ब्रेकिंग
बसस्थानक परिसरात स्वच्छतेचा जागर; नगरपरिषद, लायन्स क्लबचे श्रमदान

 

अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर नगरपरिषदेतर्फे सेवा संकल्प अभियान व स्वच्छ भारत अभियानांतर्गत ‘स्वच्छता ही सेवा अभियान २०२६’ राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या अनुषंगाने अमळनेर नगरपरिषद व लायन्स क्लब अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने बसस्थानक परिसरात स्वच्छता मोहीम व श्रमदान करण्यात आले.

नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर व मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमात सहभागी पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हातमोजे, मास्क व झाडूच्या सहाय्याने बसस्थानक परिसर, प्रवासी थांबे तसेच बस उभ्या राहण्याच्या ठिकाणांची स्वच्छता केली. परिसरातील कचरा, प्लास्टिक व पालापाचोळा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ व नशामुक्त भारताची शपथ देण्यात आली. ‘चला करूया स्वच्छतेसाठी श्रमदान’ हा संदेश देत सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्याचे आवाहन करण्यात आले. बसस्थानक परिसरात दररोज मोठ्या संख्येने नागरिक व प्रवाशांची वर्दळ असल्याने स्वच्छता राखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

नागरिक, प्रवासी व व्यावसायिकांनी कचरा रस्त्यावर न टाकता कचराकुंडीचा वापर करावा, असे आवाहन नगरपरिषदेतर्फे करण्यात आले.

यावेळी लायन्स क्लबचे पदाधिकारी, नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक, अधिकारी, कर्मचारी, सफाई कर्मचारी व प्रभाग मुकादम आदी उपस्थित होते.

१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा अभियान’ राबविण्यात येत असून, ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ या संकल्पनेतून नागरिकांनीही स्वच्छता उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन नगरपरिषदेतर्फे करण्यात आले आहे.

अमळनेरात ४ ऑक्टोबरला रंगणार काव्यसंध्येची मैफलसुप्रसिद्ध कवयित्री गुंजन पाटील यांची प्रमुख उपस्थिती

 

अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील काव्यरसिकांसाठी रविवार, ४ ऑक्टोबर रोजी काव्यसंध्या मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध कवयित्री कु. गुंजन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रंगणाऱ्या या कार्यक्रमातून हास्य, कविता आणि आनंदाची अनोखी मेजवानी अनुभवता येणार आहे.

सण-उत्सवांच्या काळात सामाजिक सलोखा जपणे, कायदा व सुव्यवस्था राखणे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पार पाडताना पोलिस प्रशासनावर मोठा ताण येतो. पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना या धकाधकीच्या कामातून काही क्षण विरंगुळा मिळावा, त्यांचा तणाव दूर होऊन त्यांना आनंदाचे क्षण अनुभवता यावेत, या उद्देशाने या विशेष काव्यसंध्येचे आयोजन करण्यात आले आहे.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात सायंकाळी ५ वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून माजी आमदार तथा कृषिभूषण साहेबराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, म. वा. मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, खानदेश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष नीरज अग्रवाल, लायन्स क्लबचे अध्यक्ष जितेंद्र पारख, अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत आणि पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम उपस्थित राहणार आहेत.

सांस्कृतिक परंपरेला उजाळा देण्याचा प्रयत्न

अमळनेर शहर व तालुक्याला समृद्ध सांस्कृतिक परंपरा लाभली आहे. महाराष्ट्राची लोकधारा आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचे कार्य विक्रांत भास्करराव पाटील यांच्या माध्यमातून सातत्याने केले जात आहे. याच सांस्कृतिक परंपरेला उजाळा देत काव्यरसिकांसह पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आनंदाचे क्षण देण्यासाठी या मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन शेतकी संघाचे संचालक विक्रांत पाटील, जयनील फाऊंडेशनचे अध्यक्ष गौतम पाटील, उपाध्यक्ष वरुण पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुनील भोई, भूषण महाजन, विजय राजपूत, अक्षय साळी, यश वर्मा आणि कवी शरद धनगर यांनी केले आहे.

गांधी-शास्त्रींच्या विचारांचा जागर; ‘प्रताप’मध्ये विद्यार्थ्यांच्या ज्ञानाला आणि लेखणीला धार

अमळनेर प्रतिनिधी : महात्मा गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त येथील प्रताप महाविद्यालयात इतिहास विभाग, मराठी विभाग आणि CCMC विभागाच्या संयुक्त विद्यमाने निबंध व सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रपुरुषांच्या विचारांचा प्रसार व्हावा, तसेच सामान्यज्ञान व लेखनकौशल्याला चालना मिळावी, या उद्देशाने स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य तथा CCMC विभागप्रमुख डॉ. धनंजय चौधरी, प्रा. प्रसाद मुठे, श्री. दिलीप शिरसाठ तसेच CCMC अभ्यासिकेतील मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदविला. कार्यक्रमातून गांधीजींचे सत्य, अहिंसा व स्वावलंबनाचे विचार तसेच लालबहादूर शास्त्री यांच्या साधेपणा, प्रामाणिकपणा आणि राष्ट्रनिष्ठेच्या मूल्यांना उजाळा मिळाला.

शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करून थकीत मानधन देण्याची मागणी

 

अमळनेर | प्रतिनिधी

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यामध्ये ग्राम रोजगार सहाय्यकांची महत्त्वाची भूमिका आहे. रोजगाराची मागणी नोंदविणे, मजुरांना रोजगार उपलब्ध करून देणे, मनरेगाच्या कामांची नोंद व अभिलेख ठेवणे, जिओटॅगिंगची कामे तसेच विविध तांत्रिक व प्रशासकीय कामांची अंमलबजावणी ग्राम रोजगार सहाय्यकांकडून केली जाते.

या पार्श्वभूमीवर अमळनेर तालुका ग्राम रोजगार सहाय्यक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शासनाकडे निवेदन सादर करण्यात आले आहे. दि. ०३ ऑक्टोबर २०२४ रोजी निर्गमित शासन निर्णयाची पूर्ण व प्रभावी अंमलबजावणी करून ग्राम रोजगार सहाय्यकांच्या मानधनात सुधारणा करावी, अशी प्रमुख मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

शासन निर्णयानुसार ग्राम रोजगार सेवकांच्या मानधनात सुधारणा करून दरमहा ८,००० रुपये मानधन तसेच २,००० रुपये प्रवास भत्ता देण्यास मान्यता देण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मात्र, या शासन निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना विविध अटी व प्रशासकीय कारणांमुळे अडथळे निर्माण होत असल्याचा दावा संघटनेने केला आहे.

ग्राम रोजगार सहाय्यकांना शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करताना मोठ्या प्रमाणावर जबाबदारी पार पाडावी लागते. त्यामुळे शासन निर्णयातील तरतुदींची तातडीने व प्रभावी अंमलबजावणी करून ग्राम रोजगार सहाय्यकांना त्यांच्या हक्काचे मानधन व इतर लाभ मिळवून द्यावेत, अशी मागणी संघटनेने केली आहे.

महाराष्ट्र शासन, नियोजन (रोहयो) विभागाच्या दि. ०३ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करून ग्राम रोजगार सहाय्यकांच्या आर्थिक व सामाजिक हिताचे रक्षण करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या वेळी गणेश चव्हाण.भागवत सोनवणे.दिपक धनगर. प्रविण पाटिल. प्रदिप पाटिल.ज्ञानेश्वर पाटिल. मनोहर पाटिल. संदिप राजपुत. प्रताप मोतीराळे. तुषार भदाणे.भगवान पाटिल. वसंत वाघ.सुर्यकांत पाटिल.कविता मिस्तरी. राजश्री देशमुख यादी उपस्थित होते

MPSC विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद अमळनेरच्या रेणुका पाटील यांनी विद्यार्थी शिष्टमंडळात मांडल्या विविध मागण्या

 

अमळनेर (प्रतिनिधी) : MPSC व इतर स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी प्रतिनिधींची बैठक मुंबईतील वर्षा निवासस्थानी झाली. या बैठकीत अमळनेर तालुक्यातील उदयनगर येथील विद्यार्थी प्रतिनिधी रेणुका पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची मांडणी केली.

रेणुका पाटील यांनी परीक्षेतील पारदर्शकता, ऑफलाइन परीक्षा, भरतीतील जागावाढ, वयोमर्यादा व परीक्षा शुल्कातील सवलत, पेपरफुटीची चौकशी, वार्षिक परीक्षा वेळापत्रक तसेच तक्रार निवारण यंत्रणेसह २० मागण्यांचे निवेदन सादर केले.

बैठकीत MPSC सचिवांची बदली, परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेणे, गट-कच्या जागांमध्ये वाढ आणि पुढील तीन वर्षांच्या रिक्त जागांचे नियोजन यासह विविध मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याचे विद्यार्थी प्रतिनिधींनी सांगितले. 

The Times of India +1

शिष्टमंडळातील एकमेव महिला प्रतिनिधी म्हणून रेणुका पाटील यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अडचणी मांडल्या. त्यांनी शासनाच्या भूमिकेबद्दल आभार व्यक्त करत मागण्यांची प्रभावी अंमलबजावणी अपेक्षित असल्याचे सांगितले.

प्रताप हायस्कूल केंद्रावर शासकीय चित्रकला परीक्षा उत्साहात एलिमेंटरीचे ५४३, इंटरमिजिएटचे ५०० विद्यार्थी सहभागी

 

अमळनेर (प्रतिनिधी) : खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप हायस्कूल येथे शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट) परीक्षा सुरळीतपणे पार पडली. १८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरदरम्यान झालेल्या परीक्षेत तालुक्यातील सुमारे ३० शाळांमधील एक हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

एलिमेंटरी परीक्षेस ५४३, तर इंटरमिजिएट परीक्षेस ५०० विद्यार्थी सहभागी झाले. वस्तुचित्र, स्मरणचित्र, डिझाईन, भूमिती व अक्षरलेखन आदी विषयांचे पेपर घेण्यात आले.

केंद्र समन्वयक डी. एन. पालवे व सहसमन्वयक के. व्ही. पाठक यांनी परीक्षा व्यवस्थेची जबाबदारी सांभाळली. मुख्याध्यापक ए. डी. भदाणे, लिपिक सागर पवार, प्रसाद गोसावी तसेच तालुक्यातील कला शिक्षकांचे सहकार्य लाभले.

शेळावे गणातील दुष्काळी प्रश्नांवर तातडीच्या उपाययोजनांची मागणी

 

पारोळा प्रतिनिधी : शेळावे गणातील गावांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाणी, पीकनुकसान भरपाई, चारा व रोजगाराच्या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी तहसीलदार, पारोळा यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.

निवेदनात पीकनुकसानीचे पंचनामे करून पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, पाणीटंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा, पशुधनासाठी चारा व आवश्यकतेनुसार चारा छावण्या सुरू कराव्यात, तसेच मनरेगा व रोजगार हमीची कामे वाढवावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय पात्र शेतकऱ्यांना पीककर्ज पुनर्गठन व कर्जवसुलीस मुदतवाढ, विद्यार्थ्यांना नियमानुसार शैक्षणिक शुल्क सवलत आणि शेतीपंप व वीजसवलतींचा लाभ देण्याची मागणी करण्यात आली. भविष्यातील पाणीटंचाईवर उपाय म्हणून नाला खोलीकरण, बंधारे, गाळ काढणे व शेततळ्यांची कामे प्राधान्याने हाती घेण्याची मागणीही करण्यात आली.

डॉ. समाधान मैराळे यांनी दुष्काळी परिस्थितीतील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर संबंधित विभागांनी तातडीने प्रत्यक्ष कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

निवेदनावर डॉ. समाधान मैराळे, प्रदीप पाटील, गणसिंग पाटील, गोरख भिल, शुभम पाटील, जितेंद्र पाटील, रोहिदास पाटील, मयूर पाटील, महेंद्र पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

अनधिकृत मुरूम वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त सडावण बुद्रुक येथे महसूल पथकाची कारवाई

 

अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यातील मौजे सडावण बुद्रुक येथे अनधिकृत गौण खनिज मुरूम वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर-ट्रॉलीवर महसूल विभागाने कारवाई केली. दोन्ही ट्रॅक्टर-ट्रॉली व मुद्देमाल तहसील कार्यालय, अमळनेर येथे जमा करण्यात आला आहे.

उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे व तहसीलदार डॉ. उमा ढेकळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

या कारवाईत मंडळ अधिकारी पी. एस. पाटील तसेच ग्राम महसूल अधिकारी जितेंद्र पाटील, मुकेश देसले, भूषण पाटील, कल्पेश कुवर, संदीप माळी, एम. आर. पाटील आणि अमोल चक्रे सहभागी होते. महसूल विभागाच्या या कारवाईमुळे अनधिकृत गौण खनिज वाहतुकीला आळा घालण्याच्या प्रशासनाच्या भूमिकेला बळ मिळाले आहे.

सफाई मित्रांच्या आरोग्याची नगरपरिषदेकडून काळजी अमळनेर नगरपरिषदेतर्फे आरोग्य तपासणी शिबिर

 

अमळनेर प्रतिनिधी : शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी अमळनेर नगरपरिषदेच्या वतीने इंदिरा गांधी भवन येथे आरोग्य शिबिर घेण्यात आले.

सेवा संकल्प अभियान व ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत आयोजित या शिबिरात सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना वैयक्तिक स्वच्छता, सुरक्षितता साधनांचा वापर आणि आरोग्यविषयक खबरदारीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर व मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिबिरास आरोग्य विभागातील अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, मुकादम व सफाई कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान, १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा संकल्प’ व ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानात नागरिकांनी सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन नगरपरिषदेने केले आहे.

जपान जिन भागातील मूलभूत सुविधांसाठी राष्ट्रवादीचा नगरपरिषदेला इशारा १५ दिवसांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा

 

अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर शहरातील जपान जिन भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष सैय्यद अजहर अली यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

जपान जिन परिसराला निवासी क्षेत्र असूनही औद्योगिक दराने कर आकारणी होत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला. नागरिक नियमितपणे घरपट्टी, पाणीपट्टी व इतर कर भरत असतानाही रस्ते, गटारी आणि पथदिव्यांसारख्या प्राथमिक सुविधा उपलब्ध नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.

निवेदनात औद्योगिक कर रद्द करून निवासी दराने कर आकारणी करणे, रस्त्यांचे काँक्रीटीकरण, भूमिगत गटार योजना, LED पथदिवे व हायमास्ट बसविणे तसेच आरक्षित मोकळ्या जागेचे सुशोभीकरण करून उद्यान व ज्येष्ठांसाठी बाकांची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली.

यापूर्वी २०२३ व २०२४ मध्ये निवेदने देऊनही दखल न घेतल्याचे सांगत, १५ दिवसांत परिसराची पाहणी करून सकारात्मक निर्णय न घेतल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सैय्यद अजहर अली यांनी दिला.

यावेळी शराफत अली ढेकेदार, इकबाल लोहार, मोहसीन अली, इम्रान बागवान, सैय्यद आसिफ, शरूख शेख, शरूख पठाण, अबीद शेख, फौजन शेख यांच्यासह जपान जिन परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवेदनाची प्रत आमदार अनिल भाईदास पाटील, नगररचना विभाग व जिल्हाधिकारी, जळगाव यांना पाठविण्यात आली.