ब्रेकिंग
‘मूर्तिकार व्हा’ कार्यशाळेचे रविवारी आयोजन साने गुरुजी कर्मभूमी स्मारक येथे शाडू मातीपासून मूर्ती साकारण्याची संधी

अमळनेर : विद्यार्थ्यांसह कला व संस्कृतीची आवड असलेल्या नागरिकांमधील सर्जनशीलतेला चालना देण्यासाठी ‘मूर्तिकार व्हा’ या विशेष कार्यशाळेचे आयोजन रविवार, दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ वाजता करण्यात आले आहे. ही कार्यशाळा साने गुरुजी कर्मभूमी स्मारक, गलवाडे रोड, अमळनेर येथे होणार आहे.

या कार्यशाळेत सहभागी होणाऱ्यांना शाडू मातीपासून मूर्ती साकारण्याचे प्राथमिक तंत्र, आकारनिर्मिती आणि कलाकुसरीची माहिती प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे देण्यात येणार आहे. पर्यावरणपूरक पद्धतीने मूर्तीकलेची ओळख करून देणाऱ्या या उपक्रमामुळे सहभागींच्या कलागुणांना वाव मिळणार असून, पारंपरिक मूर्तीकलेविषयी आकर्षण निर्माण होण्यासही मदत होणार आहे.

सहभागींसाठी आवश्यक साहित्य

कार्यशाळेत सहभागी होणाऱ्यांनी सोबत एक किलो शाडू माती, लाकडी फळी, वाटी, प्लास्टिकचा डबा, रिकामी रिफिल, रद्दी वर्तमानपत्र, पेन्सिल, पाण्याची बाटली आदी साहित्य आणावे.

कला, सर्जनशीलता आणि पर्यावरणपूरक विचार यांचा सुंदर संगम असलेल्या या उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन ‘मूर्तिकार व्हा’ कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोहात सामाजिक व राजकीय पुरस्कारांचे थाटात वितरण

 

अमळनेर | प्रतिनिधी

अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित ‘साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोहा’त राज्यस्तरीय सामाजिक व राजकीय पुरस्कारांचे थाटात वितरण करण्यात आले. अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ व साने गुरुजी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २१ व २२ ऑगस्ट रोजी आयोजित या समारोहाला सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व साहित्य क्षेत्रातील मान्यवरांसह विद्यार्थी, पालक व नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली.

यंदाचा ‘साथी गुलाबराव पाटील स्मृती राजकीय पुरस्कार’ जनता दलाचे नेते तथा मीरा-भाईंदर महापालिकेचे माजी नगरसेवक मिलन म्हात्रे यांना, तर ‘सामाजिक (पुरोगामी) पुरस्कार’ माजी आयआरएस अधिकारी व जलसंवर्धन तज्ज्ञ उज्वलकुमार चव्हाण यांना प्रदान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील व सचिव संदीप घोरपडे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

राज्यस्तरीय पुरस्काराचे स्वरूप लाल टोपी, बागायतदार रुमाल, २१ हजार रुपये रोख रक्कम आणि ‘शिंगाडेधारी गुलाबराव पाटील’ स्मृतीचिन्ह असे होते.

अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना वैचारिक दिशा

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पारलिंगी समाजाच्या अभ्यासक शमिभा पाटील होत्या. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी सोशल मीडियावरून येणाऱ्या माहितीची सत्यता पडताळून पाहण्याचे आवाहन केले.

“सोशल मीडिया किंवा इतर माध्यमातून येणारे सर्वच मेसेज खरे नसतात. मेसेजची खात्री करावी. प्रसंगी लायब्ररीत जाऊन संदर्भ शोधावा. त्यातून आपली वैचारिक बैठक तयार होईल. देशातील लोकशाही टिकवून ठेवण्याची जबाबदारी ‘जेन-झी’वर (Gen Z) आहे. विद्यार्थ्यांनी विवेकातून परिवर्तन घडवावे,” असे शमिभा पाटील यांनी सांगितले.

त्या पुढे म्हणाल्या, “द्वेषापेक्षा संवादाला महत्त्व द्या. अफवांपेक्षा सत्याची पडताळणी करा. व्यक्तीपूजेपेक्षा विचारांना आणि विभाजनापेक्षा बंधुत्वाला महत्त्व द्या. भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेतील मूल्ये आपल्या आचरणात रुजल्यास संविधानाला अभिप्रेत असा समाज निर्माण होईल.”

‘पाण्याच्या प्रश्नावर माणसे तयार करणे हेच योगदान’ — उज्वलकुमार चव्हाण

सत्कारमूर्ती उज्वलकुमार चव्हाण यांनी आपल्या मनोगतात जलसंवर्धनाच्या कार्याचा उल्लेख करताना सांगितले की, “छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी बलिदान देणारी माणसे तयार केली, हे त्यांचे सर्वात मोठे योगदान होते. आम्ही देखील महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांतील २३८ गावांमध्ये जलक्रांती घडवून आणली आहे. गावात पाण्यासाठी झटणारी माणसे तयार करणे ही आमची प्रेरणा आहे.”

विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यासाची सवय लावून घ्यावी, जीवनमूल्यांच्या जडणघडणीसाठी वारकरी संप्रदायातील हरिपाठ ऐकावा, तसेच शाळांनी विपश्यना केंद्र सुरू करावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

मिलन म्हात्रे यांनी जागविल्या साथी गुलाबराव पाटील यांच्या आठवणी

दुसरे सत्कारमूर्ती मिलन म्हात्रे यांनी आपल्या भाषणातून माजी आमदार साथी गुलाबराव पाटील यांच्या कार्याच्या व आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या सामाजिक व राजकीय योगदानाचे स्मरण करत त्यांनी त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव संदीप घोरपडे यांनी केले. यावेळी संस्थेचे ज्येष्ठ संचालक गुणवंतराव पाटील, ॲड. अशोक बाविस्कर, किरण पाटील, डॉ. शकील जलालोद्दीन शेख, भास्कर बोरसे, किरण पाटील, मगन पाटील, मुख्याध्यापक संजीव पाटील, अनिता पाटील, सुनील पाटील, शिक्षक, पालक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘साथी संदेश’ वक्तृत्व स्पर्धेत प्रशांत बेले प्रथम

स्मृती समारोहाच्या निमित्ताने आयोजित ‘साथी संदेश वक्तृत्व स्पर्धेत’ राज्यभरातून विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या स्पर्धेत प्रशांत चिंतामण बेले (संभाजीनगर) याने प्रथम क्रमांक पटकावला. समृद्धी संजय मोरणकार (मालेगाव) हिने द्वितीय, तर रुपेश जयंत पाटील (जळगाव) याने तृतीय क्रमांक मिळविला. कल्याणी संदीप पाटील (अमळनेर) हिने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले.

स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. राज्यस्तरीय ‘साथी संदेश वक्तृत्व करंडक’ स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना आपल्या विचारांना प्रभावीपणे मांडण्याची संधी मिळाली.

साहित्य व नाट्य क्षेत्रातील दिग्गज प्राध्यापक राजेंद्र देशमुख, कविवर्य बी. एन. चौधरी व संजय नेरकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. ए. धनगर, जे. एस. पाटील, मोनिका पाटील आणि श्रीमती शारदा उंबरकर यांनी केले, तर आभार मुख्याध्यापिका अनिता पाटील यांनी मानले.

सामाजिक बांधिलकी, पुरोगामी विचार, जलसंवर्धन, विद्यार्थी प्रबोधन आणि प्रभावी वक्तृत्वाला व्यासपीठ देणारा हा स्मृती समारोह अमळनेरच्या सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात प्रेरणादायी ठरला.

जळगाव शहर जिल्हा काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी जगदीश गाढे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून नियुक्ती; काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

 

अमळनेर/जळगाव : काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्याच्या दृष्टीने जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते जगदीश गाढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली.

जगदीश गाढे यांनी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर निष्ठा ठेवत सातत्याने पक्षाच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर जळगाव शहर जिल्हा काँग्रेसच्या उपाध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

गाढे यांच्या नियुक्तीचे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, त्यांच्या माध्यमातून जळगाव शहरात पक्ष संघटनेला आणखी बळ मिळेल, असा विश्वास काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

त्यांच्या निवडीबद्दल महानगराध्यक्ष जमील शेख, प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, योगेंद्रसिंग पाटील, प्रदेश सरचिटणीस मुक्ती हरून नकवी, डॉ. ऐश्वर्या राठोड, प्रदेश सचिव प्रवीण सुरवाडे, जिल्हाध्यक्ष अविनाश भालेराव, धनंजय चौधरी, जिल्हा सरचिटणीस प्रदीप सोनवणे यांच्यासह काँग्रेस पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध स्तरातील मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

पक्षाने सोपविलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून काँग्रेसची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आपण सर्वांना सोबत घेऊन काम करू, असा निर्धार नवनियुक्त उपाध्यक्ष जगदीश गाढे यांनी व्यक्त केला.

वस्त्रकलेचे आद्य निर्माते भगवान श्री जिव्हेश्वर महाराज : साळी समाजाच्या आराध्यदैवताचा जन्मोत्सव आज उत्साहात

 

अमळनेर | प्रतिनिधी

साळी समाजाचे आराध्यदैवत, वस्त्रकलेचे आद्य निर्माते आणि समाजाचे प्रेरणास्थान असलेल्या भगवान श्री जिव्हेश्वर महाराज यांचा जन्मोत्सव मंगळवार, दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात येत आहे. भगवान श्री जिव्हेश्वर महाराज हे साळी समाजाचे आद्य पुरुष मानले जात असून, त्यांच्या जन्मकथेचा आणि वस्त्रनिर्मितीच्या परंपरेचा समाजाच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाशी अतूट संबंध आहे.

मानवाची लज्जा झाकण्यासाठी भगवान जिव्हेश्वरांची निर्मिती

साळी समाजाच्या श्रद्धेनुसार, सृष्टीच्या निर्मितीनंतर मानवाच्या अंगावर वस्त्र नसल्याने त्याची लज्जा झाकण्याची आवश्यकता निर्माण झाली. मानवाची लज्जा झाकण्यासाठी आणि त्याला वस्त्र उपलब्ध करून देण्यासाठी भगवान शंकरांनी आपल्या जिव्हेतून भगवान श्री जिव्हेश्वर महाराजांची निर्मिती केली, अशी आख्यायिका आहे.

भगवान शंकरांच्या जिव्हेतून निर्माण झालेले भगवान श्री जिव्हेश्वर महाराज हे वस्त्रकलेचे आद्य पुरुष मानले जातात. त्यांनी मानवासाठी वस्त्रनिर्मितीची कला विकसित केली आणि पुढे ही कला समाजाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली. त्यामुळे भगवान जिव्हेश्वर महाराज हे केवळ साळी समाजाचे आराध्यदैवत नसून मानवाची लज्जा झाकण्यासाठी वस्त्रकलेचा पाया घालणारे आद्य पुरुष म्हणून श्रद्धेने स्मरण केले जातात.

वस्त्रकलेला मिळाले धार्मिक आणि सांस्कृतिक अधिष्ठान

वस्त्र ही मानवाची मूलभूत गरज आहे. शरीराचे संरक्षण करण्याबरोबरच मानवी प्रतिष्ठा आणि लज्जेचे रक्षण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य वस्त्र करते. त्यामुळे वस्त्रनिर्मितीची कला ही केवळ उपजीविकेचे साधन नसून मानवसेवेशी जोडलेली पवित्र कला असल्याचे भगवान श्री जिव्हेश्वर महाराजांच्या परंपरेतून दिसून येते.

विणकाम, हातमाग आणि वस्त्रनिर्मितीची कला पिढ्यान्पिढ्या पुढे चालत आली. आपल्या कष्ट, कौशल्य आणि मेहनतीच्या जोरावर समाजाच्या वस्त्रांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या साळी समाजाने या गौरवशाली परंपरेचा वारसा आजवर जपला आहे.

जन्मोत्सवाला विशेष धार्मिक महत्त्व

भगवान श्री जिव्हेश्वर महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त समाजबांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. विविध ठिकाणी पूजाविधी, अभिषेक, आरती, धार्मिक कार्यक्रम, मिरवणूक, प्रबोधनपर उपक्रम तसेच सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करून आराध्यदैवताला अभिवादन केले जाते.

हा जन्मोत्सव केवळ धार्मिक उत्सव नसून आपल्या पूर्वजांनी दिलेल्या कष्ट, कौशल्य, प्रामाणिकपणा आणि सेवाभावाच्या परंपरेचे स्मरण करण्याचा पवित्र दिवस आहे.

कष्ट, कौशल्य आणि सेवाभावाचा संदेश

भगवान श्री जिव्हेश्वर महाराजांशी जोडलेली वस्त्रनिर्मितीची परंपरा समाजाला कष्टाला प्रतिष्ठा आणि कौशल्याला सन्मान देण्याचा संदेश देते. हाताने कष्ट करून निर्माण केलेल्या वस्त्रातून मानवाची गरज पूर्ण करण्याचे कार्य साळी समाजाने केले आहे.

भगवान जिव्हेश्वर महाराजांच्या परंपरेचा खरा वारसा म्हणजे प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडणे, ज्ञानाचा सन्मान करणे, गुरुजन व माता-पित्यांचा आदर करणे, समाजबांधवांना सहकार्य करणे आणि मानवतेची सेवा करणे होय.

आधुनिक पिढीने परंपरेचा गौरवशाली वारसा जपावा

आज वस्त्रनिर्मितीच्या क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. हातमाग आणि पारंपरिक विणकामाच्या पद्धतींमध्येही काळानुरूप बदल झाले आहेत. मात्र, या कलेमागील इतिहास, परंपरा आणि संस्कृतीचा वारसा विसरता कामा नये.

भगवान श्री जिव्हेश्वर महाराजांचा जन्मोत्सव हा नव्या पिढीला आपल्या समाजाच्या गौरवशाली इतिहासाची आणि परंपरेची ओळख करून देण्याची महत्त्वपूर्ण संधी आहे. आपल्या आद्य पुरुषाने मानवाची लज्जा झाकण्यासाठी दिलेल्या वस्त्रकलेच्या परंपरेचा अभिमान बाळगून हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे ही प्रत्येक समाजबांधवाची जबाबदारी आहे.

मानवतेचा संदेश देणारे आराध्यदैवत

भगवान श्री जिव्हेश्वर महाराजांच्या जन्मकथेत मानवकल्याणाचा व्यापक विचार दडलेला आहे. मानवाची लज्जा झाकण्यासाठी वस्त्राची निर्मिती करण्याची संकल्पना ही मुळात मानवाच्या सन्मानाशी जोडलेली आहे. त्यामुळे त्यांच्या स्मरणातून समाजात प्रेम, बंधुभाव, समानता, परस्पर सहकार्य आणि मानवतेची भावना अधिक दृढ करण्याचा संदेश मिळतो.

भगवान श्री जिव्हेश्वर महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त त्यांच्या चरणी नतमस्तक होताना केवळ पूजा-अर्चना न करता त्यांच्या परंपरेतील कष्ट, कौशल्य, सेवा आणि मानवकल्याणाचा विचार आचरणात आणणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

मंगळवार, दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी साजरा होणारा भगवान श्री जिव्हेश्वर महाराजांचा जन्मोत्सव हा साळी समाजाच्या गौरवशाली परंपरेचा आणि मानवसेवेसाठी निर्माण झालेल्या वस्त्रकलेचा स्मृतिदिन ठरत आहे. भगवान शंकरांच्या जिव्हेतून निर्माण झालेले आद्य पुरुष भगवान श्री जिव्हेश्वर महाराज यांच्या विचारांचा वारसा जपत समाजात एकोपा, बंधुभाव, कष्टाची प्रतिष्ठा आणि मानवतेची भावना वृद्धिंगत करण्याचा संकल्प या पवित्र दिनी करूया.

|| भगवान श्री जिव्हेश्वर महाराज की जय ||

ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर अमळनेर शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च संवेदनशील भागांत पोलिसांचे शक्तिप्रदर्शन; ११ अधिकारी, १२५ अंमलदारांसह दंगा नियंत्रण पथक व QRT तैनात

 

अमळनेर | प्रतिनिधी

आगामी ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अमळनेर पोलिसांकडून आज दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.०० ते ११.२० वाजेच्या दरम्यान शहरातील संवेदनशील भागांत भव्य रूट मार्च काढण्यात आला. या रूट मार्चमुळे शहरात पोलिसांची दक्षता आणि सुरक्षा व्यवस्थेचे प्रभावी दर्शन घडले.

हा रूट मार्च मा. श्री. श्रीकांत धिवरे सो., पोलीस अधिक्षक, जळगाव, मा. श्री. अशोक नखाते सो., अपर पोलीस अधिक्षक, चाळीसगाव परिमंडळ तसेच मा. श्री. विनायक कोते सो., उपविभागीय पोलीस अमळनेर भाग, अमळनेर यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.

शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पाच कंदील चौक, दगडी दरवाजा, सराफ बाजार, पानखिडकी, वाडी चौक, कसाली डी.पी., आखाडा मकान, झामी चौक, पवन चौक, तिरंगा चौक आणि गांधलीपुरा चौकी आदी संवेदनशील भागांतून हा रूट मार्च काढण्यात आला.

रूट मार्चसाठी अमळनेर पोलीस स्टेशनचे ०६ अधिकारी व ४८ अंमलदार, मारवड पोलीस स्टेशनचे ०२ अधिकारी व १५ अंमलदार, एरंडोल पोलीस स्टेशनचे ०१ अधिकारी व १० अंमलदार, धरणगाव पोलीस स्टेशनचे ०१ अधिकारी व ०३ अंमलदार, चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे ०३ अंमलदार, चोपडा शहर पोलीस स्टेशनचे ०३ अंमलदार, तसेच पोलीस मुख्यालयाकडील ०३ दंगा नियंत्रण पथके आणि ०१ QRT पथक सहभागी झाले होते.

अशाप्रकारे एकूण ११ अधिकारी व १२५ अंमलदार रूट मार्चमध्ये सहभागी झाले. यासोबतच पोलीस मुख्यालय, जळगावकडील बँड पथक देखील उपस्थित होते.

ईद-ए-मिलाद सण शांततेत, उत्साहात आणि सलोख्याच्या वातावरणात पार पडावा, यासाठी पोलिस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. शहरातील संवेदनशील भागांतून काढण्यात आलेल्या या रूट मार्चमुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचा स्पष्ट संदेश नागरिकांना देण्यात आला.

रूट मार्चदरम्यान पोलिसांचा शिस्तबद्ध ताफा पाहून नागरिकांचेही लक्ष वेधले गेले. सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता, सामाजिक सलोखा आणि बंधुभाव कायम राखण्यासाठी नागरिकांनीही प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

श्री मंगळग्रह मंदिरात भक्तीमय वातावरणात रुद्र महाभिषेक श्रावणानिमित्त आयोजन;  उपनगराध्यक्ष प्रशांत निकम सपत्नीक होते पूजेचे विशेष मानकरी

 

अमळनेर : श्रावण पर्वानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिरात आज सोमवार, दि. 24 ऑगस्ट रोजी भक्तीमय वातावरणात रुद्र महाभिषेक झाला. शहराचे उपनगराध्यक्ष प्रशांत निकम व सौ. सोनालीताई निकम हे दाम्पत्य रुद्र महाभिषेक पूजेचे विशेष मानकरी होते. त्यांनी मंदिरातील श्री मंगळेश्वर महादेवांच्या पिंडीवर विधिवत रुद्र महाभिषेकासह पूजा-अर्चना व बिल्वार्चना केली. भगवान महादेवांच्या उपासनेसाठी विशेष पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावणातील या धार्मिक विधीमुळे मंदिर परिसरात चैतन्य आणि भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.

 मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी श्रावण पर्वानिमित्त रुद्र महाभिषेकाचे आयोजन करण्यात येते. यंदाही पारंपरिक धार्मिक विधींचे पालन करीत रुद्र महाभिषेक झाला. शिवपिंडीवर जल, दुग्ध आदींच्या अभिषेकासह मंत्रोच्चार करण्यात आले. यावेळी भाविकांनी भगवान महादेवांचे दर्शन घेत पूजा-अर्चा केली.

 हिंदू धर्मातील धार्मिक परंपरेत श्रावण पर्वाला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात भगवान महादेवांची उपासना, रुद्र महाभिषेक, महामृत्युंजय मंत्रजप आणि शिवनामस्मरण करण्याची प्रथा आहे. ‌‘रुद्र‌’ हे भगवान महादेवांचे तेजस्वी व उग्र स्वरूप मानले जाते. रुद्र महाभिषेकाच्या माध्यमातून शिवतत्त्वाचे स्मरण, अंतःकरणाची शुद्धी आणि आध्यात्मिक समाधान प्राप्त होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

 रुद्र महाभिषेकानंतर झालेल्या महाआरतीने सोहळ्याची सांगता झाली. याप्रसंगी झालेले घंटानाद, शंखनाद आणि मंत्रोच्चारांनी मंदिर परिसर दुमदुमला. उपस्थित भाविकांनी ‌‘हर हर महादेव‌’चा जयघोष करीत आरतीत सहभाग नोफ्लदविला. महाआरतीवेळी संपूर्ण परिसरात भक्तीमय आणि प्रसन्न वातावरण अनुभवायला मिळाले. मंदिराचे पुरोहित शुभम वैष्णव व परशुराम शर्मा, गणेश जोशी यांनी रुद्र महाभिषेकाचे पौरोहित्य केले. त्यांना ढोलकीवर चंद्रकांत जोशी यांच्यासह उमेश पाठक यांनी सहकार्य केले. या धार्मिक सोहळ्यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर यांच्यासह मंगल सेवेकरी, भाविक व मंदिरातील सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री मंगळग्रह मंदिरात आज श्री सत्यनारायण महापूजा

अमळनेर : श्रावण पर्वानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिरात मंगळवार, दि. 25 ऑगस्ट रोजी श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे. महापूजेचे विशेष मानकरी नगरसेवक श्रीराम चौधरी व त्यांच्या धर्मपत्नी सौ. सुरेखाताई चौधरी या दाम्पत्याच्या हस्ते सकाळी साडेनऊच्या सुमारास या महापूजेची मंत्रोपचारांसह विधिवत सुरूवात होईल. श्रावण पर्वातील भगवान विष्णूंच्या सत्यनारायण स्वरूपाची महापूजा करणे अतिशय पवित्र व पुण्यफल प्राप्तीचे मानले जाते. या काळात वातावरण पूर्णपणे सात्त्विक असते. त्यामुळे या पवित्र महापूजेवेळी शहरासह परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनासह तीर्थप्रसादासाठी सकाळी 9 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत यावे, असे आवाहन मंगळग्रह सेवा संस्थेच्या विश्वस्त मंडळातर्फे करण्यात आले आहे.

अमळनेर तालुक्यात काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाची संघटनात्मक बांधणी वेगाने; आढावा बैठकीत रणनीतीवर सविस्तर चर्चा जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष एड. श्री अंकुश कटारे यांची अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीला भेट

 

अमळनेर : जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष एड. श्री अविनाश भालेराव यांनी पक्ष संघटना अधिक सक्षम व मजबूत करण्यासाठी सर्व विभागांच्या जिल्हाध्यक्षांना संघटनात्मक बांधणीवर विशेष लक्ष देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार दि. २३/८/२६ रोजी सकाळी ११.०० वाजता जळगाव जिल्हा काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष एड. श्री अंकुश कटारे यांनी अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीला भेट देत पक्ष संघटना व अनुसूचित जाती विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.

या वेळी अमळनेर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष भागवत सूर्यवंशी यांनी तालुका काँग्रेस कमिटीच्या संघटनात्मक कामाची माहिती दिली. तालुक्यातील एकूण बुथ संख्या, प्रत्येक बुथवर नियुक्त करण्यात आलेले बी. एल. ए., तसेच त्यांच्या वयोमानासंदर्भातील माहिती त्यांनी यावेळी सादर केली. पक्षाची बूथपातळीवरील संघटना अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक बाबींवरही यावेळी चर्चा करण्यात आली.

या बैठकीत जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष महेश पाटील, ठाकरे सर, एड. प्रशांत संदानशिव यांनी सहभाग घेतला. विशेषतः अमळनेर तालुक्यातील अनुसूचित जाती विभागाची संघटना अधिक प्रभावीपणे उभी करण्याबाबत एड. श्री अंकुश कटारे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली.

अनुसूचित जाती विभागाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यावर भर

अनुसूचित जाती विभागाचे अमळनेर तालुका अध्यक्ष श्री भगवान संधान शिव यांनी अमळनेर तालुका अनुसूचित जाती काँग्रेस कमिटीच्या कामकाजासंदर्भात आवश्यक माहिती दिली. यावेळी श्री सईद तेली, दिनेश पाटील यांनीही चर्चेत सहभाग घेतला.

काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक वाटचालीत अनुसूचित जाती विभागाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, या विभागाची तळागाळापर्यंत मजबूत संघटना उभारणे गरजेचे असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. अनुसूचित जाती समाजातील नागरिकांशी सातत्याने संपर्क वाढवून त्यांच्या प्रश्नांना व अडचणींना संघटनात्मक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा झाली.

या बैठकीला अनुसूचित जाती विभागाचे सरचिटणीस श्री राहुल मोरे, अनिरुद्ध साळवे, राजेंद्र भोसले, अनंत बागुल यांनीदेखील सहभाग नोंदविला. तसेच तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष राजू भाट, तुषार संधान शिव, प्रवीण पाटील, तौसीब तेली यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बूथपातळीपासून संघटना बळकट करण्याचा निर्धार

आगामी काळात अमळनेर तालुक्यात काँग्रेसची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी बूथपातळीपासून नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. विशेषतः अनुसूचित जाती विभागाला अधिक सक्रिय करून समाजातील विविध घटकांपर्यंत काँग्रेसची विचारधारा आणि पक्षाचे संघटनात्मक कार्य पोहोचविण्यावर भर देण्यात आला.

जिल्हा नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील प्रत्येक स्तरावर संघटना मजबूत करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. या आढावा बैठकीमुळे अमळनेर तालुक्यात काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्या आगामी संघटनात्मक कामाला नवी दिशा मिळणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

ज्ञानदीप अभियानातून १,००० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आधार; आणखी ५० विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेणार

 

डी. एल. सोशल फाउंडेशनचा स्तुत्य सामाजिक उपक्रम; गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्वप्नांना मिळणार बळ

अमळनेर : आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असल्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याच्या शिक्षणाच्या वाटचालीत अडथळा निर्माण होऊ नये, तसेच ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साधने उपलब्ध व्हावीत, या उदात्त उद्देशाने डी. एल. सोशल फाउंडेशनच्या वतीने ‘ज्ञानदीप अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानातून आतापर्यंत विविध शाळांमधील तब्बल १,००० गरजू व होतकरू विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक साहित्याची मदत पोहोचविण्यात आली आहे.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, चित्रकला साहित्य यासह विविध आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. केवळ साहित्य वाटप करण्यापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षणाची आवड, आत्मविश्वास आणि भविष्यात मोठी स्वप्ने पाहण्याची जिद्द निर्माण करणे, हा ‘ज्ञानदीप अभियानाचा’ व्यापक हेतू आहे.

आता ५० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी

‘ज्ञानदीप अभियानाला’ अधिक व्यापक आणि दीर्घकालीन स्वरूप देण्याच्या दिशेने डी. एल. सोशल फाउंडेशनने अमळनेर व पारोळा तालुक्यातील गरजू व होतकरू ५० विद्यार्थ्यांना पुढील टप्प्यात शिक्षणासाठी दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन त्यांना आवश्यक ते सहकार्य करण्याचा प्रयत्न फाउंडेशनच्या माध्यमातून केला जाणार आहे.

या महत्त्वाकांक्षी सामाजिक उपक्रमाचे नियोजन व मार्गदर्शन संचालक डॉ. समाधान मैराळे आणि संचालिका भावना मैराळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे. अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी महेश संदानशिव, रिझवान मणियार, महेंद्र ढमाळ, मनोज मैराळे आणि कृष्णा निकम यांनी विशेष परिश्रम घेतले.

‘एक पाऊल आजचे, उज्ज्वल उद्याचे’

‘एक पाऊल आजचे, उज्ज्वल उद्याचे’ या प्रेरणादायी ब्रीदवाक्याने सुरू असलेल्या ‘ज्ञानदीप अभियानाने’ आतापर्यंत १,००० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आधार देत सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला आहे. आता आणखी ५० विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला बळ देण्याच्या निर्णयामुळे या अभियानाची व्याप्ती आणखी वाढणार आहे.

गरजू विद्यार्थ्यांच्या हातात शैक्षणिक साहित्य देऊन त्यांच्या डोळ्यांतील स्वप्नांना नवी उमेद देणारे ज्ञानदीप अभियान हे शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडविण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे. या अभियानातून भविष्यात अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहण्यासाठी मदत मिळेल, असा विश्वास डी. एल. सोशल फाउंडेशनच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

 अमळनेरच्या सर्वांगीण विकासासाठी प्रसंगी जीव ओवाळून टाकेल : डॉ. दिगंबर (राजू) महाले

 

अमळनेर : “अमळनेर ही माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. येथील पाणी, उद्योग आणि आरोग्याचे प्रश्न मला चांगलेच ज्ञात आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी तसेच अमळनेरच्या सर्वांगीण विकासासाठी प्रसंगी मी जीव ओवाळून टाकेल,” अशी भावपूर्ण ग्वाही डॉ. दिगंबर (राजू) महाले यांनी दिली.

डॉ. दिगंबर महाले यांची व्हाईस ऑफ मीडियाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अमळनेर येथे विविध सामाजिक, सांस्कृतिक व पुरोगामी संघटनांच्या वतीने भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. महाले यांनी अमळनेरच्या विकासासाठी आपली कटिबद्धता व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मौर्य क्रांती संघाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष बन्सीलाल भागवत होते. प्रारंभी महात्मा फुले यांचे गीत दिशा संदानशिव, उषा देवरे व डी. ए. पाटील यांनी सादर केले.

यावेळी मराठा सेवा संघाचे अशोक पाटील, बहुजन समाज पार्टीचे गौतम मोरे, अल्लामा फजले हक खैराबादी स्टडी सेंटर अँड पब्लिक लायब्ररीचे रियाज मौलाना, धनदाई महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रा. डॉ. लीलाधर पाटील, अर्बन बँकेचे संचालक रणजित शिंदे, राष्ट्रीय कला मंचचे अजय भामरे, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे भीमराव महाजन तसेच युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार यांनी डॉ. दिगंबर महाले यांच्या पत्रकारिता व शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव करत मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या विचारपीठावर महिला पतंजली योग समितीच्या माधुरी पाटील, तसेच पुरोगामी क्रांती दल, बहुजन क्रांती मोर्चा आणि राष्ट्र सेवा दलाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. महाले यांनी अमळनेरच्या विकासातील विविध प्रश्नांवर प्रकाश टाकत, “अमळनेरच्या विकासासाठी केवळ बोलून चालणार नाही, तर त्यासाठी प्रत्यक्ष प्रयत्नांची गरज आहे. पाणी, उद्योग, आरोग्य आणि रोजगाराच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन शहर व परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण एकजुटीने प्रयत्न केले पाहिजेत,” असा निर्धार व्यक्त केला.

कार्यक्रमाचे डी. ए. पाटील यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले, तर बापुराव ठाकरे यांनी आभार मानले.

याप्रसंगी अर्बन बँकेच्या संचालिका वसुंधरा लांडगे, ॲडव्होकेट तिलोत्तमा पाटील, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भागवत सूर्यवंशी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष डी. एम. पाटील, शिक्षकांचे नेते योगेश पाटील, सुनील अहिरराव, डॉ. कुणाल पवार, ठेंग मॅडम, वाल्मीक मराठे, दिलीप बहिरम, संजय पाटील, ॲडव्होकेट रज्जाक शेख, उमेश काटे, जयेश काटे, शंकर बैसाणे, देवेंद्र महाजन आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

डॉ. दिगंबर महाले यांच्या राष्ट्रीय पातळीवरील निवडीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील सामाजिक, शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

साने गुरुजींच्या विचारांचा दीपस्तंभ हरपला; प्राचार्य डॉ. अरविंद सराफ यांना अमळनेरकरांची भावपूर्ण आदरांजली विविध सामाजिक, शैक्षणिक व सेवाभावी संस्थांच्या वतीने आदरांजली सभा; मान्यवरांनी व्यक्त केला कृतज्ञ भाव

 

अमळनेर : साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानचे अध्यक्ष, शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक आणि सामाजिक कार्याची बांधिलकी जपणारे प्राचार्य डॉ. अरविंद सराफ सर यांच्या निधनाने अमळनेरच्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या स्मृतींना उजाळा देत अमळनेर येथील साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानसह विविध सामाजिक, शैक्षणिक व सेवाभावी संस्थांच्या वतीने रविवार, दि. २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता आदरांजली सभा आयोजित करण्यात आली.

या आदरांजली सभेत साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान, गुजराती वैष्णव समाज, सीनियर सिटीजन क्लब, सोनार व सराफ असोसिएशन, राष्ट्रसेवा दल, श्री छत्रपती शिवाजी महाराज गार्डन ग्रुप, न्यू प्लॉट परिसर विकास मंच, खानदेश शिक्षण मंडळ, प्रताप कॉलेज प्राध्यापक संघटना तसेच परिसरातील सर्व पत्रकार यांच्या वतीने प्राचार्य डॉ. अरविंद सराफ यांच्या कार्याला आदरांजली वाहण्यात आली.

प्राचार्य डॉ. सराफ यांनी शिक्षण क्षेत्रासोबतच सामाजिक व सांस्कृतिक चळवळींमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. साने गुरुजींच्या विचारांचा प्रचार-प्रसार आणि कर्मभूमीच्या कार्याला बळ देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या साधेपणातला मोठेपणा, सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची वृत्ती, विद्यार्थ्यांप्रती असलेली आत्मीयता आणि सामाजिक प्रश्नांविषयीची संवेदनशीलता यामुळे त्यांनी अमळनेरच्या जनमानसात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते.

यावेळी दर्शना पवार, बजरंग लाल अग्रवाल, ॲड. ललिता पाटील, सोमानी सर, वासुदेव देसले, प्रकाश शेठ पारेख, एएनआयचे राज्याध्यक्ष अविनाश पाटील, मकसूद बोहरी, प्राचार्य व्ही. ए. पाटील, प्रा. वाय. बी. पाटील, नवसारीकर सर, भगतसिंग परदेशी, चेतन सोनार आदींनी मनोगत व्यक्त करून डॉ. अरविंद सराफ यांच्या आठवणींना उजाळा दिला.

मान्यवरांनी आपल्या मनोगतात डॉ. सराफ यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी भरून निघणे कठीण असल्याचे सांगितले. शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि साने गुरुजींच्या विचारांशी असलेली त्यांची निष्ठा हीच त्यांच्या कार्याची खरी ओळख होती, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा पुढे नेणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, अशी भावनाही उपस्थितांनी व्यक्त केली.

सभेच्या वातावरणात डॉ. अरविंद सराफ यांच्या आठवणींनी उपस्थितांचे मन हेलावून गेले. त्यांच्या कार्याला अभिवादन करत उपस्थितांनी त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केल्या. विविध क्षेत्रांतील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार, मित्रपरिवार व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साने गुरुजींच्या कर्मभूमीत शिक्षण व समाजसेवेचा विचार रुजविणाऱ्या एका समर्पित व्यक्तिमत्त्वाला अमळनेरकरांनी अश्रुपूर्ण नयनांनी दिलेली ही आदरांजली ठरली.