ब्रेकिंग
खुर्चीच्या राजकारणात अमळनेरचा विकास अडकला; जनतेच्या प्रश्नांवर लक्ष देण्याची ‘आप’ची मागणी

 

अमळनेर (प्रतिनिधी):

अमळनेर नगरपालिकेतील अलीकडील राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया देताना आम आदमी पार्टीने जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधण्याची गरज व्यक्त केली आहे. केवळ प्रसिद्धीसाठी करण्यात येणाऱ्या आंदोलनांपेक्षा शहरातील पाणी, रस्ते, स्वच्छता आणि आरोग्य यांसारख्या प्रश्नांवर सर्व पक्षांनी एकत्रितपणे काम करावे, असे आवाहन आम आदमी पार्टीचे अमळनेर तालुकाध्यक्ष महेंद्र नाना साळुंखे आणि तालुका उपाध्यक्ष रामकृष्ण चिंतामण पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले.

महेंद्र साळुंखे यांनी सांगितले की, लोकशाहीमध्ये निवेदन देणे, आंदोलन करणे किंवा प्रशासनाकडे मागण्या मांडणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. मात्र, प्रशासकीय पदांचा सन्मान राखणे आणि लोकशाही मूल्यांचे भान ठेवणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. प्रसिद्धीसाठी करण्यात येणाऱ्या प्रतीकात्मक कृतींमुळे शहरातील गंभीर प्रश्नांकडून जनतेचे लक्ष विचलित होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी त्यांनी अमळनेर शहरातील खड्डेमय रस्ते, पिण्याच्या पाण्याची समस्या, स्वच्छतेचे प्रश्न आणि आरोग्य व्यवस्थेतील अडचणी यावर तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली. जनतेच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी सकारात्मक भूमिका घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

तालुका उपाध्यक्ष रामकृष्ण चिंतामण पाटील यांनीही प्रशासकीय संस्थांचा आणि लोकशाही प्रक्रियेचा सन्मान राखण्याचे आवाहन केले. विरोध हा विधायक पद्धतीने, सभागृहात आणि लोकहिताच्या मुद्द्यांवर व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. वैयक्तिक टीका किंवा प्रसिद्धीच्या राजकारणापेक्षा विकासाला प्राधान्य देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.

प्रसिद्धीपत्रकात आम आदमी पार्टीने अमळनेरच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक प्रशासन, दर्जेदार शिक्षण, सक्षम आरोग्य सुविधा, स्वच्छ शहर आणि मूलभूत नागरी सुविधांवर भर देण्याची भूमिका पुन्हा स्पष्ट केली आहे. नागरिकांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत विकासाभिमुख राजकारण करण्याचा पक्षाचा निर्धार असल्याचेही पत्रकात नमूद करण्यात आले.

अमळनेर नगर परिषदेत ‘नमस्ते दिवस’ उत्साहात साजरा; सफाई कर्मचाऱ्यांना PPE किट व आयुष्मान भारत कार्डचे वाटप

 

अमळनेर (प्रतिनिधी): केंद्र शासनाच्या NAMASTE (National Action for Mechanised Sanitation Ecosystem) अभियानांतर्गत अमळनेर नगरपरिषदेच्या वतीने ‘नमस्ते दिवस’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. इंदिरा गांधी भवन येथे आयोजित या कार्यक्रमात शहराच्या स्वच्छतेसाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कर्मचाऱ्यांना PPE किट तसेच आयुष्मान भारत कार्ड वाटप करून त्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचा संदेश देण्यात आला.

लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. श्री. परीक्षित बाविस्कर व मुख्याधिकारी श्री. गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. कार्यक्रमास आरोग्य सभापती श्री. रामकृष्ण पाटील, स्वच्छता निरीक्षक श्री. संतोष जाधव व स्वच्छता निरीक्षक श्री. किरण कंडारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मान्यवरांनी सफाई कर्मचाऱ्यांशी संवाद साधत शहराच्या स्वच्छता व्यवस्थेत घंटागाडी चालक, वाहक तसेच घनकचरा प्रक्रिया केंद्रावर कार्यरत कर्मचारी यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. त्यांच्या आरोग्य, सुरक्षितता व कल्याणासाठी अमळनेर नगरपरिषद सातत्याने कटिबद्ध असून अशा विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविल्या जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

कार्यक्रमात उपस्थित महिला व पुरुष कर्मचाऱ्यांना ‘नमस्ते’ योजनेची सविस्तर माहिती, आरोग्यविषयक मार्गदर्शन तसेच सुरक्षिततेबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या. त्यानंतर आरोग्य सभापती श्री. रामकृष्ण पाटील, स्वच्छता निरीक्षक श्री. संतोष जाधव, स्वच्छता निरीक्षक श्री. किरण कंडारे आणि शहर समन्वयक श्री. गणेश गढरी यांच्या हस्ते सर्व कर्मचाऱ्यांना PPE किट व आयुष्मान भारत कार्ड वितरित करण्यात आले.

या उपक्रमामुळे सफाई कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांनी अमळनेर नगरपरिषदेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. अशा उपक्रमांमुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावून शहरातील स्वच्छता सेवेची गुणवत्ता अधिक प्रभावी होईल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

यावेळी शहरातील विविध भागांमध्ये कचरा वेचण्याचे काम करणाऱ्या नागरिकांनी स्वच्छता विभागाशी संपर्क साधून ‘नमस्ते’ योजनेअंतर्गत नाव नोंदणी करून शासनाच्या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आरोग्य विभागातील योगेश पवार, श्यामराव करंदीकर, महेंद्र बिऱ्हाडे, अनंत संदानशिव, युनस शेख यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

मराठा समाज महिला मंडळाच्या वक्तृत्व स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; गुणवंत वक्त्यांचा सन्मान

 

अमळनेर : अमळनेर तालुका मराठा समाज महिला मंडळाच्या वतीने समाजातील गुणवंत व हौशी महिलांना आपल्या विचारांना प्रभावीपणे मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या अचानक दिलेल्या विषयांवरील वक्तृत्व स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण, प्रभावी मांडणी आणि ओघवत्या वक्तृत्वामुळे स्पर्धा रंगतदार ठरली.

स्पर्धेत जयश्री पवार यांनी प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद मिळविले. सीमा पाटील यांनी द्वितीय, तर स्वाती पाटील यांनी तृतीय क्रमांक मिळविला. उत्तेजनार्थ पारितोषिक रेखा मराठे व अपेक्षा पाटील यांना प्रदान करण्यात आले.

स्पर्धेत आशा पाटील, पूजा पाटील, श्वेता पाटील, शोभा पाटील, रजुताई सूर्यवंशी, मंगलाबाई पाटील, प्रतिभा शिसोदे, मनीषा पाटील, उर्मिला पाटील, प्रियदर्शनी भोसले, माधुरी पाटील आणि योगिता सूर्यवंशी यांनी उत्साहाने सहभाग नोंदवून आपल्या वक्तृत्वाची छाप पाडली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. जयश्री पाटील होत्या. प्रास्ताविक मंडळाच्या अध्यक्षा सौ. सुलोचना वाघ यांनी केले. सूत्रसंचालन सौ. गायत्री भदाणे व सौ. स्वप्ना पाटील यांनी केले. स्पर्धेचे परीक्षण सौ. भारती (आक्का) पाटील व सौ. भारती पाटील यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाच्या मंगला पाटील, सुनीता पाटील, लीना पाटील, पद्मजा पाटील, माधुरी पाटील, मनीषा पाटील, प्रभावती पाटील, राजश्री पाटील, कृपाली पाटील व नलिनी पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. स्पर्धा पाहण्यासाठी महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या. या उपक्रमामुळे महिलांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन मिळाल्याबद्दल उपस्थितांनी मराठा समाज महिला मंडळाचे कौतुक केले.

श्री मंगळग्रह मंदिर व डॉ. डिगंबर महाले यांच्या बदनामीप्रकरणी अनंत निकमविरोधात तक्रारी

 

अमळनेर : श्री मंगळग्रह मंदिर व मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांची सोशल मीडियावर बदनामी केल्याचा आरोप करत अनंत रमेश निकम यांच्याविरोधात पोलिस व प्रशासनाकडे अनेक सामूहिक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

डॉ. डिगंबर महाले यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, न्यायालयाच्या निकालाची चुकीची व दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करून मंदिर व त्यांची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप केला आहे. तसेच मंगळवार, दि. १४ जुलै रोजी धर्मदाय विभागाकडेही पुराव्यांसह तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले.

सोमवारी सकल हिंदू समाज, विविध हिंदुत्ववादी संघटना, मंगळग्रह सेवा संस्थेचे कर्मचारी व व्यावसायिक तसेच व्हॉईस ऑफ मीडियाच्या अमळनेर शाखेने प्रांताधिकारी, पोलीस उपअधीक्षक व पोलीस निरीक्षक यांच्याकडे स्वतंत्र निवेदने सादर करून अनंत निकम यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली.

तक्रारदारांच्या मते, सोशल मीडियावरील पोस्ट व व्हिडिओंद्वारे न्यायालयाच्या निकालाचा चुकीचा अर्थ लावून श्री मंगळग्रह मंदिर व डॉ. डिगंबर महाले यांची बदनामी करण्यात आली आहे. यामुळे भाविकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणामुळे शहरात मोठी चर्चा रंगली असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अल्पवयीन मुलीच्या मृत्यूने संतप्त धोबी समाज आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईसाठी तहसीलदारांना निवेदन..

 

अमळनेर :धुळे येथील गोळीबार टेकडी परिसरातील १५ वर्षीय जानवी जितेंद्र ठाकरे या अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणाने परीट-धोबी समाजात संतापाची लाट उसळली असून, अमळनेर युवा परीट धोबी समाज व परदेशी धोबी समाजाच्या वतीने सोमवारी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना निवेदन देत दोषींवर तातडीने कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. मानसिक छळामुळे एका निष्पाप मुलीला जीवन संपवावे लागल्याचा आरोप करत समाजबांधवांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आणि संबंधितांवर कायद्यानुसार कठोर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.

निवेदनात दोषींविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील लागू कलमांनुसार तात्काळ गुन्हे दाखल करून प्रकरणाची जलदगती न्यायालयात सुनावणी करण्यात यावी तसेच दोषींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी ठाम भूमिका मांडण्यात आली. यावेळी रविंद्र जाधव, विजय वाघ, उमेश वाल्हे, भरत जावदेकर, दीपक वाल्हे, गंगाराम वाल्हे, गणेश वाल्हे, अनिल मांडोळे, अनिल पवार, परशुराम महाले, सुरेशचंद्र येशी, विकी जाधव, अशोक येशी, अरुण जाधव, लक्ष्मण परदेशी, जयसिंग परदेशी, केशव परदेशी यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही,” असा इशारा देत समाजाने या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त केला. आवश्यकता भासल्यास व्यापक जनआंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला. एका अल्पवयीन मुलीच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या दोषींना कायद्याच्या चौकटीत कठोर शिक्षा मिळाली पाहिजे, अशी एकमुखी मागणी करत समाजाने न्यायासाठी एकजुटीने आवाज बुलंद केला.

अमळनेर अपघात रोखण्यासाठी वाहतूक शाखेची विशेष मोहीम   अपघाताच्या प्रमाणात वाढ, ट्रॅक्टर ट्रॉलींवर बसविले रिफ्लेक्टर 

 

अमळनेर :- जळगाव जिल्ह्यासह तालुक्यात अपघाताचे प्रमाण वाढल्यामुळे तसेच भविष्यात अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी अमळनेर शहर वाहतूक शाखेने विशेष जनजागृती व प्रतिबंधात्मक मोहीम हाती घेतली. पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांच्या आदेशानुसार, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान रस्त्यावरून धावणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलींची तपासणी करण्यात आली. ज्या ट्रॅक्टर ट्रॉलींना मागील बाजूस रिफ्लेक्टर नव्हते त्यांना थांबवून तात्काळ रिफ्लेक्टर बसविण्यात आले .

            विशेषतः रात्रीच्या वेळी ट्रॅक्टर ट्रॉली सहज दिसाव्यात आणि मागून येणाऱ्या वाहन चालकांना वेळेत त्यांचा अंदाज यावा यासाठी रिफ्लेक्टर अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे अपघात टाळण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

               या मोहिमेत पोलीस हवालदार संजय बोरसे, विनय पाटील, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र बोरसे आणि विलास बागुल यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच त्यांनी वाहन चालकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करत सुरक्षित वाहतुकीबाबत जनजागृती ही केली.

पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे राज्य शिष्यवृत्ती परीक्षा व इंडियन टॅलेंन्ट ऑलिमपियाड परीक्षेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी उत्तुंग यश संपादन

महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग यांच्यावतीने राज्य शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5 वी व 8 वी गट विभागासाठी घेण्यात आली होती. पाचवी विभाग गटासाठी एकूण 37 विद्यार्थी उपरोक्त परीक्षेसाठी बसले होते एकूण 24 विद्यार्थी परीक्षेत पात्र ठरले आणि दोन विद्यार्थी पाचवी कक्षा शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले त्यांची नावे पुढीलप्रमाणे 1) पाटील आरव विठ्ठल 2) भामरे श्रावणी हेमंत
‌ त्याचसोबत आठवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी एकूण 22 विद्यार्थी बसले होते एकूण 8 विद्यार्थी पात्र ठरले. शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे नाव मराठे कैवल्य दिनेश हे असून सदर विद्यार्थ्यांनी आपल्या कर्तुत्वाने शाळेचे नाव उज्वल करून शाळेसाठी ऐतिहासिक कार्य त्यांच्याद्वारे होऊन आकाशाला गवसणी घालण्याचे कार्य करून सर्वांच्या गुणगौरवास पात्र ठरुन त्यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.
त्याचसोबत इंडियन टॅलेंन्ट ऑलिमपियाड परीक्षेत पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी राज्यातून चतुर्थ क्रमांक प्राप्त केला असून उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी भामरे श्रावणी अजय हिस रोख राशी 1000 रुपये स्मृतीचिन्ह सन्मानपत्र अशा स्वरूपात भेट देऊन मा. मुख्याध्यापक जे.एस. देवरे यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. अशी दुर्मिळ कामगिरी करणारी एकमेव विद्यार्थीनी ही अमळनेर तालुक्यातील ठरली असून शैक्षणिक क्षेत्रातून या ऐतिहासिक कामगिरीबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत असून ही ऐतिहासिक कामगिरी करून शाळेचे नाव संबंध महाराष्ट्रात उंचावून एक आदर्श तिने आपल्या कर्तृत्वातून निर्माण केले आहे. इयत्ता 5 वीचा विद्यार्थी यश चौधरी हा या उपरोक्त परीक्षेसाठी 16 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला असून त्याला सुद्धा स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरान्वीत करण्यात आले. सदर सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन खा. शि. मंडळाचे समस्त मान्यवर संचालक मंडळ यांनी केले.
सदर परीक्षेसाठी अनमोल मार्गदर्शन सहकार्य परीक्षेसाठी ज्ञानवर्धक पुस्तके उपलब्ध करून देण्यामध्ये शाळेचे चेअरमन डॉ. संदेश गुजराथी ,मुख्याध्यापक जे.एस देवरे, पर्यवेक्षक महेश माळी पर्यवेक्षिका मीनाक्षी बारी, स्वाती माळी ,पी. व्ही. महाजन, वाय. पी. ओवे, व्ही एस अमृतकर , डिंपल देसाई, प्रशांत वंजारी , एस. एस. पारधी समस्त शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी वृंदवर्ग यांचे लाभले.

शालार्थ घोटाळ्यात मोठी कारवाई; १६० कोटींच्या आर्थिक फसवणूक प्रकरणातील आरोपी प्रशांत वाडीले धुळ्यातून जेरबंद

 

धुळे| प्रतिनिधी

शिक्षण विभागाला हादरवून सोडणाऱ्या बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्यात नाशिक शहर गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत मुख्य आरोपींपैकी एक प्रशांत तुळशीराम वाडीले याला धुळे येथून अटक केली आहे. बनावट शालार्थ आदेशांच्या आधारे शासनाची तब्बल १६० कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप या प्रकरणात आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपी प्रशांत वाडीले हा धुळे येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट-३च्या पथकाने धुळे येथे सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. अटकेनंतर त्याला येवला प्रथमवर्ग न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

या प्रकरणात बनावट शालार्थ आदेशांच्या आधारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नावावर वेतन व थकबाकीची रक्कम काढून शासनाची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केल्याचा आरोप आहे. तपासात आतापर्यंत अनेक संशयितांची नावे समोर आली असून आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके, पोलीस निरीक्षक रामदास शेळके, पोलीस निरीक्षक किरण शेवाळे तसेच गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

शालार्थ घोटाळ्याच्या तपासात ही अटक महत्त्वाची मानली जात असून, या प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहाराचे आणखी धागेदोरे उलगडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकसहभागातून ११ हजार झाडांचे संवर्धन; साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानचा हरित उपक्रम ठरतोय प्रेरणादायी संरक्षणासाठी कंपाउंड ची लोकप्रतिनिधींकडे मागणी

 

अमळनेर (प्रतिनिधी): पर्यावरण संवर्धन आणि हरित भविष्याच्या दिशेने साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानने हाती घेतलेला महत्त्वाकांक्षी वृक्षसंवर्धन उपक्रम सध्या वेगाने सुरू आहे. लोकसहभागातून उपलब्ध झालेल्या जागेवर तब्बल ११ हजार झाडांचे संवर्धन व संगोपन करण्यात येत असून, हा उपक्रम परिसरासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

लोकसहभागातून उभारलेल्या आणि सुमारे अकरा हजार झाडांचे संवर्धन संगोपन सुरू असलेल्या साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानच्या परिसराला संरक्षण कंपाऊंड उभारण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या दर्शना पवार यांनी केली आहे. कंपाउंड नसल्यामुळे समाजकंटकांकडून दोन वेळा परिसरात आग लावण्यात आली असून त्यात अनेक झाडांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. पर्यावरण संवर्धनासाठी उभारलेल्या या हरित उपक्रमाचे संरक्षण करणे ही प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे सामाजिक जबाबदारी असून तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकाळात कंपाऊंडच्या कामाला सुरुवात होऊन 25 टक्के काम पूर्ण झाले होते. मात्र त्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार अनिल पाटील यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करूनही उर्वरित कामाला गती मिळाली नाही पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या या प्रकल्पाकडे दुर्लक्ष का केली जात आहे असा सवाल उपस्थित करून यासाठी आता जनमत तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही दर्शना पवार यांनी नमूद केले आहे.