ब्रेकिंग
विद्यापीठात वनराई बंधारा प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न समाजकार्य महाविद्यालय अमळनेरच्या राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त सहभाग

 

अमळनेर (प्रतिनिधी) — जलसंधारण, पर्यावरण संवर्धन आणि ग्रामीण भागातील पाण्याच्या समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्याच्या उद्देशाने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि केशव स्मृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय वनराई बंधारा प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षण कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा व स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या प्रशिक्षण कार्यक्रमात समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग नोंदविला. यामध्ये प्रेरणा पिंपळे, कोमल जगताप, शिवदास पावरा, पिंटी पावरा, गीता जगताप, सुवार्ता गावित, सचिन साळवे आणि शामराव पारधी या स्वयंसेवकांचा सहभाग होता.

वनराई बंधारा उभारणीची संकल्पना, त्याचे नियोजन, आवश्यक साहित्य, प्रत्यक्ष बांधकामाची पद्धत, पाण्याचा अडवणूक व साठवणुकीसाठी त्याचा उपयोग तसेच जलसंधारणाच्या दृष्टीने वनराई बंधाऱ्याचे महत्त्व याबाबत स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात आले. या माध्यमातून विद्यार्थ्यांना जलसंधारणाच्या प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यावर भर देण्यात आला.

या प्रसंगी प्रकूलगुरु डॉ एस टी इंगळे, व्यवस्थापन परिषद सदस्य राजुदादा नन्नवरे, डॉ शिवाजीराव भोईटे, जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, राष्ट्रीय सेवा योजना विभाग संचालक डॉ प्रविण महाले, डॉ मनोज इंगोले, कृषी विभाग अधिकारी कुर्बान तडवी, केशव स्मृती प्रतिष्ठानचे भरत दादा अमलकर, निळकंठ गायकवाड, अनिल भाकरे आणि आदित्य सावळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मान्यवरांनी जलसंधारणाचे महत्त्व अधोरेखित करताना युवकांनी केवळ शिक्षणापुरते मर्यादित न राहता सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. वनराई बंधाऱ्यांसारख्या उपक्रमांमुळे पावसाचे पाणी अडवून त्याचा उपयोग शेती तसेच भूजलपातळी वाढविण्यासाठी होऊ शकतो, त्यामुळे अशा उपक्रमांना व्यापक स्वरूप देण्याची गरज असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

समाजकार्य महाविद्यालय, अमळनेरचे प्राचार्य डॉ पी एस पाटील, कार्यक्रम अधिकारी डॉ विजयकुमार वाघमारे आणि डॉ अनिता खेडकर यांनी सहभागी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी प्रशिक्षणाचा लाभ घेत भविष्यात जलसंधारण व पर्यावरण संवर्धनाच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला.

या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये जलसंधारण, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ होण्यास मदत झाली. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यशाळेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *