तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर चेंबरमध्ये अडकलेल्या दोन पिल्लांची सुखरूप सुटका अग्निशमन दलाची तत्परता; जेसीबीच्या साह्याने राबविले बचावकार्य
अमळनेर प्रतिनिधी : शहरातील ग्रामीण रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या रस्त्यावरील चेंबरमध्ये कुत्र्याची दोन पिल्ले अडकल्याची घटना शुक्रवार, दि. १३ नोव्हेंबर रोजी दुपारी ४.५० वाजेच्या सुमारास निदर्शनास आली. पोलीस कर्मचारी सिद्धांत शिसोदे यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तत्काळ दूरध्वनीद्वारे अग्निशमन दलाला माहिती दिली.
माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या आदेशानुसार तसेच अग्निशमन अधिकारी गणेश गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली बचावकार्य सुरू करण्यात आले. चेंबरमध्ये अडकलेल्या दोन्ही पिल्लांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तब्बल तीन तास अथक प्रयत्न केले. अखेर जेसीबीच्या साहाय्याने चेंबरमधून दोन्ही पिल्लांची सुखरूप सुटका करण्यात यश आले.
या बचावकार्यात अग्निशमन दलाचे कर्मचारी दिनेश बिऱ्हाडे, फारुक शेख, जफर पठाण, सत्यन संदानशिव, आकाश बाविस्कर आणि आकाश संदानशिव यांनी मोलाची भूमिका बजावली.
अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी दाखविलेली तत्परता, चिकाटी आणि प्राणिमात्रांप्रती असलेली संवेदनशीलता यामुळे दोन्ही पिल्लांना जीवदान मिळाले. या कामगिरीचे परिसरातून कौतुक होत आहे.

