ब्रेकिंग
तासखेडा येथे स्मशानभूमीत वृक्षारोपणाने फुलली हिरवाई गावकऱ्यांचा स्तुत्य उपक्रम

 

अमळनेर (प्रतिनिधी):- जिथे जीवनाचा शेवट होतो, तिथेच नव्या जीवनाची सुरुवात व्हावी, या संकल्पनेतून तासखेडा येथे स्मशानभूमी परिसरात मोठ्या उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच नगरसेविका जयश्री पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

माजी सरपंच प्रदीप पाटील तसेच सरपंच कल्पना पाटील व ग्रामपंचायत सदस्य,ग्रामस्थ आणि तरुण मंडळाच्या पुढाकारातून स्मशानभूमी परिसरात वड, पिंपळ, कडुलिंब, आंबा, जांभूळ, बेल अशी 50 हून अधिक देशी झाडांची रोपं लावण्यात आली.झाडांना पाणी देणेकामी रावसाहेब पाटील व ए के पाटील यांनी पाण्याच्या टाक्या उपलब्ध करुन दिल्या.यावेळी प्रत्येक झाडाला ट्री गार्ड लावून पाणी देण्याची जबाबदारीही गावकऱ्यांनी घेतली.

“स्मशानभूमी म्हणजे फक्त दुःखाची जागा नाही, तर ती शांत, स्वच्छ आणि हिरवीगार असावी. आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ लावलेले एक झाड पुढच्या पिढीसाठी ऑक्सिजन देईल,” अशी भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली.

या उपक्रमात महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. स्मशानभूमी परिसर स्वच्छ करून, झाडांसाठी खड्डे खोदून सर्वांनी श्रमदान केले.

पुढील काळात स्मशानभूमीला कुंपण, बसण्यासाठी बाके बसवण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.

याप्रसंगी गावातील दिलीप बहिरम,संतोष बहिरम,सुनील पाटील,अभिमन पाटील,गुलाब पाटील,नागेश सोनार,मच्छिंद्र पाटील,निंबा पाटील,नाना पाटील,भारत पाटील,अनिल शिंदे,अनिल पाटील, बारकू पाटील,प्रमोद पाटील आमोदे येथील भिवराव पाटील,संजय पाटील ग्रामविकास अधिकारी आधार धनगर यांसह गावकरी उपस्थित होते.

या स्तुत्य उपक्रमाबद्दल सर्व स्तरातून गावकऱ्यांचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *