ब्रेकिंग
महापुराच्या संकटात रोटरीचा मदतीचा हात; पूरग्रस्तांना फूड पॅकेट व कपड्यांचे वाटप

 

नदीकाठ व गांधलीपुरा परिसरातील सुमारे ६० गरजू नागरिकांना तातडीची मदत; “संकटाच्या काळात समाजाच्या पाठीशी उभे राहणे हीच रोटरीची खरी ओळख” – रोटे. महेश पाटील

अमळनेर | प्रतिनिधी

दि. ३१ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे अमळनेर शहरासह परिसरातील अनेक भाग जलमय झाले. अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर गरजू व संकटग्रस्त कुटुंबांना तातडीने दिलासा देण्यासाठी रोटरी क्लब अमळनेरने सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे केला.

दि. २ व ३ ऑगस्ट २०२६ रोजी रोटरी क्लबच्या वतीने नदीकाठ व गांधलीपुरा परिसरातील सुमारे ६० गरजू नागरिकांना फूड पॅकेटचे वितरण करण्यात आले. याशिवाय लहान बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत गरजूंसाठी कपड्यांचेही वाटप करण्यात आले. संकटाच्या काळात तातडीने मदत पोहोचविल्याने अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला.

या सेवाभावी उपक्रमावेळी क्लबचे अध्यक्ष रोटे. महेश पाटील, चेलाराम सैनानी, विजय माहेश्वरी, अभिजीत भांडारकर, डॉ. राहुल मुठे, प्रीतपाल सिंग बग्गा, रोहित सिंघवी, राजेश बेदमुथा, कीर्ती कुमार कोठारी, पूनम कोचर, सौरभ जैन, प्रतिक जैन, देवेंद्र कोठारी, प्रतीक खंडेरिया, विनोद थोरात, सचिन चोपडा, किरण कुंभार तसेच अन्य रोटरी सभासद उपस्थित होते.

या मदतकार्याचे नियोजन अभिजीत भांडारकर, देवेंद्र कोठारी व रोनक संकलेचा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. त्यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने फूड पॅकेट व कपड्यांचे वितरण करण्यात आले.

यावेळी बोलताना रोटे. महेश पाटील म्हणाले, “संकटाच्या काळात समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे हीच रोटरीची खरी ओळख आहे. गरजूंच्या मदतीसाठी रोटरी क्लब भविष्यातही अशाच प्रकारे सदैव तत्पर राहील.”

वरील वृत्त पी.आर.ओ. मकसूद बोहरी यांनी कळविले आहे.

स्मार्ट मीटरच्या वाढत्या तक्रारींवर अखिल भारतीय ग्राहक पंचायत आक्रमक; महावितरणला निवेदन देत पारदर्शकतेची जोरदार मागणी दुप्पट-तिप्पट वीज बिलांमुळे ग्राहकांमध्ये संताप; जनजागृतीसाठी कार्यशाळा घेण्याची अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांची ग्वाही

 

अमळनेर | प्रतिनिधी

स्मार्ट मीटर बसविल्यानंतर अनेक ग्राहकांना दुप्पट-तिप्पट वीज बिले येत असल्याच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेरच्या वतीने महावितरण वीज कंपनी लिमिटेड, अमळनेर उपविभाग-१ चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता मान. धनंजय धांडे साहेब यांना मंगळवारी (४ ऑगस्ट २०२६) सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महावितरणकडून सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संभ्रम व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी जुने मीटर बदलून स्मार्ट मीटर बसविल्यानंतर ग्राहकांना पूर्वीच्या तुलनेत दुप्पट-तिप्पट वीज बिले येत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ग्राहक संरक्षण कायदा २०१९ तसेच वीज कायदा २०२३ नुसार प्रत्येक ग्राहकाला योग्य माहिती, संपूर्ण पारदर्शकता आणि निवडीचा अधिकार मिळणे अपेक्षित आहे. मात्र स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेत आवश्यक ती पारदर्शकता दिसून येत नसल्याचा मुद्दा निवेदनातून उपस्थित करण्यात आला.

यावेळी ग्राहक पंचायतने स्मार्ट मीटरबाबत संपूर्ण व वस्तुनिष्ठ माहिती ग्राहकांना देण्यात यावी, मीटरबाबत शंका उपस्थित झाल्यास त्याची तपासणी कोणत्या अधिकृत प्रयोगशाळेत केली जाते याची माहिती पारदर्शकपणे उपलब्ध करून द्यावी, तसेच मीटर अचूक असल्यास त्याचे तांत्रिक फायदे ग्राहकांना प्रत्यक्ष तपासणीद्वारे समजावून सांगावेत, अशी मागणी केली. याशिवाय ग्राहकांच्या संमतीशिवाय जुने मीटर बदलू नयेत आणि स्मार्ट मीटरची सक्ती करू नये, अशीही ठाम भूमिका निवेदनातून मांडण्यात आली.

यावेळी मान. धनंजय धांडे साहेब यांनी ग्राहकांच्या शंका व गैरसमज दूर करण्यासाठी स्मार्ट मीटर विषयावर विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात येईल. या माध्यमातून ग्राहकांना तांत्रिक माहिती देऊन त्यांच्या सर्व संभ्रमाचे पूर्णपणे निरसन करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.

याप्रसंगी विजय शुक्ला, मकसूद बोहरी, सुनील वाघ, सतीश देशमुख, नरेंद्र बाळू पाटील, भाऊसाहेब देशमुख, दिलीप सारजे, सुभाष पाटील घोडगावकर उपस्थित होते.

 

“घाबरू नका… शासन तुमच्या पाठीशी!” – पूरग्रस्त अमळनेरला मंत्री गिरीष महाजन यांचा दिलासा महापुरानंतर शासनाची तातडीची हालचाल; पूरग्रस्तांना ₹१० हजारांची मदत, पंचनामे व पाणीपुरवठ्यासाठी विशेष निधीची घोषणा

 

अमळनेर (प्रतिनिधी): अमळनेर शहराला महापुराने दिलेल्या तडाख्यानंतर राज्य शासनाने तातडीने मदतीची भूमिका घेतली असून, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार अनिल पाटील यांनी जिल्हाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पूरग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी नागरिकांशी संवाद साधत “घाबरू नका… शासन तुमच्या पाठीशी आहे,” असा दिलासादायक संदेश देत सर्वतोपरी मदतीची ग्वाही दिली.

महापुरामुळे बाधित झालेल्या परिसराची पाहणी करताना नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. तसेच नुकसानग्रस्त कुटुंबांना तातडीने दिलासा देण्यासाठी विविध महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यात आले.

महत्त्वाचे निर्णय

प्रत्येक पात्र पूरग्रस्त कुटुंबाला तातडीची ₹१०,००० मदत देण्यात येणार.

घर, शेती, जनावरे व इतर झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे निर्देश.

शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी डीपीडीसीमधून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन.

पिंपळे नाल्यावरील अतिक्रमणांवर त्वरित कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी, पूरग्रस्त नागरिक तसेच अमळनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या प्रतिनिधींनी आपल्या अडचणी व मागण्या मंत्र्यांसमोर मांडल्या. शासन त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेईल, असे आश्वासनही देण्यात आले.

जयनिल फाऊंडेशनच्या कार्याचा गौरव

महापुराच्या भीषण संकटात स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचविणे, तसेच लायन्स क्लब, रोटरी क्लब, जैन सोशल ग्रुप आणि पत्रकार संघ यांच्या सहकार्याने पूरग्रस्तांपर्यंत अन्न व पिण्याच्या पाण्याची मदत पोहोचविल्याबद्दल जयनिल फाऊंडेशनचे अध्यक्ष गौतम अनिल पाटील व त्यांच्या संपूर्ण टीमच्या कार्याचे मंत्री गिरीष महाजन यांनी विशेष कौतुक केले.

आमदार अनिल पाटील यांची ग्वाही

यावेळी आमदार अनिल पाटील म्हणाले, “महापुरामुळे अमळनेरकरांवर मोठे संकट आले आहे. शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासह पूरग्रस्तांना शासनाची प्रत्येक योजना आणि मदत वेळेत मिळावी, यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.”

महापुराच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेला तातडीचा दिलासा, मदतीच्या घोषणा आणि पुनर्वसनासाठी सुरू झालेली यंत्रणा यामुळे पूरग्रस्त अमळनेरकरांना मोठा आधार मिळाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

नैसर्गिक आपत्तीत अमळनेरात दिसले माणुसकीचे दर्शन,   कुठे दिसला मायेचा झरा, तर कुठे दिसला मदतीचा आधार…!

अमळनेर( हृदयनाथ मोरे ) 30 जुलै च्या रात्री पडलेल्या मुसळधार पावसाने अमळनेर तालुक्यात हाहाकार माजवला. काही तासांतच नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे शहरातील अनेक भाग जलमय झाले. अनेक वर्षानंतर बोरी नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. महावितरण चे अनेक ट्रांसफार्मर पाण्याखाली गेल्यामुळे वीजपुरवठाही खंडित झाला. पावसाचा सर्वाधिक फटका कृषी उत्पन्न बाजार समितीला बसला. पिंपळे नाल्याच्या पुराच्या पाण्यामुळे बाजार समितीच्या मागील संरक्षक भिंतीला भगदाड पडून पाणी थेट आत घुसले त्यामुळे व्यापाऱ्यांच्या धान्याच्या गोण्या वाहून गेल्या काही गोण्या पाण्यात भिजल्या यात व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. धुळे रोडवरील शिवांश हब येथे पाणी घुसून दुकानातील मालाचे नुकसान झाले. गलवाडे रोड परिसर पूर्णपणे जलमय झाला होता. तसेच नदीकाठच्या परिसरातील नागरिकांचे अतोनात हाल झाले तसेच प्रचंड नुकसान झाले.

             एकंदरीतच अमळनेर शहरावर आलेल्या या नैसर्गिक संकटाच्या वेळी अंमळनेरकर नागरिक मदतीला धावले नसते तरच नवल…! अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांची तातडीने व्यवस्था करण्यात आली. तसेच गरजूंसाठी औषधे, प्रथमोपचार याची व्यवस्था करण्यात आली होती.

          अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या या कठीण परिस्थितीत तसेच पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी अनेक स्वयंसेवी संस्था, जय निल फाउंडेशन, लायन्स क्लब, रोटरी क्लब, जैन सोशल ग्रुप, अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघ, अनेक सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, पत्रकार बांधव, नगरपालिका प्रशासन, अग्निशमन दल, पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी, ज्ञात, अज्ञात अनेक नागरिकांनी ज्याला जशी जमेल तशी मदत करून या कठीण प्रसंगी अमळनेरवर कोणतेही संकट आले तर आम्ही ते परतावून लावू या भावनेने काम केले.

          आता जनजीवन पूर्व पदावर येत असून शासन प्रशासनाने नुकसानग्रस्तांचे त्वरित पंचनामे करून त्यांना तात्काळ शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून द्यावी एवढीच अमळनेर वासीयांकडून माफक अपेक्षा.

पूरग्रस्त मातंगवाडीत शिक्षिकेच्या मायेचा ओलावा; मंदाकिनी भोई यांनी दिला धीर, अन्न व वस्त्रांची मदत

 

अमळनेर (प्रतिनिधी):

पैलाड भागातील मातंगवाडीजवळील केडी गायकवाड हायस्कूल येथे कार्यरत असलेल्या शिक्षिका सौ. ताईसाहेब मंदाकिनी सुनील भोई यांनी पूरग्रस्त कुटुंबांना दिलेल्या मदतीमुळे मानवतेचा हृदयस्पर्शी आदर्श निर्माण केला आहे. मुसळधार पावसामुळे ३१ जुलै रोजी आलेल्या पुरात मातंगवाडीतील अनेक गोरगरीब कुटुंबांचा संसार अक्षरशः उद्ध्वस्त झाला. ही विदारक परिस्थिती पाहून शिक्षिका मंदाकिनी भोई यांना अश्रू अनावर झाले.

शाळेत कार्यरत असताना त्या रोजच या वस्तीतील कुटुंबांचे हालअपेष्टा व गरिबी जवळून पाहत होत्या. मात्र पुरामुळे महिलांचे संसारोपयोगी साहित्य, कपडे व अन्य वस्तू वाहून गेल्याचे दृश्य पाहून त्यांनी तत्काळ मदतीचा निर्णय घेतला.

