सामाजिक वंचितांच्या प्रश्नांवर संशोधनाची मोहोर! प्रा. विजयकुमार वाघमारे यांना समाजकार्य विषयात पीएचडी पदवी
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 16 hours ago
Top 10 News
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
द्रौ.रा. कन्या शाळेच्या ८२ व्या वर्धापन दिनाचा जल्लोष; गुणवंत विद्यार्थिनींसह क्रीडा विजेत्यांचा गौरव
केक कापून, फुगे आकाशात झेपावत आणि ‘वर्धापन दिन चिरायू होवो’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला
अमळनेर (प्रतिनिधी) : खान्देश शिक्षण मंडळ संचलित द्रौपदीबाई रामचंद्र शेठ कन्या शाळेचा ८२ वा वर्धापन दिन आगळ्यावेगळ्या आणि अभिनव पद्धतीने मोठ्या उत्साहात व आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थीनी, शिक्षक, माजी विद्यार्थिनी, पदाधिकारी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या ऐतिहासिक सोहळ्याने शाळेच्या समृद्ध परंपरेला उजाळा मिळाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खान्देश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री. विनोद जगदीश अग्रवाल होते. प्रमुख अतिथी म्हणून शाळेच्या माजी विद्यार्थिनी सौ. रोहिणी सुनील देशपांडे तसेच सामाजिक कार्यकर्त्या सौ. शुभांगी निलेश राजपूत उपस्थित होत्या.
यावेळी ताईसाहेब माधुरी पाटील, कमलजी कोचर, ताईसाहेब वसुंधरा लाडगे, सी.ए. नीरजजी अग्रवाल, भाऊसाहेब जितेंद्र जैन, श्री. हरी आण्णा वाणी, श्री. प्रदीप अग्रवाल, श्री. विवेक भांडारकर, प्राचार्य प्रा. डॉ. एच. डी. जाधव, श्री. विनोद भांडारकर, प्रा. व्ही. बी. मांटे, श्री. निलेश भांडारकर, मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी, श्री. व्ही. एम. पाटील, श्रीमती एस. पी. बाविस्कर, श्री. दत्तात्रय पवार, श्री. एस. पी. वाघ, श्री. कैलास पाटील, श्री. आर. जे. पाटील, श्री. एस. एम. पवार तसेच सौ. पी. पी. जोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते माँ सरस्वती, श्रीमंत प्रताप शेठजी, परमपूज्य सानेगुरुजी आणि श्रीमती द्रौपदीबाई भांडारकर यांच्या प्रतिमांचे पूजन, दीपप्रज्वलन व माल्यार्पण करून झाली. त्यानंतर वर्धापन दिनानिमित्त केक कापण्यात आला.
यावेळी शाळेच्या नामफलकाची आकर्षक कलाकृती फुग्यांच्या माध्यमातून आकाशात झेपावण्यात आली. हा अनोखा क्षण पाहताच विद्यार्थीनींनी “वर्धापन दिन चिरायू होवो” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून सोडला.
कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात शालेय प्रार्थनेने झाली. त्यानंतर मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी यांनी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ चा वार्षिक अहवाल सादर केला. प्रमुख पाहुण्यांचा परिचय श्री. के. पी. सनेर आणि श्रीमती पी. डी. शेवाळे यांनी करून दिला.
प्रमुख अतिथींनी आपल्या प्रेरणादायी मार्गदर्शनातून विद्यार्थिनींना शिक्षण, संस्कार, कर्तृत्व आणि सामाजिक जबाबदारीचे महत्त्व पटवून दिले. याच प्रसंगी शाळेच्या “फुलवात” या स्वलिखित वार्षिक अंकाच्या ८१ व्या अंकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
समारंभात एस.एस.सी. बोर्ड परीक्षेत प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थिनींसह आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर यश मिळविणाऱ्या क्रीडापटू विद्यार्थिनींचा स्मृतिचिन्ह, सुवर्णपदक, सन्मानपत्र आणि शालेय साहित्य देऊन गौरव करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त सर्व विद्यार्थिनींना चिवडा व पेढ्यांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन क्रीडा विभागप्रमुख श्रीमती आर. एस. सोनवणे यांनी केले, तर श्री. एस. पी. वाघ यांनी आभार मानले.
या भव्य सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी शालेय समितीचे चेअरमन भाऊसाहेब जितेंद्र जैन, मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी, पर्यवेक्षक श्री. एस. पी. वाघ, बक्षीस समिती प्रमुख श्रीमती पी. व्ही. साबे, सौ. व्ही. जे. पाटील, श्री. किरण पाठक तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
शाळेच्या ८२ वर्षांच्या गौरवशाली परंपरेला उजाळा देणारा हा वर्धापन दिन विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी आणि अविस्मरणीय ठरला.



सामाजिक वंचितांच्या प्रश्नांवर संशोधनाची मोहोर! प्रा. विजयकुमार वाघमारे यांना समाजकार्य विषयात पीएचडी पदवी
‘लैंगिक कामगार महिला : सामाजिक वंचितीकरण व सामिलीकरण’ या दुर्लक्षित पण अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावरील संशोधनाला यश
अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेरच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी उल्लेखनीय कामगिरी करत श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटी संचलित पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर येथील सहायक प्राध्यापक प्रा. विजयकुमार वाघमारे यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत समाजकार्य विषयात यशस्वीरित्या पीएचडी पदवी संपादन केली आहे.
प्रा. विजयकुमार वाघमारे यांनी डॉ. एस. जी. राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आपले संशोधन पूर्ण केले असून, त्यांच्या संशोधनाचा ऑनलाइन व्हायवा यशस्वीरीत्या पार पडला.
या परीक्षेसाठी प्रा. डॉ. रघुनाथ महाजन (बिलासपूर) यांनी चेअरमन म्हणून तर प्रा. डॉ. प्रतिभा मिश्रा (बिलासपूर) यांनी बाह्य मूल्यमापक म्हणून सहभाग नोंदविला. संशोधन मार्गदर्शक डॉ. सुदाम राठोड यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली.
प्रा. विजयकुमार वाघमारे यांनी “लैंगिक कामगार महिला : सामाजिक वंचितीकरण व सामिलीकरण” या समाजातील अत्यंत संवेदनशील, दुर्लक्षित आणि महत्त्वपूर्ण विषयावर सखोल संशोधन केले आहे. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेल्या घटकांच्या सामाजिक वास्तवाचा अभ्यास करणारे हे संशोधन समाजकार्य क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मानले जात आहे.
त्यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटी, अमळनेरचे अध्यक्ष अभिजीत सुभाष भांडारकर, प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ, डॉ. पी. एस. पाटील यांच्यासह विद्यापीठ कार्यक्षेत्रातील प्राध्यापक, राज्यभरातील सहकारी, विद्यार्थी, मित्रपरिवार आणि स्नेहींनी त्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रा. विजयकुमार वाघमारे यांच्या या उल्लेखनीय यशामुळे अमळनेरच्या शैक्षणिक क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, समाजकार्य क्षेत्रातील संशोधनाला नवी दिशा मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.



पुराच्या संकटात मानवतेचा हात! रोटरी क्लब अमळनेरकडून हजारो प्रवाशांना अन्नसेवा वापी विभागातील पुरामुळे मार्ग बदललेल्या पटना–बांद्रा एक्स्प्रेसमधील १२०० प्रवाशांना रेल्वे स्थानकावर दिला दिलासा
अमळनेर (प्रतिनिधी) : वापी विभागात आलेल्या भीषण पुरामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून, मार्ग बदलण्यात आल्याने ट्रेन क्र. २९७२ पटना–बांद्रा एक्स्प्रेस अमळनेर रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आली. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीत ट्रेनमधील सुमारे १००० ते १२०० प्रवाशांच्या जेवणाची तातडीने व्यवस्था करून रोटरी क्लब अमळनेरने आपल्या सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी परिचय दिला.
पुराच्या संकटामुळे अडकलेल्या प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी अमळनेरमधील विविध सामाजिक संस्था मदतीसाठी धावून आल्या. त्यामध्ये रोटरी क्लब अमळनेरने अत्यंत तत्परतेने पुढाकार घेत प्रवाशांना अन्नसेवा उपलब्ध करून दिली.
क्लब अध्यक्ष रोटे. महेश पाटील तसेच सेक्रेटरी व उपनगराध्यक्ष रोटे. प्रशांत निकम यांच्या मार्गदर्शनाखाली हा सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला. रेल्वे प्रशासनाच्या समन्वयाने रेल्वे स्थानक अधीक्षक श्री. अनिल शिंदे व सी. एम. आय. श्री. पांडे यांच्या सहकार्याने, तसेच पश्चिम रेल्वेचे माजी ZRUCC सदस्य रोटे. प्रीतपालसिंग बग्गा यांच्या सूचनेने व विशेष प्रयत्नातून अन्नवाटपाची प्रभावी व्यवस्था उभी करण्यात आली.
रेल्वे अधिकाऱ्यांच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत रोटरी क्लब अमळनेर आणि इतर सेवाभावी संस्थांनी एकत्रितपणे हा उपक्रम यशस्वी केला. संकटाच्या काळात सामाजिक संवेदनशीलतेचे दर्शन घडवत स्वयंसेवकांनी प्रवाशांची मनापासून सेवा केली.
या उपक्रमाचे प्रकल्प प्रमुख रोटे. प्रीतपालसिंग बग्गा होते. त्यांच्यासह रोटे. अभिजीत भांडारकर, रोटे. कीर्ती कुमार कोठारी, रोटे. रोहित सिंघवी, रोटे. प्रतीक खंडेरिया, रोटे. धीरज अग्रवाल, रोटे. किशोर लुल्ला, रोटे. ईश्वर सेनानी, रोटे. राजेश बेदमुथा, रोटे. सनी कोठारी तसेच रोटरी क्लबच्या सर्व रोटेरियन सदस्यांनी अथक परिश्रम घेत उपक्रम यशस्वी केला.
या सेवाकार्यासाठी अमळनेरमधील नागरिक आणि विविध संस्थांचेही मोलाचे सहकार्य लाभले. संकटाच्या प्रसंगी समाजसेवेची परंपरा जपत रोटरी क्लब अमळनेरने पुन्हा एकदा मानवतेचा आदर्श घालून दिला.




