ब्रेकिंग
मंगलमूर्ती चौकात बेशिस्त पार्किंगचा विळखा; वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त! प्रबुद्ध विहार परिसरात अपघातांचा धोका वाढला; वाहतूक पोलीस नेमून बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी

 

अमळनेर : शहरातील कचेरी रोडवरून गलवाडे रोडकडे जाणाऱ्या मार्गावरील मंगलमूर्ती चौक तसेच प्रबुद्ध विहार परिसरात बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या भागात रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर चारचाकी व दुचाकी वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून, नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

मंगलमूर्ती चौक हा शहरातील अत्यंत वर्दळीचा मार्ग असून, या रस्त्यावरून दिवसभर वाहनांची मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरू असते. मात्र, चौकात आणि बुद्ध विहाराजवळ अस्ताव्यस्त पद्धतीने वाहने उभी केली जात असल्याने रस्त्याची उपलब्ध जागा कमी होते. परिणामी वाहनचालकांना मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागते. पादचाऱ्यांनाही जीव मुठीत धरून रस्त्यावरून मार्गक्रमण करावे लागत आहे.

या परिसरात वारंवार अपघात घडत असल्याची नागरिकांची तक्रार असून, बेशिस्त पार्किंगमुळे अपघातांचा धोका अधिकच वाढला आहे. विशेषतः गर्दीच्या वेळेत वाहतुकीचा पूर्णपणे खोळंबा होत असून, वाहनचालक आणि पादचारी दोघांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे.

या गंभीर समस्येकडे संबंधित प्रशासन आणि वाहतूक विभागाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. मंगलमूर्ती चौकात तसेच प्रबुद्ध विहार परिसरात कायमस्वरूपी वाहतूक पोलीस कर्मचारी नेमण्यात यावा, रस्त्यावर अनधिकृतपणे वाहने उभी करणाऱ्या चालकांवर दंडात्मक कारवाई करावी आणि बेशिस्त पार्किंगला आळा घालण्यासाठी नियमित गस्त घालावी, अशी ठाम मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

अपघात होऊन जीवितहानी झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा संभाव्य धोका ओळखून प्रशासनाने वेळीच ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *