ब्रेकिंग
वसतिगृहातील २४ तास सेवाभावाची दखल; चारुशीला महाजन यांना आदर्श अधिकारी-कर्मचारी पुरस्कार विद्यार्थिनींची सुरक्षितता, शिक्षण, आरोग्य आणि सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र केलेल्या उल्लेखनीय कार्याचा शासनाकडून गौरव

 

जळगाव (प्रतिनिधी) : आदिवासी विकास विभागाच्या यावल प्रकल्प कार्यालयांतर्गत अमळनेर तालुक्यातील दहिवद शासकीय आश्रमशाळेत अधीक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या चारुशीला महाजन यांना उत्कृष्ट, सातत्यपूर्ण आणि प्रामाणिक सेवेसाठी ‘आदर्श अधिकारी-कर्मचारी पुरस्कार’ जाहीर झाला आहे. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

पिंगळवाडे आश्रमशाळेपासून सुरू झालेल्या सेवाप्रवासात महाजन यांनी विद्यार्थिनींची सुरक्षितता, शिक्षण, आरोग्य आणि सर्वांगीण विकासाला नेहमीच प्राधान्य दिले. मुलींच्या वसतिगृहाची संवेदनशील जबाबदारी सांभाळताना त्यांनी वसतिगृहाला घर मानून २४ तास सेवाभावाने कर्तव्य बजावले.

वैयक्तिक अडचणी आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांवर मात करत त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण व प्रामाणिक सेवेची शासनाने घेतलेली दखल हा त्यांच्या संघर्ष, कर्तव्यनिष्ठा आणि अथक परिश्रमांचा गौरव असल्याची भावना परिवाराकडून व्यक्त करण्यात आली.

या यशामागे आई-वडिलांचे संस्कार, जीवनसाथी दीपक यांचे पाठबळ तसेच संपूर्ण परिवाराचा आधार लाभल्याचे नमूद करण्यात आले. त्यांच्या या सन्मानाबद्दल स्नेह परिवारासह विविध स्तरांतून अभिनंदन होत असून, पुढील सेवावाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

जोश, जिद्द आणि जल्लोष! अमळनेर तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा थाटात संपन्न

अमळनेर (प्रतिनिधी) : क्रीडा व युवा सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद जळगाव तसेच अमळनेर पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय शालेय तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर उत्साहात पार पडल्या.

अमळनेर तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयांतील १४, १७ व १९ वर्षांखालील मुला-मुलींनी स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. माजी मंत्री तथा आमदार अनिलदादा पाटील यांच्या हस्ते मैदानपूजन, श्रीफळ वाढवून व क्रीडा मशाल प्रज्वलित करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी खा. शि. मं.चे कार्याध्यक्ष सी.ए. नीरज अग्रवाल, समन्वय समितीचे चेअरमन योगेश मुंदडे, प्रताप महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. ए.के. अग्रवाल, डी.आर. कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. एस.एस. सूर्यवंशी, नरेंद्र घोडपडे, तालुका क्रीडा अध्यक्ष व पर्यवेक्षक एस.पी. वाघ, महेश माळी आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार अनिल पाटील यांनी खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना, शिस्त, आत्मविश्वास व शारीरिक तंदुरुस्ती विकसित होते, असे सांगत खेळाडूंनी मेहनत, स्वच्छता आणि मोबाईलपासून दूर राहण्याचे आवाहन केले. उद्घाटनानंतर १०० मीटर धावण्याची स्पर्धा घेण्यात आली.

स्पर्धेच्या यशस्वितेसाठी पंच व क्रीडा समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

शिव टेकडीवर लायन्स क्लबतर्फे वृक्षारोपण

 

अमळनेर (प्रतिनिधी) : पर्यावरण संवर्धन व ‘हरित अमळनेर’चा संकल्प या उद्देशाने लायन्स क्लब ऑफ अमळनेरतर्फे धार-मरवड विकास मंचाच्या सहकार्याने ३ ऑक्टोबर रोजी शिव टेकडी, मारवड रोड येथे वृक्षारोपण करण्यात आले.

लायन्स क्लबचे अध्यक्ष Ln. जितेंद्रभाऊ पारख, सचिव प्रा. डॉ. जयेश गुजराथी, प्रोजेक्ट चेअरमन Ln. महेंद्र पाटील यांच्यासह प्रशांत सिंघवी, राजू नाढा, डॉ. मिलिंद नवसारीकर, दिनेश मणियार, दिलीप गांधी, रजनीश वरलानी, चंद्रकांत महाजन, कमलेश भंडारी, प्रताप शिंपी, आशिष चौधरी, गणेश तात्या तसेच क्लबचे पदाधिकारी, शिव टेकडी ग्रुप व धार-मरवड विकास मंचाचे सदस्य उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते विविध रोपांची लागवड करून त्यांच्या संगोपनाचा संकल्प करण्यात आला. सामाजिक कार्यासोबत पर्यावरण संवर्धनासाठीही लायन्स क्लब सातत्याने उपक्रम राबवत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमासाठी सहकार्य केल्याबद्दल धार-मरवड विकास मंचाचे आभार मानण्यात आले.

पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांची कॅरममध्ये दमदार कामगिरी; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

 

अमळनेर प्रतिनिधी : पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करण्याची परंपरा कायम राखत वयोगट १७ वर्षांखालील कॅरम स्पर्धेत तालुकास्तरावर दिमाखदार यश संपादन केले. या कामगिरीच्या जोरावर मुला-मुलींच्या संघातील विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

१७ वर्षे वयोगटातील मुलांच्या कॅरम स्पर्धेत श्लोक प्रवीण साळुंखे व देवेश महेंद्र निकुंभ यांनी उत्कृष्ट कामगिरी करीत तालुकास्तरावर विजेतेपद मिळवले. तसेच मुलींच्या १७ वर्षे वयोगटात ग्रंथी किशोर पटेल व प्रतीक्षा अमरनाथ हिरे यांनी विजय मिळवत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले.

या विद्यार्थ्यांना कॅरममधील तंत्रशुद्ध बारकावे व कौशल्याचे प्रशिक्षण क्रीडा शिक्षक रोहन मुंदडा, महेश माळी व विनायक सूर्यवंशी यांनी दिले.

यशस्वी विद्यार्थ्यांचे चेअरमन डॉ. संदेश गुजराथी, मुख्याध्यापक जे. एस. देवरे, पर्यवेक्षक महेश माळी, प्रशांत वंजारी, व्ही. पी. बडवे, योगिषा महाजन तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

अमळनेर तालुका निवृत्त सेवा संघाची ४४ वी वार्षिक सभा उत्साहात संपन्न निवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित देयकांसह पेन्शनच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा

 

अमळनेर (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा निवृत्त सेवा संघाच्या अमळनेर तालुका शाखेची ४४ वी वार्षिक सभा रविवार, दि. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी मेघ नगरी, अमळनेर येथे उत्साहात संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष तथा नाशिक विभागीय उपाध्यक्ष सदाशिव नारायण सोनवणे होते.

सभेस निरीक्षक म्हणून धनराज हरी पाटील उपस्थित होते. त्यांनी अहवाल सादरीकरणादरम्यान अमळनेर तालुका कार्यकारिणीच्या कार्याचे कौतुक करून अभिनंदन केले. यावेळी जिल्ह्यातील विविध तालुक्यांचे अध्यक्ष, सचिव, कार्यकारिणी सदस्य तसेच निवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी निवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. निवृत्त कर्मचाऱ्यांना दरमहा पाच तारखेच्या आत पेन्शन अदा करण्यात यावी, तसेच विविध प्रकारची थकीत देयके व बिले दोन महिन्यांच्या आत अदा करण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली. प्रलंबित देयकांचा प्रश्न तातडीने मार्गी न लागल्यास तालुका कार्यकारिणीच्या वतीने उपोषणाचा मार्ग स्वीकारण्याचा इशाराही देण्यात आला.

काल्पनिक वेतनवाढीच्या संदर्भात जिल्ह्यातून दाखल करण्यात आलेल्या तीन याचिकांमध्ये ३,३८६ निवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाजूने सकारात्मक निकाल लागल्याची माहिती देण्यात आली. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता असल्याने वरिष्ठ पातळीवरून प्रशासनाकडे मार्गदर्शन मागविण्यात आले असून, साधारण दीड महिन्याच्या कालावधीत हे प्रकरण निकाली निघण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. या प्रश्नासाठी संघटनेचा पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले.

तसेच काल्पनिक वेतनवाढीचा लाभ मिळणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांनी पूर्वतयारी म्हणून निर्धारित नमुन्यातील माहितीपत्रक, स्वाक्षरीसह अर्जाच्या दोन प्रती तयार कराव्यात. त्यापैकी एक प्रत तालुका शाखेकडे व दुसरी जिल्हा शाखेकडे सादर करून पोहोच घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.

सभेदरम्यान निवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर मार्गदर्शन व विचारविनिमय करण्यात आला. सभेस उपस्थित सर्वांसाठी श्रीमती भागाबाई चंद्रसिंग पवार यांच्या वतीने अन्नदान करण्यात आले.

सभेचे सूत्रसंचालन श्रीमती वसुंधरा यांनी केले. सभेच्या यशस्वी आयोजनासाठी अमळनेर तालुकाध्यक्ष एच. मु. पाटील, कार्याध्यक्ष प्र. ल. सांगोळे, चिटणीस भा. सी. खंडेराय, श्रीमती शांताबाई मोरे, वसंतराव पाटील, चिंधू वानखेडे, मनोहर बाविस्कर, देविदास पाटील, सुरेश पाटील, प्रमिला पाटील, मोहन ताळे आदींनी परिश्रम घेतले. उपस्थितांचे आभार मानल्यानंतर राष्ट्रगीताने सभेचा समारोप करण्यात आला.

लेखी आश्वासनाची पूर्तता न झाल्याने सोमचंद संधानशिव यांचे आमरण उपोषण पुन्हा

 

अमळनेर (प्रतिनिधी) : हॉटेल मिडटाऊन व मल्टिप्लेक्ससंदर्भातील प्रश्न, पात्र पावतीधारक सफाई कामगारांना टाकरखेडा रस्त्यावरील म्हाडाच्या घरकुलांमध्ये घरे देणे, तसेच ठगुआई रिसॉर्टचे अनधिकृत बांधकाम हटवून डीपी रस्ता मोकळा करणे आदी मागण्यांसाठी सोमचंद संधानशिव यांनी १५ ऑगस्ट २०२६ पासून आमरण उपोषण सुरू केले होते.

दरम्यान, नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित मागण्या एका महिन्यात पूर्ण करण्याबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर संधानशिव यांनी उपोषण तात्पुरते स्थगित केले होते. मात्र, लेखी आश्वासनानुसार अद्याप अपेक्षित कार्यवाही झालेली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

त्यामुळे यापूर्वीच्या उपोषणात मांडलेल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी सोमवार, ५ ऑक्टोबर २०२६ पासून स्थगित केलेले आमरण उपोषण पुन्हा सुरू करणार असल्याचे संधानशिव यांनी जाहीर केले आहे.

प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करून संबंधित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच उपोषणामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीची प्रशासनाने दखल घ्यावी, असेही त्यांनी निवेदनातून नमूद केले आहे.

माय मराठी’च्या गजरात अभिजात भाषा दिन उत्साहात

 

भडगाव (प्रतिनिधी) : येथील सौ. सु. गि. पाटील माध्यमिक विद्यालय, सौ. जयश्री गणेश पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालय व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम येथे ‘मराठी अभिजात भाषा दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. वाङ्मय समिती व आनंददायी शनिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाचे मार्गदर्शन मुख्याध्यापक तथा प्राचार्य अजय अहिरे यांनी केले.

यावेळी ज्येष्ठ शिक्षक देवेंद्र पाटील यांनी ‘मराठी मायबोली’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत मराठी भाषेचे संवर्धन व संशोधनाचे महत्त्व स्पष्ट केले. पर्यवेक्षक अशोक तायडे यांनी मायबोली व बोलीभाषेचे महत्त्व विविध उदाहरणांतून सांगितले.

अध्यक्षस्थानी उपमुख्याध्यापिका छाया बिऱ्हाडे होत्या. त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याची प्रक्रिया, त्याचे महत्त्व आणि मराठी वाचन-संशोधन संस्कृती वृद्धिंगत करण्याची गरज स्पष्ट केली. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘माय मराठी’ कवितेचे सामूहिक सादरीकरण केले.

वाङ्मय समितीप्रमुख प्रज्ञा देशमुख, आनंददायी शनिवार प्रमुख माया देशमुख व मीनल पवार यांनी विद्यालयातील ग्रंथालयातील विविध लेखकांचा परिचय करून दिला. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

भडगाव महाविद्यालयात अग्निवीर पूर्व प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप

 

भडगाव (प्रतिनिधी) : येथील र. ना. देशमुख महाविद्यालय, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव व महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहा दिवसीय अग्निवीर पूर्व प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप उत्साहात झाला. दि. २८ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरदरम्यान झालेल्या या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना शारीरिक प्रशिक्षणासह सैनिकी शिस्त, आत्मसंरक्षण आणि सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यशाळेचे उद्घाटन प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी भडगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक, संस्थेचे ज्येष्ठ संचालक बाबासाहेब विनय जकातदार व अरुण पाटील उपस्थित होते. पहिल्या दिवशी जळगाव पोलिस दलातील स्वप्नील परदेशी यांनी अग्निवीर भरतीबाबत विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या गैरसमजांवर मार्गदर्शन केले.

दुसऱ्या दिवशी विद्यार्थी विकास सहायक अधिकारी डॉ. देवेंद्र मस्की व प्रा. अर्चना टेमकर यांनी कवायत प्रशिक्षण दिले. तिसऱ्या दिवशी भडगाव तालुका माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष देविदास पाटील यांनी विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षण दिले.

चौथ्या दिवशी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व जळगाव सायबर सेलचे पोलिस निरीक्षक मुस्तफा मिर्झा यांनी विद्यार्थ्यांना मैदानी प्रशिक्षण दिले. तसेच दृकश्राव्य माध्यमातून मोबाईल सुरक्षेबाबत व सायबर फसवणुकीपासून बचाव करण्याबाबत मार्गदर्शन केले. पाचव्या दिवशी विलास शिंपी व अबरार शेख यांनी ज्युडो-कराटेच्या माध्यमातून आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले.

समारोपाच्या दिवशी माजी विद्यार्थी व आदर्श कन्या शाळेचे क्रीडा शिक्षक रवींद्र महाजन यांनी लेझीम व डंबेल्सचे प्रशिक्षण दिले. समारोप समारंभ संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी संस्थेचे व्हाइस चेअरमन नानासाहेब व्ही. टी. जोशी, ज्येष्ठ संचालक बाबासाहेब विनय जकातदार व प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड उपस्थित होते.

यावेळी अबरार शेख व रवींद्र महाजन यांनी विद्यार्थ्यांसमोर लेझीम व ज्युडो-कराटेचे प्रात्यक्षिक सादर केले. संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. संजय भैसे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. दिनेश तांदळे यांनी, तर आभार डॉ. देवेंद्र मस्की यांनी मानले.

कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांच्या अल्पोपहाराची व्यवस्था प्रा. अर्चना टेमकर यांनी केली. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. ज्योती नन्नवरे, डॉ. चित्रा पाटील, प्रवीण तडवी, रवी पाटील, विशाल महाजन, अनामिका ब्राह्मणे, आरती सपकाळे, तृप्ती बाविस्कर, भाग्यश्री पवार व आरती फासगे यांनी सहकार्य केले. राष्ट्रगीताने कार्यशाळेची सांगता झाली.

अभिजात मराठी भाषेचा जागर: प्रताप महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शन उत्साहात

 

अमळनेर: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर मराठी अभिजात भाषा गौरव दिनानिमित्त प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर येथील मराठी विभागाच्या वतीने ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना मराठी साहित्याच्या समृद्ध परंपरेची तसेच विविध साहित्यिकांच्या साहित्यकृतींची ओळख करून देण्यात आली.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने मराठी विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. ज्ञानेश्वर कांबळे यांनी विद्यार्थ्यांना बाबुराव बागुल यांच्या ‘मी जात चोरली’ या कादंबरीचा परिचय करून दिला. त्यानंतर प्रा. डॉ. रमेश माने यांनी कवी इंद्रजीत भालेराव यांच्या कवितेची विद्यार्थ्यांना ओळख करून देत त्यांच्या काव्यलेखनाचे वैशिष्ट्य स्पष्ट केले. तसेच प्रा. योगेश पाटील यांनी भालचंद्र नेमाडे लिखित ‘कोसला’ आणि ‘हिंदू’ या महत्त्वपूर्ण कादंबऱ्यांचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला.

ग्रंथ प्रदर्शनास महाविद्यालयातील तसेच मराठी विभागातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दिवसभर विद्यार्थ्यांनी विविध साहित्यिकांचे ग्रंथ पाहिले, त्यांची ओळख करून घेतली तसेच अनेक ग्रंथांचे वाचन केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मराठी साहित्याविषयीची अभिरुची, वाचनाची आवड आणि साहित्यकृतींच्या चिकित्सक आकलनाची जाणीव निर्माण झाली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गोपाळ बडगुजर यांनी केले, तर आभार दीपाली पाटील या विद्यार्थिनीने मानले. या कार्यक्रमाला मराठी विभागातील अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

पिंपळे नाला अतिक्रमणप्रकरणी भूषण भदाणेंचे उपोषण मागे ६ ऑक्टोबरला प्रशासकीय बैठक; संयुक्त मोजणी व कारवाईबाबत लेखी आश्वासन

 

अमळनेर (प्रतिनिधी) : शहरातील प्रभाग क्रमांक १६ मधील पिंपळे नाल्याच्या नैसर्गिक प्रवाहावरील कथित अतिक्रमण व अरुंदीकरणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष भूषण संजय भदाणे यांनी शुक्रवारी (२ ऑक्टोबर) अमळनेर प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर सायंकाळी त्यांनी उपोषण मागे घेतले.

आमदार अनिल पाटील, प्रांताधिकारी मयूर भंगाळे व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेनंतर भदाणे यांना लेखी आश्वासन देण्यात आले. पिंपळे नाल्याची संयुक्त मोजणी करून नैसर्गिक प्रवाह व मूळ हद्द निश्चित करणे, कथित अतिक्रमणाचा पंचनामा करणे तसेच अतिक्रमण आढळल्यास नियमानुसार कारवाई करण्याची मागणी भदाणे यांनी केली आहे.

या प्रकरणी पुढील कार्यवाहीसाठी ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता प्रांताधिकारी कार्यालयात संबंधित विभागांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीत प्रशासकीय व कायदेशीर कार्यवाहीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

यावेळी आमदार अनिल पाटील यांनी नाल्यावरील बांधकामाचे वस्तुनिष्ठ मोजमाप करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. तसेच नाला परिसरात पुढील काळात अतिरिक्त बांधकाम होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे निर्देश दिले.

यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील, नगरसेवक सचिन पाटील, जितू ठाकूर, ॲड. यज्ञेश्वर पाटील, उमेश वाल्हे, शीतल देशमुख, समाधान धनगर, दुर्गेश पाटील, आरिफ भाया यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.