ब्रेकिंग
अमळनेर मुसळधार पाऊस, पिंपळे रस्त्यावर साचले पाणीच पाणी 

 

अमळनेर :- आज सायंकाळी मुसळधार पाऊस झाल्यामुळे शरीरातील पिंपळे रस्त्यावरील देशमुख नगर एक व दोन समोरील नवीन रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे संपूर्ण देशमुख नगर परिसर जलमय झाला असून नवीन रस्ता तयार झाल्यामुळे या रस्त्याला पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही सोय नाही, रस्त्याचा उतार व्यवस्थित नाही. या रस्त्याचे काम नियोजन शून्य झाले आहे. त्यामुळे रस्त्यावरील पाणी थेट नागरिकांच्या घरापर्यंत येत असून नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. नगरपालिका प्रशासनाने या रस्त्याकडे दुर्लक्ष केल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

                 पाऊस पडल्यावर येथे मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असल्यामुळे दोन दिवसांपूर्वी येथील रहिवासी एन एस पाटील यांनी पालिकेचे मुख्याधिकारी यांना लेखी तक्रार दिली आहे.

                 देशमुख नगर, पिंपळे रोड येथील नवीन रस्त्याचे बांधकाम झाल्यामुळे उर्वरित कॉलनीत साठलेलं पावसाचे पाणी घरापर्यंत येत असून कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. वयोवृद्ध नागरिक व लहान मुले यांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत असून स्थानिक नगरसेवक आणि पालिका प्रशासनाने तात्काळ समस्या सोडवावी अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.

संत सखाराम महाराज वाडीला भीषण आग, संकटाचा क्षणी हिंदू- मुस्लिम ऐक्याचे दर्शन

 

अमळनेर ( प्रतिनिधी) महाराष्ट्राचे प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या येथील श्री संत सखाराम महाराज वाडी संस्थानाला बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार सीसीटीव्ही यंत्रणेत झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे हे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मंदिरातील लाकडी रचना तसेच ऑइल पेंट ने रंगरंगोटी केली असल्यामुळे आगीने क्षणात रौद्ररूप धारण केले. विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या वरच्या मजल्यावरील प्रसाद महाराज यांच्या बैठक खोलीत ही आग लागली.

                घटनेची माहिती मिळताच अमळनेर व पारोळा येथील अग्निशमन दल, पालिका प्रशासन, पोलीस, स्थानिक नागरिक तसेच विविध सामाजिक संस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. अनेक तासांच्या शर्तीच्या प्रयत्नांनी आग आटोक्यात आणण्यात यश आले. यावेळी माजी आमदार साहेबराव पाटील यांनी बोरी नदीच्या दोन्ही काठावर केलेल्या रस्त्यांमुळे अग्निशमन दलाच्या गाड्यांना घटनास्थळी पोहोचणे शक्य झाल्याची भावना नागरिकांनी बोलून दाखवली अन्यथा सराफ बाजारातील अरुंद रस्त्यांमुळे मदत कार्य कठीण झाले असते.

                  दरम्यान आज सकाळी संत सखाराम महाराजांची दिंडी घेऊन हभप प्रसाद महाराज पंढरपूर कडे रवाना झाले होते. आग लागल्याची माहिती मिळूनही त्यांनी दिंडी अर्धवट न सोडता वारकरी परंपरेनुसार वारी सुरूच ठेवली आहे.

              घटनास्थळी अमळनेर पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे, पारोळा पालिकेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर, आमदार अनिल पाटील, प्रांताधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार रुपेश कुमार सुराणा, डी वाय एस पी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, यांच्यासह प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आग विझविण्यासाठी अतिरिक्त अग्निशमन बंब व खाजगी पाण्याचे टँकरही मागविण्यात आले होते. आग विझविण्याचा कामात विविध सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी, पत्रकार संघटना, हिंदू मुस्लिम समाजातील अनेक युवकांनी सक्रिय सहभाग घेत सामाजिक ऐक्याचे दर्शन घडविल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

               या भीषण आगीत संस्थानाचे मोठे नुकसान झाले असले तरी मंदिरातील विठ्ठल रुक्मिणींच्या मूर्ती सुरक्षित राहिले आहेत. मंदिराचा इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण होईपर्यंत मंदिर दर्शनासाठी काही दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

समाजसेवेचा गौरवशाली सोहळा : लायन्स क्लब अमळनेरकडून डॉक्टर, सीए आणि प्रगतशील शेतकऱ्यांचा भव्य सत्कार

 

अमळनेर | प्रतिनिधी

समाजसेवा, वैद्यकीय, आर्थिक तसेच कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून समाजासाठी प्रेरणादायी ठरलेल्या मान्यवरांचा लायन्स क्लब अमळनेरच्या वतीने नर्मदा फाऊंडेशन येथे आयोजित विशेष सन्मान सोहळ्यात भव्य गौरव करण्यात आला. विविध क्षेत्रांत निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या डॉक्टर, चार्टर्ड अकाउंटंट आणि प्रगतशील शेतकरी बांधवांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लायन्स क्लब अमळनेरचे अध्यक्ष जितेंद्र पारख होते. यावेळी सचिव जयेश गुजराथी, खजिनदार कुमारपाल कोठारी यांच्यासह क्लबचे पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी समाजाप्रती असलेली निष्ठा, सेवाभाव आणि विविध क्षेत्रांतील सातत्यपूर्ण योगदानामुळेच समाजाची सर्वांगीण प्रगती शक्य होत असल्याचे प्रतिपादन केले. सन्मानित व्यक्तींचे कार्य हे समाजासाठी प्रेरणादायी असून, त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा छोटासा प्रयत्न असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली. भविष्यातही समाजोपयोगी उपक्रमांना सर्वांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत राहील, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

या प्रसंगी डॉ. संदीप जोशी, डॉ. मिलिंद नवसारिका, डॉ. नरेंद्र महाजन, डॉ. किशोर शाह, डॉ. युसुफ पटेल, डॉ. बी. आर. बाविस्कर, डॉ. रवींद्र जैन, डॉ. निखिल बहुगुणा, सीए राजेश शाह, सीए अजय हिंदुजा, सीए रुपेश मकवाणा तसेच प्रगतशील शेतकरी एच. डी. भरुचा, सुशील जैन, योगेश मुंदडा, सुनील चौधरी, प्रितेश पारख, जितेंद्र जैन आणि दिनेश मणियार यांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष जितेंद्र पारख यांनी केले. सूत्रसंचालन अजय हिंदुजा यांनी केले, तर आभार प्रदर्शन सचिव जयेश गुजराथी यांनी मानले. यावेळी डॉ. किशोर शाह, अजय हिंदुजा आणि योगेश मुंदडा यांनी मनोगत व्यक्त करत समाजहितासाठी अशा सन्मान सोहळ्यांचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

अमळनेर शहरात लवकरच 4 ते 5 दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करणार शविआच्या बैठकीत मुख्याधिकाऱ्यांची ग्वाही,नागरी समस्यांबाबत नगरसेवक आक्रमक 

 

अमळनेर:-यंदाच्या उन्हाळ्यात शहरात काही तांत्रिक अडचणींमुळे पाणीपुरवठाचे नियोजन कोलमडून नागरिकांना विलंबाने पाणी मिळाले परंतु आता तापीतही पाणी आले असल्याने लवकरच 4 ते 5 दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आम्ही करू याशिवाय स्वच्छ आणि सुरळीत पाणीपुरवठा निश्चितपणे करू अशी ग्वाही गटनेत्या सौ जयश्री पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या शविआच्या बैठकीत मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी दिली. 

       दरम्यान नगरसेवक डॉ. डीगंबर महाले यांनी आजची बैठक राजकीय चिखल फेकीची नसून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी असल्याचे स्पष्ट केले.नगरपालिका सभागृहात झालेल्या या बैठकीत शहरातील नागरी समस्यांबाबत गटनेत्या सौ जयश्री पाटील व नगरसेवक चांगलेच आक्रमक झाले होते.नगरसेवकांच्या काही प्रश्नांवर अधिकार निरुत्तर होत होते.एकंदरीत पालिकेतील सत्ताधारी व अधिकारी यांच्यात योग्य तो समन्वय नसल्यामुळेच पालिकेचा कारभार सुरळीत नसल्याचा उपस्थितांनी आरोप केला.

      यंदाच्या उन्हाळ्यात संपुर्ण दोन महिने नागरिकांना 8 ते 12 दिवसाआड पाणी मिळाल्याने शहर विकास आघाडीने पालिकेवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता, मात्र मुख्याधिकारी शिंदे यांनी मोर्चा न काढण्याबाबत दिलेल्या विनंती पत्रास मान देऊन मोर्चा स्थगित करण्यात आला होता. यासंदर्भात मुख्याधिकारी यांनी प्रशासकिय बैठक बोलवावी अशी मागणी गटनेत्या सौ जयश्रीताई पाटील यांनी केल्याने दिनांक 30 जुन रोजी सकाळी 11 वाजता ही बैठक घेण्यात आली.या बैठकीत विस्कळीत पाणीपुरवठा,टाकी सफाई नतंरही होत असलेला अशुद्ध पाणीपुरवठा,गटारी तुंबल्याने पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात साचणारे पाणी,भुयार गटार,पाणीपुरवठा टीडीएस व प्रामुख्याने कचरा घंटागाडीतून मृतदेहाची वाहतूक , सफाई कामगारांचे मनमानी समायोजन,काही ठेकेदारांची अक्षम्य कर्तव्य कसूरी आदी समस्या नगरसेवकांनी अत्यंत आक्रमकतेने मांडल्या .विशेषत :विस्कळीत ,अशुद्ध व अनेक प्रकारच्या साथीच्या आजारांना कारणीभूत ठरणारा पाणीपुरवठा आणि कचरा गाडीतून झालेली मृतदेहाची वाहतूक या प्रश्नांवर साऱ्यांनी अधिकारी वर्गास चांगलेच धारेवर धरले.घनकचरा ठेकेदारास ब्लॅक लिस्ट मध्ये टाकून गुन्हे दाखल करावेत तसेच वर्षानुवर्षे पाण्याच्या टाक्या साफ न करता नागरिकांच्या जीविताशी खेळणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत,अशी मागणी केली.

प्रामुख्याने सौ.जयश्रीताई पाटील यांचेसह नगरसेवक डॉ .डिगंबर महाले,विक्रांत पाटील,जितेंद्र ठाकूर,भरत ललवाणी,योगिता कापडणेकर,हाजी नसीरोद्दीन, जुबेदा आपा , नरेंद्र संदानशीव ,मुक्तार खाटीक, सचीन पाटील, शोभाबाई गढरे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. तर इतर नगरसेवकांनी आपापल्या प्रभागातील समस्यां मांडल्या.

     

शहरात मिळते चक्क 400 टीडीएस चे पाणी 

 

      अमळनेर शहरात सध्या नागरिकांना मिळत असलेल्या पाण्याचे टीडीएस किती हे तपासण्यासाठी प्रत्यक्ष पाणी टाकीवरील पाणी बाटलीत आणून सभागृहातच ते चेक करण्यात आले असता त्याचे टीडीएस चक्क 400 पर्यंत आले.हे पाणी पिण्यायोग्य आहे का हे पाणीपुरवठा अभियंत्यांना विचारले असता ते निरुत्तर झाले.खरे पाहता जास्तीजास्त 200 ते 250 टीडीएस पाणी असायला हरकत नाही परंतू 400 पर्यंत टीडीएस जात असेल तर लोकांच्या जीवाशी खेळ करू नका याकडे लक्ष घालून नागरिकांना स्वच्छ आणि निर्जंतुक पाणी द्या अशी मागणी सर्वानी केली.

      शेवटी मुख्याधिकारी शिंदे सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरे देताना लवकरच पाणीपुरवठा सुरळीत करण्याची ग्वाही दिली.व इतर प्रश्नांवर देखील गांभीर्याने कार्यवाही करण्याची हमी देत नागरी समस्यांबाबत प्रशासन कोणतीही कसुराई करणार नाही असे आश्वसित केले.

       सदर बैठकीत 

मुख्यधिकारी गणेश शिंदे,पाणीपुरवठा अभियंता सत्यम पाटील,,प्रविणकुमार बैसाणे,आरोग्य निरीक्षक संतोष माणिक,किरण कंडारे,बांधकाम अभियंता सचिन गवांदे,दिवाबत्ती अभियंता कुणाल महाले,वसुली विभागाचे लौकिक समशेर,वैद्यकीय अधिकारी डॉ विलास महाजन,सभा लिपिक प्रमोद लटपटे उपस्थित होते.

       तर बैठकीस श.वि.आ.च्या वतीने गटनेत्या जयश्रीताई पाटील, नगरसेवक डॉ. डिंगबर महाले, नगरसेविका योगिता कापडणेकर, जुबेदाबी नासिरोद्दीन हाजी, अफसाना खाटीक,नंदा संदानशिव, शोभाबाई गढरे,विजय पाटील, सचिन पाटील, देवेंद्र कांबळे, भरतकुमार ललवानी,माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी, राष्ट्रवादी शहरध्यक्ष चेतन राजपूत, समाजसेवक जितेंद्र ठाकूर, विक्रांत पाटील, नरेंद्र संदानशिव, मुक्तार खाटीक, नसरोद्दीन हाजी,विजय राजपूत, सयाजीराव कापडणेकर, भूषण भदाणे, सुनील शिंपी, संजय पुनाजी पाटील, गौरव महाजन आणि शुभम पाटील उपस्थित होते.

 सदर सभागृहातील घड्याळ बंद असल्याचे शेतकी संघाचे संचालक संजय पाटील यांनी निदर्शनास आणून दिले.

नवल भाऊ प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयात प्रा. डॉ. अंजली जोशी यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर प्रा. डॉ. अंजली जोशी मॅडम सेवानिवृत्त; महाविद्यालयात भावुक वातावरण

 

अमळनेर : येथील नवल भाऊ प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयात तब्बल ३३ वर्षे आपल्या ज्ञानदानाने शेकडो उत्तम शिक्षक घडविणाऱ्या ज्येष्ठ प्राध्यापिका डॉ. अंजली जोशी मॅडम यांचा सेवापूर्ती सोहळा अत्यंत भावुक आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला. गोड स्वभाव, सुश्राव्य वाणी आणि अथांग ज्ञानसाधनेच्या बळावर त्यांनी विद्यार्थी व सहकारी प्राध्यापकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या सेवानिवृत्तीमुळे महाविद्यालयातून एक आदर्श मार्गदर्शक निवृत्त होत असल्याची भावना सर्वांनी व्यक्त केली.

 

  याप्रसंगी प्रा डॉ अंजली जोशी यांना महाविद्याल्याच्या वतीने प्रा डॉ नयना वाणी व प्रा डॉ सुनंदा तायडे यांनी पुष्पगुच्छ व साडी देऊन सत्कार केला. तर पती गोविंद कुलकर्णी व भाऊ प्रसाद जोशी यांचे स्वागत महाविद्यालयाच्या तर्फे प्राचार्य डॉ प्रभाकर चौधरी यांनी केले.

निरोप देतांना भावुक वातावरण 

    सेवा पूर्ती च्या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयांतील प्राध्यापक डॉ नयना वाणी, डॉ जितेश चव्हाण, डॉ सुनंदा तायडे, डॉ विजय गाढे यांनी जोशी मॅडममांच्या सहवासातील आठवणींना सश्रूनयनाने वाट मोकळी केली व पुढील आयुष्य सुखी समाधानी जाओ म्हणून मनोभावे ईश्वराला याचना केली. भाऊ प्रसाद जोशी यांनी बहिणीच्या सहवासातील बालपणा पासून आज पर्यंतचा आठवणी उपस्थितांच्या समोर मांडला. ईश्वरानेचे माझ्या आयुष्यात सर्वगुण संपन्न अश्या बहिणीला पाठविल्याचे सांगत अनेक चांगल्या स्वभाव गुणांचा पाढाच वाचला.बालपणा पासूनच परिवाराचा आधारवड म्हणून त्यांना उपमा दिली.

उच्च शिक्षणासोबतच आदर्श कुटुंबव्यवस्था आणि देशसेवा

प्रा. डॉ. अंजली जोशी मॅडम यांचे शिक्षण एम.कॉम, एम.एड, पी.एच.डी. असे उच्च दर्जाचे असून, त्यांनी सन १९९३ मध्ये या महाविद्यालयात अध्यापनाच्या कार्यास सुरुवात केली होती. जळगाव ते अमळनेर असा तब्बल ३३ वर्षांचा रेल्वेचा खडतर प्रवास करत त्यांनी कधीही आपल्या कर्तव्यात कसुरी केली नाही. एका बाजूला उत्तम शिक्षक घडवून देशसेवेचे महत कार्य करत असतानाच, दुसऱ्या बाजूला अनेक कष्ट सोसून त्यांनी आपल्या पाल्यांनाही उच्च शिक्षित व स्वावलंबी बनवले. एक सुशिक्षित स्त्री संपूर्ण कुटुंबासाठी कशी प्रेरणादायी ठरू शकते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉ. अंजली जोशी मॅडम आहेत, अशा शब्दांत त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला.

