ब्रेकिंग
आधार संस्था संचलित महिला व बालक सहाय्य कक्ष ठरतोय महिलांसाठी आधारवड समुपदेशनातून ९१ कुटुंबांना पुन्हा मिळाला संसाराचा आधार; अनेक महिलांना कायदेशीर व सामाजिक मदत

 

अमळनेर प्रतिनिधी

महिलांवरील वाढते कौटुंबिक अत्याचार, मानसिक छळ, आर्थिक शोषण आणि घरगुती वाद यांच्या पार्श्वभूमीवर अमळनेर येथील आधार बहुदेशीय संस्था संचलित महिला व बालक सहाय्य कक्ष अनेक महिलांसाठी आशेचा किरण ठरत आहे. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभाग, गृह विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या सहाय्याने हे समुपदेशन केंद्र जुने पोलीस स्टेशन (तहसील कार्यालय) परिसरात कार्यरत असून, प्रशिक्षित समुपदेशकांच्या माध्यमातून महिलांना विविध प्रकारची मदत दिली जात आहे.

महिला समुपदेशन केंद्रात महिलांवर होणारा कौटुंबिक हिंसाचार, मानसिक व शारीरिक त्रास, आर्थिक छळ, व्यसनाधीनतेमुळे उद्भवणारे प्रश्न, मुलांचा ताबा, शैक्षणिक व महत्त्वाची कागदपत्रे हिसकावून घेणे, घराबाहेर काढणे अशा विविध समस्यांवर समुपदेशन केले जाते. तसेच गरजेनुसार कायदेशीर मार्गदर्शन, निवारा गृह, वैद्यकीय सेवा, मोफत सरकारी वकील, पुनर्वसन व शासकीय योजनांची माहिती उपलब्ध करून दिली जाते.

महिलांना न्याय मिळवून देण्याबरोबरच समाजात जनजागृती घडवून आणण्याचे कार्यही केंद्रामार्फत सातत्याने केले जाते. ग्रामीण व शहरी भागात विविध कायद्यांविषयी माहिती, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध, महिला हक्क आणि हेल्पलाइन संदर्भातील हस्तपत्रकांचे वाटप करून जागृती केली जाते. शाळा व महाविद्यालयांमध्ये विवाहपूर्व समुपदेशन, महिला सुरक्षा आणि सहाय्य कक्षाची माहिती देऊन युवक-युवतींमध्ये जागरूकता निर्माण केली जाते.

मागील वर्षभरात केंद्राकडे १५१ महिलांनी तक्रारी नोंदविल्या असून त्यापैकी ३० महिलांना कायदेशीर मदतीसाठी न्यायालयात पाठविण्यात आले. विशेष म्हणजे, ९१ कुटुंबांतील गैरसमज दूर करून समुपदेशनाच्या माध्यमातून त्यांना पुन्हा एकत्र आणण्यात केंद्राला यश आले आहे.

या कार्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ऋषिकेश काळे, पोलीस प्रशासन, आधार संस्था अध्यक्षा डॉ. भारती पाटील, सचिव प्रा. विजयकुमार वाघमारे यांचे सहकार्य लाभत आहे. केंद्रात समुपदेशक म्हणून श्रीमती रेणू प्रसाद आणि श्रीमती ज्ञानेश्वरी पाटील कार्यरत आहेत.

परिसरातील कोणत्याही महिलेला अडचण, अन्याय किंवा मानसिक त्रास होत असल्यास महिला व बालक सहाय्य कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *