ब्रेकिंग
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयश्री पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित! भाजपचे प्रफुल्ल पवार यांची उमेदवारी माघार; अमळनेरमध्ये राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा जल्लोष

 

अमळनेर प्रतिनिधी : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अमळनेर तालुक्यातील राजकीय समीकरणांना महत्त्वपूर्ण वळण मिळाले आहे. भाजपचे उमेदवार प्रफुल्ल पवार यांनी अमळनेर तालुका सोसायटी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या पत्नी तथा जिल्हा परिषद सदस्या सौ. जयश्री अनिल पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. या घडामोडीमुळे जिल्हा बँकेतील पाटील कुटुंबाचे प्रतिनिधित्व कायम राहणार असून, जयश्री पाटील यांच्यावर सहकार क्षेत्रातील नवी जबाबदारी येणार आहे.

 

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी महायुतीतील जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्यानंतर विविध मतदारसंघांतील उमेदवारी अर्जांच्या माघारीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. अमळनेर सोसायटी मतदारसंघात भाजपचे प्रफुल्ल पवार यांनी माघार घेतल्याने जयश्री पाटील यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. या निर्णयामुळे जिल्हा बँकेतील आमदार अनिल पाटील यांचे राजकीय प्रतिनिधित्व कायम राहणार आहे.

 

जयश्री पाटील यांच्या बिनविरोध निवडीची बातमी समजताच अमळनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी, घोषणाबाजी आणि शुभेच्छांच्या माध्यमातून आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर व ग्रामीण पदाधिकारी, मार्केट कमिटी व शेतकी संघाचे संचालक, नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे माजी पदाधिकारी, विविध विकास कार्यकारी सोसायट्यांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, युवक कार्यकर्ते, महिला पदाधिकारी आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

सहकार क्षेत्रातील पाटील कुटुंबाचे प्रतिनिधित्व कायम

 

आमदार अनिल पाटील यांचा अमळनेर तालुक्याच्या सहकार क्षेत्रात अनेक वर्षांपासून सक्रिय सहभाग राहिला आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती आणि जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत त्यांनी यापूर्वी प्रतिनिधित्व केले आहे. तसेच अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि शेतकी संघातील राजकीय समीकरणांमध्येही त्यांच्या गटाचे महत्त्वपूर्ण स्थान राहिले आहे.

 

जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील नव्या कायदेशीर तरतुदींमुळे आमदार अनिल पाटील यांनी स्वतः निवडणूक न लढवता पत्नी सौ. जयश्री पाटील यांना अमळनेर सोसायटी मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. जयश्री पाटील यांनी यापूर्वी जिल्हा परिषद सदस्या तसेच अमळनेर नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा म्हणून काम पाहिले आहे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या अनुभवामुळे त्यांच्या उमेदवारीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.

 

अखेर प्रतिस्पर्धी उमेदवाराने माघार घेतल्याने जयश्री पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. जिल्हा बँकेच्या माध्यमातून त्यांना सहकार क्षेत्रात काम करण्याची नवी संधी मिळणार आहे. त्यांच्या निवडीमुळे अमळनेर तालुक्याच्या सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणांमध्येही पाटील कुटुंबाचे स्थान अधिक महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *