आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर अमळनेर भक्तिरसात न्हाऊन निघाले!
‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात श्री मंगळग्रह मंदिरातून संत श्री सखाराम महाराज वाडी संस्थानापर्यंत भव्य दिंडी; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सपत्नीक केले पूजन
अमळनेर (प्रतिनिधी):
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त संपूर्ण अमळनेर नगरी शनिवारी (दि. २५ जुलै) विठ्ठलभक्तीच्या रंगात रंगून गेली. मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या संत श्री सखाराम महाराज वाडी संस्थानापर्यंतच्या भव्य दिंडी सोहळ्याने शहरातील वातावरण भक्तिमय झाले. ‘ज्ञानोबा-तुकाराम’, ‘राम कृष्ण हरी’ आणि ‘विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल’ या अखंड नामघोषाने परिसर दुमदुमून गेला, तर टाळ-मृदुंगाच्या गजरात हजारो भाविकांनी विठुरायाच्या चरणी भक्तीभाव अर्पण केला.
दिंडीच्या शुभारंभप्रसंगी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सपत्नीक उपस्थित राहून राजदंडाचे पूजन केले. मंत्रोच्चारात भगव्या पताकेला वंदन करून त्यांनी दिंडीला खांदा दिला. यानंतर हातात टाळ घेऊन काही काळ दिंडीत सहभागी होत त्यांनी वारकरी संप्रदायाच्या भक्तिमय वातावरणाचा आनंद लुटला. त्यांच्या उपस्थितीमुळे या धार्मिक सोहळ्याला विशेष प्रतिष्ठा लाभली.
यावेळी नायब तहसीलदार प्रशांत धमके, महसूल प्रशासनातील पुरुषोत्तम पाटील, टी. सी. धनराळे, मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, सहसचिव दिलीप बहिरम, विश्वस्त अनिल अहिरराव, डी. ए. सोनवणे, ‘सीईओ’ आर. जी. चव्हाण, मंगल सेवेकरी विनोद कदम, बाळा पवार, मंदिराचे सेवेकरी आणि असंख्य भाविक उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सपत्नीक श्री मंगळग्रह मंदिरात पूजा-अर्चा करून संकल्प सोडला. त्यानंतर मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या हस्ते त्यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला.
पहाटेपासूनच विठ्ठलनामाचा अखंड गजर
पहाटे श्री विठ्ठल-रुक्मिणी तसेच श्री मंगळग्रह देवतेची विधिवत पूजा, अभिषेक आणि महाआरती पार पडली. त्यानंतर वैष्णव परंपरेचे प्रतीक असलेली पताका, तुळशी वृंदावन, भगवे ध्वज आणि विठ्ठलाच्या प्रतिमेसह दिंडीला प्रारंभ झाला. टाळ, मृदुंग आणि अभंगांच्या सुरेल संगतीने वातावरण भक्तिरसाने भारावून गेले. मंदिराचे सेवेकरी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि बालवारकरी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विठ्ठलनामाचा अखंड गजर केला.
दिंडीदरम्यान संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव आणि संत एकनाथ महाराज यांच्या अभंगांचे सामूहिक गायन करण्यात आले. ‘राम कृष्ण हरी’, ‘ज्ञानोबा-तुकाराम’ आणि ‘विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल’ या नामघोषांनी संपूर्ण मार्ग भक्तिमय झाला. समता, सेवा, प्रेम, संयम आणि ईश्वरनिष्ठेचा वारकरी संदेश या दिंडीतून समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचला.
पुष्पवृष्टीने दिंडीचे जल्लोषात स्वागत
दिंडी मार्गावरील पैलाड परिसर आणि चोपडा नाका येथे नागरिकांनी दिंडीवर पुष्पवृष्टी करून स्वागत केले. दगडी दरवाजा ते सराफ बाजार आणि पुढे संत श्री सखाराम महाराज वाडी संस्थानापर्यंत सेवेकऱ्यांनी हरिपाठ म्हणत, फुगडी खेळत भक्तीचा अनोखा संगम घडवून आणला.
संत श्री सखाराम महाराज वाडी संस्थानात पोहोचल्यानंतर संस्थानाचे विश्वस्त तथा पुरोहित जय देव आणि सेवेकऱ्यांनी दिंडीचे स्वागत केले. तेथे देवांच्या मूर्तींना राजदंडाचा स्पर्श करून हरिपाठ, महाआरती आणि विठ्ठल-रुक्मिणी पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित सर्व भाविकांना प्रसादाचे वितरण करण्यात आले. धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर दिंडी पुन्हा श्री मंगळग्रह मंदिरात परतली.
भक्ती, सेवा आणि समर्पणाचा अविस्मरणीय सोहळा
आषाढी एकादशीच्या या मंगल सोहळ्याने भक्ती, श्रद्धा, सेवा आणि समर्पणाचा अद्वितीय संगम अनुभवायला मिळाला. श्री मंगळग्रह मंदिरातून निघालेली ही दिंडी केवळ संत श्री सखाराम महाराज वाडी संस्थानापर्यंतचा प्रवास नव्हता, तर प्रत्येक भाविकाच्या अंतःकरणात विठ्ठलभक्ती जागवणारी, संतपरंपरेचा गौरव करणारी आणि समाजात अध्यात्माचा सुगंध दरवळवणारी एक अविस्मरणीय आध्यात्मिक यात्रा ठरली.



