ब्रेकिंग
सुरक्षित बालपण, सुरक्षित कार्यस्थळ! ‘पॉक्सो’ अन् ‘पॉश’ कायद्यांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

 

भडगाव प्रतिनिधी : बालकांचे संरक्षण आणि कार्यस्थळावरील महिलांच्या सुरक्षिततेविषयी कायदेशीर जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने भडगाव येथील सौ. र. ना. देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात गुरुवार, दि. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘पॉक्सो’ आणि ‘पॉश’ या महत्त्वपूर्ण कायद्यांवर विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरात भडगाव सत्र न्यायालयातील वकील ॲड. नीलेश तिवारी यांनी विद्यार्थ्यांना दोन्ही कायद्यांविषयी सविस्तर व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. त्यांनी बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण करणारा पॉक्सो कायदा आणि कार्यस्थळावरील महिलांच्या लैंगिक छळास प्रतिबंध करणारा पॉश कायदा यांची माहिती सोप्या व प्रभावी भाषेत समजावून सांगितली. कायद्याच्या तरतुदींसोबतच त्यांचा सामाजिक संदर्भ स्पष्ट करत त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण केली.

व्याख्यानादरम्यान विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना ॲड. तिवारी यांनी समर्पक उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसन केले. सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी कायद्याची माहिती असणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे आणि प्रत्येकाने आपल्या अधिकारांसोबत कर्तव्यांचीही जाणीव ठेवणे आवश्यक असल्याचा संदेश या मार्गदर्शनातून देण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय भैसे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. देवेंद्र मस्की यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ. चित्रा पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. बी. एस. भालेराव यांनी मानले. राष्ट्रगीताने या मार्गदर्शन शिबिराची सांगता झाली.

कायद्याची माहिती, सुरक्षिततेची जाणीव आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश देणारे हे शिबिर विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *