अमळनेरमध्ये मतचोरीच्या आरोपांविरोधात तीव्र निषेध; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन! दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर एनएसयूआयच्या वतीने आंदोलन; निष्पक्ष निवडणूक आयोगाची मागणी
अमळनेर | प्रतिनिधी : लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या मागणीसाठी अमळनेर येथे नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) च्या वतीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
दसरा हा असत्यावर सत्याचा, अन्यायावर न्यायाचा आणि वाईट प्रवृत्तींवर चांगल्या विचारांचा विजय दर्शविणारा सण आहे. याच पार्श्वभूमीवर, ज्याप्रमाणे दसऱ्याला रावणाचे दहन केले जाते, त्याचप्रमाणे निवडणूक प्रक्रियेतील कथित मतचोरी, गैरप्रकार आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविषयी निर्माण झालेल्या प्रश्नांच्या निषेधार्थ हे प्रतीकात्मक पुतळादहन करण्यात आले.
लोकशाहीचा खरा आधार हा जनतेचा मतदानाचा अधिकार असून, त्या अधिकाराचे संरक्षण करण्याची घटनात्मक जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. मात्र, निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत असेल, तर ही बाब देशाच्या लोकशाही व्यवस्थेसाठी अत्यंत चिंताजनक आहे, अशी भूमिका यावेळी एनएसयूआयच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.
निवडणूक आयोग ही कोणत्याही राजकीय पक्षाच्या हितासाठी नव्हे, तर देशातील प्रत्येक नागरिकाच्या मताचे संरक्षण करण्यासाठी असलेली स्वतंत्र घटनात्मक संस्था आहे. त्यामुळे मतचोरीच्या आरोपांची स्वतंत्र व पारदर्शक चौकशी करण्यात यावी आणि निवडणूक आयोगाने आपल्या कार्यपद्धतीतून जनतेचा विश्वास कायम राखावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.
“दसऱ्याच्या दिवशी आपण रावणाचे दहन करून अन्याय आणि असत्याच्या अंताचा संदेश देतो. आज त्याच भावनेतून लोकशाहीच्या मूल्यांना बाधा पोहोचवणाऱ्या प्रवृत्तींचा आम्ही निषेध करत आहोत. निवडणूक आयोग हा सत्ताधाऱ्यांचा नव्हे, तर संविधानाचा आणि देशातील सर्वसामान्य जनतेच्या मतदानाच्या अधिकाराचा रक्षक असला पाहिजे. लोकशाहीमध्ये प्रत्येक मत पवित्र आहे आणि त्या मताशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही,” अशी भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.
लोकशाहीचे रक्षण, संविधानिक संस्थांची स्वायत्तता आणि निष्पक्ष निवडणूक प्रक्रिया या मागण्यांसाठी एनएसयूआयच्या वतीने लोकशाही मार्गाने संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या आंदोलनावेळी ॲड. कौस्तुभ पाटील (जिल्हाध्यक्ष, एनएसयूआय), महेश पाटील (जिल्हाध्यक्ष, युवक काँग्रेस), उमेश संदानशिव (तालुकाध्यक्ष, एनएसयूआय), बी. के. सूर्यवंशी (अध्यक्ष, तालुका काँग्रेस कमिटी), गजेंद्र साळुंखे (शहराध्यक्ष), माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम बापू पाटील, धनगर दला पाटील, मनोज दाजीबा पाटील, संदीप घोरपडे, रज्जाक शेख, सईद तेली, प्रताप पाटील, रोहिदास दाजी पाटील, श्याम पवार, अशोक पवार, पी. वाय. पाटील, दिनेश पवार, मयूर पाटील, हरिभाऊ मारवडकर, बाळा आप्पा पाटील, राजेंद्र भाट, हर्षल जाधव, तौसिफ तेली, अशोक पारधी, नरेश चव्हाण, प्रशांत चव्हाण, हिमांशू पाटील, प्रशांत बाविस्कर, मयंक चव्हाण, हर्षल बडगुजर, आकाश भिल, बंटी खैरनार, प्रवीण पाटील आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