घरी परतल्यानंतर आपल्या वयोवृद्ध सासू-सासरे, तसेच सुपुत्र गौरव व भूषण यांच्या सहकार्याने त्यांनी पूरग्रस्तांसाठी भाजी-भाकरी, खिचडी आदी अन्नपदार्थ तयार करून मातंगवाडीत जाऊन गरजू कुटुंबांना वाटप केले. अन्नासोबतच त्यांनी प्रेमाचे दोन शब्द देत महिलांचे सांत्वन केले आणि संकटाच्या काळात धीर दिला.

पूराच्या पाण्यात अनेक महिलांचे कपडे वाहून गेल्याने सौ. मंदाकिनी सुनील भोई यांनी स्वतःच्या चांगल्या प्रतीच्या साड्याही मातंग समाजातील भगिनींना वाटप केल्या. त्यांच्या या संवेदनशील व मानवतावादी कृतीचे सर्व स्तरांतून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.

विशेष म्हणजे, ज्या वस्तीत त्या शिक्षिका म्हणून विद्यार्थ्यांना विद्यादानाचे कार्य करतात, त्याच वस्तीतील गरजू कुटुंबांच्या मदतीसाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेत मानवतेचे दर्शन घडविले.

सौ. मंदाकिनी सुनील भोई या समाजसेवक व पक्षीमित्र तसेच अर्बन बँकेतील कॅशियर श्री. सुनील भोई यांच्या सुविद्य पत्नी असून, समाजकार्यात त्या आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत आहेत. त्यांच्या या सेवाभावी कार्यामुळे परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, अनेकांनी त्यांना “आदर्श शिक्षिका” म्हणून गौरविले आहे.

या समाजकार्याबद्दल प्रताप छबुलाल साळी, नगरसेवक यांनी सौ. ताईसाहेब मंदाकिनी सुनील भोई यांना मानाचा मुजरा करत त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले आहे. त्यांच्या या माणुसकीच्या कार्याने समाजात सेवाभाव, संवेदनशीलता आणि मानवतेचा संदेश दिला आहे.

चिमुकल्यांच्या ओजस्वी भाषणातून महापुरुषांना अभिवादन; सरस्वती शिशुवाटीकेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात विद्यार्थ्यांनी उलगडला महापुरुषांच्या विचारांचा व कार्याचा प्रेरणादायी वारसा

 

अमळनेर (प्रतिनिधी) : थोर समाजसेवक, स्वातंत्र्यसैनिक व राष्ट्रप्रेमाची प्रेरणा देणारे लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त येथील सरस्वती शिशुवाटीका येथे प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी प्रभावी भाषणांमधून दोन्ही महापुरुषांच्या कार्याचा, विचारांचा व समाजासाठी दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण आढावा घेत उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाची सुरुवात शालेय प्रार्थनेने झाली. त्यानंतर शिक्षक व विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करून वातावरण राष्ट्रभक्तीने भारावून टाकले. लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे श्री दिनेश नाईक यांच्या हस्ते पूजन व माल्यार्पण करण्यात आले.

यावेळी शाळेतील प्रियंका बनसोडे, राधिका मोरे, नीरज बाविस्कर, तन्मयी पाटील, हर्षाली संदानशिव आणि दिशान सोनवणे या विद्यार्थ्यांनी ओजस्वी भाषणातून महापुरुषांच्या जीवनकार्याचा प्रेरणादायी परिचय करून दिला. त्यांच्या प्रभावी वक्तृत्वाचे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात कौतुक केले.

यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनातील प्रेरणादायी व बोधपर प्रसंग सांगून त्यांच्या विचारांचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि संस्कारांची जपणूक करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

कार्यक्रमास सौ. किरण भदाणे, सौ. माहेश्वरी राजपूत, सौ. काजल राठोड आणि सौ. आम्रपाली संदानशिव यांची प्रमुख उपस्थिती लाभली. शेवटी सामूहिक पसायदानाने कार्यक्रमाची भावपूर्ण सांगता करण्यात आली.

अतिवृष्टीग्रस्तांसाठी जयनिल फाऊंडेशनचा मदतीचा हात; अन्न व शुद्ध पिण्याच्या पाण्याचे वितरण रोटरी क्लब, लायन्स क्लब आणि पत्रकार संघाच्या सहकार्याने पूरग्रस्तांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य

 

अमळनेर :- अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीत पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी जयनिल फाऊंडेशन, अमळनेर यांनी सामाजिक बांधिलकी जपत तातडीने मदतकार्य हाती घेतले आहे. फाऊंडेशनच्या वतीने पूरग्रस्त बांधवांसाठी अन्नपदार्थ तसेच शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून गरजूंपर्यंत मदत पोहोचविण्यात आली.

         यासाठी जयनिल फाऊंडेशनचे अध्यक्ष गौतम पाटील व उपाध्यक्ष वरून पाटील यांनी पुढाकार घेतला.या मदतकार्याचे प्रभावी नियोजन करण्यासाठी आणि मदत योग्य लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचावी यासाठी रोटरी क्लब अमळनेर, लायन्स क्लब अमळनेर,जैन सोशल ग्रुप तसेच अमळनेर तालुका व शहर पत्रकार संघ यांनी मोलाचे सहकार्य केले. या सर्व संस्थांच्या स्वयंसेवकांनी दिवसभरात वितरण व्यवस्थापनात सक्रिय सहभाग घेत पूरग्रस्त कुटुंबांपर्यंत अन्न व पिण्याचे पाणी पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले.

नैसर्गिक आपत्तीच्या काळात विविध सामाजिक संस्था एकत्र येऊन गरजूंना मदतीचा हात देत असल्याचे हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे. जयनिल फाऊंडेशनसह सहकार्य करणाऱ्या सर्व संस्थांच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत असून, संकटाच्या काळात अशा सामाजिक एकोप्यामुळे पूरग्रस्तांना मोठा दिलासा मिळत आहे.

      दरम्यान गौतम पाटील यांच्या नेतृत्वाखाली जयनिल फाऊंडेशनच्या टीमने दिवसभर पूरग्रस्त भागात जाऊन लोकांना धीर दिला.एवढेच नव्हे तर काही ठिकाणी मदत कार्यासाठी जेसीबी सह इतर मशिनरी उपलब्ध करून दिली.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा समतेचा विचार आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी : वक्त्या सुनिता मोरे यांचे प्रतिपादन 

 

अमळनेर ( प्रतिनिधी ) अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य, सामाजिक कार्य आणि समतेचा विचार आजच्या पिढीसाठी तितकाच प्रेरणादायी आहे, त्यांनी कधीही समरस तेला महत्व दिले नसून समता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या तथा वक्त्या सुनिता मोरे यांनी केले.

             येथील युवा कल्याण प्रतिष्ठान संचलित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानाच्या वतीने आज शहरातील साने गुरुजी शाळेत प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आप्पासो. गुणवंतराव गुलाबराव पाटील होते. 

               आपल्या व्याख्यानात सुनीता मोरे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवन प्रवासाचा आढावा घेत त्यांच्या साहित्याने समाजातील वंचित, शोषित आणि दुर्बल घटकांना न्याय व स्वाभिमानाची प्रेरणा दिल्याचे सांगितले. शिक्षण, सामाजिक समता आणि मानवतेची मूल्ये जोपासून प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या जीवनात यश संपादन करावे असे आवाहन त्यांनी केले. 

          कार्यक्रमाला संचालक ॲड. अशोक बाविस्कर, पत्रकार किरण पाटील, मुख्याध्यापक संजीव पाटील, उप मुख्याध्यापक मोरे सर, शिक्षक प्रतिनिधी जगताप सर उपस्थित होते. सूत्रसंचालन स्नेहल पाटील मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन अनिल पाटील सर यांनी केले. यावेळी सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘प्रताप’ मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे,लोकमान्य टिळकांना अभिवादन

 

अमळनेर- समाज सुधारक,लेखक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या अग्रस्थानी असणारे साहित्यिक डॉ.अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती लेखन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली तसेच केसरी व मराठा या साप्ताहिक व नियतकालिकातून ब्रिटिश राजवट विरोधी बुलंद आवाज उठविणारे, चतु:सूत्री च्या माध्यमातून राष्ट्रीय आंदोलन सक्रिय करणारे बॅरिस्टर लोकमान्य टिळकांची १०६ वे स्मृती दिन निमित्ताने खा.शी.मंडळाचे चिटणीस प्रा.पराग पाटील,सह सचिव प्रा.व्ही बी मांटे,प्रताप कॉलेजचे प्राचार्य डॉ.हर्षवर्धन जाधव, कुलसचिव राकेश निळे यांनी अण्णाभाऊ व टिळकांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले.

या प्रसंगी उपप्रचार्य डॉ.अशोक पाटील,डॉ.कल्पना पाटील,राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.विजय तुंटे,हिंदी विभाग प्रमुख डॉ.शशिकांत सोनवणे, डॉ.बालाजी कांबळे,डॉ.अनिल झळके, ग्रंथपाल दिपक पाटील, कमलाकर पाटील,धनराज मोरे, महेंद्र चौधरी, विश्वास पाटील,सीसीएमसी विभागाचे पराग रवींद्र पाटील आदी उपस्थित होते.

अमळनेरमध्ये पुराच्या विळख्यात अडकलेल्या एक महिन्याच्या चिमुकल्यासह कुटुंबाची थरारक सुटका; आरोग्य विभाग व अग्निशमन दलाचे दोन तास जीवावर उदार बचावकार्य

 

अमळनेर | प्रतिनिधी

अमळनेर शहरात मुसळधार पावसाने थैमान घातले असताना भालेराव नगर परिसरातील गुरुकृपा कॉलनीत घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण शहराची धडकी भरली. नाल्याला आलेल्या प्रचंड पुरामुळे एका घरात अवघ्या एक महिन्याच्या बाळासह संपूर्ण कुटुंब अडकून पडले होते. घरात वेगाने पाणी शिरत असल्याने कुटुंबीयांचा जीव अक्षरशः टांगणीला लागला होता. मात्र, अमळनेर नगरपालिकेच्या आरोग्य विभाग आणि अग्निशमन दलाच्या धाडसी व शर्थीच्या बचाव मोहिमेमुळे सर्व कुटुंबीयांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

मुसळधार पावसामुळे गुरुकृपा कॉलनीलगतच्या नाल्याला अचानक पूर आला. काही क्षणांतच परिसरात छातीएवढे पाणी साचले आणि एका घरात पाणी घुसल्याने कुटुंबीय पूर्णपणे अडकून पडले. घरामध्ये एक महिन्याचे चिमुकले बाळ, त्याची आई, तीन महिला, तीन लहान मुले आणि इतर कुटुंबीय असे अनेक जण जीव मुठीत धरून उंच जागेवर उभे राहून मदतीची वाट पाहत होते.

घटनेची माहिती मिळताच मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या तातडीच्या निर्देशानुसार आरोग्य निरीक्षक किरण कंडारे, गोल्डी बिऱ्हाडे तसेच अग्निशमन दलाचे फारुख शेख, दिनेश बिऱ्हाडे, भिका सदानंदशीव आणि पवन बिऱ्हाडे यांचे पथक घटनास्थळी धावून पोहोचले.

पुराच्या पाण्याचा वेग अत्यंत प्रचंड असल्याने बचावकार्य मोठे आव्हानात्मक ठरत होते. मात्र, दोर, लाइफ जॅकेट आणि मानवी साखळी तयार करून बचाव पथकाने तब्बल दोन तास जीवाची बाजी लावत पुराच्या पाण्यातून मार्ग काढत अडकलेल्या कुटुंबापर्यंत पोहोचण्यात यश मिळवले.

या बचाव मोहिमेतील सर्वात हृदयस्पर्शी क्षण म्हणजे अवघ्या एक महिन्याच्या चिमुकल्याला प्लास्टिकच्या टबमध्ये सुरक्षित ठेवून पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर बाळासह सर्व कुटुंबीयांना सुरक्षितपणे जवळील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर हलविण्यात आले. सुदैवाने या संपूर्ण घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या धाडसी आणि वेळेवर पार पडलेल्या बचाव मोहिमेमुळे एक संपूर्ण कुटुंब नवजीवन मिळाल्याची भावना व्यक्त होत असून मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आरोग्य विभाग व अग्निशमन दलातील किरण कंडारे, गोल्डी बिऱ्हाडे, फारुख शेख, दिनेश बिऱ्हाडे, भिका सदानंदशीव आणि पवन बिऱ्हाडे यांच्या धैर्य, तत्परता आणि सेवाभावाचे शहरभरातून कौतुक होत आहे.

पुराच्या संकटात जीवाची पर्वा न करता केलेल्या या धाडसी बचावकार्यामुळे अमळनेरच्या आपत्कालीन यंत्रणेने पुन्हा एकदा आपल्या कर्तव्यदक्षतेची प्रचिती दिली आहे.