ग्रामीण रुग्णालयात आमदार अनिल पाटील यांची धडक पाहणी उष्माघात कक्षाची तपासणी; उपजिल्हा रुग्णालयाचे काम दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे कडक आदेश
अमळनेर : शहरातील ग्रामीण रुग्णालयात माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी आज अचानक भेट देत विविध विभागांची सखोल पाहणी केली. रुग्णालयातील अस्वच्छता, बंद स्वच्छतागृह, तुटलेले दरवाजे आणि उपजिल्हा रुग्णालयाच्या रखडलेल्या बांधकामावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.
उपजिल्हा रुग्णालयासाठी वरच्या मजल्यावर सुरू असलेल्या बांधकामाची गती अत्यंत संथ असल्याचे निदर्शनास येताच आमदार पाटील यांनी बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना धारेवर धरले. “कोणत्याही परिस्थितीत पुढील दोन महिन्यांत हे काम पूर्ण झालेच पाहिजे,” असे स्पष्ट आदेश त्यांनी दिले.

बांधकामामुळे गेल्या वर्षभरापासून बंद असलेले स्वच्छतागृह तातडीने सुरू करण्याच्या सूचना देतानाच तुटलेले दरवाजे आणि इतर दुरुस्तीची कामे त्वरित पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. रुग्णालयातील बेडशीट अस्वच्छ असल्याचे पाहूनही त्यांनी नाराजी व्यक्त करत, “रुग्णांच्या आरोग्याशी कोणताही खेळ खपवून घेतला जाणार नाही,” असा इशारा दिला.
आमदार पाटील यांनी औषधालयासह प्रत्येक विभागात प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा मिळाल्याच पाहिजेत, यासाठी सर्वांनी जबाबदारीने काम करण्याचे निर्देश त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले. तसेच रुग्णालय प्रशासनाला तातडीने सुधारणा करण्याच्या सूचना करण्यात आल्या.
यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश ताळे यांनी रुग्णालयाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा आमदारांना दिला.
उष्माघात कक्षाची विशेष पाहणी
अमळनेर तालुक्यात वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार अनिल पाटील यांनी उष्माघात कक्षाची विशेष पाहणी केली. रुग्णांसाठी कुलर, थंड पिण्याचे पाणी, आवश्यक औषधसाठा आणि सर्व सुविधा तत्काळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन राजपूत, जितेंद्र ठाकूर, विजय पाटील, जयेश पाटील उपस्थित होते. तसेच रुग्णालयाच्या वतीने डॉ. जी. एम. पाटील, डॉ. संदीप जोशी, डॉ. प्रशांत शिंदे, डॉ. सुमित पाटील, डॉ. परेश पाटील, बांधकाम अभियंता भागवत माळी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.


