समाजातील दुर्बलांना ‘नवदृष्टी’ देणारे कार्य प्रेरणादायी; मंगळग्रह सेवा संस्थेचे योगदान गौरवास्पद : पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे मंगळग्रह सेवा संस्था व आर. जे. शंकरा आय हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर; ७२ रुग्ण शस्त्रक्रियेसाठी पात्र
अमळनेर | प्रतिनिधी
समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असून, मंगळग्रह सेवा संस्था, अमळनेर आणि पनवेल (जि. रायगड) येथील आर. जे. शंकरा आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या अनेक वर्षांपासून राबविण्यात येत असलेले मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया अभियान हे समाजाला ‘नवदृष्टी’ देणारे अत्यंत प्रेरणादायी व गौरवास्पद कार्य आहे, असे प्रतिपादन जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले.
रविवार, दि. १९ जुलै रोजी सकाळी आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर आणि ‘सीईओ’ आर. जी. चव्हाण उपस्थित होते.
श्रीकांत धिवरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, समाजातील अनेक गरजू नागरिकांना डोळ्यांच्या उपचारांसाठी आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. अशा वेळी दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी आयोजित होणाऱ्या या मोफत शिबिरातून हजारो रुग्णांना नवजीवन आणि नवदृष्टी मिळत आहे. आतापर्यंत जवळपास १,२०० हून अधिक रुग्णांवर यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून त्यांना पुन्हा प्रकाशाची अनुभूती देण्याचे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे.
शिबिरादरम्यान नेत्रतज्ज्ञ डॉ. गुरुप्रीतसिंग राठोड, डॉ. विजय बाम्हणे, डॉ. अनिल मुंडे तसेच सहाय्यक प्राची गायकवाड आणि नेत्रा गोडवे यांनी नागरिकांची नेत्र तपासणी केली. या शिबिरात एकूण १३७ नागरिकांनी सहभाग नोंदविला. सखोल वैद्यकीय तपासणीनंतर ७२ रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले. पात्र रुग्णांची आवश्यक कागदपत्रे व वैद्यकीय नोंदणी पूर्ण करण्यात आली.
यावेळी उपस्थित रुग्णांच्या हस्ते नेत्रतज्ज्ञांचा सत्कार करण्यात आला. तसेच पात्र ठरलेल्या सर्व रुग्णांना पनवेल येथील आर. जे. शंकरा आय हॉस्पिटलमध्ये पूर्णपणे मोफत शस्त्रक्रियेसाठी पाठविण्याची व्यवस्था मंगळग्रह सेवा संस्थेच्या वतीने करण्यात आली. हे सर्व रुग्ण सायंकाळी श्री मंगळग्रह मंदिर येथून पनवेलकडे रवाना झाले. शस्त्रक्रियेनंतरचा उपचार, औषधे आणि आवश्यक वैद्यकीय सुविधा देखील रुग्णालयामार्फत मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मंगळग्रह सेवा संस्थेचे विश्वस्त मंडळ, सेवेकरी आणि वैद्यकीय पथकाने विशेष परिश्रम घेतले. उपस्थित नागरिकांनी या सामाजिक उपक्रमाचे स्वागत करत भविष्यातही अशाच आरोग्यविषयक शिबिरांचे सातत्याने आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांनी सांगितले की, “समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा मिळावी, हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर नियमितपणे आयोजित केले जाते. भविष्यातही विविध आरोग्यविषयक व समाजोपयोगी उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविले जातील.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहसचिव दिलीप बहिरम यांनी केले.
संत श्री सखाराम महाराज रोपवाटिकेची श्रीकांत धिवरे यांनी केली पाहणी
शिबिरानंतर जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सपत्नीक श्री मंगळग्रह मंदिर परिसरातील संत श्री सखाराम महाराज रोपवाटिकेला भेट दिली. यावेळी त्यांनी गांडूळ खत प्रकल्प, गोवरी निर्मिती विभाग, निसर्गसज्ज बैठक विभाग, गुलाब बाग, सेंद्रिय शेती, गोसेवा विभाग आदी उपक्रमांची सविस्तर पाहणी केली.
मंगळग्रह सेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून या विविध प्रकल्पांची माहिती जाणून घेतल्यानंतर श्रीकांत धिवरे यांनी संस्थेच्या पर्यावरणपूरक, समाजोपयोगी आणि अभिनव उपक्रमांचे तोंडभरून कौतुक करत अशा कार्यातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडत असल्याचे गौरवोद्गार काढले.



