ब्रेकिंग
पाणीटंचाईच्या संकटात नगरसेवक दीपक चौगुले यांची धावपळ; प्रभाग ६ मध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू

 

अमळनेर | प्रतिनिधी

अतिवृष्टीमुळे अमळनेर शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था गेल्या काही दिवसांपासून विस्कळीत झाली असून, अनेक भागांतील नागरिकांना पाणीटंचाईच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागत आहे. या बिकट परिस्थितीत प्रभाग क्रमांक ६ चे नगरसेवक दीपक भाऊ चौगुले यांनी नागरिकांच्या मदतीसाठी पुढाकार घेत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून प्रभाग क्रमांक ६ मधील विविध कॉलनी तसेच परिसरात गरजेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. नागरिकांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागू नये आणि त्यांच्या दैनंदिन गरजा सुरळीतपणे पूर्ण व्हाव्यात, यासाठी दीपक भाऊ चौगुले हे आपल्या भाऊ मित्र मंडळाच्या सहकाऱ्यांसह सातत्याने प्रयत्नशील आहेत.

दिवस असो वा रात्र, नागरिकांकडून पाण्याची मागणी होताच परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक त्या ठिकाणी टँकर उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या या पाणीटंचाईच्या संकटात नागरिकांच्या मदतीला प्रत्यक्ष धावून जात मदतकार्य सुरू ठेवल्याने दीपक भाऊ चौगुले यांच्या कार्याचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.

प्रभागातील नागरिकांना तातडीने पाणी उपलब्ध करून देण्यासाठी टँकरची व्यवस्था सातत्याने सुरू ठेवण्यात आली असून, शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत होईपर्यंत नागरिकांना शक्य ती सर्व मदत करण्याचा प्रयत्न सुरूच राहील, असे नगरसेवक दीपक भाऊ चौगुले यांनी सांगितले.

अतिवृष्टीच्या काळात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या संकटात प्रशासनाच्या पाणीपुरवठा व्यवस्थेला पूरक ठरत नागरिकांच्या दारापर्यंत पाणी पोहोचविण्याचा उपक्रम सुरू असल्याने प्रभाग क्रमांक ६ मधील नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे.

अमळनेरात अतिवृष्टी बाधितांना आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते किराणा किटचे वाटप

 

बाधित कुटुंबांना पुढील आठवड्यात मिळणार दहा हजारांची मदत-आमदारांची माहिती

अमळनेर:- तालुक्यात ३१ जुलै २०२६ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि पुरामुळे नुकसान झालेल्या नगरपरिषद हद्दीतील बाधित नागरिकांना जीवनावश्यक वस्तू आणि किराणा किटचे वाटप काल शुक्रवार, दिनांक १४ ऑगस्ट रोजी माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते प्राथमिक स्वरूपात वाटप करून वाटपाचा शुभारंभ करण्यात आला.

      यावेळी आमदारांनी बांधीत भागातील प्रत्येक केंद्रावर जाऊन किटचे वाटप केल्यानंतर बाधित नागरिकांशी संवाद साधत पुढील आठवड्यात प्रत्येक बाधित कुटुंबास शासनाकडून दहा हजारांची मदत दिलेल्या बँक खात्यावर जमा होईल असे संकेत दिले.दरम्यान बाधित कुटुंबाचे पंचनामे झाल्यानंतर तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी, अमळनेर यांच्या कार्यालयाकडून किराणा किट वाटपाचे आदेश पारित करण्यात आले होते.सदर किट वाटप करताना आमदार पाटील यांच्या सोबत प्रांताधिकारी मयूर भंगाळे,न प चे मुख्याधिकारी गणेश शिंदे यासह प्रशासनातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

       बाधित नागरिकांना मदत मिळण्यास सोयीचे व्हावे, यासाठी शहरातील ८ विविध ठिकाणी केंद्र करण्यात आले होते.

भोई समाज मंगल कार्यालय, पैलाड,शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र,ताडेपुरा,डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, गांधलीपुरा,संत सखाराम महाराज वाडी,शिवाजी विद्या मंदिर, तांबेपुरा,क्षत्रिय कांचमाळी पंचमढी, बहादरपूर नाका रोड,शिवम कुटी बोर्डाजवळ, झामी चौक,विद्या विहार कॉलनी गेटजवळ आदी केंद्रांवर हे वाटप करण्यात आले.सुमारे 1700 पेक्षा अधिक कुटुंबाना ही मदत मिळाली असून या वाटप प्रक्रियेत प्रति बाधित कुटुंबास एक किराणा किट देण्यात आले आणि मदत देताना लाभार्थ्यांचा फोटो आणि वाटप केल्याबाबतची स्वाक्षरी घेण्यात आली.

      यावेळी नगरसेवक भरतकुमार ललवाणी,शोभाबाई गढरे,नरेंद संदानशिव,विजय कहारु पाटील,सचिन पाटील,देवेंद्र कांबळे,मुक्तार खाटीक,संजय कौतीक पाटील,विजय पाटील,दुर्गेश पाटील,विनोद लांबोळे,देविदास महाजन,दिनेश शेलकर,शांताराम महाजन,प्रविण महाजन,गंगाराम महाजन,भुषण भदाणे,वेद पाटील तसेच राष्ट्रवादी शहराध्यक्ष चेतन राजपूत,जितेंद्र ठाकुर यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

वंचित कुटुंबांनाही मिळणार मदत

     सदर प्रक्रियेत बाधित झालेल्या काही बाधित कुटुंबांची नावे मदतीच्या यादीत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर आमदारांनी प्रांताधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांचेशी मोबाईलवरून संवाद साधत लवकरच या कुटुंबाना देखील किराणा किट उपलब्ध करून घ्यावेत अश्या सूचना केल्या.

स्वातंत्र्य दिनानिमित्त उद्या अंधजन कल्याण मंडळाचा भव्य चॅरिटी संगीत मैफिलीचा कार्यक्रम

 

अंध बंधवांच्या मदतीसाठी अंध कलाकार देणार अमळनेरकराना संगीत मेजवानी…” 

अमळनेर:- स्वातंत्र्य दिनानिमित्त दृष्टिदिव्यांग कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी अंधजन कल्याण मंडळाच्या वतीने भव्य चॅरिटी संगीत मैफिलीचे आयोजन आज दिनांक 15 ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे.

         या मौफिलीचे वैशिट्य म्हणजे सर्व कलाकार दृष्टिहीन व शासकीय सेवेतील असून केवळ आपल्या अंध बांधवांच्या मदतीसाठी त्यांनी हे पाऊल टाकले आहे.हा कार्यक्रम शनिवार, दि. 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6.00 वाजता छत्रपती शिवाजी नाट्यगृह, स्टेशन रोड, अमळनेर येथे होणार आहे. सप्तस्वरांजली म्युझिकल ग्रुप यांच्या वतीने देशभक्तीपर, मराठी, हिंदी तसेच अहिराणी सदाबहार गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.

        दृष्टिदिव्यांग कलाकारांच्या कला, कौशल्य आणि स्वयोरोजगार करणाऱ्या अंध व्यक्तींच्या स्वावलंबनाला चालना देणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. कार्यक्रमातून प्राप्त होणारा निधी दृष्टिदिव्यांग बांधवांच्या शिक्षण, आरोग्य, स्वयोरोजगार, कौशल्य विकास तसेच विविध सामाजिक कल्याणकारी उपक्रमांसाठी वापरण्यात येणार आहे.तरी या सामाजिक उपक्रमात सर्व नागरिक, उद्योजक, व्यापारी, संस्था आणि दानशूर व्यक्तींनी सहभाग नोंदवावा. चॅरिटी शोचे तिकीट शुल्क फक्त ₹100/- ठेवण्यात आले आहे.तरी नागरिकांनी कुटुंबासह उपस्थित राहून दृष्टिदिव्यांग कलाकारांच्या कलागुणांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

अमळनेर शहरात डास प्रतिबंधक फवारणी व मलेरिया ऑइल टाकण्याची प्रभावी मोहीम

 

अमळनेर : अमळनेर नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागामार्फत माननीय लोकनियुक्त नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर शहरातील नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे आणि डासांमुळे होणाऱ्या आजारांना प्रतिबंध व्हावा, यासाठी विशेष स्वच्छता व डास प्रतिबंधक मोहीम राबविण्यात येत आहे.

शहरातील प्रभाग क्रमांक १ ते १८ मधील विविध भागांमध्ये डास प्रतिबंधक औषधांची फवारणी करण्यात येत असून, ज्या ठिकाणी पाणी साचलेले आहे अशा ठिकाणी मलेरिया ऑइलचा वापर करण्यात येत आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डासांची उत्पत्ती होऊ नये, तसेच मलेरिया, डेंग्यू यांसारख्या डासांपासून होणाऱ्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपरिषदेच्या वतीने ही प्रतिबंधात्मक कार्यवाही सातत्याने करण्यात येत आहे.

या मोहिमेसाठी भरत आगळे, प्रविण बिऱ्हाडे, योगेश पवार, सतीश बिऱ्हाडे, विजय पाटील व मनोज गरुड यांच्या कर्मचारी पथकासह प्रभाग क्रमांक १ ते १८ मधील सर्व मुकादम व स्वच्छता कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित पथकांकडून विविध भागांची पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी फवारणी तसेच साचलेल्या पाण्यावर मलेरिया ऑइल टाकण्याची कार्यवाही केली जात आहे.

“स्वच्छ व निरोगी अमळनेर – डासमुक्त अमळनेर” या उद्देशाने नगरपरिषद प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असून, नागरिकांनीही आपल्या घराच्या परिसरात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. घराभोवतीची भांडी, टायर, डबे, कुंड्या, गटारी किंवा इतर ठिकाणी पाणी साचले असल्यास ते तात्काळ काढून टाकावे आणि नगरपरिषद स्वच्छता विभागास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येते की, स्वच्छता ही केवळ नगरपरिषदेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. नागरिकांच्या सहकार्याने अमळनेर शहर स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी ठेवण्यासाठी स्वच्छता विभाग सदैव तत्पर राहील.

जिजामाता माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना सायबर क्राईमविषयी मार्गदर्शन

 

एरंडोल, जि. जळगाव : डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि ऑनलाइन व्यवहारांच्या वाढत्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षेबाबत सजग राहणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर जिजामाता माध्यमिक विद्यालय, एरंडोल येथे विद्यार्थ्यांसाठी सायबर क्राईम आणि सायबर सुरक्षेविषयी जनजागृतीपर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमात बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विद्यार्थिनी कुमारी स्नेहल पाटील व कुमारी वैष्णवी पाटील यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांचे विविध प्रकार, त्यापासून बचावाच्या उपाययोजना तसेच डिजिटल माध्यमांचा सुरक्षित वापर याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

मोबाईल, सोशल मीडिया आणि ऑनलाइन व्यवहारांचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या. अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, ओटीपी व पासवर्ड कोणालाही सांगू नये, सोशल मीडिया अकाउंट सुरक्षित ठेवावे, तसेच क्यूआर कोडच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले. ऑनलाइन फसवणुकीची घटना घडल्यास घाबरून न जाता तातडीने योग्य ती कार्यवाही करण्याचेही सांगण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा व ऑनलाइन फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी मार्गदर्शक बुकलेटचे वाटप करण्यात आले. या बुकलेटमधील माहिती विद्यार्थ्यांना दैनंदिन डिजिटल व्यवहार करताना अधिक सजग आणि सुरक्षित राहण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. विद्यार्थ्यांनी बुकलेटमधील मार्गदर्शक सूचनांचा नियमित वापर करावा, असे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. प्रविण शंभू केदार सर तसेच ज्युनिअर क्लर्क श्री. आर. आर. वाघ सर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सायबर सुरक्षा, ऑनलाइन फसवणूक आणि सोशल मीडिया वापराबाबत विविध प्रश्न विचारले. उपस्थित मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसन केले.

डिजिटल युगात तंत्रज्ञानाचा सुरक्षित आणि जबाबदारीने वापर करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करणारा हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला.

अमळनेरच्या विद्यार्थ्यांसाठी ‘दोन तास मोबाईलपासून मुक्ती’चा अभिनव उपक्रम; शहरात शैक्षणिक चळवळीची संकल्पना

 

अमळनेर : विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची सवय, एकाग्रता आणि वाचनाची आवड वाढावी, तसेच मोबाईल व टीव्हीच्या अतिवापरापासून काही काळ दूर राहून अभ्यास व ज्ञानार्जनासाठी वेळ देता यावा, या उद्देशाने अमळनेर PTA क्लासेस संघटनेतर्फे ‘दोन तास मोबाईलपासून मुक्ती’ हा अभिनव शैक्षणिक उपक्रम राबविण्याची संकल्पना पुढे आली आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्व-अनुशासन, वेळेचे नियोजन आणि अभ्यासाची सकारात्मक सवय निर्माण करण्यास मदत होणार आहे.

या उपक्रमासंदर्भात PTA पदाधिकाऱ्यांनी अमळनेर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष श्री. प्रशांत निकम तसेच शिक्षण सभापती श्री.नविद शेख यांची भेट घेऊन संकल्पनेची सविस्तर माहिती दिली. या अभिनव उपक्रमाचे दोन्ही मान्यवरांनी स्वागत करून सकारात्मक प्रतिसाद दिला. अमळनेर नगर परिषद आणि PTA यांच्या संयुक्त विद्यमाने लवकरच हा उपक्रम कार्यान्वित करण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला.

उपक्रमांतर्गत दररोज सायंकाळी ७ ते ९ या दोन तासांच्या कालावधीत विद्यार्थ्यांनी मोबाईल व टीव्हीपासून दूर राहून केवळ अभ्यास, वाचन आणि ज्ञानार्जनासाठी वेळ द्यावा, अशी संकल्पना आहे. सायंकाळी ७ वाजता विशेष सायरन वाजवून संपूर्ण शहरातील विद्यार्थ्यांना ‘अभ्यासाची वेळ सुरू झाली’ असा संदेश देण्याची कल्पनाही मांडण्यात आली आहे.

हा उपक्रम केवळ PTA किंवा नगर परिषदेपुरता मर्यादित न राहता विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि संपूर्ण अमळनेर शहराने स्वीकारलेली शैक्षणिक चळवळ व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. ‘दोन तासांचा छोटासा संकल्प; विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मोठी चळवळ!’ या विचारातून हा उपक्रम पुढे नेण्यात येत असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी अमळनेर शहराने एक आदर्श निर्माण करावा, असा मानस PTA पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्यात वेळेचे नियोजन, स्व-अनुशासन, एकाग्रता आणि वाचनाची गोडी निर्माण होण्यास हातभार लागेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

या भेटीप्रसंगी PTA अध्यक्ष भैय्यासाहेब मगर, सौ. सुरश्री वैद्य, सुधीर टाकणे, सौ. वैशाली निकम, मयूर भावसार, स्वर्णदीप राजपूत आदी PTA पदाधिकारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी संपूर्ण शहराने या उपक्रमात सहभागी व्हावे आणि ‘दोन तास मोबाईलपासून मुक्ती’चा संकल्प प्रत्यक्षात आणावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

बाप एक अधिष्ठान’ निबंध व वक्तृत्व स्पर्धेत प्रेरणा चौधरीची दुहेरी बाजी

 

अमळनेर : प्रा.डॉ.एस.ओ.माळी परिवार, अमळनेर आणि यश पंढरी इंग्लिश क्लास यांच्या संयुक्त विद्यमाने स्व.ओंकार त्र्यंबक माळी यांच्या २६ व्या पुण्यतिथीनिमित्त ‘बाप एक अधिष्ठान’ या विषयावर निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

निबंध स्पर्धेत एकूण २६ स्पर्धकांनी, तर वक्तृत्व स्पर्धेत १२ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेतील विजेत्यांसाठी एकूण रु.५,००० रोख रकमेची बक्षिसे ठेवण्यात आली होती. सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र, मोमेंटो तसेच विजेत्यांना रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक कु.लिना गणेश पाटील, द्वितीय क्रमांक कु.प्रेरणा वासुदेव चौधरी (डी. आर. कन्या शाळा, अमळनेर इ.१० वी अ), तर तृतीय क्रमांक कु.साक्षी अशोक बडगुजर यांनी पटकावला.

वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक कु.प्रेरणा वासुदेव चौधरी (डी. आर. कन्या शाळा, अमळनेर इ.१० वी अ), द्वितीय क्रमांक कु.गायत्री देविदास पाटील, तर तृतीय क्रमांक साहिल कैलास भिल यांनी मिळविला.

विशेष म्हणजे कु.प्रेरणा वासुदेव चौधरी हिने निबंध आणि वक्तृत्व या दोन्ही स्पर्धांमध्ये द्वितीय व प्रथम क्रमांक मिळवत दुहेरी यश संपादन केले. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीचे उपस्थितांनी कौतुक केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.प्रकाश पाटील, विजय पाटील, वासुदेव चौधरी, हेमांगी धर्माधिकारी आणि प्रा.स्वर्णदीप राजपूत यांनी विशेष सहकार्य केले. स्व.ओंकार त्र्यंबक माळी यांच्या स्मृती जपत विद्यार्थ्यांमध्ये वाचन, लेखन, वक्तृत्व आणि संस्कारांची जडणघडण व्हावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.

रा. ति. काबरे विद्यालयात विद्यार्थ्यांना सायबर क्राईमविषयी मार्गदर्शन

 

एरंडोल : रा. ति. काबरे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, एरंडोल येथे विद्यार्थ्यांना सायबर क्राईम तसेच सायबर सुरक्षेविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता निर्माण करणे आणि डिजिटल माध्यमांचा सुरक्षितपणे वापर करण्याबाबत माहिती देणे हा होता.

या मार्गदर्शन कार्यक्रमात बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विद्यार्थिनी कुमारी स्नेहल पाटील व कुमारी वैष्णवी पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी सोशल मीडिया वापरताना घ्यावयाची काळजी, अनोळखी लिंकवर क्लिक न करणे, वैयक्तिक माहिती व पासवर्ड सुरक्षित ठेवणे, ऑनलाइन फसवणूक टाळणे तसेच सायबर गुन्हा घडल्यास योग्य ती खबरदारी घेण्याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली.

विद्यार्थ्यांनीही या मार्गदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध प्रश्न विचारून सायबर सुरक्षेविषयी माहिती जाणून घेतली.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता निर्माण होण्यास मोठी मदत झाली. 

 कार्यक्रम प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री.एस. एस.राठी सर, उपमुख्याध्यापक श्री. पी.एच. नेटके सर, शिक्षक प्रतिनिधी श्री. एस. बी. चव्हाण सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

सात्री गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न २६ वर्षांपासून प्रलंबित;  पांझरा नदीवर बंधारे उभारण्याची डॉ. दीपक पाटील यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

 

कळमसरे ता.अमळनेर : सात्री गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न तब्बल २६ वर्षांपासून प्रलंबित असून, शासनाने तातडीने या प्रश्नावर ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी माजी पंचायत समिती सभापती तथा शिवसेना अमळनेरचे माजी संघटक व शेतकरी सेना अध्यक्ष श्री. डॉ. दीपक पंढरीनाथ पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दि. ११ ऑगस्ट रोजी दिलेल्या निवेदनात सात्री गावातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. सात्री गावाच्या पुनर्वसनासाठी शासनाने जागा घेतली असली तरी तब्बल २६ वर्षांनंतरही अनेक कुटुंबांना घरांसह मूलभूत सुविधा मिळालेल्या नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

गावाच्या पुनर्वसनासाठी यापूर्वी जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र, पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने अनेक ग्रामस्थांना अद्यापही अनिश्चिततेचा सामना करावा लागत आहे.

दि. २७ मे २०२२ रोजीच्या पत्रानुसार वाटप प्रक्रिया स्थगित करून पुन्हा सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, २६ वर्षांनंतरही सर्वेक्षण पूर्ण झाले नसल्याने आता पुन्हा नवीन सर्वेक्षण कशासाठी, असा सवाल डॉ. पाटील यांनी उपस्थित केला आहे.

पांझरा नदीवर बंधारे उभारण्याची मागणी

सात्री गावाच्या पुनर्वसना सोबतच पांझरा नदीवर मंडळ, मुडी आणि शहापूर येथे केटीवेअर बंधारे उभारून नदीतील पाणी अडवावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. यामुळे परिसरातील पाणीटंचाई दूर होण्यास तसेच शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढण्यास मदत होईल. याबाबत जलसंपदा विभाग, जळगाव यांच्याकडून सर्वेक्षण करून प्रस्तावित कामांना गती देण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.

सात्री गावाचा पुनर्वसन प्रश्न आणि पांझरा नदीवरील बंधाऱ्यांचा प्रश्न शासनाने गांभीर्याने घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी डॉ. दीपक पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

डॉ. एस. आर. रंगनाथन जयंतीनिमित्त क्रांतिवीर नवलभाऊ कला महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शन

 

नवलनगर, ता. व जि. धुळे : ग्रंथालय शास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाणारे डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त क्रांतिवीर नवलभाऊ कला महाविद्यालय, नवलनगर येथे विविध ग्रंथांचे आकर्षक प्रदर्शन आयोजित करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात डॉ. व्ही एच उभाळेसर यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, तसेच ग्रंथालयातील उपलब्ध साहित्याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी, हा प्रदर्शनामागील प्रमुख उद्देश होता.

या ग्रंथ प्रदर्शनाचे अध्यक्षीय स्थान प्राचार्य डॉ. विजय उबाळेसर होते. प्रमुख मार्गदर्शक डॉ. सुजाता निकम होत्या. कार्यक्रमास डॉ. एन. झेड. पाटील, डॉ. एस. जे. पाटील, डॉ. ए. बी. सोनवणे, डॉ. यु.वाय. गांगुर्डे, डॉ. के. डी. बागुल, डॉ. संभाजी कदम, प्रा. एस. डी. सूर्यवंशी, प्रा. विजय शिंदे, प्रा. छाया पाटील, श्री. रवींद्र धनगर, श्री. संभाजी पाटील, श्री. संतोष पाटील, श्री. संजय पवार, श्री. योगेंद्र राजपूत, श्री. रोहिदास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रदर्शनात विविध विषयांवरील संदर्भग्रंथ, स्पर्धा परीक्षा पुस्तके, साहित्यिक पुस्तके तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करणारे विविध ग्रंथ मांडण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध पुस्तकांची माहिती घेतली.

यावेळी डॉ. सुजाता निकम यांनी वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी ग्रंथालयाचे महत्त्व आणि डॉ. रंगनाथन यांचे ग्रंथालय क्षेत्रातील योगदान याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची प्रेरणा निर्माण होऊन ग्रंथालयाचा अधिकाधिक उपयोग करण्याची भावना वाढीस लागली.

ग्रंथ प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.