ब्रेकिंग
लोकवर्गणी व पाणीपट्टीवरील २% व्याजाविरोधात ग्राहक पंचायत पुन्हा आक्रमक; मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

 

अमळनेर | प्रतिनिधी

अमळनेर नगरपरिषदेकडून नागरिकांकडून आकारली जाणारी ‘लोकवर्गणी’ आणि पाणीपट्टीवरील वार्षिक शुल्कावर लावण्यात येणारे २ टक्के व्याज या दोन्ही मुद्द्यांवर अखिल भारतीय ग्राहक पंचायत, अमळनेर पुन्हा एकदा आक्रमक झाली असून, या दोन्ही वसुली तात्काळ बंद करण्याची मागणी करत मुख्याधिकारी श्री. गणेश शिंदे यांना शुक्रवारी (दि. १७ जुलै) निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अमळनेर नगरपरिषद गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांकडून ‘लोकवर्गणी’ या नावाखाली कोणताही कायदेशीर आधार नसताना बेकायदेशीर व बळजबरीची वसुली करत आहे. त्यामुळे ही आकारणी तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.

यासोबतच, सन २०२४-२५ पासून आर्थिक वर्ष ३१ मार्चला संपत असतानाही नगरपरिषद ३१ डिसेंबरपासूनच पाणीपट्टीच्या वार्षिक शुल्कावर २ टक्के दराने व्याज आकारत आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे ही व्याज आकारणीही त्वरित रद्द करावी, अशी मागणी ग्राहक पंचायतने केली आहे.

निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, दि. १७ डिसेंबर २०२४, २२ एप्रिल २०२५ आणि ६ फेब्रुवारी २०२६ रोजी याच विषयावर दिलेल्या निवेदनांनंतर प्रशासनाकडून ‘यापुढे लोकवर्गणी व २ टक्के व्याज आकारले जाणार नाही’ असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढत असल्याचे ग्राहक पंचायतने स्पष्ट केले आहे.

दोन्ही प्रकारची वसुली तात्काळ थांबवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी ग्राहक पंचायतने निवेदनाद्वारे केली. यावेळी मुख्याधिकारी श्री. गणेश शिंदे यांनी या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत योग्य निर्णय केला जाईल, अशी ग्वाही दिली.

याप्रसंगी अखिल भारतीय ग्राहक पंचायत तर्फे अ‍ॅड. भारती अग्रवाल, सौ. कपीला मुठे, मकसूद बोहरी, विजय शुक्ल, सुनील वाघ, सतीश देशमुख तसेच ज्येष्ठ पत्रकार व कवी-लेखक सुभाष पाटील घोडगावकर यांच्यासह ग्राहक पंचायतचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *