शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी दहा दिवसीय प्रशिक्षणाला सुरुवात साने गुरुजी विद्या मंदिरात निवड व वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन; गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे यांचे मार्गदर्शन
अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुका पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या दहा दिवसीय निवड व वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण वर्गाला शुक्रवार, दि. १३ नोव्हेंबर रोजी शहरातील साने गुरुजी विद्या मंदिर येथे उत्साहात सुरुवात झाली. हे प्रशिक्षण दि. १३ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.
या प्रशिक्षण वर्गाला गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन उपस्थित शिक्षकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिक्षकांना मोलाचे मार्गदर्शन करताना अद्ययावत शैक्षणिक तंत्रज्ञान, नवीन अध्यापन पद्धती आणि ज्ञानाचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्याचे आवाहन केले.
या प्रशिक्षण वर्गाच्या यशस्वी नियोजनासाठी समन्वयक म्हणून किरण शिसोदे, तर सहसमन्वयक व विषयतज्ज्ञ म्हणून तुषार बाविस्कर, देवेंद्र पाटील, प्रशांत पाटील आणि किशोर पाटील जबाबदारी सांभाळत आहेत. तसेच निवड व वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षणासाठी आनंदा बापू धनगर, सर्जेराव शिसोदे, सोपान भवरे, रवींद्र देवरे यांच्यासह इतर तज्ज्ञ शिक्षक मार्गदर्शन करीत आहेत.
या दहा दिवसीय प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षकांना शैक्षणिक क्षेत्रातील बदलते प्रवाह, आधुनिक अध्यापन तंत्र आणि व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळणार असून, त्यांच्या सेवांतर्गत व व्यावसायिक विकासाला नवी दिशा मिळण्यास मदत होणार आहे.

