पत्रकाराला अडवून शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी; अमळनेर पोलिसांकडे कारवाईची मागणी मोटारसायकलची चावी काढून घेतल्याचा आणि ‘खंडणीखोर पत्रकार’ म्हणत बदनामी केल्याचा तक्रारीत आरोप
अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर शहरात पत्रकाराला रस्त्यात अडवून शिवीगाळ केल्याची, जीवे मारण्याची धमकी दिल्याची आणि सार्वजनिक ठिकाणी बदनामी केल्याची तक्रार अमळनेर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. ‘द लोक न्यूज’ या वेब पोर्टलचे मुख्य संपादक संभाजी सुकलाल देवरे यांनी महेंद्र शालीग्राम बोरसे यांच्याविरुद्ध लेखी तक्रार देत संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे शहरात चर्चेला उधाण आले आहे.
न्यू प्लॉट परिसरात रस्ता अडविल्याचा आरोप
संभाजी देवरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १३ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६ ते ६.३० वाजेच्या दरम्यान ते मोटारसायकलने जात असताना अमळनेर शहरातील न्यू प्लॉट परिसरात बजरंग बन्सीलाल अग्रवाल यांच्या घरासमोर संबंधित व्यक्तीने मोटारसायकलने त्यांचा रस्ता अडविला. त्यानंतर मोटारसायकलची चावी काढून घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
यावेळी संबंधित व्यक्तीने शिवीगाळ केली, जीवे मारण्याची धमकी दिली तसेच अंगावर धावून येत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचे देवरे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
‘खंडणीखोर पत्रकार’ संबोधल्याचा दावा
या घटनेदरम्यान सार्वजनिक ठिकाणी आपल्याला ‘खंडणीखोर पत्रकार’ असे संबोधण्यात आले. तसेच सोबत असलेल्या एका व्यक्तीला संभाषणाचे चित्रीकरण करण्यास सांगण्यात आल्याचा आरोपही तक्रारदाराने केला आहे. घटनास्थळी सुमारे ३० ते ४० लोकांची गर्दी जमली होती, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे आपली सार्वजनिक प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा संभाजी देवरे यांनी केला आहे.
विविध कायदेशीर तरतुदींनुसार कारवाईची मागणी
या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १२७(२), ३५१(२), १५२ व ३५६(२) तसेच महाराष्ट्र प्रसार माध्यमातील व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था (हिंसक कृत्य व मालमत्तेचे नुकसान किंवा हानी प्रतिबंध) अधिनियम, २०१७ मधील कलम ३ व ४ अंतर्गत कारवाई करण्याची मागणी तक्रारदाराने केली आहे.
संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून कायद्यानुसार कारवाई करावी, अशी विनंती देवरे यांनी पोलिसांकडे केली आहे. या तक्रारीची प्रत जळगावचे पोलीस अधीक्षक आणि अमळनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनाही पाठविण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
दरम्यान, तक्रारीतील आरोपांची स्वतंत्र पडताळणी होणे आवश्यक असून, पोलिसांच्या अधिकृत भूमिकेनंतरच प्रकरणातील पुढील तपशील स्पष्ट होऊ शकतील.
