ब्रेकिंग
समाजकार्य महाविद्यालयात आदिवासी गौरव दिन, क्रांती दिन व डॉ. एस. आर. रंगनाथन जयंती उत्साहात संपन्न

 

अमळनेर : श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटी, अमळनेर संचलित पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर येथे विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने जागतिक आदिवासी दिन, क्रांती दिन तसेच डॉ. एस. आर. रंगनाथन जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एस. पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अनिता खेडकर यांनी केले.

जागतिक आदिवासी दिनानिमित्त सचिन ज्ञानेश्वर साळवे, यामिनी तुकाराम माळी आणि निलेश साईराम भोये या विद्यार्थ्यांनी आपापल्या मनोगतातून आदिवासी समाजाची जीवनशैली, समृद्ध संस्कृती, भाषा तसेच जल, जंगल आणि जमीन यांच्याशी असलेले आदिवासी समाजाचे अतूट नाते यावर प्रकाश टाकला. आदिवासी समाजाच्या परंपरा, संघर्ष आणि सांस्कृतिक वैविध्याची माहिती विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे मांडली.

यावेळी प्रा. डॉ. जगदीश सोनवणे आणि प्रा. डॉ. अस्मिता सरवैया यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपल्या अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एस. पाटील यांनी आदिवासी समाजाच्या विविध वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकत त्यांच्या संस्कृतीचे आणि परंपरांचे जतन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच क्रांती दिनाचे ऐतिहासिक महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगत स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांच्या योगदानाची माहिती दिली.

याचवेळी डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या कार्याची आणि ग्रंथालय क्षेत्रातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यात आली. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले.

या कार्यक्रमास विभाग प्रमुख डॉ. जे. एस. सोनवणे, संशोधन विभागाचे संचालक प्रा. डॉ. भरत खंडागळे, सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डी. आर. ढगे, डॉ. एस. आर. चव्हाण, राष्ट्रीय सेवा योजना महिला कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. अनिता खेडकर, प्रा. डॉ. विजयकुमार वाघमारे, ग्रंथपाल प्रा. उदय महाजन यांच्यासह महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. अस्मिता सरवैया यांनी केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन यामिनी तुकाराम माळी या विद्यार्थिनीने केले.

आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, क्रांती दिनाचा प्रेरणादायी इतिहास आणि डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या ज्ञानक्षेत्रातील योगदानाची विद्यार्थ्यांना माहिती देणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *