तणावमुक्त जीवनशैलीच निरोगी आरोग्याचा पाया; सकारात्मक विचार व सात्त्विक आहाराची गरज : हेमंतकुमार भदाणे श्री मंगळग्रह मंदिरात आयसीडीएसची जिल्हास्तरीय कार्यशाळा; जळगाव जिल्ह्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती
अमळनेर : आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक जीवनशैलीमुळे तणाव प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. त्यातच बदलती आहारशैली, फास्टफूडचे वाढते प्रमाण आणि मानसिक तणाव यामुळे अनेक शारीरिक व मानसिक आजारांना आमंत्रण मिळत आहे. त्यामुळे सकारात्मक विचार, सात्त्विक आहार, नियमित दिनचर्या आणि मानसिक संतुलन यांचा अंगीकार केल्यासच निरोगी व आनंदी जीवन जगता येईल, असे प्रतिपादन जळगाव जिल्हा कार्यक्रम अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हेमंतकुमार भदाणे यांनी केले.
येथील श्री मंगळग्रह मंदिरात शनिवार, दि. १८ जुलै रोजी एकात्मिक बालविकास सेवा योजना (आयसीडीएस) अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कार्यशाळेत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यशाळेला जळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील बालविकास प्रकल्प अधिकारी (सीडीपीओ), पर्यवेक्षिका तसेच महिला व बालविकास विभागातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना हेमंतकुमार भदाणे यांनी तणाव व्यवस्थापन, मानसिक आरोग्य, सकारात्मक विचारसरणी, संतुलित आहार आणि निरोगी जीवनशैली या विषयांवर प्रभावी उदाहरणांसह मार्गदर्शन केले. बदलत्या जीवनशैलीत मानसिक स्वास्थ्य जपण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित करत उपस्थितांना दैनंदिन जीवनात आरोग्यदायी सवयी अंगीकारण्याचे आवाहन केले.
यावेळी त्यांनी श्री मंगळग्रह मंदिराचे धार्मिक, सामाजिक व ऐतिहासिक महत्त्व विशद केले. तसेच मंदिरामार्फत समाजहितासाठी सातत्याने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देत अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक परिवर्तन घडत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमात मंगळग्रह सेवा संस्थेचे सहसचिव दिलीप बहिरम यांनी मनोगत व्यक्त करत अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या नेतृत्वाखाली संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहिती दिली. तसेच श्री मंगळग्रह मंदिरातील पूजाविधी, धार्मिक परंपरा आणि सामाजिक उपक्रमांवरही त्यांनी प्रकाश टाकला.
कार्यक्रमात अमळनेरच्या सीडीपीओ सौ. हेमलताताई पाटील, पर्यवेक्षिका सौ. सुजाताताई चौधरी, सौ. भाग्यश्रीताई पाटील, श्रीमती प्रीतीताई देवरे तसेच त्यांच्या सहकाऱ्यांचा हेमंतकुमार भदाणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी सौ. वर्षा भदाणे, पाचोऱ्याच्या सीडीपीओ संत मॅडम, जळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील सीडीपीओ, पर्यवेक्षिका व महिला व बालविकास विभागातील अधिकारी उपस्थित होते. तसेच मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, विश्वस्त डी. एस. सोनवणे, मंगल सेवेकरी आर. टी. पाटील, व्ही. व्ही. कुलकर्णी, नंदू कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगळग्रह सेवा संस्थेचे जनसंपर्क अधिकारी शरद कुलकर्णी यांनी केले, तर श्रीमती प्रीतीताई देवरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.



