नीट परीक्षा घोटाळा व पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करा
एनएसयूआयचे अमळनेर येथे जोरदार आंदोलन; मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी तीव्र आंदोलनाचा इशारा
अमळनेर, दि. १४ ऑगस्ट : नीट परीक्षेतील कथित गैरप्रकार, पेपरफुटी तसेच परीक्षा व्यवस्थेतील अनियमिततेच्या निषेधार्थ एनएसयूआय विद्यार्थी संघटनेच्या वतीने अमळनेर येथे जोरदार आंदोलन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या या प्रकारांची निष्पक्ष, सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
नीटसारख्या देशातील महत्त्वाच्या प्रवेश परीक्षेबाबत कथित गैरप्रकार समोर आल्याने लाखो विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम व असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. वर्षभर मेहनत करून परीक्षा देणाऱ्या प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये, तसेच परीक्षा प्रक्रियेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास अबाधित राहावा, यासाठी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे एनएसयूआयच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
आंदोलनादरम्यान नीट परीक्षा घोटाळा व पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करावी, दोषींना कायद्याच्या चौकटीत कठोर शिक्षा द्यावी, परीक्षा प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता आणावी तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य सुरक्षित करावे, अशा विविध मागण्या करण्यात आल्या.
विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या या गंभीर प्रश्नाकडे शासन व प्रशासनाने गांभीर्याने पाहावे, अशी मागणी करत आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला निवेदन सादर केले. विद्यार्थ्यांच्या मागण्यांची तातडीने दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्यात आली नाही, तर एनएसयूआयच्या वतीने संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिला.
परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता, विद्यार्थ्यांचे हक्क आणि गुणवत्ताधारित शिक्षणव्यवस्थेसाठी एनएसयूआय आक्रमक भूमिका घेणार असल्याचे या आंदोलनातून स्पष्ट झाले.
पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती
या आंदोलनाला एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष ऍड. कौस्तुभ पाटील, तालुकाध्यक्ष उमेश संधान शिव, शहराध्यक्ष जयेश पाटील, प्रभारी प्रवीण पाटील, तसेच काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भागवत सूर्यवंशी, शहराध्यक्ष गजेंद्र साळुंखे यांच्यासह संदीप घोरपडे, मनोज पाटील, तुषार संधान शिव, महेश पाटील, अशोक पवार, प्रताप पाटील, रोहिदास पाटील, गोकुळ बोरसे, कृष्णा चौधरी, कुणाल कोळी, विनायक सोनवणे, विलास भिल, पप्पू भिल, करण भिल, निंबाजी भिल यांच्यासह एनएसयूआय व काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि परीक्षा व्यवस्थेतील गैरप्रकारांविरोधात संघटित लढा उभारण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.



