ब्रेकिंग
आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून अमळनेरमध्ये जलक्रांती..!

 

माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या पुढाकारातून ३० आर्च बंधारे व संरक्षण भिंतींच्या कामांना गती; भूजल पातळीत वाढ, सिंचनाला बळ, टँकरवरील अवलंबित्व घटले

अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेर विधानसभा मतदारसंघ हा पारंपरिकदृष्ट्या अवर्षणग्रस्त व दुष्काळप्रवण म्हणून ओळखला जातो. अनियमित पर्जन्यमान, भूजल पातळीतील सातत्याने होणारी घट, पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि अपुऱ्या सिंचन सुविधांमुळे येथील शेतकऱ्यांना दरवर्षी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या परिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या उद्देशाने तत्कालीन मदत व पुनर्वसन तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा विद्यमान आमदार अनिल पाटील यांनी दूरदृष्टी ठेवत आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या दुष्काळ शमन व मृद व जलसंधारण उपाययोजना अंतर्गत सुमारे ₹१०,२६९.६५ लाख निधीतून ३० आर्च बंधारे व संरक्षण भिंतींच्या कामांना मंजुरी मिळवून दिली. राज्यात प्रथमच राबविण्यात आलेल्या या अभिनव पायलट प्रकल्पामुळे अमळनेर मतदारसंघातील अनेक गावांमध्ये जलसाठा निर्माण झाला असून भूजल पुनर्भरण, सिंचन क्षमता वाढ, मृद संवर्धन, पूरनियंत्रण आणि ग्रामीण पाणीपुरवठा व्यवस्थेला मोठा आधार मिळाला आहे.

दुष्काळमुक्त अमळनेरचे स्वप्न साकार करण्यासाठी आखला दीर्घकालीन आराखडा

लोकप्रतिनिधी झाल्यापासूनच आमदार अनिल पाटील यांनी अमळनेरच्या दुष्काळी परिस्थितीचा अभ्यास करून जलसंधारणावर आधारित विकासाचा आराखडा तयार केला होता. निम्न तापी पाडळसरे धरणासह नदी-नाल्यांवरील लघु व मध्यम जलसाठे निर्माण करून पावसाचे पाणी गावातच अडविणे, भूजल पुनर्भरण वाढविणे आणि शेतीला वर्षभरासाठी पाण्याचा स्थिर स्रोत उपलब्ध करून देणे हे त्यांच्या नियोजनाचे प्रमुख उद्दिष्ट होते. महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री झाल्यानंतर त्यांनी या संकल्पनेला प्रत्यक्ष मूर्त स्वरूप दिले. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून दुष्काळ शमन, मृद संवर्धन, जलसंधारण आणि नैसर्गिक साधनसंपत्ती संवर्धन यांचा समन्वय साधत आर्च बंधाऱ्यांची अभिनव पायलट योजना मंजूर करून घेतली. या माध्यमातून अमळनेर मतदारसंघातील विविध नदी-नाल्यांवर आर्च बंधारे, संरक्षण भिंती आणि पूरप्रतिबंधक संरचना उभारण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू झाले.

आर्च बंधारा – आधुनिक जलसंधारणाची प्रभावी संकल्पना

आर्च बंधारा (Arch Dam/Arch Weir) हा जलसंधारण क्षेत्रातील आधुनिक व अभियांत्रिकी दृष्ट्या अत्यंत प्रभावी प्रकार मानला जातो. कमानीच्या आकारात बांधण्यात येणाऱ्या या बंधाऱ्यामुळे पाण्याचा दाब थेट संरचनेवर न येता दोन्ही बाजूंच्या खडकाळ काठांवर समान रीतीने वितरित होतो. त्यामुळे कमी काँक्रीटमध्ये अधिक मजबूत, सुरक्षित आणि दीर्घकालीन टिकाऊ संरचना उभारणे शक्य होते. या बंधाऱ्यांमुळे पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी प्रभावीपणे अडविले जाते, भूजल पुनर्भरण वाढते, विहिरी व कूपनलिकांची पाणीपातळी उंचावते, नदीकाठावरील शेतीला वर्षभर ओलावा मिळतो, सिंचनाखालील क्षेत्र वाढते, मृदा धूप कमी होते आणि पूरस्थितीत पाण्याचा वेग नियंत्रित राहण्यास मदत मिळते.

भूजल पुनर्भरणामुळे टँकरमुक्तीकडे अमळनेरची वाटचाल

या प्रकल्पाचा सर्वात मोठा परिणाम यंदाच्या वर्षी भूजल पातळीत झालेल्या वाढीच्या स्वरूपात दिसून येत आहे. आर्च बंधाऱ्यांमुळे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात अडविले जाऊन जमिनीत मुरत असल्याने विहिरी, कूपनलिका, पाझर स्रोत तसेच ग्रामीण पाणीपुरवठा योजनांच्या जलस्रोतांमध्ये समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. यापूर्वी उन्हाळ्यात अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होत असल्याने शासनाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत असे. या व्यवस्थेवर दरवर्षी मोठ्या प्रमाणात शासकीय निधी खर्च होत होता. मात्र यंदा भूजल पातळी वाढल्यामुळे अनेक गावांमध्ये टँकरची आवश्यकता लक्षणीयरीत्या कमी झाली असून काही गावे टँकरमुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. परिणामी शासनाचा टँकरद्वारे पाणीपुरवठ्यावर होणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च कमी होण्यास मोठी मदत झाली आहे.

शेती, पिण्याचे पाणी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवे बळ

आर्च बंधाऱ्यांमुळे निर्माण झालेल्या जलसाठ्याचा थेट लाभ शेती क्षेत्राला होत आहे. सिंचनासाठी उपलब्ध पाण्यात वाढ झाल्याने रब्बी आणि उन्हाळी हंगामातील क्षेत्र वाढत असून दुबार व तिबार पीकपद्धतीला चालना मिळत आहे. फळबाग विकास, पशुपालन आणि पूरक व्यवसायांसाठीही पाण्याची उपलब्धता सुधारत आहे. भूजल पुनर्भरणामुळे ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची कार्यक्षमता वाढली असून नागरिकांना अधिक स्थिर आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा स्रोत उपलब्ध होत आहे.

पूरनियंत्रणासाठी संरक्षण भिंतींचेही महत्त्वपूर्ण योगदान

या योजनेत केवळ आर्च बंधाऱ्यांचा समावेश नसून नदीकाठ संवर्धन, संरक्षण भिंती, तटबंदी आणि पूरप्रतिबंधक संरचना उभारण्याची कामेही करण्यात आली आहेत. त्यामुळे अतिवृष्टीच्या काळात नदीकाठाची धूप कमी होण्यास, गावांचे संरक्षण होण्यास आणि सार्वजनिक तसेच कृषी मालमत्तेचे नुकसान टाळण्यास मोठी मदत होत आहे.

अनेक कामे पूर्ण; उर्वरित अंतिम टप्प्यात

मंजूर करण्यात आलेल्या कामांपैकी अनेक आर्च बंधारे पूर्णत्वास आले असून उर्वरित कामे प्रगतिपथावर आहेत. पूर्ण झालेल्या बंधाऱ्यांमुळे परिसरातील विहिरींमध्ये पाणी टिकून राहू लागले आहे. भविष्यात या प्रकल्पांचा जलसुरक्षा, कृषी उत्पादन, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि पर्यावरण संवर्धनावर दीर्घकालीन सकारात्मक परिणाम होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

मंजूर करण्यात आलेली प्रमुख कामे

आपत्ती व्यवस्थापन विभागांतर्गत दुष्काळ शमन व मृद व जलसंधारण उपाययोजनेत पुढील कामांचा समावेश आहे – मुडी संरक्षण भिंत (₹250.00 लाख), अमळगाव – चिखली नदीवरील आर्च बंधारा (₹295.32 लाख), चोपडाई – लोकल नाल्यावर आर्च बंधारा (₹206.92 लाख), दहिवद – आर्च बंधारा (₹177.15 लाख), ढेकू खुर्द – आर्च बंधारा (₹176.20 लाख), जानवे – आर्च बंधारा (₹160.74 लाख), डांगरी – माळण नदीवरील आर्च बंधारा (₹239.75 लाख), लोणे-भोणे फाटा – खैनी नदीवरील आर्च बंधारा (₹236.72 लाख), मारवड – माळण नदीवरील आर्च बंधारा (₹234.65 लाख), सडावण – आर्च बंधारा (₹237.75 लाख), सारबेटे – आर्च बंधारा (₹237.75 लाख), अमळनेर – आर्च बंधारा (₹215.24 लाख), नंदगाव – आर्च बंधारा (₹216.04 लाख), वावडे – आर्च बंधारा (₹198.73 लाख), मांडळ – आर्च बंधारा (₹198.73 लाख), पातोंडा – आर्च बंधारा (₹221.92 लाख), गडखांब – आर्च बंधारा (₹175.29 लाख), देवळी – आर्च बंधारा (₹195.97 लाख), नांद्री – आर्च बंधारा (₹186.00 लाख), कन्हेरे – बोरी नदीवरील आर्च बंधारा (₹807.00 लाख), मुंगसे – तापी नदीलगत संरक्षण भिंत (₹100.00 लाख), तांबापुरा, अमळनेर – महादेव मंदिराजवळ संरक्षण भिंत (₹100.00 लाख), पिंपळे खुर्द – संरक्षण भिंत (₹70.00 लाख), माळण नदीवरील अतिरिक्त आर्च बंधारा (₹237.59 लाख), निमझरी – आर्च बंधारा (₹205.49 लाख), सावखेडा–मुंगसे दरम्यान तापी नदीलगत संरक्षण भिंत (₹100.00 लाख), अमळनेर – बोरी नदीवरील आर्च बंधारा (₹811.66 लाख), मुडी – बोरी नदीवरील आर्च बंधारा (₹1,001.23 लाख), भिलाली – आर्च बंधारा (₹237.60 लाख), अमळनेर – बोरी नदीवरील आर्च बंधारा व पुलाचे काम (₹2,538.21 लाख), या सर्व कामांसाठी एकूण ₹१०,२६९.६५ लाख (अंदाजित) निधी मंजूर करण्यात आला असून, जलसंधारण, भूजल पुनर्भरण, सिंचन क्षमता वाढ, पूरनियंत्रण आणि ग्रामीण विकासाच्या दृष्टीने हा उपक्रम अमळनेर मतदारसंघासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे.

 जलसुरक्षित, सिंचनसमृद्ध आणि टँकरमुक्त अमळनेरकडे वाटचाल

जलसंधारणाच्या माध्यमातून दुष्काळावर कायमस्वरूपी मात करणे, भूजल पातळी वाढविणे, पिण्याच्या पाण्याची शाश्वत उपलब्धता निर्माण करणे, सिंचन क्षमता वाढविणे आणि टँकरमुक्त गावांची निर्मिती करणे ही या प्रकल्पामागील व्यापक संकल्पना आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून राबविण्यात आलेला हा अभिनव पायलट प्रकल्प अमळनेर मतदारसंघाला जलसुरक्षित, कृषीसमृद्ध आणि शाश्वत विकासाच्या दिशेने नेणारा महत्त्वपूर्ण टप्पा ठरत असून, भविष्यात राज्यातील इतर दुष्काळग्रस्त भागांसाठीही हा उपक्रम आदर्श मॉडेल ठरू शकतो.

अनिल भाईदास पाटील

मा.मंत्री तथा आमदार अमळनेर विधानसभा मतदारसंघ

अतिवृष्टीग्रस्त अमळनेरला तातडीने आर्थिक मदत द्या; नुकसानीचे पंचनामे करून शासनाने दिलासा द्यावा – तालुका काँग्रेसची मागणी

 

उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन; शेतकरी, व्यापारी, कामगारांसह १२०० ते १५०० कुटुंबांना मदतीची मागणी

अमळनेर | प्रतिनिधी

दि. ३० व ३१ जुलै २०२६ रोजी झालेल्या मुसळधार अतिवृष्टीमुळे अमळनेर शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून बाधित नागरिक, शेतकरी, व्यापारी, शेतमजूर व सर्व समाजघटकांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी जोरदार मागणी अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीने केली आहे. यासंदर्भात दि. ३ ऑगस्ट रोजी मा. उपविभागीय अधिकारी अमळनेर, मा. तहसीलदार अमळनेर तसेच मुख्याधिकारी, नगरपरिषद अमळनेर यांना सविस्तर निवेदन देण्यात आले.

तालुका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दि. २ ऑगस्ट रोजी शहरातील पूरग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी केली. बोरी नदीकाठावरील उत्तरेकडील रेल्वे पुलापासून दक्षिणेकडील माळी मढीच्या मागील भागापर्यंत, संताजी नगर, मार्केट कमिटीच्या मागील व आतील परिसरासह विविध भागांना भेट देऊन नागरिकांच्या व्यथा जाणून घेतल्या.

पाहणीदरम्यान बोरी नदीकाठावरील रियाझ मौलाना यांच्या वीटभट्टीचे तब्बल ७ ते ८ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले. तसेच नदीकाठावरील नागरिकांचे धान्य, डाळी, कपडे, अंथरूण-पांघरूण व दैनंदिन वापराच्या वस्तू पुराच्या पाण्यात पूर्णतः भिजून खराब झाल्या असून अनेक घरांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने नागरिकांसमोर अन्न, निवारा व स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर धान्य भिजून खराब झाले असून संपूर्ण परिसरात उग्र दुर्गंधी पसरली आहे. याशिवाय प्रसाद नगर, भालेराव नगर, संताजी नगर, गलवाडे रोड, ताडेपुरा, पहिलाड आदी भागांतील शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे.

नाल्यांच्या काठावरील अतिक्रमण आणि नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडला असून पुराचे पाणी थेट रस्ते, वस्त्या आणि घरांमध्ये घुसल्याचा आरोपही काँग्रेसने निवेदनातून केला आहे. या अतिवृष्टीमुळे शहर व तालुक्यातील सुमारे १२०० ते १५०० कुटुंबांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

तालुक्यात अनेक ठिकाणी शेतीतील सुपीक माती वाहून गेली असून उभी पिके धोक्यात आली आहेत. अनेक घरांची पडझड झाली असून शेतरस्ते (पाणंद) उद्ध्वस्त झाले आहेत. काही ठिकाणी रस्ते खचले असून पशुधनाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

पूराचे पाणी ओसरल्यानंतर शहर व ग्रामीण भागात दुर्गंधी पसरू लागली असून दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, अतिसार, कावीळ यांसारख्या आजारांचा तसेच डास, माशा व कीटकांमुळे डेंग्यू, मलेरिया आणि त्वचारोगांचा धोका वाढल्याबद्दलही निवेदनातून चिंता व्यक्त करण्यात आली. पूरग्रस्त कुटुंबांच्या मदतीसाठी सेवाभावी संस्थांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी मा. उपविभागीय अधिकारी अमळनेर यांना निवेदन देताना अमळनेर तालुका काँग्रेस अध्यक्ष भागवत सूर्यवंशी, संदीप घोरपडे, बन्सीलाल भागवत, प्रा. शाम पवार, मगन वामन पाटील, पी. वाय. पाटील यांनी पूरग्रस्त नागरिकांच्या समस्या मांडल्या.

मा. तहसीलदार अमळनेर यांना निवेदन देताना डॉ. रवींद्र पाटील, रोहिदास कापडे, कन्हैयालाल कापडे, अधिकार पाटील, लोटन चौधरी, तुषार संधान शिव यांनी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटाची माहिती देत तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली.

तर मुख्याधिकारी, अमळनेर नगरपरिषद यांच्यासमोर राजेंद्र भिकन पाटील, डॉ. प्रकाश सोनवणे, एड. रज्जाक शेख, लोटन पाटील, सुधाकर भैसे, कैलास पाटील यांनी बोरी नदीकाठावरील नागरिकांच्या अडचणी मांडत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली.

यावेळी राजू भाट, साईद तेली, तोशिब तेली, शालिग्राम पाटील, पितांबर पाटील यांची उपस्थिती होती.

प्रस्तावित बीएचएमएस, सीसीएमपी नोंदणी प्रक्रियेला आयएमए अमळनेर शाखेचा तीव्र विरोध प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांना निवेदन; 

 

अमळनेर : राज्य शासनाकडून प्रस्तावित बीएचएमएस व सीसीएमपी नोंदणी प्रक्रिया राबविण्याच्या हालचालींविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) अमळनेर शाखेने तीव्र भूमिका घेतली असून, या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी करत ४ ऑगस्ट रोजी प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांना निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी आयएमए अमळनेर शाखेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत शिंदे, सचिव डॉ. नरेंद्र महाजन यांच्यासह शाखेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, प्रस्तावित बीएचएमएस, सीसीएमपी नोंदणी प्रक्रियेमुळे वैद्यकीय व्यवसायाची गुणवत्ता, उपचारांची शास्त्रीय पद्धत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रुग्णांची सुरक्षितता धोक्यात येण्याची भीती आहे. आधुनिक वैद्यकशास्त्रातील उपचारपद्धती, निदान आणि औषधोपचार हे केवळ त्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व प्रशिक्षण घेतलेल्या वैद्यकीय तज्ज्ञांकडूनच केले जाणे आवश्यक असल्याचे आयएमएने स्पष्ट केले.

तसेच अशा प्रकारच्या नोंदणी प्रक्रियेमुळे आरोग्य व्यवस्थेत गोंधळ निर्माण होऊ शकतो, रुग्णांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर विपरीत परिणाम होऊ शकतो, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

शासनाने कोणताही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी इंडियन मेडिकल असोसिएशनसह वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ संघटनांशी व्यापक चर्चा करावी, रुग्णहिताला सर्वोच्च प्राधान्य द्यावे आणि प्रस्तावित नोंदणी प्रक्रिया तातडीने स्थगित करावी, अशी मागणी आयएमए अमळनेर शाखेने केली आहे.

प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांनी निवेदन स्वीकारून ते शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन दिले.

यावेळी आयएमए अमळनेर शाखेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत शिंदे, सचिव डॉ. नरेंद्र महाजन, खजिनदार डॉ. मयुरी जोशी , माजी आमदार डॉ . बी एस पाटील, डॉ. अविनाश जोशी, डॉ. निखिल बहुगुणी, डॉ. संदीप जोशी, डॉ. भूषण पाटील, डॉ. रवींद्र कुलकर्णी, डॉ. राहुल मुठे, डॉ. प्रसन्न जोशी, डॉ. अक्षय कुलकर्णी, डॉ. शरद बाविस्करतसेच शाखेचे सर्व सदस्य उपस्थित होते.

खानदेश शिक्षण मंडळाकडून नवीन सभासद नोंदणीबाबत स्पष्टीकरणात्मक जाहीर आवाहन

 

अमळनेर : |, दि. ५ ऑगस्ट : खानदेश शिक्षण मंडळ, अमळनेर यांच्या वतीने नवीन सभासद नोंदणीसंदर्भात सोशल मीडियावर सुरू असलेल्या विविध संदेशांच्या पार्श्वभूमीवर अधिकृत स्पष्टीकरण प्रसिद्ध करण्यात आले आहे.

संस्थेचे चिटणीस प्रा. पराग पी. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, खानदेश शिक्षण मंडळ, अमळनेर येथे नवीन सभासद बनविण्याबाबत अथवा त्यासाठी अर्ज भरण्याबाबत अद्याप संस्थेने कोणताही अधिकृत निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अशा कोणत्याही संदेशांवर अथवा अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच त्यास बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

संस्थेने स्पष्ट केले आहे की, सभासद नोंदणीसंदर्भातील कोणताही निर्णय झाल्यास त्याची माहिती संस्थेमार्फत अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात येईल. तोपर्यंत नागरिकांनी व इच्छुकांनी केवळ संस्थेच्या अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

महापुराच्या संकटात रोटरीचा मदतीचा हात; पूरग्रस्तांना फूड पॅकेट व कपड्यांचे वाटप

 

नदीकाठ व गांधलीपुरा परिसरातील सुमारे ६० गरजू नागरिकांना तातडीची मदत; “संकटाच्या काळात समाजाच्या पाठीशी उभे राहणे हीच रोटरीची खरी ओळख” – रोटे. महेश पाटील

अमळनेर | प्रतिनिधी

दि. ३१ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे अमळनेर शहरासह परिसरातील अनेक भाग जलमय झाले. अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर गरजू व संकटग्रस्त कुटुंबांना तातडीने दिलासा देण्यासाठी रोटरी क्लब अमळनेरने सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे केला.

दि. २ व ३ ऑगस्ट २०२६ रोजी रोटरी क्लबच्या वतीने नदीकाठ व गांधलीपुरा परिसरातील सुमारे ६० गरजू नागरिकांना फूड पॅकेटचे वितरण करण्यात आले. याशिवाय लहान बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत गरजूंसाठी कपड्यांचेही वाटप करण्यात आले. संकटाच्या काळात तातडीने मदत पोहोचविल्याने अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला.

या सेवाभावी उपक्रमावेळी क्लबचे अध्यक्ष रोटे. महेश पाटील, चेलाराम सैनानी, विजय माहेश्वरी, अभिजीत भांडारकर, डॉ. राहुल मुठे, प्रीतपाल सिंग बग्गा, रोहित सिंघवी, राजेश बेदमुथा, कीर्ती कुमार कोठारी, पूनम कोचर, सौरभ जैन, प्रतिक जैन, देवेंद्र कोठारी, प्रतीक खंडेरिया, विनोद थोरात, सचिन चोपडा, किरण कुंभार तसेच अन्य रोटरी सभासद उपस्थित होते.

या मदतकार्याचे नियोजन अभिजीत भांडारकर, देवेंद्र कोठारी व रोनक संकलेचा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. त्यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने फूड पॅकेट व कपड्यांचे वितरण करण्यात आले.

यावेळी बोलताना रोटे. महेश पाटील म्हणाले, “संकटाच्या काळात समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे हीच रोटरीची खरी ओळख आहे. गरजूंच्या मदतीसाठी रोटरी क्लब भविष्यातही अशाच प्रकारे सदैव तत्पर राहील.”

वरील वृत्त पी.आर.ओ. मकसूद बोहरी यांनी कळविले आहे.

स्मार्ट मीटरच्या वाढत्या तक्रारींवर अखिल भारतीय ग्राहक पंचायत आक्रमक; महावितरणला निवेदन देत पारदर्शकतेची जोरदार मागणी दुप्पट-तिप्पट वीज बिलांमुळे ग्राहकांमध्ये संताप; जनजागृतीसाठी कार्यशाळा घेण्याची अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांची ग्वाही

 

अमळनेर | प्रतिनिधी

स्मार्ट मीटर बसविल्यानंतर अनेक ग्राहकांना दुप्पट-तिप्पट वीज बिले येत असल्याच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेरच्या वतीने महावितरण वीज कंपनी लिमिटेड, अमळनेर उपविभाग-१ चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता मान. धनंजय धांडे साहेब यांना मंगळवारी (४ ऑगस्ट २०२६) सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महावितरणकडून सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संभ्रम व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी जुने मीटर बदलून स्मार्ट मीटर बसविल्यानंतर ग्राहकांना पूर्वीच्या तुलनेत दुप्पट-तिप्पट वीज बिले येत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ग्राहक संरक्षण कायदा २०१९ तसेच वीज कायदा २०२३ नुसार प्रत्येक ग्राहकाला योग्य माहिती, संपूर्ण पारदर्शकता आणि निवडीचा अधिकार मिळणे अपेक्षित आहे. मात्र स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेत आवश्यक ती पारदर्शकता दिसून येत नसल्याचा मुद्दा निवेदनातून उपस्थित करण्यात आला.

यावेळी ग्राहक पंचायतने स्मार्ट मीटरबाबत संपूर्ण व वस्तुनिष्ठ माहिती ग्राहकांना देण्यात यावी, मीटरबाबत शंका उपस्थित झाल्यास त्याची तपासणी कोणत्या अधिकृत प्रयोगशाळेत केली जाते याची माहिती पारदर्शकपणे उपलब्ध करून द्यावी, तसेच मीटर अचूक असल्यास त्याचे तांत्रिक फायदे ग्राहकांना प्रत्यक्ष तपासणीद्वारे समजावून सांगावेत, अशी मागणी केली. याशिवाय ग्राहकांच्या संमतीशिवाय जुने मीटर बदलू नयेत आणि स्मार्ट मीटरची सक्ती करू नये, अशीही ठाम भूमिका निवेदनातून मांडण्यात आली.

यावेळी मान. धनंजय धांडे साहेब यांनी ग्राहकांच्या शंका व गैरसमज दूर करण्यासाठी स्मार्ट मीटर विषयावर विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात येईल. या माध्यमातून ग्राहकांना तांत्रिक माहिती देऊन त्यांच्या सर्व संभ्रमाचे पूर्णपणे निरसन करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.

याप्रसंगी विजय शुक्ला, मकसूद बोहरी, सुनील वाघ, सतीश देशमुख, नरेंद्र बाळू पाटील, भाऊसाहेब देशमुख, दिलीप सारजे, सुभाष पाटील घोडगावकर उपस्थित होते.

 

“घाबरू नका… शासन तुमच्या पाठीशी!” – पूरग्रस्त अमळनेरला मंत्री गिरीष महाजन यांचा दिलासा महापुरानंतर शासनाची तातडीची हालचाल; पूरग्रस्तांना ₹१० हजारांची मदत, पंचनामे व पाणीपुरवठ्यासाठी विशेष निधीची घोषणा

 

अमळनेर (प्रतिनिधी): अमळनेर शहराला महापुराने दिलेल्या तडाख्यानंतर राज्य शासनाने तातडीने मदतीची भूमिका घेतली असून, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार अनिल पाटील यांनी जिल्हाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पूरग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी नागरिकांशी संवाद साधत “घाबरू नका… शासन तुमच्या पाठीशी आहे,” असा दिलासादायक संदेश देत सर्वतोपरी मदतीची ग्वाही दिली.

महापुरामुळे बाधित झालेल्या परिसराची पाहणी करताना नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. तसेच नुकसानग्रस्त कुटुंबांना तातडीने दिलासा देण्यासाठी विविध महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यात आले.

महत्त्वाचे निर्णय

प्रत्येक पात्र पूरग्रस्त कुटुंबाला तातडीची ₹१०,००० मदत देण्यात येणार.

घर, शेती, जनावरे व इतर झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे निर्देश.

शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी डीपीडीसीमधून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन.

पिंपळे नाल्यावरील अतिक्रमणांवर त्वरित कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी, पूरग्रस्त नागरिक तसेच अमळनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या प्रतिनिधींनी आपल्या अडचणी व मागण्या मंत्र्यांसमोर मांडल्या. शासन त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेईल, असे आश्वासनही देण्यात आले.

जयनिल फाऊंडेशनच्या कार्याचा गौरव

महापुराच्या भीषण संकटात स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचविणे, तसेच लायन्स क्लब, रोटरी क्लब, जैन सोशल ग्रुप आणि पत्रकार संघ यांच्या सहकार्याने पूरग्रस्तांपर्यंत अन्न व पिण्याच्या पाण्याची मदत पोहोचविल्याबद्दल जयनिल फाऊंडेशनचे अध्यक्ष गौतम अनिल पाटील व त्यांच्या संपूर्ण टीमच्या कार्याचे मंत्री गिरीष महाजन यांनी विशेष कौतुक केले.

आमदार अनिल पाटील यांची ग्वाही

यावेळी आमदार अनिल पाटील म्हणाले, “महापुरामुळे अमळनेरकरांवर मोठे संकट आले आहे. शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासह पूरग्रस्तांना शासनाची प्रत्येक योजना आणि मदत वेळेत मिळावी, यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.”

महापुराच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेला तातडीचा दिलासा, मदतीच्या घोषणा आणि पुनर्वसनासाठी सुरू झालेली यंत्रणा यामुळे पूरग्रस्त अमळनेरकरांना मोठा आधार मिळाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

नैसर्गिक आपत्तीत अमळनेरात दिसले माणुसकीचे दर्शन,   कुठे दिसला मायेचा झरा, तर कुठे दिसला मदतीचा आधार…!

अमळनेर( हृदयनाथ मोरे ) 30 जुलै च्या रात्री पडलेल्या मुसळधार पावसाने अमळनेर तालुक्यात हाहाकार माजवला. काही तासांतच नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे शहरातील अनेक भाग जलमय झाले. अनेक वर्षानंतर बोरी नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. महावितरण चे अनेक ट्रांसफार्मर पाण्याखाली गेल्यामुळे वीजपुरवठाही खंडित झाला. पावसाचा सर्वाधिक फटका कृषी उत्पन्न बाजार समितीला बसला. पिंपळे नाल्याच्या पुराच्या पाण्यामुळे बाजार समितीच्या मागील संरक्षक भिंतीला भगदाड पडून पाणी थेट आत घुसले त्यामुळे व्यापाऱ्यांच्या धान्याच्या गोण्या वाहून गेल्या काही गोण्या पाण्यात भिजल्या यात व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. धुळे रोडवरील शिवांश हब येथे पाणी घुसून दुकानातील मालाचे नुकसान झाले. गलवाडे रोड परिसर पूर्णपणे जलमय झाला होता. तसेच नदीकाठच्या परिसरातील नागरिकांचे अतोनात हाल झाले तसेच प्रचंड नुकसान झाले.

             एकंदरीतच अमळनेर शहरावर आलेल्या या नैसर्गिक संकटाच्या वेळी अंमळनेरकर नागरिक मदतीला धावले नसते तरच नवल…! अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांची तातडीने व्यवस्था करण्यात आली. तसेच गरजूंसाठी औषधे, प्रथमोपचार याची व्यवस्था करण्यात आली होती.

          अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या या कठीण परिस्थितीत तसेच पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी अनेक स्वयंसेवी संस्था, जय निल फाउंडेशन, लायन्स क्लब, रोटरी क्लब, जैन सोशल ग्रुप, अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघ, अनेक सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, पत्रकार बांधव, नगरपालिका प्रशासन, अग्निशमन दल, पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी, ज्ञात, अज्ञात अनेक नागरिकांनी ज्याला जशी जमेल तशी मदत करून या कठीण प्रसंगी अमळनेरवर कोणतेही संकट आले तर आम्ही ते परतावून लावू या भावनेने काम केले.

          आता जनजीवन पूर्व पदावर येत असून शासन प्रशासनाने नुकसानग्रस्तांचे त्वरित पंचनामे करून त्यांना तात्काळ शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून द्यावी एवढीच अमळनेर वासीयांकडून माफक अपेक्षा.

पूरग्रस्त मातंगवाडीत शिक्षिकेच्या मायेचा ओलावा; मंदाकिनी भोई यांनी दिला धीर, अन्न व वस्त्रांची मदत

 

अमळनेर (प्रतिनिधी):

पैलाड भागातील मातंगवाडीजवळील केडी गायकवाड हायस्कूल येथे कार्यरत असलेल्या शिक्षिका सौ. ताईसाहेब मंदाकिनी सुनील भोई यांनी पूरग्रस्त कुटुंबांना दिलेल्या मदतीमुळे मानवतेचा हृदयस्पर्शी आदर्श निर्माण केला आहे. मुसळधार पावसामुळे ३१ जुलै रोजी आलेल्या पुरात मातंगवाडीतील अनेक गोरगरीब कुटुंबांचा संसार अक्षरशः उद्ध्वस्त झाला. ही विदारक परिस्थिती पाहून शिक्षिका मंदाकिनी भोई यांना अश्रू अनावर झाले.

शाळेत कार्यरत असताना त्या रोजच या वस्तीतील कुटुंबांचे हालअपेष्टा व गरिबी जवळून पाहत होत्या. मात्र पुरामुळे महिलांचे संसारोपयोगी साहित्य, कपडे व अन्य वस्तू वाहून गेल्याचे दृश्य पाहून त्यांनी तत्काळ मदतीचा निर्णय घेतला.

घरी परतल्यानंतर आपल्या वयोवृद्ध सासू-सासरे, तसेच सुपुत्र गौरव व भूषण यांच्या सहकार्याने त्यांनी पूरग्रस्तांसाठी भाजी-भाकरी, खिचडी आदी अन्नपदार्थ तयार करून मातंगवाडीत जाऊन गरजू कुटुंबांना वाटप केले. अन्नासोबतच त्यांनी प्रेमाचे दोन शब्द देत महिलांचे सांत्वन केले आणि संकटाच्या काळात धीर दिला.

पूराच्या पाण्यात अनेक महिलांचे कपडे वाहून गेल्याने सौ. मंदाकिनी सुनील भोई यांनी स्वतःच्या चांगल्या प्रतीच्या साड्याही मातंग समाजातील भगिनींना वाटप केल्या. त्यांच्या या संवेदनशील व मानवतावादी कृतीचे सर्व स्तरांतून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.

विशेष म्हणजे, ज्या वस्तीत त्या शिक्षिका म्हणून विद्यार्थ्यांना विद्यादानाचे कार्य करतात, त्याच वस्तीतील गरजू कुटुंबांच्या मदतीसाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेत मानवतेचे दर्शन घडविले.

सौ. मंदाकिनी सुनील भोई या समाजसेवक व पक्षीमित्र तसेच अर्बन बँकेतील कॅशियर श्री. सुनील भोई यांच्या सुविद्य पत्नी असून, समाजकार्यात त्या आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत आहेत. त्यांच्या या सेवाभावी कार्यामुळे परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, अनेकांनी त्यांना “आदर्श शिक्षिका” म्हणून गौरविले आहे.

या समाजकार्याबद्दल प्रताप छबुलाल साळी, नगरसेवक यांनी सौ. ताईसाहेब मंदाकिनी सुनील भोई यांना मानाचा मुजरा करत त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले आहे. त्यांच्या या माणुसकीच्या कार्याने समाजात सेवाभाव, संवेदनशीलता आणि मानवतेचा संदेश दिला आहे.

चिमुकल्यांच्या ओजस्वी भाषणातून महापुरुषांना अभिवादन; सरस्वती शिशुवाटीकेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात विद्यार्थ्यांनी उलगडला महापुरुषांच्या विचारांचा व कार्याचा प्रेरणादायी वारसा

 

अमळनेर (प्रतिनिधी) : थोर समाजसेवक, स्वातंत्र्यसैनिक व राष्ट्रप्रेमाची प्रेरणा देणारे लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त येथील सरस्वती शिशुवाटीका येथे प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी प्रभावी भाषणांमधून दोन्ही महापुरुषांच्या कार्याचा, विचारांचा व समाजासाठी दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण आढावा घेत उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाची सुरुवात शालेय प्रार्थनेने झाली. त्यानंतर शिक्षक व विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करून वातावरण राष्ट्रभक्तीने भारावून टाकले. लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे श्री दिनेश नाईक यांच्या हस्ते पूजन व माल्यार्पण करण्यात आले.

यावेळी शाळेतील प्रियंका बनसोडे, राधिका मोरे, नीरज बाविस्कर, तन्मयी पाटील, हर्षाली संदानशिव आणि दिशान सोनवणे या विद्यार्थ्यांनी ओजस्वी भाषणातून महापुरुषांच्या जीवनकार्याचा प्रेरणादायी परिचय करून दिला. त्यांच्या प्रभावी वक्तृत्वाचे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात कौतुक केले.

यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनातील प्रेरणादायी व बोधपर प्रसंग सांगून त्यांच्या विचारांचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि संस्कारांची जपणूक करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

कार्यक्रमास सौ. किरण भदाणे, सौ. माहेश्वरी राजपूत, सौ. काजल राठोड आणि सौ. आम्रपाली संदानशिव यांची प्रमुख उपस्थिती लाभली. शेवटी सामूहिक पसायदानाने कार्यक्रमाची भावपूर्ण सांगता करण्यात आली.