पानखिडकी मारामारी प्रकरणात जय बजरंग मंडळाचा विनाकारण उल्लेख; ६१ कार्यकर्त्यांचे पोलीस निरीक्षकांना निवेदन हरीश भावसार याने पोलिसांची दिशाभूल केल्याचा मंडळाच्या कार्यकर्त्यांचा आरोप; सखोल चौकशीची मागणी
अमळनेर प्रतिनिधी : पानखिडकी परिसरात झालेल्या मारामारीच्या प्रकरणात जय बजरंग मित्र मंडळाचे नाव विनाकारण गोवण्यात आल्याचा आरोप करीत मंडळाच्या ६१ कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना निवेदन दिले आहे. आपल्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्याला प्रत्युत्तर देण्यासाठी हरीश भावसार याने पोलिसांची दिशाभूल करून खोटी तक्रार दाखल केल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, हरीश भावसार याचा जय बजरंग गणेश मंडळाच्या आर्थिक हिशोबाशी कोणताही संबंध नाही. त्याच्याविरुद्ध दाखल झालेला गुन्हा तसेच सौरभ याच्याशी असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्याने मंडळाचे नाव या प्रकरणात गोवले आहे. पोलिसांना चुकीची माहिती देऊन जय बजरंग मंडळाची तसेच गणेशोत्सवाची बदनामी करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला आहे.
मंडळाच्या आर्थिक हिशोबाबाबत कोणताही वाद नसून, संबंधित व्यक्तींच्या आपापसातील वादात मंडळ किंवा मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनाकारण त्रास होऊ नये, अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे. तसेच हरीश भावसार आणि संबंधित साक्षीदारांची सखोल चौकशी करून सत्य परिस्थिती समोर आणावी व योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर नगरसेवक गोपी कासार, जितेंद्र पवार, कमलेश गुरव, निखिल चौधरी, गणेश चौधरी, मुकेश पाटील, श्रीकांत करंजे, दिनेश सैंदाणे, हर्षल विसपुते, राज गोलेच्छा, चेतन चौधरी, मनोज पाटील, अमोल चौधरी, हर्षल भावसार, रितेश चौधरी, गणेश जाधव, परेश भामरे, रवींद्र बारी, ऋषिकेश बारी, महेश करंजे, प्रसाद करंजे, प्रशांत चौधरी, वैभव खैरनार यांच्यासह ६१ मंडळ कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


