ब्रेकिंग
कर्तृत्ववान महिलांचा होणार ‘नारी शक्ती ग्राम गौरव’ सन्मान नवरात्रोत्सवानिमित्त DL SOCIAL FOUNDATIONचा विशेष उपक्रम; सन्मानासाठी प्रस्ताव मागविणे सुरू

 

जळगाव : नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून DL SOCIAL FOUNDATION तर्फे जळगाव जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा “नारी शक्ती ग्राम गौरव सन्मान सोहळा – २०२६” आयोजित करण्यात येणार आहे.

 

“गावच्या लेकींचा सन्मान, गावाच्या प्रगतीचा अभिमान” या संकल्पनेतून आयोजित करण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण व शहरी भागातील महिलांच्या कर्तृत्वाची दखल घेऊन त्यांच्या कार्याचा गौरव करणे तसेच इतर महिलांना प्रेरणा देणे हा आहे.

 

शिक्षण, आरोग्य, शेती, व्यवसाय, स्वयंरोजगार, सामाजिक कार्य, क्रीडा, कला-संस्कृती, ग्रामविकास, पर्यावरण तसेच प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा या सन्मानासाठी विचार करण्यात येणार आहे.

 

*कर्तृत्ववान महिलांसाठी प्रस्ताव मागविणे सुरू*

 

जळगाव जिल्ह्यातील कर्तृत्ववान महिलांच्या नामनिर्देशनासाठी प्रस्ताव मागविणे सुरू करण्यात आले आहे. नागरिकांना आपल्या परिसरातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलेचे नामनिर्देशन करता येणार आहे.

 

प्राप्त प्रस्तावांमधील माहिती व संबंधित महिलेच्या कार्याची पडताळणी करून संस्थेच्या निर्धारित निकषांनुसार सन्मानार्थी महिलांची निवड करण्यात येईल.

 

समाजासाठी, कुटुंबासाठी तसेच आपल्या गावाच्या व परिसराच्या विकासासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांनी आणि त्यांच्या कार्याची माहिती असलेल्या नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन DL SOCIAL FOUNDATION तर्फे संचालिका सौ भावना मैराळे व डॉ. समाधान मैराळे यांनी केले आहे.

अमळनेर क्रीडा संकुलातील सुविधांचा वनवास संपवा! लाईट, पाणी, ट्रॅक, ओपन जिमसह फुटबॉल पोल व कंपाऊंडचे काम तातडीने पूर्ण करण्याची ललित सातपुतेंची मागणी; अन्यथा उपोषणाचा इशारा

 

अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर येथील क्रीडा संकुलात खेळाडूंसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांचा अभाव असून, त्याचा थेट परिणाम सराव करणाऱ्या खेळाडूंवर होत असल्याचे निदर्शनास आणून देत ललित सातपुते यांनी क्रीडा विभागाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी तालुका क्रीडा अधिकारी यांना निवेदन देऊन प्रलंबित सुविधांची कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली असून, मागण्या मार्गी न लागल्यास उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

अमळनेर क्रीडा संकुलाचा उपयोग विविध क्रीडा प्रकारांचा सराव करणारे खेळाडू, विद्यार्थी आणि क्रीडाप्रेमी मोठ्या प्रमाणावर करतात. मात्र, संकुलात पुरेशा प्रकाशव्यवस्थेचा अभाव, पाण्याची सुविधा, धावपट्टी (ट्रॅक), ओपन जिम, फुटबॉल पोल तसेच संरक्षक कंपाऊंडचे काम यांसारख्या मूलभूत बाबी अद्याप पूर्णत्वास न गेल्याने खेळाडूंना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

खेळाडूंना दर्जेदार सरावाची सुविधा उपलब्ध करून देणे, क्रीडा संकुलाचा प्रभावी वापर होणे आणि स्थानिक पातळीवरील खेळाडूंना प्रोत्साहन मिळणे यासाठी या सुविधा तातडीने उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे सातपुते यांनी म्हटले आहे. संबंधित विभागाने केवळ आश्वासनांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कामांना गती द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

या मागण्यांसंदर्भातील निवेदनाच्या प्रती क्रीडामंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच अमळनेर नगरपरिषद प्रशासन यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता प्रशासन या मागण्यांकडे किती गांभीर्याने पाहते आणि क्रीडा संकुलातील प्रलंबित कामांना कधी गती मिळते, याकडे खेळाडू व क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.

“खेळाडूंना सुविधा मिळणे हा त्यांचा हक्क असून, क्रीडा संकुलात आवश्यक त्या मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात. मागण्यांची दखल न घेतल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल,” असा इशारा ललित सातपुते यांनी दिला आहे.

अमळनेरात ‘प्रगतिशील महाराष्ट्र २०२६’ प्रदर्शनाचे दिमाखात उद्घाटन शासनाच्या योजना, आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती एकाच छताखाली; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

अमळनेर प्रतिनिधी : केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना, विकासात्मक उपक्रम आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने अमळनेर येथील कलागुरू मंगल भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘प्रगतिशील महाराष्ट्र २०२६’ या भव्य प्रदर्शनास बुधवार, दि. ७ ऑक्टोबरपासून उत्साहात सुरुवात झाली.

प्रदर्शनातील महावितरणच्या दालनाचे उद्घाटन वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार नंदकुमार महाजन, आमदार अमोल जावळे, खानदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष नीरज अग्रवाल, मुनिशन्स इंडिया लिमिटेडचे चीफ जनरल मॅनेजर एम. झेड. सर वर, यंत्रा इंडियाचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर निरंजन लाल यांची प्रमुख उपस्थिती होती.

खासदार स्मिता उदय वाघ यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात केंद्र व राज्य शासनाच्या ७० हून अधिक योजनांची माहिती नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. कृषी व फलोत्पादन, विज्ञान-तंत्रज्ञान, संरक्षण तंत्रज्ञान, वित्त, बँकिंग व विमा, आरोग्य, ऊर्जा व पर्यावरण, शिक्षण, माहिती-तंत्रज्ञान, वाहतूक, रेल्वे, पर्यटन, हस्तकला व हातमाग आदी विविध क्षेत्रांतील योजना व उपक्रमांची माहिती प्रदर्शनातून दिली जात आहे.

महावितरणच्या दालनात प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-२.०, मागेल त्याला सौर कृषिपंप योजना, रूफटॉप सोलर योजना तसेच स्मार्ट मीटरचे फायदे याबाबत माहिती देण्यात येत आहे. नागरिकांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र नोंदवहीची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे.

या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकरी, विद्यार्थी, महिला, युवक, उद्योजक तसेच सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती प्रत्यक्ष संबंधित विभागांकडून जाणून घेण्याची संधी मिळत आहे. विविध विभागांचे अधिकारी व तज्ज्ञ प्रदर्शनस्थळी मार्गदर्शनासाठी उपस्थित आहेत.

७ ते ९ ऑक्टोबरदरम्यान सुरू असलेल्या या प्रदर्शनाला अमळनेर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन शासनाच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती घ्यावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. दत्ता थोरे यांनी प्रास्ताविक, संजय पाटील यांनी सूत्रसंचालन तर संदीप पाटील यांनी आभार मानले.

रोटरी क्लब अमळनेर तर्फे शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वितरण

 

अमळनेर दिनांक -६

 ऑक्टोंबर २०२६ रोजी रोटरी क्लब अमळनेर तर्फे तांबेपुरा परिसरातील सी आर पाटील इंग्लिश मीडियम स्कूल मधील सुमारे २०० विद्यार्थ्यांना अतिशय आकर्षक व पूर्ण सोयीने उपयुक्त अशी स्कूल बॅगचे वितरण करण्यात आले होते .ह्या प्रसंगी रोटरी क्लब तर्फे रोटरी अध्यक्ष रोटे महेश पाटील ,रोटे चेलाराम सेनानी ,प्रोजेक्ट चेअरमन विनोद थोरात, रोटे प्रदीप पारख, रोटे विवेक देशमुख रोटे दिलीप भावसार, रोटे सीबी वशिष्ठ ,रोटे अजय रोडगे ,रोटे मनोज पाटील आणि स्कूल तर्फे प्राचार्य सौ नूतन पाटील व शिक्षक वृंद आदी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते अशी माहिती मकसूद बोहरी कळवितात.

पीएसआय गायकवाड यांची पशुपक्ष्यांप्रती भूतदया जखमी कबुतराच्या पंखातील काटे काढून पाजले पाणी

 

अमळनेर | प्रतिनिधी :

अमळनेर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष पीएसआय समाधान गायकवाड यांनी कर्तव्य बजावत असताना पशुपक्ष्यांप्रती संवेदनशीलता दाखवत जखमी कबुतराला मदतीचा हात दिला.

                   दि. ५ ऑक्टोबर सोमवारी रोजी एका कबुतराच्या पंखात काटेरी काटे टोचल्याचे गायकवाड यांच्या निदर्शनास आले. या कबुतराला उडता येत नव्हते, त्यांनी तत्काळ कबुतराला सुरक्षितपणे हातात घेऊन पंखात टोचलेले काटे काळजीपूर्वक काढले. त्यानंतर कबुतराला पाणी पाजून त्याची सुटका केली.

पोलिसी कर्तव्याबरोबरच मुक्या जीवांप्रती दाखविलेल्या या संवेदनशीलतेचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले. या घटनेतून पीएसआय गायकवाड यांची पशुपक्ष्यांप्रती असलेली भूतदया दिसून येते.

राष्ट्र उभारणीत साहित्यिकांचाही मोलाचा वाटा – सुभाष अहिरे

 

अमळनेर, दि. ६ : खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथील मराठी विभागाच्या वतीने ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’निमित्त विविध साहित्यिक व भाषिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांच्या शृंखलेत मंगळवार, दि. ६ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘मराठी कथाकथन’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुप्रसिद्ध कथाकार सुभाष अहिरे यांनी आपल्या प्रभावी कथाकथनातून उपस्थित विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.

      यावेळी कथाकथन करताना सुभाष अहिरे म्हणाले, “राष्ट्र उभारणीत साहित्यिकांचाही महत्त्वाचा वाटा असतो. साहित्य हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते मानवी मन घडविण्याचे, संवेदनशील बनविण्याचे आणि त्याच्या जगण्याला दिशा देण्याचे प्रभावी माध्यम आहे.” कथा ही माणसाच्या जीवनाशी, अनुभवांशी आणि सामाजिक वास्तवाशी जोडलेली असल्याने तिच्या माध्यमातून जीवनमूल्ये, सामाजिक भान आणि मानवी संवेदना प्रभावीपणे व्यक्त करता येतात, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या ओघवत्या आणि रसाळ कथाकथनाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यांच्या प्रभावी कथाकथनाने विद्यार्थ्यांना साहित्याच्या सर्जनशील आणि सामाजिक सामर्थ्याचा अनुभव मिळाला.

 

कार्यक्रमाच्या प्रारंभी मराठी विभागाचे प्रमुख डॉ. ज्ञानेश्वर कांबळे यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकातून त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी झालेल्या प्रदीर्घ संघर्षाचा आणि त्यामागील विविध प्रयत्नांचा आढावा घेतला. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे हा केवळ भाषेचा सन्मान नसून मराठी संस्कृती, साहित्य, परंपरा आणि भाषिक वारशाचा गौरव आहे, असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव होते. अध्यक्षीय मनोगतात त्यांनी साहित्य आणि समाज यांच्यातील परस्परसंबंध अधोरेखित करत, विद्यार्थ्यांनी वाचनाची आवड जोपासावी, साहित्याचा आस्वाद घ्यावा आणि मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेशी आपले नाते अधिक दृढ करावे, असे आवाहन केले.

        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाल बडगुजर यांनी केले. डॉ. विलास गावित यांनी प्रमुख पाहुणे सुभाष अहिरे यांचा परिचय करून दिला. तर आभार प्रा. सागर सैंदाणे यांनी मानले.

यावेळी मराठी विभागातील डॉ. रमेश माने, प्रा. योगेश पाटील आणि तुषार पाटील उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त आणि उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळाला.

“साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये सेवा संकल्प अभियान अंतर्गत विविध उपक्रम”

 

अमळनेर: साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये सेवा संकल्प अभियान अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले.
स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, चित्रकला स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, व्याख्यान, फिट इंडिया योग व ध्यान सत्र व विद्यार्थी लाभाच्या योजना अंतर्गत सोमवारी व्याख्यान झाले. कार्यक्रमास बांधकाम व्यावसायिक व अमळनेर नगरीचे उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांना यशस्वी उद्योजक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे यांनी अध्यक्षस्थानी होत्या. मान्यवरांचे हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविकात श्रीमती बोरसे मॅडम म्हणाल्या प्रत्येक यशस्वी उद्योजका मागे त्यांची मेहनत, श्रम व त्यांची इमानदारी हे गुण असतात. म्हणूनच त्यांचे नाव यशस्वी उद्योजकांमध्ये सन्मानाने घेतले जाते. त्यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. मान्यवरांच्या हस्ते वकृत्व स्पर्धेत यशस्वी विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. प्रथम -वैष्णवी पवार 8 वी/ब द्वितीय – स्नेहा शिंदे 8 वी- अ तृतीय – भाविका पाटील 8वी ब, उत्तेजनार्थ -हिरल पाटील 8 वी ब. यावेळी निकम विद्यार्थिनींना मार्गदर्शन करतांना म्हणाले तुम्ही कुठलेही काम कमी लेखू नका त्या कामांमध्ये स्वतःला झोकून द्या व कामाशी मेहनत इमानदारी व सत्य या तीन गुणांचा ताळमेळ ठेवा मग तुम्ही प्रत्येक व्यवसायात यशस्वी व्हाल. नोकरीचे मागे न धावता स्वतः मालक व्हा व दुसऱ्यांना काम द्या. हीच खरी यशस्वी उद्योजकाची गुरुकिल्ली होय. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे व संचालक मंडळ यांनी शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचलन मुकेश पाटील व आभार दिलीप पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देशमुख सर, साळुंके सर, महाजन सर, सौ.वैद्य मॅडम, श्रीमती वानखेडे मॅडम व सौ.वंजारी मॅडम यांनी प्रयत्न केले.

परिश्रम दिव्यांग विद्यालयातील ५१ विद्यार्थ्यांना लायन्स क्लबतर्फे गणवेश व भोजन

 

अमळनेर प्रतिनिधी : सामाजिक बांधिलकी जपत लायन्स क्लब ऑफ अमळनेरच्या वतीने परिश्रम दिव्यांग बॉईज अँड गर्ल्स स्कूल, पारोळा रोड, अमळनेर येथे ६ ऑक्टोबर रोजी शालेय गणवेश वाटप व भोजनाचा उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमांतर्गत विद्यालयातील ५१ दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय गणवेश देण्यात आला तसेच भोजनाची व्यवस्था करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणारा हा उपक्रम उत्साहपूर्ण व समाधानकारक वातावरणात पार पडला.

यावेळी लायन्स क्लब ऑफ अमळनेरचे सर्व सदस्य उपस्थित होते. क्लबच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांचा उत्साह वाढविला. गरजू व दिव्यांग विद्यार्थ्यांना मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

लायन्स क्लबच्या या सामाजिक उपक्रमाचे विद्यालयाच्या पदाधिकाऱ्यांसह उपस्थितांनी कौतुक केले.

२६ जणांचे रक्तदान, ७१ जणांची रक्तशर्करा तपासणी; लायन्स क्लबच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

अमळनेर प्रतिनिधी : सामाजिक बांधिलकी जपत लायन्स क्लब ऑफ अमळनेरच्या वतीने मंगळग्रह मंदिर येथे ६ ऑक्टोबर रोजी रक्तदान व रक्तशर्करा तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. सकाळी ९.३० वाजता झालेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शिबिरात २६ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक दायित्व निभावले. तसेच ७१ नागरिकांची रक्तशर्करा तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान दोन व्यक्तींमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक आढळून आले. त्यांना पुढील वैद्यकीय तपासणी करून तज्ज्ञांचा योग्य सल्ला घेण्याचे आवाहन करण्यात आले.

या उपक्रमातून रक्तदानाचे महत्त्व तसेच नियमित रक्तशर्करा तपासणीबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. लायन्स क्लब ऑफ अमळनेरचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते. त्यांच्या सहकार्याने शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

लायन्स क्लबच्या या आरोग्यविषयक सामाजिक उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले.

अमळनेरात बुधवारपासून ‘प्रगतिशील महाराष्ट्र २०२६’चे भव्य प्रदर्शन केंद्र व राज्य सरकारच्या ७० हून अधिक योजनांची माहिती एकाच छताखाली; खासदार स्मिता वाघ यांचा पुढाकार

 

अमळनेर (प्रतिनिधी) : केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना, उपक्रम, आधुनिक तंत्रज्ञान आणि विकासकामांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘प्रगतिशील महाराष्ट्र २०२६’ या भव्य तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन अमळनेर येथे करण्यात आले आहे. खासदार स्मिता उदय वाघ यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली दिल्ली येथील फ्रेंड्ज एक्झिबिशन अँड प्रमोशन संस्थेच्या वतीने हे प्रदर्शन ७ ते ९ ऑक्टोबरदरम्यान कलागुरू मंगल कार्यालयात होणार आहे.

प्रदर्शनाची माहिती देताना खासदार स्मिता वाघ यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली देश व राज्याच्या प्रगतीचे विविध पैलू या प्रदर्शनातून नागरिकांना पाहता येणार आहेत. प्रदर्शन दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.

गतवर्षी जळगाव येथील जी.एस. मैदानावर झालेल्या प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्याचा लाभ अमळनेर व परिसरातील नागरिकांनाही मिळावा, या उद्देशाने यंदा अमळनेर येथे आयोजन करण्यात आले आहे. एकाच जिल्ह्यात हे प्रदर्शन दुसऱ्यांदा होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

या प्रदर्शनात कृषी व फलोत्पादन, विज्ञान व तंत्रज्ञान, संरक्षण तंत्रज्ञान, वित्त, बँकिंग व विमा, आरोग्य, वाणिज्य व व्यापार, ऊर्जा व पर्यावरण, शिक्षण, ग्राहक जागरूकता, माहिती व दळणवळण तंत्रज्ञान, वाहतूक, रेल्वे, पर्यटन, हस्तकला व हातमाग, रसायने व खते आदी क्षेत्रांतील योजनांची माहिती मिळणार आहे. केंद्र व राज्य सरकारच्या विविध विभागांचे अधिकारी, आयएएस अधिकारी, संचालक तसेच वैज्ञानिक नागरिकांना योजनांची माहिती देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

शेतकरी, विद्यार्थी, महिला, युवक आणि उद्योजकांसह जळगाव जिल्ह्यातील नागरिकांनी या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट देऊन शासनाच्या योजनांची माहिती घ्यावी, असे आवाहन खासदार स्मिता वाघ यांनी केले.

७ ऑक्टोबरला सकाळी ११.३० वाजता उद्घाटन

प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता होणार आहे. खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते तसेच जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती फ्रेंड्ज एक्झिबिशन अँड प्रमोशन संस्थेचे चेअरमन आनंद पाल यांनी दिली.

पत्रकार परिषदेला अखिला श्रीनिवासन, दीपकसिंह मेहता, साक्षी सैनी, दत्ता थोरे, संतोष पवार, नीरज अग्रवाल, डॉ अनिल शिंदे आदी उपस्थित होते.