ब्रेकिंग
बाप एक अधिष्ठान’ निबंध व वक्तृत्व स्पर्धेत प्रेरणा चौधरीची दुहेरी बाजी

 

अमळनेर : प्रा.डॉ.एस.ओ.माळी परिवार, अमळनेर आणि यश पंढरी इंग्लिश क्लास यांच्या संयुक्त विद्यमाने स्व.ओंकार त्र्यंबक माळी यांच्या २६ व्या पुण्यतिथीनिमित्त ‘बाप एक अधिष्ठान’ या विषयावर निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

निबंध स्पर्धेत एकूण २६ स्पर्धकांनी, तर वक्तृत्व स्पर्धेत १२ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेतील विजेत्यांसाठी एकूण रु.५,००० रोख रकमेची बक्षिसे ठेवण्यात आली होती. सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र, मोमेंटो तसेच विजेत्यांना रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक कु.लिना गणेश पाटील, द्वितीय क्रमांक कु.प्रेरणा वासुदेव चौधरी (डी. आर. कन्या शाळा, अमळनेर इ.१० वी अ), तर तृतीय क्रमांक कु.साक्षी अशोक बडगुजर यांनी पटकावला.

वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक कु.प्रेरणा वासुदेव चौधरी (डी. आर. कन्या शाळा, अमळनेर इ.१० वी अ), द्वितीय क्रमांक कु.गायत्री देविदास पाटील, तर तृतीय क्रमांक साहिल कैलास भिल यांनी मिळविला.

विशेष म्हणजे कु.प्रेरणा वासुदेव चौधरी हिने निबंध आणि वक्तृत्व या दोन्ही स्पर्धांमध्ये द्वितीय व प्रथम क्रमांक मिळवत दुहेरी यश संपादन केले. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीचे उपस्थितांनी कौतुक केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.प्रकाश पाटील, विजय पाटील, वासुदेव चौधरी, हेमांगी धर्माधिकारी आणि प्रा.स्वर्णदीप राजपूत यांनी विशेष सहकार्य केले. स्व.ओंकार त्र्यंबक माळी यांच्या स्मृती जपत विद्यार्थ्यांमध्ये वाचन, लेखन, वक्तृत्व आणि संस्कारांची जडणघडण व्हावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.

रा. ति. काबरे विद्यालयात विद्यार्थ्यांना सायबर क्राईमविषयी मार्गदर्शन

 

एरंडोल : रा. ति. काबरे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, एरंडोल येथे विद्यार्थ्यांना सायबर क्राईम तसेच सायबर सुरक्षेविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता निर्माण करणे आणि डिजिटल माध्यमांचा सुरक्षितपणे वापर करण्याबाबत माहिती देणे हा होता.

या मार्गदर्शन कार्यक्रमात बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विद्यार्थिनी कुमारी स्नेहल पाटील व कुमारी वैष्णवी पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी सोशल मीडिया वापरताना घ्यावयाची काळजी, अनोळखी लिंकवर क्लिक न करणे, वैयक्तिक माहिती व पासवर्ड सुरक्षित ठेवणे, ऑनलाइन फसवणूक टाळणे तसेच सायबर गुन्हा घडल्यास योग्य ती खबरदारी घेण्याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली.

विद्यार्थ्यांनीही या मार्गदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध प्रश्न विचारून सायबर सुरक्षेविषयी माहिती जाणून घेतली.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता निर्माण होण्यास मोठी मदत झाली. 

 कार्यक्रम प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री.एस. एस.राठी सर, उपमुख्याध्यापक श्री. पी.एच. नेटके सर, शिक्षक प्रतिनिधी श्री. एस. बी. चव्हाण सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

सात्री गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न २६ वर्षांपासून प्रलंबित;  पांझरा नदीवर बंधारे उभारण्याची डॉ. दीपक पाटील यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

 

कळमसरे ता.अमळनेर : सात्री गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न तब्बल २६ वर्षांपासून प्रलंबित असून, शासनाने तातडीने या प्रश्नावर ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी माजी पंचायत समिती सभापती तथा शिवसेना अमळनेरचे माजी संघटक व शेतकरी सेना अध्यक्ष श्री. डॉ. दीपक पंढरीनाथ पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दि. ११ ऑगस्ट रोजी दिलेल्या निवेदनात सात्री गावातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. सात्री गावाच्या पुनर्वसनासाठी शासनाने जागा घेतली असली तरी तब्बल २६ वर्षांनंतरही अनेक कुटुंबांना घरांसह मूलभूत सुविधा मिळालेल्या नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

गावाच्या पुनर्वसनासाठी यापूर्वी जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र, पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने अनेक ग्रामस्थांना अद्यापही अनिश्चिततेचा सामना करावा लागत आहे.

दि. २७ मे २०२२ रोजीच्या पत्रानुसार वाटप प्रक्रिया स्थगित करून पुन्हा सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, २६ वर्षांनंतरही सर्वेक्षण पूर्ण झाले नसल्याने आता पुन्हा नवीन सर्वेक्षण कशासाठी, असा सवाल डॉ. पाटील यांनी उपस्थित केला आहे.

पांझरा नदीवर बंधारे उभारण्याची मागणी

सात्री गावाच्या पुनर्वसना सोबतच पांझरा नदीवर मंडळ, मुडी आणि शहापूर येथे केटीवेअर बंधारे उभारून नदीतील पाणी अडवावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. यामुळे परिसरातील पाणीटंचाई दूर होण्यास तसेच शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढण्यास मदत होईल. याबाबत जलसंपदा विभाग, जळगाव यांच्याकडून सर्वेक्षण करून प्रस्तावित कामांना गती देण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.

सात्री गावाचा पुनर्वसन प्रश्न आणि पांझरा नदीवरील बंधाऱ्यांचा प्रश्न शासनाने गांभीर्याने घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी डॉ. दीपक पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

डॉ. एस. आर. रंगनाथन जयंतीनिमित्त क्रांतिवीर नवलभाऊ कला महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शन

 

नवलनगर, ता. व जि. धुळे : ग्रंथालय शास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाणारे डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त क्रांतिवीर नवलभाऊ कला महाविद्यालय, नवलनगर येथे विविध ग्रंथांचे आकर्षक प्रदर्शन आयोजित करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात डॉ. व्ही एच उभाळेसर यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, तसेच ग्रंथालयातील उपलब्ध साहित्याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी, हा प्रदर्शनामागील प्रमुख उद्देश होता.

या ग्रंथ प्रदर्शनाचे अध्यक्षीय स्थान प्राचार्य डॉ. विजय उबाळेसर होते. प्रमुख मार्गदर्शक डॉ. सुजाता निकम होत्या. कार्यक्रमास डॉ. एन. झेड. पाटील, डॉ. एस. जे. पाटील, डॉ. ए. बी. सोनवणे, डॉ. यु.वाय. गांगुर्डे, डॉ. के. डी. बागुल, डॉ. संभाजी कदम, प्रा. एस. डी. सूर्यवंशी, प्रा. विजय शिंदे, प्रा. छाया पाटील, श्री. रवींद्र धनगर, श्री. संभाजी पाटील, श्री. संतोष पाटील, श्री. संजय पवार, श्री. योगेंद्र राजपूत, श्री. रोहिदास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रदर्शनात विविध विषयांवरील संदर्भग्रंथ, स्पर्धा परीक्षा पुस्तके, साहित्यिक पुस्तके तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करणारे विविध ग्रंथ मांडण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध पुस्तकांची माहिती घेतली.

यावेळी डॉ. सुजाता निकम यांनी वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी ग्रंथालयाचे महत्त्व आणि डॉ. रंगनाथन यांचे ग्रंथालय क्षेत्रातील योगदान याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची प्रेरणा निर्माण होऊन ग्रंथालयाचा अधिकाधिक उपयोग करण्याची भावना वाढीस लागली.

ग्रंथ प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

स्वर अर्पण’मधून अमळनेरकरांना हिंदी-मराठी गीतांची सुरेल मेजवानी १३ ऑगस्टला छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात रंगणार संगीताची अविस्मरणीय मैफल

 

अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेर शहरातील संगीतप्रेमी रसिकांसाठी हिंदी आणि मराठी गीतांची सुरेल मेजवानी घेऊन स्वर ओमकार म्युझिकल ऑर्केस्ट्रा, मुंबई प्रस्तुत ‘स्वर अर्पण’ हा विशेष संगीत कार्यक्रम गुरुवार, १३ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर, अमळनेर येथे रंगणार आहे. लोकप्रिय हिंदी-मराठी गीतांचा बहारदार नजराणा सादर करणाऱ्या या कार्यक्रमाची संगीतप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय तसेच सदाबहार गीतांची सुरेल मैफल या कार्यक्रमातून अमळनेरकर रसिकांना अनुभवता येणार आहे. विविध भावछटांनी नटलेली गाणी, दमदार ऑर्केस्ट्राचे सादरीकरण, सुरेल गायन आणि नृत्याचा मनमोहक आविष्कार यामुळे ‘स्वर अर्पण’ कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढणार आहे.

या संगीत सोहळ्याचे आयोजन सुनील वाघ यांनी केले असून, कार्यक्रमाच्या निवेदनाची जबाबदारी करुणा सोनार सांभाळणार आहेत. ध्वनी व्यवस्थापनाची जबाबदारी साऊंड मॅनेजर विजय शुक्ला यांच्याकडे असून, नृत्यांगना पूजा आपल्या आकर्षक नृत्याविष्कारातून रसिकांचे मनोरंजन करणार आहेत.

या सुरेल मैफलीत शिवानी वाघ, ऋचा बिरारी, चंद्रकांत बी. आणि सिंगर मनोज वानखेडे आपल्या सुमधुर आवाजातून हिंदी व मराठी गीतांचे सादरीकरण करणार आहेत. लोकप्रिय गीतांच्या सादरीकरणासोबतच ऑर्केस्ट्राची साथ आणि नृत्याची रंगत यामुळे रसिकांना संगीताचा बहुरंगी अनुभव मिळणार आहे.

‘स्वर अर्पण’ हा केवळ संगीत कार्यक्रम नसून, जुन्या-नव्या लोकप्रिय हिंदी-मराठी गीतांच्या आठवणींना उजाळा देणारा आणि संगीतप्रेमींच्या मनाला आनंद देणारा सुरेल अनुभव ठरणार आहे. अमळनेरकर रसिकांना आपल्या आवडत्या गीतांचा आनंद प्रत्यक्ष संगीत मैफलीत घेण्याची ही विशेष संधी उपलब्ध झाली आहे.

संगीताची आवड असलेल्या सर्व रसिकांनी १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर, अमळनेर येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुरेल मैफलीचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजक सुनील वाघ यांनी केले आहे.

विद्यापीठात वनराई बंधारा प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न समाजकार्य महाविद्यालय अमळनेरच्या राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त सहभाग

 

अमळनेर (प्रतिनिधी) — जलसंधारण, पर्यावरण संवर्धन आणि ग्रामीण भागातील पाण्याच्या समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्याच्या उद्देशाने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि केशव स्मृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय वनराई बंधारा प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षण कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा व स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या प्रशिक्षण कार्यक्रमात समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग नोंदविला. यामध्ये प्रेरणा पिंपळे, कोमल जगताप, शिवदास पावरा, पिंटी पावरा, गीता जगताप, सुवार्ता गावित, सचिन साळवे आणि शामराव पारधी या स्वयंसेवकांचा सहभाग होता.

वनराई बंधारा उभारणीची संकल्पना, त्याचे नियोजन, आवश्यक साहित्य, प्रत्यक्ष बांधकामाची पद्धत, पाण्याचा अडवणूक व साठवणुकीसाठी त्याचा उपयोग तसेच जलसंधारणाच्या दृष्टीने वनराई बंधाऱ्याचे महत्त्व याबाबत स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात आले. या माध्यमातून विद्यार्थ्यांना जलसंधारणाच्या प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यावर भर देण्यात आला.

या प्रसंगी प्रकूलगुरु डॉ एस टी इंगळे, व्यवस्थापन परिषद सदस्य राजुदादा नन्नवरे, डॉ शिवाजीराव भोईटे, जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, राष्ट्रीय सेवा योजना विभाग संचालक डॉ प्रविण महाले, डॉ मनोज इंगोले, कृषी विभाग अधिकारी कुर्बान तडवी, केशव स्मृती प्रतिष्ठानचे भरत दादा अमलकर, निळकंठ गायकवाड, अनिल भाकरे आणि आदित्य सावळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मान्यवरांनी जलसंधारणाचे महत्त्व अधोरेखित करताना युवकांनी केवळ शिक्षणापुरते मर्यादित न राहता सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. वनराई बंधाऱ्यांसारख्या उपक्रमांमुळे पावसाचे पाणी अडवून त्याचा उपयोग शेती तसेच भूजलपातळी वाढविण्यासाठी होऊ शकतो, त्यामुळे अशा उपक्रमांना व्यापक स्वरूप देण्याची गरज असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

समाजकार्य महाविद्यालय, अमळनेरचे प्राचार्य डॉ पी एस पाटील, कार्यक्रम अधिकारी डॉ विजयकुमार वाघमारे आणि डॉ अनिता खेडकर यांनी सहभागी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी प्रशिक्षणाचा लाभ घेत भविष्यात जलसंधारण व पर्यावरण संवर्धनाच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला.

या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये जलसंधारण, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ होण्यास मदत झाली. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यशाळेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

अमळनेरात केंद्र व राज्य सरकारविरोधात पेटवली क्रांतीची मशाल महाविकास आघाडी व पुरोगामी संघटनांचा भव्य मशाल मोर्चा; शेतकरी, बेरोजगारी, महागाईसह विविध प्रश्नांवर सरकारला घेरले

 

अमळनेर (प्रतिनिधी) : क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारच्या विविध धोरणांविरोधात अमळनेर शहरात महाविकास आघाडी आणि विविध पुरोगामी संघटनांच्या वतीने मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले. तिरंगा चौकातून सुरू झालेल्या या मोर्चाने शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते

तिरंगा चौकातून सुरू झालेला मशाल मोर्चा सुभाष चौक, पाच कंदील चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत नेण्यात आला. पुतळ्याजवळ पोहोचल्यानंतर उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर येथे जाहीर सभा घेण्यात आली.

या सभेत माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, प्रा. अशोक पवार, शिवराम पाटील, सुलोचना वाघ, बन्सीलाल भागवत, ऍड. शकील काझी, रियाज मौलाना, चंद्रशेखर भावसार आदी वक्त्यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी वक्त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध धोरणांवर जोरदार टीका करत शेतकरी कर्जमाफी, वाढती बेरोजगारी, विद्यार्थ्यांचे प्रश्न, महागाई, भ्रष्टाचार तसेच स्थानिक प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याचे आवाहन केले. सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि बेरोजगारांच्या प्रश्नांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

विविध पक्ष-संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहभाग

या मशाल मोर्चात उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, ऍड. तीलोत्तमा पाटील, गोकुळ बोरसे, सुरेश पाटील, योजना पाटील, आरती पाटील, गजेंद्र साळुंखे, प्रताप पाटील, जाकीर शेख, नरेंद्र पाटील, लोटन चौधरी, अरुण देशमुख, पंढरीनाथ बागुल, मकसूद पठाण, एड. कौस्तुभ पाटील, प्राचार्य लीलाधर पाटील, बसपाचे गौतम मोरे, अतुल डोळस, चिंधु, वानखेडे योगेश पाटील, बाळासाहेब पाटील, नितीन निळे, रज्जाक शेख, विजय पाटील, वासू पाटील, गिरीश पाटील यांच्यासह विविध पक्ष व पुरोगामी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बी. के. सूर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचालन राष्ट्रवादीचे डी. एम. पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्याम पाटील यांनी केले.

क्रांती दिनाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या या मशाल मोर्चाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. सरकारच्या धोरणांविरोधातील घोषणांनी आणि मशालींनी अमळनेर शहरातील वातावरण दुमदुमून गेले.

समाजकार्य महाविद्यालयात आदिवासी गौरव दिन, क्रांती दिन व डॉ. एस. आर. रंगनाथन जयंती उत्साहात संपन्न

 

अमळनेर : श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटी, अमळनेर संचलित पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर येथे विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने जागतिक आदिवासी दिन, क्रांती दिन तसेच डॉ. एस. आर. रंगनाथन जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एस. पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अनिता खेडकर यांनी केले.

जागतिक आदिवासी दिनानिमित्त सचिन ज्ञानेश्वर साळवे, यामिनी तुकाराम माळी आणि निलेश साईराम भोये या विद्यार्थ्यांनी आपापल्या मनोगतातून आदिवासी समाजाची जीवनशैली, समृद्ध संस्कृती, भाषा तसेच जल, जंगल आणि जमीन यांच्याशी असलेले आदिवासी समाजाचे अतूट नाते यावर प्रकाश टाकला. आदिवासी समाजाच्या परंपरा, संघर्ष आणि सांस्कृतिक वैविध्याची माहिती विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे मांडली.

यावेळी प्रा. डॉ. जगदीश सोनवणे आणि प्रा. डॉ. अस्मिता सरवैया यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपल्या अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एस. पाटील यांनी आदिवासी समाजाच्या विविध वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकत त्यांच्या संस्कृतीचे आणि परंपरांचे जतन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच क्रांती दिनाचे ऐतिहासिक महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगत स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांच्या योगदानाची माहिती दिली.

याचवेळी डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या कार्याची आणि ग्रंथालय क्षेत्रातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यात आली. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले.

या कार्यक्रमास विभाग प्रमुख डॉ. जे. एस. सोनवणे, संशोधन विभागाचे संचालक प्रा. डॉ. भरत खंडागळे, सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डी. आर. ढगे, डॉ. एस. आर. चव्हाण, राष्ट्रीय सेवा योजना महिला कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. अनिता खेडकर, प्रा. डॉ. विजयकुमार वाघमारे, ग्रंथपाल प्रा. उदय महाजन यांच्यासह महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. अस्मिता सरवैया यांनी केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन यामिनी तुकाराम माळी या विद्यार्थिनीने केले.

आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, क्रांती दिनाचा प्रेरणादायी इतिहास आणि डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या ज्ञानक्षेत्रातील योगदानाची विद्यार्थ्यांना माहिती देणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

रवींद्र मोरे यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अमळनेर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती

 

अमळनेर : पत्रकार संवाद यात्रेचे शिल्पकार तसेच संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे, कार्याध्यक्ष प्रविण सपकाळे यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबईच्या प्रिंट मीडिया विभागाच्या अमळनेर तालुका अध्यक्षपदी तथा जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी रवींद्र सखाराम मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

संघटनेचे जिल्हाध्यक्ष भूषण रमेश महाजन यांनी रवींद्र मोरे यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. 

पत्रकारांच्या हितासाठी तसेच संघटनेचा विस्तार करण्याच्या दृष्टीने मोरे यांनी संघटनेची उद्दिष्टे, नियम व धोरणांचे पालन करून प्रभावीपणे काम करावे, अशी अपेक्षा नियुक्तीपत्रात व्यक्त करण्यात आली आहे. 

अमळनेर तालुक्यात पत्रकारिता, डिजिटल मीडिया आणि स्थानिक प्रश्नांवर सातत्याने सक्रिय असलेल्या रवींद्र मोरे यांच्या नियुक्तीचे पत्रकारिता क्षेत्रातून स्वागत होत आहे. त्यांच्या माध्यमातून पत्रकारांच्या विविध प्रश्नांना संघटनात्मक व्यासपीठ मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे, रवींद्र मोरे यांच्या निवडी बद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.

स्वातंत्र्य दिनी अमळनेरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन जैन सोशल ग्रुप व रोटरेक्ट क्लबचा संयुक्त उपक्रम; रक्तदात्यांना आकर्षक ट्रॅव्हल बॅगचे प्रोत्साहनपर बक्षीस

 

अमळनेर : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत जैन सोशल ग्रुप व रोटरेक्ट क्लब अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील १३ पंथ भवन, अमळनेर येथे सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत हे रक्तदान शिबिर होणार आहे.

स्वातंत्र्य दिन हा देशभक्ती आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारा दिवस असून, या विशेष दिनाचे औचित्य साधत नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून सामाजिक कर्तव्य बजावावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. ‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून गरजू रुग्णांना जीवनदान देण्यासाठी मदतीचा हात पुढे केला जाणार आहे.

रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला प्रोत्साहनपर आकर्षक ट्रॅव्हल बॅग बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. त्यामुळे अमळनेर शहरातील नागरिक, युवक, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून रक्तदानाचा संकल्प करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन यशस्वी करण्यासाठी जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष सचिन पारख, सचिव महावीर सिंघवी, रोटरेक्ट क्लबचे वेंकी शर्मा, मोनीश मकिजा, प्रोजेक्ट चेअरमन प्रतीक जैन आणि देवेंद्र कोठारी परिश्रम घेत आहेत.

स्वातंत्र्य दिनी देशसेवेबरोबरच मानवसेवेची अनोखी संधी!
अमळनेरकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होत रक्तदान शिबिर यशस्वी करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.