ब्रेकिंग
समाजातील दुर्बलांना ‘नवदृष्टी’ देणारे कार्य प्रेरणादायी; मंगळग्रह सेवा संस्थेचे योगदान गौरवास्पद : पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे मंगळग्रह सेवा संस्था व आर. जे. शंकरा आय हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर; ७२ रुग्ण शस्त्रक्रियेसाठी पात्र

 

अमळनेर | प्रतिनिधी

समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असून, मंगळग्रह सेवा संस्था, अमळनेर आणि पनवेल (जि. रायगड) येथील आर. जे. शंकरा आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या अनेक वर्षांपासून राबविण्यात येत असलेले मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया अभियान हे समाजाला ‘नवदृष्टी’ देणारे अत्यंत प्रेरणादायी व गौरवास्पद कार्य आहे, असे प्रतिपादन जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले.

रविवार, दि. १९ जुलै रोजी सकाळी आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर आणि ‘सीईओ’ आर. जी. चव्हाण उपस्थित होते.

श्रीकांत धिवरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, समाजातील अनेक गरजू नागरिकांना डोळ्यांच्या उपचारांसाठी आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. अशा वेळी दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी आयोजित होणाऱ्या या मोफत शिबिरातून हजारो रुग्णांना नवजीवन आणि नवदृष्टी मिळत आहे. आतापर्यंत जवळपास १,२०० हून अधिक रुग्णांवर यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून त्यांना पुन्हा प्रकाशाची अनुभूती देण्याचे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे.

शिबिरादरम्यान नेत्रतज्ज्ञ डॉ. गुरुप्रीतसिंग राठोड, डॉ. विजय बाम्हणे, डॉ. अनिल मुंडे तसेच सहाय्यक प्राची गायकवाड आणि नेत्रा गोडवे यांनी नागरिकांची नेत्र तपासणी केली. या शिबिरात एकूण १३७ नागरिकांनी सहभाग नोंदविला. सखोल वैद्यकीय तपासणीनंतर ७२ रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले. पात्र रुग्णांची आवश्यक कागदपत्रे व वैद्यकीय नोंदणी पूर्ण करण्यात आली.

यावेळी उपस्थित रुग्णांच्या हस्ते नेत्रतज्ज्ञांचा सत्कार करण्यात आला. तसेच पात्र ठरलेल्या सर्व रुग्णांना पनवेल येथील आर. जे. शंकरा आय हॉस्पिटलमध्ये पूर्णपणे मोफत शस्त्रक्रियेसाठी पाठविण्याची व्यवस्था मंगळग्रह सेवा संस्थेच्या वतीने करण्यात आली. हे सर्व रुग्ण सायंकाळी श्री मंगळग्रह मंदिर येथून पनवेलकडे रवाना झाले. शस्त्रक्रियेनंतरचा उपचार, औषधे आणि आवश्यक वैद्यकीय सुविधा देखील रुग्णालयामार्फत मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मंगळग्रह सेवा संस्थेचे विश्वस्त मंडळ, सेवेकरी आणि वैद्यकीय पथकाने विशेष परिश्रम घेतले. उपस्थित नागरिकांनी या सामाजिक उपक्रमाचे स्वागत करत भविष्यातही अशाच आरोग्यविषयक शिबिरांचे सातत्याने आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांनी सांगितले की, “समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा मिळावी, हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर नियमितपणे आयोजित केले जाते. भविष्यातही विविध आरोग्यविषयक व समाजोपयोगी उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविले जातील.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहसचिव दिलीप बहिरम यांनी केले.

संत श्री सखाराम महाराज रोपवाटिकेची श्रीकांत धिवरे यांनी केली पाहणी

शिबिरानंतर जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सपत्नीक श्री मंगळग्रह मंदिर परिसरातील संत श्री सखाराम महाराज रोपवाटिकेला भेट दिली. यावेळी त्यांनी गांडूळ खत प्रकल्प, गोवरी निर्मिती विभाग, निसर्गसज्ज बैठक विभाग, गुलाब बाग, सेंद्रिय शेती, गोसेवा विभाग आदी उपक्रमांची सविस्तर पाहणी केली.

मंगळग्रह सेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून या विविध प्रकल्पांची माहिती जाणून घेतल्यानंतर श्रीकांत धिवरे यांनी संस्थेच्या पर्यावरणपूरक, समाजोपयोगी आणि अभिनव उपक्रमांचे तोंडभरून कौतुक करत अशा कार्यातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडत असल्याचे गौरवोद्गार काढले.

‘सुवर्णक्षणात’ जीवदानासाठी लायन्स क्लबचा पुढाकार; अमळनेर पोलिसांना स्ट्रेचर व फर्स्ट एड किट भेट ‘झिरो फॅटॅलिटी’ मोहिमेला बळ; अपघातग्रस्तांना तातडीची मदत, पोलीस ठाण्यात वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

 

अमळनेर | प्रतिनिधी

रस्ते अपघातातील जखमींना ‘सुवर्णक्षणात’ (Golden Hour) तातडीची मदत मिळून मौल्यवान जीव वाचावेत, या सामाजिक उद्देशाने लायन्स क्लब, अमळनेर यांनी जळगाव जिल्हा पोलिसांच्या ‘झिरो फॅटॅलिटी कॉन्सेप्ट’ उपक्रमाला मोलाचे बळ दिले. क्लबच्या वतीने अमळनेर शहर पोलीस ठाण्यास दोन फोल्डेबल स्ट्रेचर आणि दोन फर्स्ट एड किट बॉक्स भेट देण्यात आले.

उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या उपक्रमात पोलीस ठाण्याच्या दोन्ही शासकीय वाहनांमध्ये स्ट्रेचर व प्रथमोपचार साहित्य ठेवण्यात आले. त्यामुळे अपघातस्थळी जखमींना सुरक्षितपणे हलविणे आणि तातडीचे प्रथमोपचार देणे अधिक प्रभावी व जलद होणार आहे.

शहर व परिसरातील अपघातांमध्ये मदत करताना स्ट्रेचर व प्रथमोपचार साहित्याची कमतरता जाणवत असल्याची बाब पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत क्लबने या सूचनेची तात्काळ दखल घेत आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले.

यावेळी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम म्हणाले की, “अपघातग्रस्तांना वेळेवर मदत मिळणे हेच सर्वात मोठे समाजकार्य आहे. लायन्स क्लबने दिलेल्या स्ट्रेचर व फर्स्ट एड किटमुळे ‘सुवर्णक्षणात’ जखमींना मदत करणे अधिक परिणामकारक ठरणार असून अनेकांचे प्राण वाचविण्यास याचा निश्चितच हातभार लागेल.”

कार्यक्रमानंतर पोलीस ठाण्याच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि पर्यावरणीय असंतुलन लक्षात घेता प्रत्येकाने वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारी स्वीकारावी, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

या सामाजिक उपक्रमासाठी लायन्स क्लबचे अध्यक्ष जितेंद्र पारख, प्रोजेक्ट चेअरमन सुनील चौधरी, अभिषेक (राज) जैन, रजनीश वरलानी आणि प्रदीप पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला.

कार्यक्रमास उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, डॉ. मिलिंद नवसारीकर, महेंद्र पाटील, एस. डी. भरुचा, जितेंद्र जैन, प्रशांत सिंघवी, शेखर धनगर, डॉ. रवींद्र जैन, रवींद्र कॉलरा, प्रकाश शहा, कुमारपाल कोठारी, प्रकाश जैन, चंद्रकांत महाजन, दिनेश मणियार, दिलीप गांधी, विनोद अग्रवाल, पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, नामदेव बोरकर, शरद काकलीज, पोलीस हवालदार हितेश बेहरे, सिद्धार्थ शिसोदे, भटुसिंग तोमर, प्रमोद पाटील, योगेश बागुल यांच्यासह लायन्स क्लबचे अनेक सदस्य उपस्थित होते.

लायन्स क्लबच्या या सामाजिक योगदानाबद्दल पोलीस प्रशासनाने समाधान व्यक्त करत, सामाजिक संस्था आणि पोलीस प्रशासनाच्या अशा समन्वयातून अपघातग्रस्तांना वेळेत मदत मिळून ‘झिरो फॅटॅलिटी’चे उद्दिष्ट साध्य करण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला.

अमळनेरच्या भैय्यासाहेब मगर यांची महाराष्ट्र राज्य पीटीए क्लासेस संघटनेच्या कार्याध्यक्षपदी निवड साई इंग्लिश अकॅडमीच्या संचालकांवर राज्यस्तरीय जबाबदारी; शिक्षण क्षेत्रातील कार्याची दखल, अमळनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा

 

अमळनेर : शिक्षण क्षेत्रात सातत्यपूर्ण कार्य, प्रभावी नेतृत्व आणि संघटन कौशल्याच्या जोरावर अमळनेरने पुन्हा एकदा राज्यस्तरावर आपला ठसा उमटविला आहे. येथील साई इंग्लिश अकॅडमी कोचिंग क्लासेसचे संचालक भैय्यासाहेब मगर यांची प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन (पीटीए) महाराष्ट्र राज्य या प्रतिष्ठित संघटनेच्या कार्याध्यक्षपदी नुकतीच निवड झाली आहे. त्यांच्या या मानाच्या निवडीमुळे अमळनेरच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव वाढला असून शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन (पीटीए) महाराष्ट्र राज्य ही राज्यातील कोचिंग क्लासेस संचालकांची सर्वांत जुनी, प्रतिष्ठित आणि शिखर संघटना म्हणून ओळखली जाते. सन २००० मध्ये स्थापन झालेल्या या संघटनेचे कार्य राज्यातील २९ जिल्ह्यांमध्ये विस्तारले असून हजारो कोचिंग क्लासेस संचालक या संघटनेचे सभासद आहेत. कोचिंग क्लासेस क्षेत्रातील विविध प्रश्न, शैक्षणिक गुणवत्ता, संस्थाचालकांचे हित आणि संघटनात्मक बळकटीसाठी ही संघटना सातत्याने कार्यरत आहे.

संघटनेच्या नव्या कार्यकारिणीत सातारा येथील डॉ. पी. कुलकर्णी यांची अध्यक्षपदी, तर वाई येथील डॉ. नितीन कदम यांची सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत भैय्यासाहेब मगर यांच्यावर कार्याध्यक्ष म्हणून महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ही निवड उत्तर महाराष्ट्रासह अमळनेरसाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.

भैय्यासाहेब मगर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या प्रसारासाठी आणि कोचिंग क्लासेस क्षेत्राच्या उन्नतीसाठी सातत्याने उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचा, प्रशासकीय अनुभवाचा आणि शैक्षणिक योगदानाचा लाभ आता राज्यभरातील कोचिंग क्लासेस संचालकांना मिळणार असल्याचा विश्वास शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केला आहे.

या मानाच्या निवडीनंतर भैय्यासाहेब मगर यांच्यावर शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, कोचिंग क्लासेस संचालक, विविध सामाजिक संस्था, विद्यार्थी आणि पालक यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

तणावमुक्त जीवनशैलीच निरोगी आरोग्याचा पाया; सकारात्मक विचार व सात्त्विक आहाराची गरज : हेमंतकुमार भदाणे श्री मंगळग्रह मंदिरात आयसीडीएसची जिल्हास्तरीय कार्यशाळा; जळगाव जिल्ह्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती

 

अमळनेर : आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक जीवनशैलीमुळे तणाव प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. त्यातच बदलती आहारशैली, फास्टफूडचे वाढते प्रमाण आणि मानसिक तणाव यामुळे अनेक शारीरिक व मानसिक आजारांना आमंत्रण मिळत आहे. त्यामुळे सकारात्मक विचार, सात्त्विक आहार, नियमित दिनचर्या आणि मानसिक संतुलन यांचा अंगीकार केल्यासच निरोगी व आनंदी जीवन जगता येईल, असे प्रतिपादन जळगाव जिल्हा कार्यक्रम अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हेमंतकुमार भदाणे यांनी केले.

येथील श्री मंगळग्रह मंदिरात शनिवार, दि. १८ जुलै रोजी एकात्मिक बालविकास सेवा योजना (आयसीडीएस) अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कार्यशाळेत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यशाळेला जळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील बालविकास प्रकल्प अधिकारी (सीडीपीओ), पर्यवेक्षिका तसेच महिला व बालविकास विभागातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना हेमंतकुमार भदाणे यांनी तणाव व्यवस्थापन, मानसिक आरोग्य, सकारात्मक विचारसरणी, संतुलित आहार आणि निरोगी जीवनशैली या विषयांवर प्रभावी उदाहरणांसह मार्गदर्शन केले. बदलत्या जीवनशैलीत मानसिक स्वास्थ्य जपण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित करत उपस्थितांना दैनंदिन जीवनात आरोग्यदायी सवयी अंगीकारण्याचे आवाहन केले.

यावेळी त्यांनी श्री मंगळग्रह मंदिराचे धार्मिक, सामाजिक व ऐतिहासिक महत्त्व विशद केले. तसेच मंदिरामार्फत समाजहितासाठी सातत्याने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देत अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक परिवर्तन घडत असल्याचे सांगितले.

कार्यक्रमात मंगळग्रह सेवा संस्थेचे सहसचिव दिलीप बहिरम यांनी मनोगत व्यक्त करत अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या नेतृत्वाखाली संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहिती दिली. तसेच श्री मंगळग्रह मंदिरातील पूजाविधी, धार्मिक परंपरा आणि सामाजिक उपक्रमांवरही त्यांनी प्रकाश टाकला.

कार्यक्रमात अमळनेरच्या सीडीपीओ सौ. हेमलताताई पाटील, पर्यवेक्षिका सौ. सुजाताताई चौधरी, सौ. भाग्यश्रीताई पाटील, श्रीमती प्रीतीताई देवरे तसेच त्यांच्या सहकाऱ्यांचा हेमंतकुमार भदाणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी सौ. वर्षा भदाणे, पाचोऱ्याच्या सीडीपीओ संत मॅडम, जळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील सीडीपीओ, पर्यवेक्षिका व महिला व बालविकास विभागातील अधिकारी उपस्थित होते. तसेच मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, विश्वस्त डी. एस. सोनवणे, मंगल सेवेकरी आर. टी. पाटील, व्ही. व्ही. कुलकर्णी, नंदू कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगळग्रह सेवा संस्थेचे जनसंपर्क अधिकारी शरद कुलकर्णी यांनी केले, तर श्रीमती प्रीतीताई देवरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

 

लायन्स क्लब अमळनेरचा सामाजिक पुढाकार ३७ तीव्र कुपोषित बालकांना पोषण आहाराचे वाटप; ग्रामीण भागातील मातांना बसभाड्याचीही मदत

 

अमळनेर | प्रतिनिधी

तालुक्यातील कुपोषणाच्या गंभीर समस्येची दखल घेत लायन्स क्लब, अमळनेर यांनी समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी पुन्हा एकदा सिद्ध केली. जून २०२६ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात अमळनेर तालुक्यात ३७ बालके तीव्र कुपोषित (SAM) आणि २१४ बालके मध्यम कुपोषित (MAM) असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले होते. या पार्श्वभूमीवर ९ जुलै रोजी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत लायन्स क्लबने पुढाकार घेत ३७ तीव्र कुपोषित बालकांना पोषण आहाराचे वाटप केले.

शुक्रवारी (दि. १७) सकाळी जी. एस. हायस्कूल येथील लायन्स हॉलमध्ये झालेल्या या उपक्रमात प्रत्येक बालकाला २०० ग्रॅम प्रोटीन पावडर आणि राजगिरा लाडू देण्यात आले. विशेष म्हणजे, दूरवरच्या ग्रामीण भागातून आलेल्या सर्व मातांना लायन सुनील चौधरी यांच्या वतीने बसभाडे देऊन आर्थिक मदतीचाही हात पुढे करण्यात आला.

कार्यक्रमाला जिल्हा परिषद, जळगावचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी हेमंतराव भदाणे, पंचायत समिती, अमळनेरचे गटविकास अधिकारी एन. आर. पाटील, बालविकास प्रकल्प अधिकारी प्रेमलता पाटील, लायन्स क्लबचे अध्यक्ष जितेंद्र पारख, ज्येष्ठ लायन डॉ. डिगंबर महाले, प्रोजेक्ट चेअरमन डॉ. संदीप जोशी, महेंद्र पाटील, तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि लायन्स क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेमंतराव भदाणे यांनी कुपोषण ही केवळ उपचारांची नव्हे, तर सामाजिक आणि आरोग्यविषयक जाणीवेची समस्या असल्याचे सांगितले. गर्भधारणेपासून प्रसूतीपर्यंत माता व बालकाच्या पोषणाची विशेष काळजी घेणे, बालकांना पचनशक्ती वाढविणारा सकस आहार देणे आणि कुटुंब नियोजनाबाबत प्रभावी जनजागृती करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच अशा सेवाभावी कार्यासाठी लायन्स क्लब, अमळनेरचे विशेष कौतुक करत समाजसेवेचा हा वसा अखंड सुरू ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.

ज्येष्ठ लायन डॉ. डिगंबर महाले यांनी, “समाजातील वंचित, गरजू आणि गरजवंत घटकांच्या मदतीसाठी लायन्स क्लब नेहमीच अग्रस्थानी राहिला आहे. समाजसेवा हीच आमची खरी ओळख आणि परंपरा आहे,” असे सांगितले.

अध्यक्ष जितेंद्र पारख यांनी भविष्यातही अशा सामाजिक आणि लोकहिताच्या उपक्रमांसाठी लायन्स क्लब सदैव तत्पर राहील, अशी ग्वाही देत गरजूंसाठी मदतीचे दरवाजे कायम खुले असल्याचे नमूद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मिलिंद नवसारीकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रेमलता पाटील यांनी मानले.

यावेळी सुनील चौधरी, दिनेश मणियार, चंद्रकांत महाजन, विजय पारख, प्रितेश पारख, जितेंद्र जैन, महावीर पहाडे, प्रदीप जैन, प्रकाश जैन, राज जैन, रोनक दोधिवाला यांच्यासह लायन्स क्लबचे अनेक सदस्य उपस्थित होते.

पी. बी. ए. इंग्लिश मिडीयम स्कूलचा ४९ वा स्थापना दिवस जल्लोषात; विद्यार्थ्यांच्या उत्साहात दुमदुमले शाळेचे प्रांगण

 

अमळनेर : शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता, संस्कार आणि सर्वांगीण विकासाची परंपरा जपणाऱ्या पी. बी. ए. इंग्लिश मिडीयम स्कूलचा ४९ वा स्थापना दिवस (वर्धापन दिन) अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. रंगीबेरंगी फुगे, आकर्षक तोरणे, पुष्पपाकळ्यांच्या रांगोळ्या आणि मनमोहक सजावटीने नटलेल्या शाळा परिसरात विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी या ऐतिहासिक सोहळ्याचा आनंद लुटला.

सकाळच्या मंगलमय वातावरणात शाळेचे प्रांगण उत्सवी स्वरूपात सजविण्यात आले होते. प्रवेशद्वारावर स्वागत रांगोळ्या काढून मान्यवर अतिथी आणि पालकांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे सर्व विद्यार्थी मोठ्या उत्साहाने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर म्हणून शाळा पालक-शिक्षक समितीचे उपाध्यक्ष इंजिनिअर कमलेश जिजाबराव महाजन तसेच सहसचिव ॲडव्होकेट मीनाक्षी विशाल राठोड उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची मंगल सुरुवात करण्यात आली.

यावेळी शाळेच्या शिक्षकांनी संस्थेच्या गौरवशाली ४९ वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेत शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय यशस्वी वाटचालीवर प्रकाश टाकला. शाळेच्या प्रगतीचा इतिहास आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या कार्याची माहिती प्रभावी शब्दांत मांडण्यात आली.

कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे शाळेच्या नामफलकाची आकर्षक कलाकृती फुग्यांच्या माध्यमातून आकाशात झेपावण्याचा सोहळा. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी जल्लोषात “पी. बी. ए. इंग्लिश मिडीयम स्कूल चिरायू होवो” अशा घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना उपहार म्हणून पेढ्यांचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमासाठी करण्यात आलेली आकर्षक सजावट, परिसर सुशोभीकरण, फलक लेखन व कलात्मक मांडणी कलाशिक्षक अनंत बागल यांनी साकारली. कार्यक्रमाचे प्रभावी प्रास्ताविक व सूत्रसंचालन व्ही. जी. बोरोले यांनी केले.

या यशस्वी सोहळ्यासाठी शाळेचे चेअरमन डॉ. संदेश गुजराथी, मुख्याध्यापक जे. एस. देवरे, पर्यवेक्षक महेश माळी, पर्यवेक्षिका मीनाक्षी बारी, व्ही. एस. अमृतकर, व्ही. पी. बडवे, प्रशांत वंजारी, अशोक महाजन, विनायक सूर्यवंशी, सविता पारधी, राजश्री पाटील, वाय. पी. ओवे, रोहन मुंदडा तसेच समस्त शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.

४९ वर्षांची यशस्वी परंपरा, गुणवत्तापूर्ण शिक्षणाची अखंड वाटचाल आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असलेली कटिबद्धता याचा प्रत्यय या भव्य व प्रेरणादायी स्थापना दिन सोहळ्यातून पुन्हा एकदा आला.

लोकवर्गणी व पाणीपट्टीवरील २% व्याजाविरोधात ग्राहक पंचायत पुन्हा आक्रमक; मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

 

अमळनेर | प्रतिनिधी

अमळनेर नगरपरिषदेकडून नागरिकांकडून आकारली जाणारी ‘लोकवर्गणी’ आणि पाणीपट्टीवरील वार्षिक शुल्कावर लावण्यात येणारे २ टक्के व्याज या दोन्ही मुद्द्यांवर अखिल भारतीय ग्राहक पंचायत, अमळनेर पुन्हा एकदा आक्रमक झाली असून, या दोन्ही वसुली तात्काळ बंद करण्याची मागणी करत मुख्याधिकारी श्री. गणेश शिंदे यांना शुक्रवारी (दि. १७ जुलै) निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अमळनेर नगरपरिषद गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांकडून ‘लोकवर्गणी’ या नावाखाली कोणताही कायदेशीर आधार नसताना बेकायदेशीर व बळजबरीची वसुली करत आहे. त्यामुळे ही आकारणी तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.

यासोबतच, सन २०२४-२५ पासून आर्थिक वर्ष ३१ मार्चला संपत असतानाही नगरपरिषद ३१ डिसेंबरपासूनच पाणीपट्टीच्या वार्षिक शुल्कावर २ टक्के दराने व्याज आकारत आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे ही व्याज आकारणीही त्वरित रद्द करावी, अशी मागणी ग्राहक पंचायतने केली आहे.

निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, दि. १७ डिसेंबर २०२४, २२ एप्रिल २०२५ आणि ६ फेब्रुवारी २०२६ रोजी याच विषयावर दिलेल्या निवेदनांनंतर प्रशासनाकडून ‘यापुढे लोकवर्गणी व २ टक्के व्याज आकारले जाणार नाही’ असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढत असल्याचे ग्राहक पंचायतने स्पष्ट केले आहे.

दोन्ही प्रकारची वसुली तात्काळ थांबवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी ग्राहक पंचायतने निवेदनाद्वारे केली. यावेळी मुख्याधिकारी श्री. गणेश शिंदे यांनी या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत योग्य निर्णय केला जाईल, अशी ग्वाही दिली.

याप्रसंगी अखिल भारतीय ग्राहक पंचायत तर्फे अ‍ॅड. भारती अग्रवाल, सौ. कपीला मुठे, मकसूद बोहरी, विजय शुक्ल, सुनील वाघ, सतीश देशमुख तसेच ज्येष्ठ पत्रकार व कवी-लेखक सुभाष पाटील घोडगावकर यांच्यासह ग्राहक पंचायतचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोक वर्गणी व पाणीपट्टीवरील दोन टक्के व्याज हा विषय पुन्हा ऐरणीवर _अखिल भारतीय ग्राहक पंचायत, अमळनेर चे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

*अमळनेर -दि. १७ जुलै २०२६ रोजी

अखिल भारतीय ग्राहक पंचायत, अमळनेर च्या वतीने आज नगरपरिषदेचे *मुख्याधिकारी श्री. गणेश शिंदे साहेब* यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, अमळनेर नगरपरिषद गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांकडून “लोक वर्गणी” या नावाखाली बेकायदेशीर व बळजबरीने कर वसुली करीत आहे. सदर वसुलीस कोणताही कायदेशीर आधार नसल्याने ती त्वरित रद्द करण्यात यावी.

तसेच सन २०२४-२०२५ पासून नगरपरिषद आर्थिक वर्ष ३१ मार्च रोजी संपत असतानाही ३१ डिसेंबर पासूनच पाणीपट्टीच्या वार्षिक शुल्कावर २% दराने व्याज आकारत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. तरी पाणीपट्टीवरील २% व्याज आकारणी देखील रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दिनांक १७/१२/२०२४ व २२/४/२०२५ आणि ०६/०२/२०२६ रोजी दिलेल्या निवेदनावेळी “पुढील काळात लोक वर्गणी व २% व्याज आकारणी केली जाणार नाही” असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्याप त्याबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

तरी नगरपरिषदेने तातडीने याची दखल घेऊन दोन्ही वसुली बंद करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मुख्याधिकारी श्री शिंदे साहेब यांनी या प्रसंगी आम्ही सकारात्मक योग्य निर्णय घेऊ अशी ग्वाही दिली. 

*याप्रसंगी* अखिल भारतीय ग्राहक पंचायत तर्फे *अ‍ॅड. भारती अग्रवाल, सौ. कपीला मुठे, मकसूद बोहरी, विजय शुक्ल, सुनील वाघ, सतीश देशमुख* व *ज्येष्ठ पत्रकार व कवी-लेखक सुभाष पाटील घोडगावकर* यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पी. बी. ए. इंग्लिश मिडीयम स्कूल चा 49 वा स्थापना दिवस उत्साहाच्या आनंदाच्या वातावरणात साजरा करीत संपन्न

पी. बी. ए. इंग्लिश मिडीयम स्कूलचा 49 वा स्थापना दिवस (वर्धापन दिन) उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरणात संपन्न झाला. सकाळच्या मंगल प्रहरीच्या वातावरणात समस्त शाळेचे प्रांगण व मंच आकर्षक फुग्यांनी तोरणांनी व सुंदर आकर्षक पुष्प पाकळ्यांच्या रांगोळ्यांनी सज्जित करण्यात आला होता. शाळेच्या प्रांगणात सडा रांगोळ्या टाकून प्रवेशद्वाराजवळ स्वागत रांगोळ्या टाकून मान्यवर अतिथींचे पालकांचे अभिनव पद्धतीने स्वागत करण्यात येत होते. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी इयत्ता 1ली ते 10 वी पर्यंतचे समस्त विद्यार्थी आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर अतिथी म्हणून शाळा पालक शिक्षक समितीचे उपाध्यक्ष इंजिनिअर कमलेश जिजाबराव महाजन, सहसचिव ॲडव्होकेट मीनाक्षी विशाल राठोड हे होते. मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन दीप प्रज्वलन व माल्यार्पण करून करण्यात आले. शाळेचे मान्यवर शिक्षकांनी शाळेच्या गौरवशाली इतिहास व त्या कालखंडात सुवर्णमय स्वरूपात घडलेली कामगिरी या बाबींवर प्रकाशझोत टाकून अलंकारिक भाषेत मनोगत प्रकट केले. तसेच मान्यवरांच्या शुभहस्ते शाळेचे नाम फलक तयार केलेले कलाकृतीला फुग्याच्या माध्यमातून आकाशात सोडण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांना एक जल्लोष करीत वर्धापन दिन चिरायू होवो अशा घोषणा देऊन आकाश निदादून सोडले. या कार्यक्रमानिमित्त विद्यार्थ्यांना उपहार स्वरूपात पेढे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी आकर्षक सजावट कलाकृती व परिसर सुशोभीकरण फलक लेखन कलाशिक्षक अनंत बागल यांनी केले प्रास्ताविक सूत्रसंचालन व्ही. जी. बोरोले यांनी केले .
सदर कार्यक्रमासाठी अनमोल सहकार्य मार्गदर्शन शाळेचे चेअरमन डॉ. संदेश गुजराथी ,मुख्याध्यापक जे.एस. देवरे, पर्यवेक्षक महेश माळी, पर्यवेक्षिका मीनाक्षी बारी , व्ही.एस. अमृतकर, व्ही.पी .बडवे, प्रशांत वंजारी,अशोक महाजन, विनायक सूर्यवंशी, सविता पारधी, राजश्री पाटील, वाय. पी. ओवे, रोहन मुंदडा समस्त शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे लाभले.

भंते नागसेन यांच्या नेतृत्वात जळगाव ते धुळे लांडोर बंगला ‘ भीमस्मृती धम्म पदयात्रा ‘

 

जळगाव( प्रतिनिधी) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक स्मृतींना अभिवादन करत सामाजिक समता, बंधुता, बौद्ध धम्म आणि भारतीय संविधानातील मूल्यांचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने भंते, नागसेन ( सातपुडा पर्वत) यांच्या नेतृत्वाखाली जळगाव ते धुळे लांडोर बंगला भीमस्मृती धम्म पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही पदयात्रा दिनांक 21 जुलै रोजी सकाळी आठ वाजता जळगाव येथील विश्व रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून प्रारंभ होणार आहे.

                ही पदयात्रा दिनांक 21 जुलै ते 31 जुलै २०२६ या कालावधीत सुमारे 200 किलोमीटरचा प्रवास पायी पूर्ण करत पदयात्रेचा समारोप धुळे येथील लांडोर बंगला येथे होणार आहे. या पदयात्रेला पूज्य गुरुजी ज्ञानज्योती महाथेरो ( ताडोबा अभयारण्य, चंद्रपूर ) यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच देशभरातील अनेक मान्यवर भिक्खू संघ या पदयात्रेत सहभागी होणार असून त्यामध्ये भंते प्रियबोधी, भंते चार धम्मो, भंते सुगद बोधि, भंते सागर बोधी, भंते धम्म ज्योती, भंते आनंद, भंते धम्मदत्त, भंते संघरक्षित, भंते आर्यनाग, भंते सुमित बोधी यांचा समावेश आहे. याशिवाय मोठ्या संख्येने बुद्ध अनुयायी, उपासक उपासिका आणि भीमसैनिक या पदयात्रेत सहभागी होणार आहेत.

               या ऐतिहासिक पदयात्रेचा समारोप दिनांक 31 जुलै रोजी धुळे येथील लांडोर बंगला परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला अभिवादन करून होणार आहे. ही पदयात्रा खानदेशातील सामाजिक, धार्मिक, प्रबोधनात्मक चळवळीला नवी दिशा देणारी ठरेल असा विश्वास असून या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.