ब्रेकिंग
अमळनेरमध्ये पुराच्या विळख्यात अडकलेल्या एक महिन्याच्या चिमुकल्यासह कुटुंबाची थरारक सुटका; आरोग्य विभाग व अग्निशमन दलाचे दोन तास जीवावर उदार बचावकार्य

 

अमळनेर | प्रतिनिधी

अमळनेर शहरात मुसळधार पावसाने थैमान घातले असताना भालेराव नगर परिसरातील गुरुकृपा कॉलनीत घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण शहराची धडकी भरली. नाल्याला आलेल्या प्रचंड पुरामुळे एका घरात अवघ्या एक महिन्याच्या बाळासह संपूर्ण कुटुंब अडकून पडले होते. घरात वेगाने पाणी शिरत असल्याने कुटुंबीयांचा जीव अक्षरशः टांगणीला लागला होता. मात्र, अमळनेर नगरपालिकेच्या आरोग्य विभाग आणि अग्निशमन दलाच्या धाडसी व शर्थीच्या बचाव मोहिमेमुळे सर्व कुटुंबीयांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

मुसळधार पावसामुळे गुरुकृपा कॉलनीलगतच्या नाल्याला अचानक पूर आला. काही क्षणांतच परिसरात छातीएवढे पाणी साचले आणि एका घरात पाणी घुसल्याने कुटुंबीय पूर्णपणे अडकून पडले. घरामध्ये एक महिन्याचे चिमुकले बाळ, त्याची आई, तीन महिला, तीन लहान मुले आणि इतर कुटुंबीय असे अनेक जण जीव मुठीत धरून उंच जागेवर उभे राहून मदतीची वाट पाहत होते.

घटनेची माहिती मिळताच मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या तातडीच्या निर्देशानुसार आरोग्य निरीक्षक किरण कंडारे, गोल्डी बिऱ्हाडे तसेच अग्निशमन दलाचे फारुख शेख, दिनेश बिऱ्हाडे, भिका सदानंदशीव आणि पवन बिऱ्हाडे यांचे पथक घटनास्थळी धावून पोहोचले.

पुराच्या पाण्याचा वेग अत्यंत प्रचंड असल्याने बचावकार्य मोठे आव्हानात्मक ठरत होते. मात्र, दोर, लाइफ जॅकेट आणि मानवी साखळी तयार करून बचाव पथकाने तब्बल दोन तास जीवाची बाजी लावत पुराच्या पाण्यातून मार्ग काढत अडकलेल्या कुटुंबापर्यंत पोहोचण्यात यश मिळवले.

या बचाव मोहिमेतील सर्वात हृदयस्पर्शी क्षण म्हणजे अवघ्या एक महिन्याच्या चिमुकल्याला प्लास्टिकच्या टबमध्ये सुरक्षित ठेवून पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर बाळासह सर्व कुटुंबीयांना सुरक्षितपणे जवळील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर हलविण्यात आले. सुदैवाने या संपूर्ण घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या धाडसी आणि वेळेवर पार पडलेल्या बचाव मोहिमेमुळे एक संपूर्ण कुटुंब नवजीवन मिळाल्याची भावना व्यक्त होत असून मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आरोग्य विभाग व अग्निशमन दलातील किरण कंडारे, गोल्डी बिऱ्हाडे, फारुख शेख, दिनेश बिऱ्हाडे, भिका सदानंदशीव आणि पवन बिऱ्हाडे यांच्या धैर्य, तत्परता आणि सेवाभावाचे शहरभरातून कौतुक होत आहे.

पुराच्या संकटात जीवाची पर्वा न करता केलेल्या या धाडसी बचावकार्यामुळे अमळनेरच्या आपत्कालीन यंत्रणेने पुन्हा एकदा आपल्या कर्तव्यदक्षतेची प्रचिती दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *