ब्रेकिंग
आरक्षण उपवर्गीकरण विरोधात शुक्रवारी नाशिक मध्ये राज्यव्यापी बैठकीचे आयोजन   राज्यभरातून अनेक सामाजिक कार्यकर्ते राहणार उपस्थित 

 

अमळनेर जि. जळगाव:- अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या प्रक्रिये विरोधात राज्यभरात तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे. आरक्षणाचा मूळ घटनात्मक ढाचा, सामाजिक एकात्मता आणि अनुसूचित जातींचे संविधानिक हक्क अबाधित राखण्यासाठी शुक्रवारी दिनांक 5 जून रोजी दुपारी बारा वाजता नाशिक येथे राज्यस्तरीय जनआंदोलनाची हाक देण्यासाठी निर्णय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक डॉ. आंबेडकर नगर हाउसिंग सोसायटी, विजय ममता जवळ, नाशिक पुणे रोड नाशिक येथे होणार आहे.

                  या बैठकीत आरक्षण उपवरगीकरणाची प्रक्रिया रद्द करणे, बदर समितीचा अहवाल सार्वजनिक करणे, हरकतीन साठी मुदत वाढ देणे, जातनिहाय जनगणना राबविणे यांसह विविध मागण्यांवर चर्चा होणार आहे. राज्यभरातील सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक, संविधान प्रेमी नागरिक व विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून पुढील राज्यव्यापी आंदोलनाचा आराखडा निश्चित करण्यात येणार आहे.

             या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक कृष्णा शिंदे, ऍड. सुरेश माने, कॅप्टन कुणाल गायकवाड, प्रबुद्ध साठे, माजी आमदार बाबुराव माने, मौलाना सलीम खान, प्रवीण साळवे, डीटी गोतीस, काळूराम चौधरी, सत्यजित साळवे, डॉ. आशिष तांबे, डॉ. प्रमिला पवार, संतोष शिंदे, ऍड. चंद्रकांत निकम, प्रा. गंगाधर अहिरे, अरुण भालेराव, डॉ. विशाल जाधव, ऍड. कृष्णा शिलावत, चंद्रकांत ठाकरे, गणेश खंडारे, शरद गोरे, अजमल खान, सुनील कदम, निलेश गांगुर्डे, लालचंद शिरसाट, विजय बागुल आदींनी केले आहे.

देवस्थान जमिनी वहिवाटदारांना हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावाला ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चा कडाडून विरोध  अन्यायकारक कायदा मागे घ्या; अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

 

अमळनेर प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाकडून देवस्थान इनाम व मंदिरांच्या जमिनी वहिवाटदारांच्या नावावर हस्तांतरित करण्यासाठी प्रस्तावित करण्यात येत असलेल्या कायद्याविरोधात ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ आक्रमक झाले असून या प्रस्तावाला कडाडून विरोध दर्शविला आहे. हा कायदा तातडीने मागे घ्यावा, अन्यथा राज्यभर व्यापक जनआंदोलन उभारण्यात येईल, असा स्पष्ट इशारा महासंघाने दिला आहे.

यासंदर्भात महासंघाच्या अमळनेर शाखेतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्थानिक खासदार स्मिताताई वाघ, माजी मंत्री तथा आमदार अनिलदादा पाटील आणि उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांना निवेदन सादर करण्यात आले.

महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रस्तावित कायद्यावर तीव्र नाराजी व्यक्त करताना म्हटले आहे की, हा कायदा हिंदू देवस्थानांच्या अस्तित्वावर घाला घालणारा असून भूमाफियांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या विविध निकालांनुसार देवस्थानांच्या जमिनी वहिवाटदारांना वाटण्याचा अधिकार कोणालाही नसताना शासन अशा प्रकारचा कायदा आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

महासंघाने आपल्या निवेदनात काही महत्त्वपूर्ण मागण्या व सूचना शासनासमोर मांडल्या आहेत. त्यामध्ये देवस्थान जमिनींच्या सातबारा उताऱ्यावर ‘देवस्थान प्रतिबंधित सत्ता प्रकार’ अशी स्पष्ट नोंद करण्यासाठी स्वतंत्र परिपत्रक जारी करावे, वक्फ बोर्डाच्या धर्तीवर देवस्थान मालमत्तांनाही कायदेशीर संरक्षण द्यावे, गुजरात राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ‘अँटी लँड ग्रॅबिंग’ अर्थात जमीन बळकावण्याविरोधी कठोर कायदा लागू करावा, तसेच देवस्थानांच्या जमिनी बेकायदेशीररीत्या हडप करणाऱ्यांवर १४ वर्षांच्या सश्रम कारावासासह अजामीनपात्र गुन्ह्यांची तरतूद करावी, अशा मागण्यांचा समावेश आहे.

याशिवाय गेल्या २५ वर्षांत झालेल्या देवस्थान जमिनींच्या हस्तांतरणाची आणि कथित बोगस नोंदींची चौकशी करण्यासाठी सनदी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक स्थापन करावे, तसेच न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली प्रकरणे जलदगती न्यायालयांमार्फत सहा महिन्यांच्या आत निकाली काढावीत, अशी मागणीही करण्यात आली आहे.

शासनाने हा प्रस्ताव मागे न घेतल्यास राज्यभर जनजागृती मोहीम राबवून तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा निर्धार महासंघाने व्यक्त केला आहे.

सदर निवेदनावर संतश्री प्रसाद महाराज, मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिंगबर महाले, सचिव सुरेश बाविस्कर, सुभाष पाटील, नाना निळे, पवन लांडगे, ज्ञानेश्वर पाटील, संजय पाटील आदींच्या सह्या आहेत.

मंगळग्रह मंदिरात ‘गो-सन्मान अभियान’चे उत्साहात उद्घाटन; भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

अमळनेर प्रतिनिधी : भारतीय संस्कृतीतील गोमातेचे महत्त्व अधोरेखित करत गो-संवर्धन व गो-सन्मानाचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘गो-सन्मान आवाहन अभियान’ चे उद्घाटन मंगळग्रह मंदिर परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

या प्रसंगी संस्थेचे सचिव श्री. सुरेश बाविस्कर, सहसचिव श्री. दिलीप बहिरम, खजिनदार श्री. गिरीशजी कुलकर्णी, जनसंपर्क अधिकारी श्री. शरद कुलकर्णी तसेच अभियानाच्या समन्वयक सौ. मीना शहा यांची प्रमुख उपस्थिती होती.

मंदिर परिसरात आयोजित या अभियानास भाविकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला. गो-संवर्धन व गो-सन्मानाच्या जनजागृतीसाठी राबविण्यात आलेल्या सह्यांच्या मोहिमेत सहभागी होण्यासाठी भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. अनेकांनी स्वखुशीने अभियानाला पाठिंबा दर्शवत आपली नोंदणी करून स्वाक्षरी केली.

या अभियानाच्या माध्यमातून गोमातेचे संरक्षण, संवर्धन आणि सन्मान याबाबत समाजात व्यापक जागरूकता निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. दिवसभर मंदिर परिसरात भाविकांचा उत्साह, सहभाग आणि अभियानाविषयीची सकारात्मक भावना अनुभवायला मिळाली.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “गोमाता ही भारतीय संस्कृतीचा आत्मा असून तिचे संरक्षण व संवर्धन ही प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी आहे. गो-सन्मानासाठी समाजातील प्रत्येक घटकाने सक्रिय सहभाग नोंदवून या चळवळीला बळ द्यावे.”

या अभियानामुळे गो-संवर्धनाच्या कार्याला नवी दिशा मिळणार असून समाजात सकारात्मक जनजागृती निर्माण होण्यास मोठी मदत होणार असल्याचा विश्वास आयोजकांनीव्यक्त केला.

पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जयंतीनिमित्त अमळनेरात रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद  ‘ आप ‘ च्या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक 

 अमळनेर ( प्रतिनिधी) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त अमळनेर तालुका आम आदमी पार्टी च्या वतीने एका भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

               या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार स्मिताताई वाघ, आमदार अनिल पाटील, डॉ. अनिल शिंदे, भैरवी वाघ पलांडे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपस्थितांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी कार्याचे स्मरण केले आणि रक्तदान शिबिराच्या उपक्रमाचे कौतुक केले.

              कार्यक्रमाचे आयोजन आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष महेंद्र साळुंखे, दीक्षा महेंद्र साळुंखे, यांनी केले होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष रामकृष्ण पाटील, वंदना रामकृष्ण पाटील, सल्लागार मोहन मोरे, सुधाकर गजे, राजेंद्र बाळकृष्ण जाधव, ललित सातपुते, राजू धनगर, शेजत खाटीक यांनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी पक्षाचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अमळनेर शेतकी संघावर राष्ट्रवादीचा दणदणीत विजय   आमदार अनिल पाटलांचे वर्चस्व कायम

 

अमळनेर ( प्रतिनिधी ) संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेल्या अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वातील सहकार पॅनल दणदणीत विजय मिळवित 15 पैकी दहा जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले. या विजयामुळे शेतकी संघावर राष्ट्रवादीचे निर्विवाद सत्ता प्रस्थापित झाली आहे. तर काँग्रेसच्या शेतकरी पॅनल ला तीन जागा तर भाजप खासदार स्मिता वाघ यांच्या किसान विकास पॅनल ला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले.

            तालुक्यात भाजपासाठी हा मोठा धक्का असून शेतकऱ्यांची आणि जनतेचे भाजपावर असलेली नाराजी या निवडणुकीच्या निमित्ताने अधोरेखित झाली आहे.

            व्यक्तिशः मतदारसंघातून प्रा. सुभाष सुकलाल पाटील ( शिरू ड ), संभाजी लोटानराव पाटील ( लोन ), सुरेश पिरण पाटील( निंभोरा ), संजय पुनाजी पाटील ( पिंपळे), प्रा. श्याम साहेबराव पवार ( खेडी ) हे विजयी झाले.

            महिला राखीव मतदारसंघातून सुषमा वासुदेव देसले ( दहिवद ), मालुबाई बापूराव पाटील ( झाडी ) यांनी विजय मिळविला. सोसायटी मतदार संघात मात्र चुरस निर्माण झाली होती. नितीन बापूराव पाटील ( गड खांब ), गणेश धर्मराज भामरे ( ब्राह्मणे ), सचिन बाळू पाटील ( रंजाने ), जितेंद्र पाटील ( फापोरे ) यांनी विजय मिळविला. मात्र पाचव्या जागेसाठी प्रफुल्ल पाटील ( मालपुर ) आणि महेश देशमुख( गांधली ) यांना समान मते पडल्याने ईश्वर चिठ्ठी द्वारे निर्णय घेण्यात आला त्यात प्रफुल्ल पाटील यांना विजय घोषित करण्यात आले. ओबीसी मतदारसंघातून विक्रांत पाटील, अनुसूचित जमाती मतदारसंघातून रणजीत पाटील, तर अनुसूचित जाती मतदारसंघातून एस बी बैसाणे सर यांनी विजय मिळविला.

             सर्व नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन होत असून त्यांनी आता शेतकरी हिताचे निर्णय घ्यावेत अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

आरटीई विद्यार्थ्यांच्या नावाखाली खासगी शाळांची आर्थिक लूट? गणवेश, पुस्तके, दप्तर, मेंटेनन्स फीच्या नावाखाली वसुली;

 

अमळनेर | प्रतिनिधी

शिक्षण हक्क कायदा (RTE) अंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांकडून गणवेश, पुस्तके, वह्या, दप्तर, शैक्षणिक साहित्य तसेच मेंटेनन्स फीच्या नावाखाली हजारो रुपयांची वसुली करणाऱ्या खासगी शाळांविरोधात अमळनेर तालुक्यात पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. राज्य शासनाचे स्पष्ट आदेश आणि शिक्षण मंत्र्यांचे निर्देश असतानाही काही शाळांकडून पाच ते सात हजार रुपयांपर्यंतची मागणी होत असल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला आहे.

दि. २९ मे २०२६ रोजी अमळनेर येथील अनेक पालकांनी पंचायत समिती कार्यालयात जाऊन गटशिक्षणाधिकारी यांची भेट घेतली. यावेळी शासनाच्या आदेशाची प्रत सादर करत संबंधित शाळांकडून सुरू असलेल्या कथित आर्थिक वसुलीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. पालकांनी सांगितले की, माननीय शिक्षण मंत्री **दादाजी भुसे** यांनी आरटीई अंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारू नये, असे स्पष्ट निर्देश दिले असून त्यासंदर्भातील अधिकृत पत्र दि. १ जुलै २०२५ रोजी जारी करण्यात आले आहे.

मात्र, शासनाच्या आदेशांना हरताळ फासत काही खासगी शाळांकडून “स्कूल किट”, “बुक सेट”, “युनिफॉर्म पॅकेज”, “अ‍ॅक्टिव्हिटी फी”, “मेंटेनन्स” अशा विविध नावाखाली पालकांकडून मोठ्या प्रमाणावर पैशांची मागणी होत असल्याचा आरोप करण्यात आला. काही शाळांनी थेट पाच हजार रुपये मेंटेनन्स फीची मागणी केली असून, तर काहींनी पुस्तके, वह्या, दप्तर आणि गणवेशासाठी पाच ते सात हजार रुपयांची सक्ती केल्याचे पालकांनी सांगितले.

आरटीई कायद्यानुसार विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देणे बंधनकारक आहे. या विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती शासनाकडून संबंधित शाळांना केली जाते. त्यामुळे पालकांवर कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त आर्थिक भार टाकणे हे नियमबाह्य असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. शासनाच्या नव्या निर्देशांमध्ये गणवेश, पुस्तके किंवा इतर शैक्षणिक साहित्याच्या नावाखाली शुल्क घेणे हा गंभीर नियमभंग मानला जाणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

गटशिक्षणाधिकारी कार्यालयात पालकांनी जोरदार भूमिका घेत संबंधित शाळांची तातडीने चौकशी करावी, दोषींना नोटिसा बजावाव्यात तसेच आवश्यक असल्यास शाळांची मान्यता रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी केली. “गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी म्हणून आरटीई योजना सुरू करण्यात आली. मात्र काही शाळा पालकांची आर्थिक पिळवणूक करून शासनाच्या उद्देशालाच हरताळ फासत आहेत,” अशी संतप्त प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली.

यावेळी काही पालकांनी धक्कादायक आरोप करत सांगितले की, “पैसे भरल्याशिवाय प्रवेश प्रक्रिया पूर्ण होणार नाही”, “पुस्तके शाळेतूनच घ्यावी लागतील”, “गणवेश बाहेरून चालणार नाही” अशा प्रकारचा दबाव टाकला जात आहे. परिणामी सर्वसामान्य पालक आर्थिक तणावाखाली आले असून शासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

शिक्षण विभागाने आधीच स्पष्ट इशारा दिला आहे की, आरटीई विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर वसुली झाल्याची तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित शाळेची चौकशी करून कठोर प्रशासकीय कारवाई केली जाईल. आवश्यक असल्यास शाळेची मान्यता रद्द करण्यापर्यंतची कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

अमळनेर तालुक्यातील या गंभीर प्रकरणामुळे आता गटशिक्षणाधिकारी कार्यालय कोणती भूमिका घेणार, संबंधित शाळांवर काय कारवाई होणार आणि पालकांना न्याय मिळणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या अधिकारासाठी पालक आता अधिक आक्रमक झाले असून, “आरटीई म्हणजे मोफत शिक्षण की खासगी शाळांची आर्थिक लूट?”असा संतप्त सवाल सर्वसामान्य पालकांकडून उपस्थित केला जात आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी

म.वा.मंडळात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती साजर

अमळनेर-येथिल मराठी वाड्•मय मंडळात राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची ३०१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी बन्सीलाल भागवत,डॉ एन डी ओसवाल,डॉ.सुरेश माहेश्वरी, प्रा.डॉ विजय तुंटे यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. या प्रसंगी मा.गोविंद पाटील, हेमंत बाळापुरे,जगदीश कुलकर्णी आदी उपस्थित होते.

Read More पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी

अमळनेरात आम आदमी पार्टीचा ‘झाडू अभियाना’चा धडाका; गाडगे महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजसेवेचा विडा!

 

अमळनेर:

अमळनेर शहरामध्ये सध्या आम आदमी पार्टी (आप) च्या वतीने सुरू असलेल्या ‘झाडू अभियाना’ची चर्चा सर्वत्र होत आहे. केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष कृतीतून शहर स्वच्छतेचे व्रत पक्षाने स्वीकारले आहे. या अभियानाचे नेतृत्व स्वतः तालुका अध्यक्ष श्री. महेंद्र साळुंके आणि उपाध्यक्ष श्री. रामकृष्ण चिंतामण देवरे करत आहेत.

