अमळनेरच्या भैय्यासाहेब मगर यांची महाराष्ट्र राज्य पीटीए क्लासेस संघटनेच्या कार्याध्यक्षपदी निवड साई इंग्लिश अकॅडमीच्या संचालकांवर राज्यस्तरीय जबाबदारी; शिक्षण क्षेत्रातील कार्याची दखल, अमळनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा
अमळनेर : शिक्षण क्षेत्रात सातत्यपूर्ण कार्य, प्रभावी नेतृत्व आणि संघटन कौशल्याच्या जोरावर अमळनेरने पुन्हा एकदा राज्यस्तरावर आपला ठसा उमटविला आहे. येथील साई इंग्लिश अकॅडमी कोचिंग क्लासेसचे संचालक भैय्यासाहेब मगर यांची प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन (पीटीए) महाराष्ट्र राज्य या प्रतिष्ठित संघटनेच्या कार्याध्यक्षपदी नुकतीच निवड झाली आहे. त्यांच्या या मानाच्या निवडीमुळे अमळनेरच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव वाढला असून शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन (पीटीए) महाराष्ट्र राज्य ही राज्यातील कोचिंग क्लासेस संचालकांची सर्वांत जुनी, प्रतिष्ठित आणि शिखर संघटना म्हणून ओळखली जाते. सन २००० मध्ये स्थापन झालेल्या या संघटनेचे कार्य राज्यातील २९ जिल्ह्यांमध्ये विस्तारले असून हजारो कोचिंग क्लासेस संचालक या संघटनेचे सभासद आहेत. कोचिंग क्लासेस क्षेत्रातील विविध प्रश्न, शैक्षणिक गुणवत्ता, संस्थाचालकांचे हित आणि संघटनात्मक बळकटीसाठी ही संघटना सातत्याने कार्यरत आहे.
संघटनेच्या नव्या कार्यकारिणीत सातारा येथील डॉ. पी. कुलकर्णी यांची अध्यक्षपदी, तर वाई येथील डॉ. नितीन कदम यांची सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत भैय्यासाहेब मगर यांच्यावर कार्याध्यक्ष म्हणून महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ही निवड उत्तर महाराष्ट्रासह अमळनेरसाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.
भैय्यासाहेब मगर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या प्रसारासाठी आणि कोचिंग क्लासेस क्षेत्राच्या उन्नतीसाठी सातत्याने उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचा, प्रशासकीय अनुभवाचा आणि शैक्षणिक योगदानाचा लाभ आता राज्यभरातील कोचिंग क्लासेस संचालकांना मिळणार असल्याचा विश्वास शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केला आहे.
या मानाच्या निवडीनंतर भैय्यासाहेब मगर यांच्यावर शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, कोचिंग क्लासेस संचालक, विविध सामाजिक संस्था, विद्यार्थी आणि पालक यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.



