ब्रेकिंग
अमळनेरमध्ये ईद-उल-अजहा उत्साहात; सामाजिक सलोख्याची परंपरा कायम!

 

 

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शहरात आज ईद-उल-अजहा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. गांधीलीपुरा येथील ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र येत देशात शांतता आणि प्रगतीसाठी प्रार्थना केली.

शहर ए काझी हाफिजो कारी अझर नुरी साहब यांच्या नेतृत्वाखाली नमाज पठण झाले. यावेळी पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. नमाजनंतर हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देत अमळनेरच्या सलोख्याची संस्कृती अधोरेखित केली. तसेच कब्रिस्तानात जाऊन पूर्वजांच्या स्मृतीस उजाळा देण्यात आला.

“नाद विसरून भेदाचा, संदेश देऊ प्रेमाचा…” हाच अमळनेरकरांचा सलोख्याचा संदेश आजच्या काळाची गरज आहे!

Read More अमळनेरमध्ये ईद-उल-अजहा उत्साहात; सामाजिक सलोख्याची परंपरा कायम!

जनगणना कर्मचाऱ्यास दमदाटी; माजी नगरसेवक सलीम टोपीविरुद्ध गुन्हा दाखल राष्ट्रीय जनगणना कामात अडथळा; प्रशासनाची कठोर भूमिका

 

अमळनेर | प्रतिनिधी

केंद्र शासनाच्या अत्यंत महत्त्वाच्या जनगणना प्रक्रियेत अडथळा निर्माण करत शासकीय कर्मचाऱ्यास दमदाटी केल्याप्रकरणी अमळनेर शहरातील गांधलीपुरा परिसरातील माजी नगरसेवक सलीम टोपी यांच्याविरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात एनसीआर दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रीय कर्तव्य बजावत असलेल्या प्रगणकाला थेट हाकलून लावत जनगणना नोंद करण्यास मज्जाव करण्यात आल्याने प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नियुक्त प्रगणक दिनेश पालवे हे जनगणना पूर्वतयारीच्या कामासाठी गांधलीपुरा भागात माहिती संकलनासाठी गेले होते. यावेळी त्यांनी संबंधित घराची माहिती विचारून नोंद प्रक्रिया सुरू करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना विरोध करण्यात आला.

“तू यहां क्यों आया? यहां पे पच्चीस साल से कोई सरकारी अधिकारी आया नहीं… चल निकल यहां से… यहां आना नहीं…” अशा शब्दांत दमदाटी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच संबंधित घराचा क्रमांक टाकू दिला नसून शासकीय कामात थेट अडथळा निर्माण करण्यात आल्याचेही समोर आले आहे.

घटनेनंतर प्रगणक दिनेश पालवे यांनी संपूर्ण प्रकाराची नोंद जनगणना नोंदवहीत केली. त्यानंतर त्यांनी तातडीने अमळनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा जनगणना अधिकारी गणेश शिंदे यांना माहिती दिली. प्रशासनाने तत्काळ हालचाल करत अमळनेर पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम २२१ व ३५२ नुसार एनसीआर क्रमांक ०५२९/२०२६ दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. शहरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू असून राष्ट्रीय कामात अडथळा आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

“जनगणना ही देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया” — गणेश शिंदे

> “भारताची जनगणना हे केंद्र शासनाचे अत्यंत महत्त्वाचे राष्ट्रीय काम असून नियुक्त प्रगणक व पर्यवेक्षकांना नागरिकांनी आवश्यक ती माहिती देणे कायद्याने बंधनकारक आहे. अमळनेर नगर परिषदेमार्फत जनगणना २०२७ च्या पूर्वतयारीचे काम सुरू आहे. नियुक्त प्रगणक श्री. दिनेश पालवे हे गांधलीपुरा भागात माहिती संकलनासाठी गेले असता त्यांना सहकार्य करण्यात आले नाही, तसेच त्यांच्याशी अयोग्य भाषेत बोलल्याची तक्रार प्राप्त झाली आहे.

> शासकीय व राष्ट्रीय कामात अडथळा निर्माण करणे ही गंभीर बाब असून प्रशासनाने संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाईसाठी अमळनेर पोलीस ठाण्यात पत्र दिले आहे. नागरिकांनी जनगणना प्रक्रियेस पूर्ण सहकार्य करून प्रगणक व पर्यवेक्षकांशी सौजन्याने वागावे.”

गणेश शिंदे

जनगणना अधिकारी तथा मुख्याधिकारी, अमळनेर नगर परिषद

अमळनेर रेल्वे स्थानकाच्या विकासकामांना वेग; खासदार स्मिताताई वाघ व पश्चिम रेल्वेच्या जनरल मॅनेजरांकडून पाहणी

 

 

अमळनेर | प्रतिनिधी

अमळनेर रेल्वे स्थानकाच्या विकासाला नवसंजीवनी देणाऱ्या ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आज पश्चिम रेल्वेचे जनरल मॅनेजर श्री रामशरय पांडे यांनी प्रत्यक्ष पाहणी दौरा करून सविस्तर आढावा घेतला. यावेळी जळगावच्या खासदार स्मिताताई वाघ यांनीही उपस्थित राहून प्रवाशांच्या सोयीसुविधांबाबत महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या.

या पाहणीदरम्यान श्री पंकज सिंग (डीआरएम), श्री आदिश पठानिया (डीसीएम), 

श्री हिमांशू शर्मा यांच्यासह रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. स्थानक परिसरातील सुरू असलेल्या विविध विकासकामांची माहिती अधिकाऱ्यांनी जनरल मॅनेजरांना दिली.

खासदार स्मिताताई वाघ यांनी स्थानकाच्या सुशोभीकरणासोबतच प्रवाशांना अधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी काही आवश्यक दुरुस्त्या करण्याची मागणी केली. तसेच स्थानक परिसरात नागरी सुविधा वाढवून प्रवाशांसाठी अधिक सुरक्षित व सुसज्ज वातावरण निर्माण करण्याबाबत त्यांनी प्रशासनाला सूचना दिल्या.

 

दरम्यान, सध्या प्रगतीपथावर असलेल्या नरडाणा–धुळे रेल्वे मार्गा बाबतही खासदार वाघ यांनी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. धुळे आणि जळगाव रेल्वेने थेट जोडले जावे, यासाठी नरडाणा येथे स्वतंत्र रेल्वे बायपास उभारण्यात यावा, अशी मागणी त्यांनी जनरल मॅनेजरांकडे केली. यासंदर्भात त्यांनी सविस्तर चर्चा करून पत्रव्यवहारही केला.

हा प्रस्तावित रेल्वे बायपास खानदेशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून भविष्यात मुंबई–पुणे मार्गावरील अनेक रेल्वेगाड्या या मार्गाने चालविणे शक्य होणार असल्याचे स्मिताताई वाघ यांनी सांगितले. त्यामुळे खानदेशातील प्रवाशांना मोठा लाभ मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

याचबरोबर अमळनेर रेल्वे स्थानकावर अधिकाधिक एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यात यावा, अशी मागणीही खासदार वाघ यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली. तसेच सध्या बंद असलेली पार्सल सेवा तात्काळ सुरू करण्यात यावी, जेणेकरून व्यापारी व नागरिकांची मोठी सोय होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी भाजपा मंडल अध्यक्ष जिजाबराव पाटील, शहर मंडल अध्यक्ष योगेश महाजन, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष लालचंद सैनानी, खा.शी. मंडळ संचालक निरज अग्रवाल, राकेश पाटील, दीपक भोई, शिवाजी राजपूत, राहुल चौधरी तसेच रेल्वे प्रशासनाचे अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अमळनेरात गोऱ्ह्यांची कत्तल रोखली; जपान जीन परिसरातील शेडवर पोलिसांचा धाडसी छापा, दोन निष्पाप जनावरांची सुटका

 

 

प्रतिनिधी | अमळनेर

अमळनेर शहरात गोऱ्ह्यांची कत्तल करण्याच्या उद्देशाने त्यांना अमानुष पद्धतीने डांबून ठेवल्याची संतापजनक घटना उघडकीस आली असून, पोलिसांनी वेळीच धाडसी कारवाई करत दोन निष्पाप गोऱ्ह्यांची सुटका केली आहे. जपान जीन परिसरातील रेल्वे पटरीजवळ असलेल्या पत्र्याच्या शेडवर छापा टाकत पोलिसांनी ही कारवाई केली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून प्राणीप्रेमींमधून संताप व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणी संशयित आरोपी रईस पठाण (रा. गांधलीपुरा, अमळनेर) याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोपनीय माहितीवरून पोलिसांची तात्काळ कारवाई

२४ मे रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास अमळनेरचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना गोपनीय माहिती मिळाली की, गांधलीपुरा येथील रईस पठाण याने जपान जीन भागातील रेल्वे रुळांजवळील पत्र्याच्या शेडमध्ये दोन गोऱ्हे कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवले आहेत. तसेच त्यांना कोणतीही खाण्यापिण्याची व्यवस्था न करता अत्यंत निर्दयीपणे दोरीने घट्ट बांधून ठेवण्यात आले असल्याची माहिती समोर आली.

माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज, विनोद भोई, चंद्रकांत पाटील, मंगल भोई तसेच डी.बी. पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत छापा टाकला.

१५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी शेडची पाहणी केली असता अंदाजे १० ते १२ महिने वयाचे दोन गोऱ्हे अत्यंत क्रूरतेने बांधून ठेवलेले आढळून आले. या दोन्ही गोऱ्ह्यांची अंदाजे किंमत १५ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी तात्काळ दोन्ही जनावरांची सुटका करत पंचनामा केला व गुरे जप्त केली.

प्राण्यांवरील क्रूरतेविरोधात गुन्हा दाखल

या प्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत संशयित आरोपी रईस शेख उर्फ रईस पठाण याच्याविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागणूक देणे प्रतिबंधक कायदा १९६० चे कलम ११(१)(अ)(ई) तसेच महाराष्ट्र प्राण्यांचे जतन सुधारणा कायदा २०१५ चे कलम ५(अ)(क) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास हेडकॉन्स्टेबल अशोक साळुंखे करीत असून, पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

सामाजिक कार्यकर्ते दिपक पाटील यांची शिवसेना शहर ओबीसी आघाडीच्या पदावर दमदार नियुक्ती

 

 

प्रतिनिधी | अमळनेर

अमळनेर शहरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय कार्य करणारे युवा सामाजिक कार्यकर्ते श्री. दिपक श्रीराम पाटील यांची शिवसेना शहर ओबीसी आघाडी (कार्यक्षेत्र – अमळनेर विधानसभा क्षेत्र) पदावर पुढील एक वर्षांच्या कालावधीसाठी तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

ही नियुक्ती वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेतून प्रेरित होत, शिवसेना मुख्यनेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे. तसेच जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जळगाव लोकसभा संपर्कप्रमुख आ. दिलीप लांडे यांच्या सूचनेनुसार आणि मा. आ. शिरीषदादा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील व ओबीसी आघाडी जिल्हाप्रमुख रुपेश माळी यांच्या नेतृत्वात ही निवड जाहीर करण्यात आली.

नियुक्तीपत्रामध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांचा तसेच धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीचा तळागाळापर्यंत प्रचार आणि प्रसार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिवसेना पक्षवाढीसाठी सर्वसामान्य नागरिकांना सोबत घेऊन संघटन मजबूत करण्यासाठी आणि पक्षाचे विचार घराघरात पोहोचविण्यासाठी कार्य करावे, असा विश्वास पक्षश्रेष्ठींनी व्यक्त केला आहे.

श्री. दिपक पाटील यांनी सामाजिक क्षेत्रात सातत्याने जनसंपर्क ठेवत विविध उपक्रमांद्वारे नागरिकांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे अमळनेर शहर व विधानसभा क्षेत्रात शिवसेना ओबीसी आघाडी अधिक बळकट होईल, असा विश्वास शिवसैनिकांनी व्यक्त केला आहे.

या निवडीबद्दल सामाजिक, राजकीय तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

RTE प्रवेशित विद्यार्थ्यांकडून गणवेश-पुस्तकांसाठी पैसे घेतल्यास शाळांवर थेट कारवाई  राज्य सरकारचा कडक इशारा; अमळनेरातील काही शाळांविरोधात पालकांमध्ये संताप

 

अमळनेर : शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना मोठा दिलासा देत राज्य सरकारने खासगी शाळांना स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. आरटीई कोट्यातून प्रवेशित विद्यार्थ्यांकडून गणवेश, पुस्तके, वह्या किंवा इतर कोणत्याही शैक्षणिक साहित्याच्या नावाखाली एक रुपयाही आकारता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश शिक्षण विभागाने जारी केले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असल्याचेही शासनाने बजावले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या आदेशानुसार, आरटीई अंतर्गत प्रवेशित बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणे हा त्यांचा घटनात्मक अधिकार आहे. मात्र राज्यातील अनेक खासगी शाळांकडून पुस्तके, गणवेश व विविध साहित्याच्या नावाखाली पालकांकडून अतिरिक्त शुल्क उकळले जात असल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. या गंभीर प्रकाराची दखल घेत शिक्षण संचलनालयाने सर्व जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी तसेच संबंधित प्रशासनाला अशा शाळांवर विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

नियमानुसार, आरटीई अंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती शासनाकडून संबंधित शाळांना केली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांवर कोणत्याही प्रकारचा आर्थिक भार टाकणे बेकायदेशीर असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. जर एखादी शाळा गणवेश, पुस्तके किंवा इतर साहित्यांसाठी पैशांची मागणी करत असेल, तर पालकांनी तात्काळ स्थानिक शिक्षण विभागाकडे लेखी तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे

दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरातही काही संस्थाचालक शाळांकडून आरटीई अंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांच्या पालकांकडे तब्बल सात हजार रुपयांपर्यंतची मागणी केली जात असल्याची चर्चा सध्या पालकांमध्ये रंगली आहे. आयडी नंबर प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून गणवेश व पुस्तकांच्या नावाखाली रक्कम मागितली जात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून संबंधित प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.

पालकांनी गट शिक्षणाधिकारी, अमळनेर तसेच शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद जळगाव यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित शाळांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. दोषी आढळणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करण्यापर्यंतची कारवाई करण्याचा इशाराही शिक्षण विभागाने दिला आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, शिक्षणाच्या नावाखाली होणारी पालकांची आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी शासनाने उचललेले हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

अमळनेरचे सुपुत्र डॉ. संदीप पाटील यांना आंतरराष्ट्रीय बहुमान 

 

अमळनेर ( प्रतिनिधी ) अमेरिकेतील प्रतिष्ठित ‘ अमेरिकन असोसिएशन ऑफ हीप अँड नी सर्जन्स ‘ या संघटनेने अमळनेरचे सुपुत्र तथा प्रसिद्ध सांधेरोपण व स्पोर्ट्स सर्जन डॉ. संदीप सुरेश पाटील यांना संघटनेचे सदस्यत्व बहाल केले आहे. हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठा बहुमान मानला जातो.

 

यासाठी डॉ. पाटील यांना त्यांचे मार्गदर्शक डॉ. आर्थर मलकानी, चीफ ऑफ अॅडल्ट रिकन्स्ट्रक्शन व फेलोशिप डायरेक्टर फॉर जॉइंट रिप्लेसमेंट, युनिव्हर्सिटी ऑफ लुईव्हिल, केंटकी (यूएसए) तसेच डॉ. सव्यसाची ठक्कर, डिपार्टमेंट ऑफ आर्थोप्लास्टी, हिप अँड नी सर्जरी, जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी, बाल्टिमोर (यूएसए) यांनी शिफारस केली. डॉ. पाटील यांनी सन २००८-०९ मध्ये डॉ. आर्थर मलकानी यांच्या मार्गदर्शनाखाली फेलोशिप पूर्ण केली होती. याशिवाय डॉ. संदीप पाटील यांची ‘इंडियन सोसायटी ऑफ हिप अँड नी सर्जन्स’ या राष्ट्रीय संघटनेचे सदस्य म्हणूनही निवड झाली आहे. दि. १६ एप्रिल २०२६ रोजी त्यांना सदस्यत्व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. त्यांचा सदस्यत्व क्रमांक पी-०१-१३२ असा आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. एच. पी. सी. खिंचा व सचिव डॉ. लिओ जोसेफ यांच्या स्वाक्षरीने हे प्रमाणपत्र देण्यात आले. डॉ. संदीप पाटील हे डी.एन.बी. ऑर्थो व डिप्लोमा ऑर्थो पदवीधारक असून सांधेरोपण व स्पोर्ट्स इंज्युरी शस्त्रक्रियेत तज्ज्ञ आहेत. त्यांच्या या आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील सदस्यत्वामुळे अमळनेरच्या वैद्यकीय क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. डॉ. पाटील यांनी या यशाचे श्रेय आपले गुरू डॉ. मलकानी व डॉ. ठक्कर यांना देत कृतज्ञता व्यक्त केली आहे. डॉ. संदीप पाटील हे सध्या मुंबई (बोरीवली) येथे सेवारत असून अमळनेर तालुका मराठा समाजाचे माजी सचिव कै. सुरेश रामकृष्ण सोनवणे (अमळगाव) यांचे ते सुपूत्र आहेत.

 

 

 

अमळनेरमध्ये संत शिरोमणी भिमा भोई जयंती उत्साहात साजरी महाभंडाऱ्यासह भक्तिमय वातावरणात हजारो समाजबांधवांची उपस्थिती

 

अमळनेर शहरात संत शिरोमणी भिमा भोई यांची जयंती अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. भोई समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात महाभंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी सामूहिक आरती करून संत शिरोमणी भिमा भोई यांना अभिवादन करण्यात आले.

भोईवाडा, बहादरपूर नाका, रुबीजीनगर तसेच पैलाड परिसरातील हजारो समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते. सर्वांनी एकत्र येत भक्तीभावाने जयंती उत्सव साजरा करत सामाजिक ऐक्य आणि एकोप्याचे दर्शन घडवले.

यावेळी समाजासाठी विशेष योगदान देणाऱ्या मान्यवरांचा भोई समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यात सुरेश शिंगाणे, अनिल महाजन, भीमराव शिंगाणे, रोहन वडिले, हिरालाल भोई, साहेबराव शिंगाणे, संतोष शिंगाणे, पांडुरंग शिंगाणे, सुदाम शिंगाणे, देविदास भोई, पंकज मोरे, प्रकाश शिंगाणे आणि भाऊसाहेब महाजन यांचा समावेश होता. समाजकार्य आणि कार्यक्रमासाठी दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पांडुरंग शिंगाणे (नगरसेवक), दीपक शिंगाणे, मोहन भोई, हिरालाल भोई, राजेंद्र शिंगाणे, रवींद्र शिंगाणे, श्रीराम भोई, भीका भोई, संतोष शिंगाणे, पंकज भोई (नगरसेवक), दिनकर भोई, शशिकांत शिंगाणे, मनोज शिंगाणे, सुदाम शिंगाणे, गणेश शिंगाणे, देवा भोई, विजय शिंगाणे, सागर भोई, दीपक ढोले, संदीप शिंगाणे, विकी शिंगाणे आणि प्रवीण शिंगाणे यांनी विशेष परिश्रम घेत मोलाचे सहकार्य केले.

संपूर्ण कार्यक्रम भक्तीमय वातावरणात आणि उत्साहपूर्ण माहोलात पार पडला. समाजबांधवांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला असून सामाजिक ऐक्याचे सुंदर दर्शन या जयंती उत्सवातून घडले.

पाडळसरे धरणावरील अमळनेरची १९४.५४ कोटींची २४x७ पाणीपुरवठा योजना प्रगतिपथावर आमदार अनिल पाटील यांची प्रत्यक्ष पाहणी; नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर नगरसेवकांसह उपस्थित

 

प्रतिनिधी | अमळनेर

अमळनेर शहराचे अनेक वर्षांपासूनचे जलसंकट कायमस्वरूपी दूर करण्याच्या दृष्टीने उभारण्यात येत असलेली तब्बल *१९४.५४ कोटी रुपयांची पाडळसरे धरणावरील २४x७ पाणीपुरवठा योजना* आता वेगाने प्रगतिपथावर असून या महत्त्वाकांक्षी योजनेची रविवारी प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.

रविवार, दि. २४ मे रोजी माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी आणि शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांसह पाडळसरे धरण परिसराला भेट देत सुरू असलेल्या कामाचा सविस्तर आढावा घेतला. सकाळी ७:३० वाजताच आमदार अनिल पाटील यांचा ताफा पाडळसरे धरण परिसरात दाखल झाला.

विशेष म्हणजे, शहराच्या विकासासाठी शिवसेना शिंदे गटाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांनीही नगरसेवकांसह उपस्थिती लावत या महत्त्वपूर्ण प्रकल्पाला पाठिंबा दर्शविला. त्यामुळे शहर विकासाच्या मुद्द्यावर आमदार आणि नगराध्यक्ष एकत्र आल्याचे सकारात्मक चित्र पाहायला मिळाले.

पाडळसरे धरणाजवळ तापी नदीच्या काठी सुरू असलेल्या जलवाहिनी आणि पाणीपुरवठा योजनेच्या विविध कामांची पाहणी करताना संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाच्या प्रगतीची माहिती घेण्यात आली. शहरवासीयांना भविष्यात शुद्ध आणि नियमित पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

अमळनेर शहरासाठी ही योजना ‘गेमचेंजर’ ठरणार असून, २४ तास अखंडित पाणीपुरवठ्याचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी एकत्र येत केलेले प्रयत्न आता प्रत्यक्षात दिसू लागल्याचे चित्र या पाहणी दौऱ्यातून स्पष्ट झाले.