सहकारी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी आपुलकीचे नाते

आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात महाविद्यालयातील सहकारी प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्याशी त्यांनी नेहमीच कुटुंबातील सदस्याप्रमाणे आपुलकीचे व घट्ट नाते जपले. त्यांच्या गोड स्वभावामुळे त्या सर्वांच्याच लाडक्या प्राध्यापिका राहिल्या. अध्यापनासोबतच त्यांना संगीताचीही उत्तम आवड आहे. आपल्या गोड गळ्याने त्यांनी अनेकदा सहज एखादे गाणे गाऊन अवतीभवतीच्या सर्वांनाच मंत्रमुग्ध केले आहे, अशा आठवणींना यावेळी सहकाऱ्यांनी उजाळा दिला.

निरोगी व सुखी आयुष्यासाठी प्रार्थना

सर्वांना हव्याहव्याशा वाटणाऱ्या प्रा. डॉ. जोशी मॅडम आज सेवानिवृत्त होत असल्याने महाविद्यालयातील प्रत्येकाचेच उर भरून आले होते. निरोप देताना सहकाऱ्यांचे डोळे पाणावले होते. त्यांच्या पुढील वाटचालीस, निरामय, सुखी आणि समाधानी आयुष्यासाठी महाविद्यालयातील सर्वच स्तरांतून आणि उपस्थितांकडून ईश्वराजवळ प्रार्थना करण्यात आली. या सोहळ्याला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रभाकर चौधरी , प्राध्यापक वृंद डॉ नयना वाणी,डॉ सुंनंदा तायडे, डॉ जितेश चव्हाण, डॉ विजय गाढे, प्रा कैलास देवरे, शिक्षकेतर कर्मचारी सौ.वनिता पाटील,किरण रावल, कैलास भोंगळ, अनिकेत पाटील, राजू पाटील, विनोद पाटील आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SIR मोहिमेच्या पहिल्याच दिवशी प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांची धडक क्षेत्रभेट BLO च्या कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी; मतदारांच्या घरी जाऊन स्वतः भरून घेतले गणना प्रपत्र

 

अमळनेर | प्रतिनिधी

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येणाऱ्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेस मंगळवार, दि. ३० जूनपासून प्रारंभ झाला असून ही मोहीम २९ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी अमळनेरचे मतदार नोंदणी अधिकारी तथा प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांनी प्रत्यक्ष क्षेत्रभेट देत BLO यांच्या कामकाजाची सखोल पाहणी केली.

प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांनी विविध भागांना भेट देऊन BLO प्रत्यक्ष क्षेत्रात जाऊन काम करत आहेत का, मतदारांकडून गणना प्रपत्र अचूक व नियमानुसार भरून घेतले जात आहे का, तसेच मोहिमेदरम्यान कोणत्या अडचणी येत आहेत याची सविस्तर माहिती घेतली. यावेळी त्यांनी उद्भवणाऱ्या समस्यांवर आवश्यक सूचना व मार्गदर्शन करत मोहिमेची प्रभावी, पारदर्शक आणि वेळेत अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.

भेटीदरम्यान भाग क्रमांक १६९ चे BLO तथा शिक्षक अजय भामरे हे प्रत्यक्ष क्षेत्रात मतदारांच्या घरी जाऊन काम करत असताना प्रांताधिकाऱ्यांनी त्यांच्या कामाची अचानक पाहणी केली. त्यांच्या कार्यपद्धतीची माहिती घेतल्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांनी मतदार प्रा. अशोक पवार यांच्या निवासस्थानी प्रत्यक्ष भेट देत स्वतः गणना प्रपत्र भरून घेतले आणि त्याची एक प्रत त्यांना सुपूर्द केली. तसेच मतदारांना आवश्यक माहिती देत निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले.

या पाहणीदरम्यान BLO यांच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करत प्रत्येक पात्र मतदारापर्यंत अचूक, पारदर्शक आणि वेळेत सेवा पोहोचविण्यावर भर देण्यात आला. SIR मोहिमेच्या पहिल्याच दिवशी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या या प्रत्यक्ष क्षेत्रभेटीमुळे BLO यांचे मनोबल उंचावले असून मोहिमेला वेग आणि प्रभावी दिशा मिळाल्याचे चित्र दिसून आले.

वटसावित्री पौर्णिमेनिमित्त ३० वटवृक्षांची लागवड; चिमणपुरी पिंपळे खुर्दच्या महिला शेतकरी गटांचा प्रेरणादायी उपक्रम

 

अमळनेर (प्रतिनिधी) वटसावित्री पौर्णिमेचे औचित्य साधत चिमणपुरी पिंपळे खुर्द येथील महिला शेतकरी गटांनी पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश देत तब्बल ३० वटवृक्षांची लागवड केली. विशेष म्हणजे, केवळ वृक्षलागवड न करता या वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारीही महिलांनी स्वीकारली आहे.

लागवडीपूर्वी महिलांनी वटवृक्षाची विधिवत पूजा करून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. “वृक्षलागवड हीच भविष्यातील समृद्धीची गुरुकिल्ली आहे. पाऊस, पर्यावरण आणि जीवनमान यांचा थेट संबंध वृक्षांशी आहे. वृक्षांशिवाय पाऊस नाही आणि पावसाशिवाय समृद्ध जीवन नाही,” अशी भावना यावेळी महिलांनी व्यक्त केली.

या उपक्रमात धरती माता महिला शेतकरी गट, संघर्ष महिला शेतकरी गट आणि भूमाता महिला शेतकरी गट यांच्या सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पर्यावरण संवर्धनाची सामूहिक जबाबदारी स्वीकारली.

या प्रेरणादायी उपक्रमाची प्रेरणा तालुक्याचे भूमिपुत्र तथा आयकर आयुक्त संदीपकुमार साळुंखे यांच्याकडून मिळाल्याचे महिलांनी सांगितले.

उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मा. सरपंच दिनेश पाटील, रवींद्र पाटील, महेंद्र पाटील, सुभाष पाटील, अरविंद पाटील, भैया पाटील, अनिल पाटील, भाऊसाहेब पाटील आणि संजय पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले.

वटसावित्रीसारख्या पारंपरिक सणाला पर्यावरण संवर्धनाची जोड देत महिला शेतकरी गटांनी दिलेला हा संदेश समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून, “एक सण… एक वृक्ष… एक संकल्प” ही संकल्पना प्रत्यक्षात साकारल्याबद्दल या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अॅड. कौस्तुभ पाटील यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात; जळगाव जिल्ह्यात एनएसयूआय संघटन बळकटीचा निर्धार

 

 

अमळनेर | प्रतिनिधी :

जळगाव जिल्हा एनएसयूआय च्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अॅड. कौस्तुभ पाटील यांच्या पदग्रहणाचा भव्य सोहळा अमळनेर येथील मराठा मंगल कार्यालयात  उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला जिल्हाभरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी, युवक, पदाधिकारी आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित राहिल्याने सभागृह उत्साहाने फुलून गेले.

जिल्ह्यात अनेक वर्षांनंतर एनएसयूआयचा भव्य विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत संघटनेवरील विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमास काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार , प्रदेश सरचिटणीस भाऊसाहेब आजबे , काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष (पश्चिम) अविनाश भालेराव, काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष (पूर्व) धनंजय शिरीष चौधरी यांच्यासह काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते, पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना हनुमंत पवार यांनी राज्य सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. नीट (NEET) आणि टीईटी (TET) परीक्षा घोटाळ्यांचा उल्लेख करत विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या घटनांचा निषेध व्यक्त केला आणि अशा प्रकारांवर कठोर कारवाईची मागणी केली.

भाऊसाहेब आजबे यांनी एनएसयूआयचा इतिहास, संघटनेची कार्यपद्धती आणि विद्यार्थी चळवळीचे महत्त्व यावर सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी संघटनात्मक ताकद वाढवून सामाजिक व शैक्षणिक प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठवावा, असे आवाहन त्यांनी केले.

पदग्रहणानंतर मनोगत व्यक्त करताना अॅड. कौस्तुभ पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करण्याची ग्वाही दिली. जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयात एनएसयूआयची शाखा स्थापन करून संघटना अधिक सक्षम व व्यापक करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमास विद्यार्थी, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची उल्लेखनीय उपस्थिती लाभली. टाळ्यांच्या कडकडाटात आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थी राजकारणाला नवसंजीवनी मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

अमळनेरमध्ये २५ ते ३० वर्षीय अनोळखी तरुणाचा बेवारस मृतदेह आढळला; ओळख पटवण्यासाठी अमळनेर पोलिसांचे आवाहन

 

अमळनेर | प्रतिनिधी :

शहरातील दाजीबा नगर परिसरात एका २५ ते ३० वर्षीय अनोळखी तरुणाचा बेवारस मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृताची ओळख पटविण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना सहकार्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. २ जून २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.०० वाजता दाजीबा नगर येथील कच्च्या रस्त्यालगत एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला.

 मृताचे वर्णन

वय: अंदाजे २५ ते ३० वर्षे

रंग:  सावळा

उंची: अंदाजे ५ फूट ३ इंच

चेहरा: लांबट

नाक:  सरळ

केस: काळे

अंगावरील कपडे: निळसर रंगाचा टी-शर्ट व राखाडी (ग्रे) रंगाची पॅन्ट

ओळखण्याची खूण: उजव्या हातात स्टीलचे कडे व लाल रंगाचा दोरा बांधलेला आहे.

या प्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यू रजि. क्र. ५६/२०२६ अन्वये बी.एन.एस.एस. २०२३ च्या कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद भोई करीत आहेत.

 पोलिसांचे नागरिकांना आवाहन

वरील वर्णनातील तरुणाची ओळख किंवा त्याच्या नातेवाईकांबाबत कोणालाही कोणतीही माहिती असल्यास त्यांनी तात्काळ तपास अधिकारी पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद भोई यांच्याशी ७३०४१६६१४८ या मोबाईल क्रमांकावर किंवा अमळनेर पोलीस स्टेशन च्या ०२५८७-२२३३३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

प्रतापच्या आणखी चार विद्यार्थ्यांची मुंबई पोलीस दलात दिमाखदार निवड; एकूण ११ विद्यार्थ्यांनी फडकवला यशाचा झेंडा!

 

 

अमळनेर | प्रतिनिधी

खान्देश शिक्षण मंडळाच्या प्रताप महाविद्यालयातील करिअर काउन्सेलिंग सेंटरने पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेची छाप उमटवली आहे. केंद्राच्या आणखी चार विद्यार्थ्यांची मुंबई पोलीस दलात निवड झाली असून, यापूर्वी निवड झालेल्या सात विद्यार्थ्यांसह आता एकूण ११ विद्यार्थ्यांनी मुंबई पोलीस दलात स्थान मिळवत महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशामुळे प्रताप महाविद्यालयासह संपूर्ण अमळनेर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, करिअर काउन्सेलिंग सेंटरच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनाला यामुळे मोठी दाद मिळाली आहे.

मुंबई पोलीस दलात निवड झालेले विद्यार्थी

मयुर भगवान पाटील

अविनाश विकास पाटील

मंगलेश सुनील पाटील

विकास इंदल बेहरे

या यशाबद्दल खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष सीए नीरज अग्रवाल, कार्योपाध्यक्ष जितेंद्र जैन, चिटणीस प्रा. पराग पाटील, सहचिटणीस डॉ. व्ही. बी. मांटे, प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव, उपप्राचार्य डॉ. अशोक पाटील, करिअर काउन्सेलिंग सेंटरचे प्रमुख डॉ. विजय तुंटे, कुलसचिव राकेश निळे, कार्यालयीन अधीक्षक देवेंद्र कांबळे, डॉ. धनंजय चौधरी, डॉ. निलेश पवार, डॉ. आर. सी. सरवदे, डॉ. कैलास निळे, डॉ. माधव भुसनर, डॉ. प्रमोद चौधरी, डॉ. जितेंद्र पाटील, डॉ. विजय साळुंखे, डॉ. ज्ञानेश्वर मराठे, डॉ. विवेक बडगुजर, तसेच करिअर काउन्सेलिंग सेंटरचे दिलीप शिरसाठ, पराग रविंद्र पाटील आणि अतुल धनगर यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील सेवाभावी आणि उज्ज्वल कारकिर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

प्रताप महाविद्यालयाच्या करिअर काउन्सेलिंग सेंटरने अल्पावधीतच स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवत विद्यार्थ्यांना सक्षम मार्गदर्शन उपलब्ध करून दिले असून, या यशामुळे भविष्यातही अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणार आहे.