समान काम, समान वेतनाच्या मागणीसाठी न्यायालयीन कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर अमळनेरमधील न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा संपात सहभागी होण्याचा निर्धार; सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचाही पाठिंबा
अमळनेर प्रतिनिधी : समान काम, समान वेतन या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागणीसाठी महाराष्ट्रातील सर्व न्यायालयीन कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत. या संपात सक्रिय सहभाग नोंदवून आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार अमळनेर येथील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी केला आहे.
उच्च न्यायालयातील कर्मचारी आणि राज्यातील दुय्यम न्यायालयांमधील कर्मचारी हे एकाच न्यायव्यवस्थेचे महत्त्वाचे घटक आहेत. दुय्यम न्यायालयांमधील कर्मचारी अनेकदा अधिक काम करीत असतानाही दोन्ही स्तरांवरील कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत मोठी तफावत आहे. उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांना सन २००६ पासून लागू असलेली वेतनश्रेणी महाराष्ट्रातील सर्व दुय्यम न्यायालयांतील कर्मचाऱ्यांनाही लागू करावी, अशी मागणी कर्मचारी महासंघाकडून अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे.
न्यायालयीन कर्मचारी महासंघ गट-क, महाराष्ट्र ज्युडिशियल स्टेनोग्राफर असोसिएशन, महाराष्ट्र राज्य न्यायालयीन बेलीफ कर्मचारी महासंघ आणि न्यायालयीन गट-ड कर्मचारी महासंघ या संघटनांनी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. मात्र, अद्याप या मागणीवर निर्णय न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या सुधारित वेतनश्रेणीचा प्रस्ताव ३१ जानेवारी २०२५ रोजी शासनाकडे सादर केला आहे. मात्र, त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी १६ व १७ सप्टेंबर रोजी काळ्या फिती लावून आंदोलन केले होते. मात्र, शासनाकडून दखल घेतली जात नसल्याने अखेर आजपासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे.
दरम्यान, अमळनेर येथे न्यायालयीन कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळ एकत्र येत या बेमुदत संपात सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला. सेवानिवृत्त कर्मचारी महासंघानेही या मागणीला पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच, या मागणीच्या समर्थनार्थ आज जळगाव येथे सेवानिवृत्त कर्मचारी एकदिवसीय धरणे आंदोलन करणार आहेत.


