ब्रेकिंग
जागतिक जैवइंधन आघाडीत महत्त्वाच्या पदावर डॉ. तुषार पाटील यांची निवड भारत सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयाकडून नियुक्ती; ३५ देश आणि १२ आंतरराष्ट्रीय संघटनांशी समन्वयाची जबाबदारी

 

अमळनेर प्रतिनिधी : जागतिक स्तरावर भारताच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या जागतिक जैवइंधन आघाडीमध्ये (Global Biofuel Alliance) महत्त्वाच्या पदावर डॉ. तुषार शिवाजीराव पाटील यांची निवड करण्यात आली आहे. भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय, नवी दिल्ली यांच्याकडून त्यांची आंतरराष्ट्रीय उद्योग संपर्क विशेषज्ञ (International Industry Outreach Specialist) या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे अमळनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

 

भारत, ब्राझील आणि अमेरिका यांच्या पुढाकारातून २०२३ मध्ये जागतिक जैवइंधन आघाडीची स्थापना करण्यात आली. भारताच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या या आघाडीच्या माध्यमातून जैवइंधन क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सहकार्य, उद्योगविकास आणि स्वच्छ ऊर्जेला प्रोत्साहन देण्याचे काम केले जाते. या आघाडीअंतर्गत डॉ. पाटील यांच्यावर ३५ देश आणि १२ आंतरराष्ट्रीय संघटनांशी संबंधित उद्योग संपर्क व समन्वयाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

 

डॉ. तुषार पाटील यांची निवड विविध टप्प्यांवरील प्रोफाइल परीक्षण आणि मुलाखतींच्या फेऱ्यांनंतर करण्यात आली आहे. त्यांना जैवइंधन उद्योगातील १६ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून, या काळात त्यांनी विविध देशांमध्ये भारतीय उद्योगाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांच्या या अनुभवाचा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्याचा त्यांच्या निवडीसाठी विशेष फायदा झाला.

 

या पदावर ते नवी दिल्ली येथील संरक्षण भवनातून कार्यरत राहणार आहेत. जागतिक जैवइंधन आघाडीच्या कामकाजात आंतरराष्ट्रीय उद्योगांशी संपर्क प्रस्थापित करणे आणि विविध देश व संघटनांमध्ये समन्वय साधणे, अशी महत्त्वाची भूमिका ते पार पाडणार आहेत.

 

डॉ. तुषार शिवाजीराव पाटील हे श्री. अण्णासाहेब शिवाजीराव पाटील यांचे धाकटे सुपुत्र, तर दिवंगत डॉ. नितीन पाटील यांचे बंधू आहेत. त्यांच्या या प्रतिष्ठित निवडीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांच्या यशाचे कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *