान आहेत, ही भावना घराघरांत रुजवली पाहिजे. महिलांनीही अन्याय सहन करत बसू नये. आपल्या हक्कांची जाणीव ठेवावी. चुकीच्या गोष्टींविरुद्ध आवाज उठवावा. अंधश्रद्धा, फसवणूक आणि भोंदूगिरीपासून सावध राहावे. श्रद्धा असणे चुकीचे नाही, पण श्रद्धेच्या नावाखाली कोणी फसवत असेल, तर त्याला प्रश्न विचारण्याची हिंमतही असली पाहिजे. कोणत्याही व्यक्तीच्या बोलण्यावर डोळे झाकून विश्वास ठेवण्यापेक्षा सत्य तपासणे, विचार करणे आणि योग्य-अयोग्य ओळखणे महत्त्वाचे आहे. समाजात समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणे, हीच खरी सामाजिक प्रगती आहे. गरबा-दांडियाचा उत्साह असावा, पण स्त्रीच्या सन्मानाची जाणीवही हवी.
काळानुसार नवरात्रोत्सवाचे स्वरूप बदलले आहे. पूर्वी घरात किंवा गावातील मंदिरात देवीची पूजा केली जात असे. आता सार्वजनिक मंडळे, मोठे मंडप, आकर्षक रोषणाई, गरबा आणि दांडियाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित केले जातात. तरुणाई उत्साहाने या उत्सवात सहभागी होते. नऊ दिवस नऊ रंगांचे कपडे घालण्याची परंपराही अनेक ठिकाणी लोकप्रिय झाली आहे. या उत्सवातून आनंद मिळावा, लोक एकत्र यावेत आणि आपली संस्कृती जपली जावी, यात काहीच गैर नाही. मात्र या उत्सवाच्या धामधुमीत त्यामागचा खरा विचार विसरता कामा नये. गरबा खेळताना महिलांचा सन्मान राखला जातो का? गर्दीच्या ठिकाणी त्यांची सुरक्षितता जपली जाते का? मुलींना निर्भयपणे सहभागी होता येते का? महिलांशी बोलताना आणि वागताना आदर ठेवला जातो का? या प्रश्नांची उत्तरे आपल्या वागण्यातून मिळाली पाहिजेत. नऊ रंगांचे कपडे घालणे ही आनंदाची बाब आहे, पण महिलांच्या आयुष्यातही आनंदाचे रंग भरले पाहिजेत. त्यांना शिक्षणाचा रंग, स्वातंत्र्याचा रंग, समानतेचा रंग आणि सुरक्षिततेचा रंग मिळाला पाहिजे. नवरात्रीचे नऊ रंग अंगावर दिसण्यापेक्षा समता, माणुसकी आणि स्त्रीसन्मानाचे रंग आपल्या विचारांत दिसले पाहिजेत. आपल्या आजूबाजूला अनेक नवदुर्गा आहेत. शेतात राबणारी महिला, कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मजुरी करणारी स्त्री, मुलांना शिकवणारी शिक्षिका, रुग्णांची सेवा करणारी परिचारिका, रस्त्यावर काम करणारी सफाई कर्मचारी, घरकाम करणारी महिला आणि आपल्या कुटुंबासाठी दिवसरात्र मेहनत करणारी आई या सगळ्या आपल्या समाजाचा आधार आहेत. काही महिला स्वतःच्या संसाराची जबाबदारी सांभाळत दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करतात. काही महिला स्वतःच्या मुलांचे शिक्षण पूर्ण व्हावे म्हणून पोटाला चिमटा घेऊन पैसे वाचवतात. काही महिला घरातील संकटांना तोंड देत कुटुंबाला आधार देतात. अनेक महिलांच्या कामाची दखलही घेतली जात नाही. त्यांच्या कष्टांना प्रसिद्धी मिळत नाही. त्यांच्या नावाचा सत्कार होत नाही. पण त्यांच्या मेहनतीशिवाय घर, शेती आणि समाजाचे चक्र व्यवस्थित चालू शकत नाही. म्हणून समाज अशा खऱ्या नवदुर्गांचा सन्मान करणार तरी कधी ? या महिलांना मोठ्या विचारपीठावर बोलावून सत्कार केला तरच सन्मान होतो असे नाही. त्यांच्या कामाची योग्य किंमत देणे, त्यांना विश्रांती मिळू देणे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे, त्यांच्या मताचा आदर करणे आणि त्यांच्या हक्कांसाठी उभे राहणे, यातूनही सन्मान व्यक्त होतो. शेतात राबणाऱ्या महिलेला शेतीच्या निर्णयांत सहभागी करून घेणे, तिला जमीन आणि मालमत्तेतील कायदेशीर हक्क मिळवून देण्यासाठी मदत करणे, मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे, ही काळाची गरज आहे. महिलांच्या कष्टांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांना फक्त त्याग करणारी व्यक्ती समजून त्यांच्या सर्व जबाबदाऱ्या त्यांच्यावर टाकणेही योग्य नाही. त्यांनाही स्वतःचे आयुष्य आहे, स्वतःची स्वप्ने आहेत आणि स्वतःच्या इच्छा आहेत. त्यामुळे महिलांना फक्त देवी मानून पूजण्यापेक्षा त्यांना माणूस म्हणून समान हक्क आणि सन्मान देणे अधिक महत्त्वाचे आहे.
*स्त्रीचा सन्मान हीच खरी देवीपूजा!*
नवरात्रोत्सव आपल्याला शक्तीची आठवण करून देतो. ही शक्ती फक्त मंदिरातील मूर्तीमध्ये शोधून उपयोग नाही. ती आपल्या घरातील आईमध्ये, शेतात राबणाऱ्या महिलेच्या कष्टांत, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या मुलीमध्ये आणि संकटांशी लढणाऱ्या प्रत्येक स्त्रीमध्ये दिसते. महिलांना शिक्षण मिळाले पाहिजे. त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता आले पाहिजे. घरातील आणि समाजातील निर्णयांमध्ये त्यांचा सहभाग असला पाहिजे. त्यांच्या कष्टांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे. त्यांना सुरक्षित वातावरण मिळाले पाहिजे. महिलांच्या सन्मानाची सुरुवात आपल्या घरापासून झाली पाहिजे. घरातील मुलगा आणि मुलगी यांना समान वागणूक दिली पाहिजे. महिलांच्या कामाचे कौतुक केले पाहिजे. घरातील जबाबदाऱ्या सर्वांनी मिळून पार पाडल्या पाहिजेत. देवीसमोर दिवा लावण्याबरोबरच घरातील महिलांच्या आयुष्यातही आनंदाचा दिवा लावला पाहिजे. देवीला फुले वाहण्याबरोबरच कष्टकरी महिलांच्या आयुष्यातही सुखाची फुले फुलवली पाहिजेत. कारण स्त्रीचा अपमान करून देवीची पूजा करण्यात काहीच अर्थ नाही. स्त्रीला समान हक्क, स्वातंत्र्य आणि सन्मान देणे, हीच खऱ्या अर्थाने देवीची पूजा आहे. नवरात्रोत्सव हा फक्त नऊ दिवसांचा उत्सव राहू नये. महिलांचा आदर करण्याची, त्यांचे हक्क जपण्याची आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची शिकवण आपण वर्षभर आचरणात आणली पाहिजे. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आणि शिक्षणाची खरी देवी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या समतेच्या विचारांचा स्वीकार करून प्रत्येक महिला आणि मुलीला सन्मानाने जगता येईल, असा समाज घडवण्याचा संकल्प आपण करूया. नवरात्रोत्सवाच्या मंगलपर्वात आपल्या मनातील वाईट विचार, अहंकार, भेदभाव आणि अन्यायाची भावना दूर होवो. समाजात समता, माणुसकी, बंधुता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वाढो व प्रत्येक स्त्रीला सुरक्षित, स्वतंत्र आणि सन्मानाचे जीवन जगता येवो. शेतात राबणाऱ्या हातांचा सन्मान होवो, घर सांभाळणाऱ्या मातेच्या कष्टांची जाणीव होवो आणि प्रत्येक मुलीला तिच्या स्वप्नांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळो आणि नवरात्रीपर्वावर प्रत्येकाच्या जीवनात कमलप्रकाश पसरो, याच आदिशक्तीच्या चरणी प्रार्थना!
✍️ प्राजक्ता कमल प्रकाश माळी
नगाव, धुळे

