साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये विविध स्पर्धांनी हिंदी सप्ताह उत्साहात साजरा
अमळनेर : साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये हिंदी दिवसाचे औचित्य साधून संपूर्ण सप्ताह विविध शैक्षणिक उपक्रम व स्पर्धांनी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. हिंदी भाषेचा प्रचार, प्रसार तसेच विद्यार्थिनींमध्ये हिंदी भाषेविषयी आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने हिंदी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि हिंदी सामान्य ज्ञान स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
हिंदी सप्ताहाच्या समारोपप्रसंगी दिनांक २१ सप्टेंबर २०२६, सोमवार रोजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव माननीय श्री. दादासाहेब संदीप घोरपडे होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय श्रीमती अनिता बोरसे मॅडम यांनी केले. आपल्या प्रास्ताविकपर भाषणात त्यांनी स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या विद्यार्थिनींचे कौतुक केले. “तुम्ही या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन खऱ्या अर्थाने हिंदी भाषेचा प्रचार व प्रसार करत आहात आणि हिंदी भाषेचा गौरव वाढवत आहात,” असे त्यांनी सांगितले.
वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थिनींनी हिंदी भाषेतील आपले प्रभावी वक्तृत्व सादर करत उपस्थितांची दाद मिळवली. स्पर्धेत प्रथम क्रमांक – कल्याणी पाटील (१० वी-अ), द्वितीय क्रमांक – दिव्यानी पाटील (१० वी-अ), तृतीय क्रमांक – पूजा पाटील (१० वी-अ) तर उत्तेजनार्थ – अक्षरा साळुंखे (८ वी-अ) यांनी यश संपादन केले. विजेत्या विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
याच कार्यक्रमात तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल दृष्टी चौधरी हिचाही अध्यक्षांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दृष्टी चौधरी हिला श्री. मुकेश पाटील सर व श्री. आर. एम. देशमुख सर यांचे मार्गदर्शन लाभले.
अध्यक्षीय भाषणात संस्थेचे सचिव दादासाहेब श्री. संदीप घोरपडे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना, “तुम्ही प्रत्येक भाषा शिका आणि ती समजून घ्या. भाषा शिकल्याने ज्ञानामध्ये वृद्धी होत असते,” असे प्रतिपादन केले. हिंदी सप्ताहादरम्यान संपूर्ण आठवडाभर विविध उपक्रम व स्पर्धांचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी विद्यार्थिनी तसेच हिंदी शिक्षकांचे मनापासून कौतुक केले. “खऱ्या अर्थाने तुम्ही हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य करत आहात,” असेही त्यांनी नमूद केले.
या उपक्रमास संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब श्री. हेमकांत पाटील तसेच संचालक मंडळाने शुभेच्छा दिल्या.
संपूर्ण हिंदी सप्ताहाचे आयोजन हिंदी शिक्षक श्री. दिलीप पाटील सर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. दिलीप पाटील सर यांनी केले, तर श्री. मुकेश पाटील सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग, विविध स्पर्धांमधून दिसून आलेले त्यांचे भाषिक कौशल्य आणि हिंदी भाषेविषयी निर्माण झालेली आस्था यामुळे साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये साजरा झालेला हिंदी सप्ताह संस्मरणीय ठरला.
