अमळनेरात गोऱ्ह्यांची कत्तल रोखली; जपान जीन परिसरातील शेडवर पोलिसांचा धाडसी छापा, दोन निष्पाप जनावरांची सुटका
प्रतिनिधी | अमळनेर
अमळनेर शहरात गोऱ्ह्यांची कत्तल करण्याच्या उद्देशाने त्यांना अमानुष पद्धतीने डांबून ठेवल्याची संतापजनक घटना उघडकीस आली असून, पोलिसांनी वेळीच धाडसी कारवाई करत दोन निष्पाप गोऱ्ह्यांची सुटका केली आहे. जपान जीन परिसरातील रेल्वे पटरीजवळ असलेल्या पत्र्याच्या शेडवर छापा टाकत पोलिसांनी ही कारवाई केली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून प्राणीप्रेमींमधून संताप व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणी संशयित आरोपी रईस पठाण (रा. गांधलीपुरा, अमळनेर) याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोपनीय माहितीवरून पोलिसांची तात्काळ कारवाई
२४ मे रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास अमळनेरचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना गोपनीय माहिती मिळाली की, गांधलीपुरा येथील रईस पठाण याने जपान जीन भागातील रेल्वे रुळांजवळील पत्र्याच्या शेडमध्ये दोन गोऱ्हे कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवले आहेत. तसेच त्यांना कोणतीही खाण्यापिण्याची व्यवस्था न करता अत्यंत निर्दयीपणे दोरीने घट्ट बांधून ठेवण्यात आले असल्याची माहिती समोर आली.

माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज, विनोद भोई, चंद्रकांत पाटील, मंगल भोई तसेच डी.बी. पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत छापा टाकला.
१५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी शेडची पाहणी केली असता अंदाजे १० ते १२ महिने वयाचे दोन गोऱ्हे अत्यंत क्रूरतेने बांधून ठेवलेले आढळून आले. या दोन्ही गोऱ्ह्यांची अंदाजे किंमत १५ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी तात्काळ दोन्ही जनावरांची सुटका करत पंचनामा केला व गुरे जप्त केली.

प्राण्यांवरील क्रूरतेविरोधात गुन्हा दाखल
या प्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत संशयित आरोपी रईस शेख उर्फ रईस पठाण याच्याविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागणूक देणे प्रतिबंधक कायदा १९६० चे कलम ११(१)(अ)(ई) तसेच महाराष्ट्र प्राण्यांचे जतन सुधारणा कायदा २०१५ चे कलम ५(अ)(क) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास हेडकॉन्स्टेबल अशोक साळुंखे करीत असून, पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