झाडू अभियान जुडो अभियान हा उद्देश पूर्ण झाला चांगले काम पाहता चांगला मित्र माझी आवड बघून तो आपल्या कामाने भाऊक होऊन दररोज येण्यासाठी तयार झाले आहे श्रीमंत प्रताप शेठजी स्मारक स्वच्छ पाण्याने धुण्यात आले.

गाडगे महाराजांचा वारसा, आमची जिद्द

या मोहिमेबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना तालुका अध्यक्ष श्री. महेंद्र साळुंके म्हणाले की, “संत गाडगे महाराजांनी आपल्या हातात झाडू घेऊन संपूर्ण देशाला स्वच्छतेचा संदेश दिला आणि ते अमर झाले. गाडगे महाराजांच्या पावलांवर पाऊल ठेवूनच आम्ही हे अभियान चालवत आहोत. आम्हाला कोणत्याही निवडणुकीचे वावडे नाही; पुढील चार-पाच वर्षे निवडणुका नसल्या तरीही आम्ही जनसामान्यांच्या सेवेसाठी तत्पर आहोत.”

केवळ स्वच्छताच नाही, तर प्रश्नांची सोडवणूक

आम आदमी पार्टी कोणत्याही राजकीय युतीमध्ये सामील नसून, केवळ स्वबळावर सामान्यांचा आवाज उठवत आहे. सध्या पक्षाचे ध्येय आणि जिद्द एकच आहे – “स्वच्छ आणि सुंदर अमळनेर.” धार्मिक स्थळे, स्मारके आणि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करण्याची जबाबदारी पक्षाचे सर्व पदाधिकारी जसे की, राजेंद्र बाळकृष्ण जाधव, मोहन मनोरे, ललित विसपुते, शेजात खाटीक आणि सुधाकर गजरे हे अतिशय निष्ठेने पार पाडत आहेत.

जनतेच्या मूलभूत गरजांसाठी लढा

आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते दर दोन-तीन दिवसांच्या अंतराने प्रशासनाला निवेदने देऊन विकासकामांचा पाठपुरावा करत आहेत. स्वार्थी राजकारणापेक्षा जनहिताला प्राधान्य देणाऱ्या या कार्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये पक्षाबद्दल विश्वास वाढला आहे.

“झाडू” हा केवळ एक शब्द नसून तो क्रांतीचे प्रतीक आहे, ज्याद्वारे आम्ही शहरातील समस्यांचा कचरा दूर करून सर्वसामान्यांचे जीवन सुसह्य करण्याचा संकल्प केला आहे, असेही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रताप महाविद्यालयातील एनसीसी संयुक्त वार्षिक प्रशिक्षण शिबिरात अग्निशमन विभागाचे प्रात्यक्षिक; ३५६ छात्र सैनिकांना आपत्कालीन व्यवस्थापनाचे धडे

 

अमळनेर प्रतिनिधी
खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात ४९ महाराष्ट्र बटालियन, अमळनेर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले एन.सी.सी. संयुक्त वार्षिक प्रशिक्षण शिबिर (CATC-209) उत्साहपूर्ण वातावरणात सुरू असून छात्र सैनिकांना शिस्त, देशसेवा आणि आपत्कालीन परिस्थितीत कार्य करण्याचे महत्त्वपूर्ण प्रशिक्षण दिले जात आहे. दि. २० मे ते २९ मे २०२६ या कालावधीत सुरू असलेल्या या शिबिरात दि. २६ मे रोजी अमळनेर नगरपरिषद अग्निशमन विभागातर्फे विशेष अग्निशमन व आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.

या संयुक्त प्रशिक्षण शिबिरात ४८ महाराष्ट्र बटालियन धुळे, ४९ महाराष्ट्र बटालियन अमळनेर आणि ५० महाराष्ट्र बटालियन छत्रपती संभाजीनगर येथील छात्र सैनिकांचा उत्स्फूर्त सहभाग असून तब्बल ३५६ छात्र सैनिक प्रशिक्षण घेत आहेत. प्रताप महाविद्यालयाच्या सहकार्याने आयोजित या उपक्रमामुळे छात्र सैनिकांना प्रत्यक्ष अनुभवातून आपत्ती व्यवस्थापनाचे धडे मिळत आहेत.

अमळनेर नगरपरिषद अग्निशमन विभागाचे अग्निशमन अधिकारी श्री. गणेश गोसावी यांनी उपस्थित छात्र सैनिकांना आगीचे विविध प्रकार, आग लागण्याची कारणे, आग विझविण्याच्या पद्धती तसेच अग्निशमन साहित्यांच्या वापराबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी अग्निशमन विभागातील कर्मचारी दिनेश बिऱ्हाडे, फारूक शेख आणि आकाश संदानशिव यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखवत आग नियंत्रण प्रक्रियेची माहिती प्रभावीपणे समजावून सांगितली. छात्र सैनिकांनीही मोठ्या उत्साहाने या प्रशिक्षणात सहभाग घेतला.

शिबिराचे आयोजन अत्यंत नियोजनबद्ध व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडत असून ४९ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अमित रे तसेच अमळनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रशिक्षण प्रक्रिया सुरू आहे. यासाठी प्रशासकीय अधिकारी लेफ्टनंट कर्नल पिनाकी बानकी, एएनओ कॅप्टन डॉ. भारतकुमार सपकाळ, कॅप्टन डॉ. प्रमोद चौधरी, लेफ्टनंट डॉ. राहुल जाधव, सेकंड ऑफिसर रोहन पाटील, सुभेदार गजेसिंग, प्रशिक्षण जेसीओ सुभेदार कुलदीप सिंग तसेच परेड इन्स्ट्रक्टर स्टाफ यांनी विशेष परिश्रम घेतले.

वाढत्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकाला प्राथमिक अग्निशमन आणि आपत्कालीन व्यवस्थापनाचे ज्ञान असणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन अग्निशमन अधिकारी श्री. गणेश गोसावी यांनी यावेळी केले. देशसेवेची प्रेरणा देणारे आणि संकटसमयी धैर्याने कार्य करण्याचे बळ देणारे हे प्रशिक्षण छात्र सैनिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या शेवटी ४९ महाराष्ट्र बटालियन, अमळनेर यांच्या वतीने अमळनेर नगरपरिषद अग्निशमन दलाचा सत्कार करण्यात आला.

‘प्रताप’च्या सात विद्यार्थ्यांची मुंबई पोलीस दलात दमदार निवड; अमळनेरच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाची लाट

 

 

अमळनेर | प्रतिनिधी

खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयाच्या करिअर कौन्सेलिंग सेंटरने पुन्हा एकदा यशाची परंपरा कायम राखत मुंबई शहर पोलीस दलात तब्बल सात विद्यार्थ्यांची निवड करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. २७ मे रोजी रात्री १०.३० वाजता जाहीर झालेल्या निवड यादीत प्रताप महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपला ठसा उमटवला.

मुंबई पोलीस दलात निवड झालेले विद्यार्थी

१) शितल पाटील

२) चेतन पाटील

३) कार्तिक पाटील

४) रोहित कुंभार

५) समाधान कुंभार

६) उमेश कुंभार

७) अजय कोळी

हे सर्व विद्यार्थी प्रताप महाविद्यालयाच्या सीसीएमसी विभागाचे नियमित विद्यार्थी असून त्यांनी विविध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग, १५ दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिर तसेच राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचा लाभ घेतला होता.

विशेष म्हणजे अमळगाव येथील वीटभट्टीवर मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थ्यांनीही या यशात स्थान मिळविल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

या यशाबद्दल खान्देश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष विनोद अग्रवाल, उपाध्यक्ष माधुरीताई पाटील, कमल कोचर, विश्वस्त सौ. वसुंधराताई लांडगे, कार्याध्यक्ष सीए नीरज अग्रवाल, कार्योपाध्यक्ष जितेंद्र जैन, ज्येष्ठ संचालक हरी भिका वाणी, डॉ. संदेश गुजराथी, योगेश मुंदडे, प्रदीप अग्रवाल, सौ. लीनाताई पाटील, पंकज मुंदडे, चिटणीस प्रा. पराग पाटील, प्रभारी प्राचार्य डॉ. एच. डी. जाधव, प्राध्यापक प्रतिनिधी प्रा. दिनेश भलकार, कुलसचिव राकेश निळे, सीसीएमसी प्रमुख डॉ. विजय तुंटे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Read More ‘प्रताप’च्या सात विद्यार्थ्यांची मुंबई पोलीस दलात दमदार निवड; अमळनेरच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाची लाट