ब्रेकिंग
सिद्धांत राहुल निकम याची सुवर्णझेप! 🌹 एम. फार्मसी परीक्षेत विद्यापीठात प्रथम; सुवर्णपदकाने सन्मानित

 

अमळनेर:

चोपडा येथील प्रा. डॉ. राहुल निकम यांचे सुपुत्र चि. सिद्धांत राहुल निकम यांनी आपल्या गुणवत्तेच्या आणि अथक परिश्रमाच्या जोरावर शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर केंद्रीय विश्वविद्यालय, लखनऊ (उत्तर प्रदेश) येथे झालेल्या एम. फार्मसी (फार्माकॉलॉजी) परीक्षेत विशेष प्राविण्यासह प्रथम क्रमांक पटकावत सिद्धांत निकम यांनी मानाचा सुवर्णपदकाचा बहुमान मिळविला.

विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात मान्यवरांच्या हस्ते सिद्धांत निकम यांना सुवर्णपदक प्रदान करून त्यांच्या उज्ज्वल शैक्षणिक कामगिरीचा गौरव करण्यात आला. त्यांच्या या यशामुळे कुटुंबीय, मित्रपरिवार, शिक्षकवर्ग तसेच चोपडा व अमळनेर परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

परीक्षांमध्येही सातत्यपूर्ण दमदार कामगिरी

सिद्धांत निकम यांच्या यशाची ही पहिलीच झेप नसून, त्यांनी यापूर्वीही विविध राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धात्मक परीक्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांनी जी-पॅट (ग्रॅज्युएट फार्मसी अॅप्टिट्यूड टेस्ट) परीक्षा तब्बल तीन वेळा उत्तीर्ण केली आहे. तसेच नेट (एनईटी) परीक्षा तीन वेळा उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी मिळविला असून, गेट (जीएटीई) परीक्षा देखील एकदा उत्तीर्ण केली आहे.

पीएच.डी.च्या दिशेनेही यशस्वी वाटचाल

सुवर्णपदकाने सन्मानित झाल्यानंतरही सिद्धांत निकम यांची ज्ञानाची आणि संशोधनाची वाटचाल सुरूच आहे. ते सध्या डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर केंद्रीय विश्वविद्यालय, लखनऊ येथे एम. फार्मसी क्षेत्रात पीएच.डी.चे संशोधनकार्य करीत आहेत.

अभ्यासातील सातत्य, कठोर परिश्रम, संशोधनाची आवड आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा यामुळे सिद्धांत निकम यांनी अल्पावधीतच शैक्षणिक क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

सिद्धांत निकम हे समाजकार्य महाविद्यालय, चोपडा येथे कार्यरत असलेले प्रा. डॉ. राहुल निकम यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून मनःपूर्वक अभिनंदन होत असून, आगामी शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील वाटचालीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत.

 सिद्धांत राहुल निकम यांच्या या सुवर्णयशाबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! 

 हार्दिक अभिनंदन! 

 

🌱 अमळनेर मुस्लिम कब्रस्तानात अल खिदमत ट्रस्टतर्फे २५ वृक्षांची लागवड

 

अमळनेर : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत अल खिदमत ट्रस्ट, अमळनेर यांच्या तर्फे अमळनेर मुस्लिम कब्रस्तान परिसरात २५ वृक्षांची लागवड करण्यात आली.

या वृक्षारोपण उपक्रमास अमळनेर मुस्लिम कब्रस्तान व ईदगाह ट्रस्टचे हाजी सत्तार भाया साहब तसेच अल खिदमत ट्रस्ट अमळनेरचे सदस्य उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

विशेष म्हणजे या उपक्रमात लहान मुलांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. मुलांच्या हातून वृक्षारोपण करून घेत त्यांना झाडांचे आपल्या जीवनातील महत्त्व, पर्यावरणाचे संरक्षण आणि भविष्यातील पिढीसाठी हिरवाई जपण्याची गरज याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

“आज लावलेले एक झाड म्हणजे उद्याच्या पिढीसाठी दिलेली जीवनाची भेट आहे,” या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. कब्रस्तान परिसर अधिक हिरवागार आणि सुंदर करण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला.

श्रीमंत शिवाजीराव होळकर महाराज अमळनेर ला येणार.

 

अमळनेर   :  राजमाता अहिल्याबाई होळकर महेश्वर (मध्य प्रदेश) संस्थांचे प्रमुख व 17 वे वंशज श्रीमंत शिवाजीराव होळकर महाराज( रिचर्ड महाराज) यांची महेश्वर येथे जाऊन भेट घेऊन चर्चा केली व त्यांना अमळनेर येथील कार्यक्रमासाठी आमंत्रित केले व सदरचे आमंत्रण त्यांनी स्वीकारले लवकरच त्यांच्या कार्यक्रमाची तारीख जाहीर करण्यात येईल. . बन्सीलाल भागवत,अध्यक्ष, उत्तर महाराष्ट्र, ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ महेश्वर येथे गेले होते त्यात प्रा अशोक पवार, डी ए पाटील, अचलबाई भागवत, एडवोकेट तिलोत्तमा पाटील, सौ. मीनाक्षी पवार,एस सी तेले, संजय पाटील, चिंधू वानखेडे, सुनंदा तेले, प्रतिभा पाटील, सीमा पाटील, प्रमिला वाघ, एडवोकेट क्रांती ठाकरे आदींचा समावेश होता.

        राजमाता अहिल्याबाई होळकर घराण्याचे महेश्वर संस्थान प्रेरणादायी ठिकाण म्हणून नावारूपाला आणणाऱ्या श्रीमंत शिवाजीराव होळकरांचे शिष्टमंडळाने अभिनंदन केले याप्रसंगी (रिचर्ड होळकर )महाराजांनी राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या कर्तृत्वाविषयी माहिती सांगितली. ही भेट घडवून आणण्यासाठी राजे अमरजीत बारगळ जहांगीरदार,,तळोदा यांनी खूप मोलाची मदत केली. महेश्वर गादीचे 17 वे वंशज श्रीमंत शिवाजीराव होळकर महाराज यांची साधी राहणी व उच्च विचार विचारसरणी असल्याने खऱ्या अर्थाने देवी अहिल्याबाई होळकर यांचे ते सामाजिक,वैचारिक वारसदार आहेत याची खात्री पटली.

राखी पौर्णिमेनिमित्त   कष्टकरी सफाई कामगारांचा सन्मान

 

अमळनेर :  राखी त्या हातांना जे रोज आपल्या शहराचे रोगराई पासून रक्षण करतात.कष्टकरी सफाई कर्मचारी हे समाजाचे रक्षक आहेत. अमळनेर नगर परिषदेच्या कष्टकरी सफाई कामगारांचा सन्मान करण्यासाठी राखी पौर्णिमेच्या निमित्ताने कामगारांना राखी बांधण्याचा कार्यक्रम, संविधान जागर अभियान व युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेर तर्फे छत्रपती शिवाजी गार्डन अमळनेर येथे करण्यात आला. कार्यक्रमापूर्वी समतेवर आधारित गीते सुनीता मोरे, दिशा संदानशिव, उषा देवरे, माधुरी पाटील, योगिता पांडे, निवेदिता कापडणे कर यांनी सादर केले व कामगारांना राखी बांधली याप्रसंगी प्रा अशोक पवार यांनी कामगारांच्या कामाविषयी व त्यांच्या त्यागाविषयी मनोगत व्यक्त केले.

            सफाई कामगार महिलांनी सामाजिक कार्यकर्त्यांना राखी बांधली तर सफाई कामगारांना सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांनी राखी बांधून कामगारांचा सन्मान केला. याप्रसंगी कामगारांना मिठाई वाढण्यात आली . अमळनेरच्या सांस्कृतिक इतिहासात प्रथमच अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . याप्रसंगी अमळनेर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक किरण खंडारे, हृदयनाथ मोरे, अनिल बाविस्कर, अनिल बेंडवाल, भैय्या मोरे, नितीन बिऱ्हाडे, डि ए पाटील, संजय पाटील व सफाई कामगार बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

*“स्मृती राहतात, विचार पुढे जातात…”* विनायक आप्पा बैसाणे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त शिरूडमध्ये भावपूर्ण अभिवादन

 

शिरूड | दि. ३१ ऑगस्ट २०२६

आपल्या माणसाच्या आठवणी मनात जपताना त्याच्या स्मृतींना विधायक विचारांची जोड देण्याचा आदर्श शिरूड येथे पाहायला मिळाला. स्मृतीशेष *विनायक आप्पा अमृत बैसाणे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सोमवारी आयोजित कार्यक्रमात बुद्ध-आंबेडकरी विचारांचा जागर करण्यात आला.*

विनायक आप्पा बैसाणे हे रिपब्लिकन पक्षाचे युवा नेते यशवंत आबा बैसाणे यांचे बंधू होते. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सकाळी ११ वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन रवींद्र बैसाणे (मुंबई) यांच्या हस्ते करण्यात आले. भंते संघरक्षित आणि बौद्धाचार्य दरू दादा सैंदाणे यांनी धम्मविधी पार पाडला.

यावेळी गौतम दादा मोरे, बापूराव संदानशिव, घोलप सर, अशोक बिऱ्हाडे, मोहिते बापू (साक्री), अशोक भिसन बैसाणे (सुरत) यांनी मार्गदर्शन केले.

आपल्या मनोगतात वक्त्यांनी *बुद्धांच्या समतावादी, विवेकशील आणि विज्ञाननिष्ठ विचारांचे महत्त्व अधोरेखित केले.* स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित समाजनिर्मिती हीच महापुरुषांना खरी आदरांजली ठरेल, असा संदेश यावेळी देण्यात आला.

पुण्यस्मरणानिमित्त अशोक बिऱ्हाडे लिखित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावरील सुमारे ५० पुस्तकांचे वाटप करण्यात आले. यशवंत आबा बैसाणे यांनी पुस्तकांसाठी योगदान दिले.

कार्यक्रमास प्रवीण बैसाणे (जळगाव), भीमराव बैसाणे (नंदुरबार), एम. एस. बैसाणे,(PSI), प्रा यशवंत बैसाणे (मुंबई),

 भिकाजी बिऱ्हाडे, ग्रामसेवक आप्पा पाटील, डी. सी. पाटील, पत्रकार व्ही. ए. पाटील, अॅड. योगेश गजरे, अॅड. अभिजित बिऱ्हाडे,किरण नवल बैसाणे,पत्रकार मिलिंद पाटील,रविंद्र मखा बैसाणे, जितेंद्र करणकाळ,भाऊसाहेब मोरे यांच्यासह पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिक, आप्तेष्ट, मित्रमंडळी व कार्यकर्ते उपस्थित होते.

भावपूर्ण स्मरण, बुद्ध-आंबेडकरी विचारांचे चिंतन आणि पुस्तकवाटपातून प्रबोधन या त्रिसूत्रीमुळे विनायक आप्पा बैसाणे यांचे प्रथम पुण्यस्मरण सामाजिक संदेश देणारे ठरले.

अमळनेरात बनावट दूध निर्मितीचा कारखाना उध्वस्त जानवे–इंदा पिंपरी रस्त्यावरील पत्री शेडमध्ये सुरू होता भेसळीचा गोरखधंदा; FDA व पोलिसांची संयुक्त कारवाई, २७ वर्षीय आरोपी रंगेहात अटक

 

अमळनेर : शहरासह परिसरात बनावट व भेसळयुक्त दूध विक्रीचा संशयास्पद प्रकार सुरू असल्याची गुप्त

माहिती मिळाल्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभाग आणि अमळनेर पोलिसांनी संयुक्तपणे धडक कारवाई करत बनावट दूध निर्मितीचा प्रकार उघडकीस आणला. जानवे–इंदा पिंपरी रस्त्यावर एका पत्री शेडमध्ये सुरू असलेल्या या कथित बनावट दूध निर्मितीच्या ठिकाणावर छापा टाकून पोलिसांनी महेश दिलीप पाटील (वय २७) याला रंगेहात ताब्यात घेतले.

ही कारवाई ३० ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे ३ वाजता करण्यात आली. या कारवाईमुळे परिसरात भेसळयुक्त दूध तयार करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

गुप्त माहितीवरून कारवाईला वेग

जानवे–इंदा पिंपरी रस्त्यावर पत्री शेडमध्ये दूध तयार करण्याच्या नावाखाली भेसळीचा प्रकार सुरू असल्याची गुप्त माहिती अमळनेर पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी तत्काळ अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी आकाश बोराडे यांच्याशी संपर्क साधून संयुक्त कारवाईचे नियोजन केले.

मिळालेल्या माहितीची खातरजमा करून अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांसह अमळनेर पोलिसांच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी पत्री शेडमध्ये दूध तयार करण्यासाठी व भेसळ करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य आढळून आले.

मिक्सर, सोयाबीन तेल, लोखंडी कॅनसह साहित्य जप्त

कारवाईदरम्यान घटनास्थळावरून मिक्सर, सोयाबीन तेल, लोखंडी कॅन, गाईचे दूध तसेच भेसळ करण्यासाठी वापरले जाणारे इतर साहित्य जप्त करण्यात आले. या साहित्याच्या आधारे संबंधित ठिकाणी दूध निर्मिती व त्यामध्ये भेसळ केली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाने घटनास्थळावरील साहित्याची तपासणी करून आवश्यक ती कार्यवाही केली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असलेल्या दूध पदार्थात भेसळ होत असल्याचा प्रकार समोर आल्याने या कारवाईकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.

आरोपी रंगेहात ताब्यात

या कारवाईत महेश दिलीप पाटील (वय २७) याला पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेतले. अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी आकाश बोराडे यांच्या फिर्यादीवरून संबंधित आरोपीविरुद्ध अन्नसुरक्षा व मानके कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

या कारवाईमुळे अमळनेर परिसरात दूध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांमध्येही खळबळ उडाली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांवर कठोर कारवाई करण्याची गरज असल्याची मागणीही नागरिकांकडून होत आहे.

भेसळखोरांवर पोलिस-प्रशासनाचा वॉच

दूध हा नागरिकांच्या दैनंदिन आहारातील महत्त्वाचा घटक असल्याने त्यामध्ये भेसळ करून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे. अमळनेर पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीची दखल घेत FDA विभागाशी समन्वय साधून केलेल्या या कारवाईमुळे भेसळखोरांवर प्रशासनाचा वॉच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल सुनील जाधव करीत आहेत. तपासादरम्यान या कथित बनावट दूध निर्मितीमागे आणखी कोणी सहभागी आहे का, तसेच तयार केलेले दूध कुठे व कशा पद्धतीने विक्री केले जात होते, याबाबत माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

 

‌‘माहेरचा पारिजात‌’अंतर्गत माहेरवाशिणींनी अनुभवली पक्ष्यांची दुनिया! कपिलेश्वर महादेवांचे दर्शन, निसर्गाच्या सान्निध्यात भोजनासह लुटला विविध गुणदर्शनांचा आनंद

 

अमळनेर : माहेरच्या अंगणातील बालपणीच्या आठवणींना उजाळा देत, सासर-माहेर दोन्ही कुटुंबांना आपल्या कर्तृत्वाने आणि मायेने समृद्ध करणाऱ्या अमळनेर महिला मंच ट्रस्टतर्फे आयोजित अमळनेरच्या लेकींचा स्नेहमेळा अर्थात ‌‘माहेरचा पारिजात‌’ या उपक्रमाची काल शनिवार, दि. 29 ऑगस्ट रोजी सुरूवात झाली. यात दिवसभरातील विविधांगी आनंद लुटल्यानंतर श्री मंगळग्रह मंदिरात सर्व माहेरवाशिणींनी विविध खेळ, नृत्य, गप्पागोष्टींद्वारे रात्र जागून काढली. या उपक्रमासाठी मंगळग्रह सेवा संस्थेचे विशेष सहकार्य लाभले आहे. 

या स्नेहमेळ्यांतर्गत आज दुसऱ्या दिवशी अर्थात रविवार, दि. 30 ऑगस्ट रोजी उपस्थित सर्व महिला पहाटे पाच वाजता उठून अतिशय रम्य, शांत, मंगलमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात प. पू. संतश्री सखाराम महाराज रोपवाटिकेत फेरफटका मारण्यासाठी गेल्या. सदर रोपवाटिकेत पक्ष्यांसाठी बाराही महिने पिण्याचे पाणी व त्यांना खाण्यासाठी सर्व प्रकारचे धान्य ठेवलेले असते तसेच मंदिर परिसरातील झाडांवर पक्ष्यांना अंडी देण्यासाठी व उबविण्यासाठी तसेच नवजात अर्भकांना सुरक्षित ठेवण्यासाठी सुमारे शंभर मडकी बांधली आहेत. त्यामुळे अनेक प्रकारच्या पक्ष्यांचे मंगळग्रह मंदिर आश्रयस्थान झाले आहे. फेरफटका मारणाऱ्या महिलांना या सर्व प्रकारच्या पक्ष्यांचे दर्शन झाले तसेच पक्ष्यांचे विविध प्रकारचे कर्णमधूर आवाज ऐकून सर्वांनाच मनस्वी आनंद झाला. ही जणू त्यांच्यासाठी सुमधूर सुगंधी सुप्रभात सफर ठरली. यावेळी काहींनी आपले दैनंदिन व्यायामाचे प्रकार तसेच योगसाधना केली. त्यानंतर सर्वांनी स्नानानंतर सकाळी सात वाजता श्री मंगळग्रह देवांची सामूहिकरित्या आरती केली. साडेआठ ते साडेनऊ वाजेदरम्यान अल्पोपहार घेतला. त्ंयानंतर अमळनेर डेपोच्या बसमधून प्रवास करीत नीम (ता. अमळनेर) येथील तापी, पांझरा व लुप्त गंगा या नद्यांच्या संगमावर वसलेल्या तीर्थक्षेत्र कपिलेश्वर महादेव मंदिरात सकाळी साडेदहा वाजता पोहोचल्या. तेथे सर्वांनी श्रद्धापूर्वक श्री कपिलेश्वर महादेवांचे दर्शन घेऊन पूजा-अर्चा केली. यावेळी काही माहेरवाशिणींनी अभंग व भजने गात आध्यात्मिक सेवाही श्री कपिलेश्वरांच्या चरणी अर्पित केली. दुपारच्या भोजनानंतर जवळपास अर्धातास गप्पागोष्टी, हास्य-विनोदात रंगल्यानंतर बसमधून त्यांनी पुनश्च श्री मंगळग्रह मंदिर गाठले. मंदिरात दुपारी चार वाजेपासून पारंपरिक सागर गोटे, काचा-कवड्या, चौपट, आट्यापाट्या, तळ्यात-मळ्यात, उभा खो-खो, लगोरी, बेसबॉल, आंधळी कोशिंबीर, संगीत खुर्ची आदी खेळ सायंकाळी सहा वाजेपर्यंत खेळले. त्यांनतर सर्वांनी श्री मंगळग्रह सामूहिक सायंआरती केली. सायंकाळी साडेसात वाजेपासून विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम झाला. त्यातील मिमिक्रीने सर्वांची मनोसोक्त करमणूक केली. रात्रीच्या भोजनानंतर सर्वांनी शेकोटीसह नृत्य व गायनाचा रात्री उशिरापर्यंत सर्वांनी मनमुराद आनंद घेतला.

यावेळी अमळनेर महिला मंच ट्रस्टच्या अध्यक्षा सौ. कांचनताई शहा, उपाध्यक्षा सौ. तिलोत्तमाताई पाटील, सौ. सरोजताई भांडारकर, सचिव सौ. वसुंधराताई लांडगे व कोशाध्यक्षा प्रा. सौ. शीलाताई पाटील यांच्यासह कार्यकारी मंडळातील सदस्या उपस्थित होते.

स्नेहमेळ्यात आज (सोमवार, 

दि. 31 ऑगस्ट) होणारे कार्यक्रम

सकाळी 8.30 वाजता नाश्ता. 9.30 वाजता माहेरवाशिणींचे ओटी भरण व स्नेहमेळ्याचा समारोप.

 

डि आर कन्या शाळांमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला..

अमळनेर..

खानदेश शिक्षण मंडळ संचालित श्रीमती डि आर कन्या शाळेत आज २९ ऑगस्ट मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. आज शाळेत सकाळी व दुपार विभागामध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित भारताचे रत्न मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस माल्यार्पन करून क्रीडा साहित्यचे पुजा करण्यात आले.या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यस्तरिय जीवन गौरव पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापिका सौ एस एस सुर्यवंशी मॅडम होत्या,या वेळी उपमुख्याध्यापक एस आर शिंगाणे , पर्यवेक्षक एस पी वाघ , शिक्षक प्रतिनिधी पी पी जोशी , एस एस माळी , क्रीडा विभाग प्रमुख आर एस सोनवणे मॅडम ,शामभाऊ पवार सर्व सर्व मान्यवरांनी पूजन केले. 

     अध्यक्षीय भाषणात सौ एस एस सुर्यवंशी मॅडम यांनी मेजर ध्यान चंद यांचा क्रीडा क्षेत्रातील कार्याविषयी व त्यांनी देशासाठी केलेला त्याग, देश भावना, समर्पण , भारताची मान उंचावण्यासाठी ऑलम्पिक मध्ये केलेलं कार्य , क्रीडा संस्कृती , आजच्या पिढीला शिकण्यासारखे अनेक गोष्टी आपल्याजवळ आहेत त्याचा फायदा करून देशासाठी क्रीडा क्षेत्रात मोठे योगदान देण्याचं, मोठे ध्येय गाठण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावे. असे आपल्या भाषणातून सांगितले. 

  राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त राष्ट्रीय सुवर्ण पदक प्राप्त नूतन किशोर भोई , आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक प्राप्त सुकेशनी समाधान सपकाळे या खेळाडूंचा सन्मान व सत्कार यावेळी करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षिका,व शिक्षकेतर बंधू-भगिनी यांनी सहकार्य केले.

अमळनेर नगरपरिषद अंतर्गत पथविक्रेता तक्रार निवारण व विवाद निर्णय समिती स्थापन अध्यक्षपदी न्यायाधीश व्ही.ए.वाजे तर सदस्यपदी नितीन कोल्हे व चेतन राजपुत

 

अमळनेर:-जिल्हाधिकारी जळगाव यांचेमार्फत अमळनेर नगरपरिषद अंतर्गत “पथविक्रेता तक्रार निवारण व विवाद निर्णय समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीत अध्यक्षपदी न्या.व्ही.ए.वाजे(सह. दिवानी न्यायाधीश कनिष्ठ स्तर अमळनेर) तर सदस्य पदी अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत व मॉडर्न इन्स्टिट्यूटचे संचालक नितीन कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

        याबाबत जळगाव जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे पत्र अमळनेर नगरपरिषदेला दिनांक 26 ऑगस्ट 2026 रोजी प्राप्त झाले आहे.या समितीचा कार्यकाळ 5 वर्षाचा असणार आहे.दरम्यान 

 पथविक्रेता (उपजीविकेचे संरक्षण व पथविक्रीचे विनियमन) अधिनियम, 2014 अंतर्गत प्रत्येक स्थानिक प्राधिकरणासाठी “तक्रार निवारण व विवाद निर्णय समिती” गठीत करण्यासंदर्भात मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी दिलेले आदेश.महाराष्ट्र शासन, नगरविकास विभागाचा शासन निर्णय यां अनुषंगाने सदर समिती गठीत करण्यात आली आहे.

        केंद्र शासनाने पथविक्रेता (उपजीविकेचे संरक्षण व पथविक्रीचे विनियमन) अधिनियम, 2014 दिनांक 05 मार्च 2014 रोजी लागू केला असून, सदर अधिनियमाच्या कलम 36(1) अन्वये महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र पथविक्रेता (उपजीविकेचे संरक्षण व पथविक्रीचे विनियमन) नियम, 2016 दिनांक 03 ऑगस्ट 2016 रोजी अधिसूचित केले आहेत.सदर अधिनियमाच्या कलम 20 तसेच महाराष्ट्र पथविक्रेता (उपजीविकेचे संरक्षण व पथविक्रीचे विनियमन) नियम, 2016 मधील नियम 3 व 4 नुसार प्रत्येक स्थानिक प्राधिकरणासाठी “तक्रार निवारण व विवाद निर्णय समिती” स्थापन करणे आवश्यक आहे.त्यानुषंगाने, मा. उच्च न्यायालयाने दिलेले आदेश तसेच शासनाच्या निर्देशांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने जळगाव जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद/नगरपंचायतींसाठी ही स्वतंत्र “तक्रार निवारण व विवाद निर्णय समिती” गठीत करण्यात आली आहे.

ढोल-ताशांच्या गजरात माहेरवाशिणींचे औक्षणासह स्वागत! गजरा, मेंदी, बांगड्यांच्या साजशृंगाराने नटल्या अमळनेरच्या लेकी

 

अमळनेर : माहेरच्या अंगणातील बालपणीच्या आठवणींना उजाळा देत, सासर-माहेर दोन्ही कुटुंबांना आपल्या कर्तृत्वाने आणि मायेने समृद्ध करणाऱ्या अमळनेरच्या लेकींचा स्नेहमेळा अर्थात ‌‘माहेरचा पारिजात‌’ या उपक्रमाची आज शनिवार, दि. 29 ऑगस्ट रोजी श्री मंगळग्रह मंदिरात सकाळच्या मंगलमय आणि अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात सुरूवात झाली. आजपासून तीन दिवस अर्थात सोमवार, दि. 31 ऑगस्ट 2026 पर्यंत रंगणाऱ्या या स्नेहमेळ्याचे येथील अमळनेर महिला मंच ट्रस्टतर्फे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी मंगळग्रह सेवा संस्थेचे त्यांना विशेष सहकार्य लाभले आहे.

 माहेरच्या अंगणात जाऊन पुनश्च बालपण अनुभवता यावे, जुन्या आठवणींना उजाळा मिळावा आणि मैत्रिणींसोबत मनमोकळेपणाने गप्पागोष्टींची मैफल रंगावी, हा या स्नेहमेळ्याचा मुख्य उद्देश आहे.

 या स्नेहमेळ्यांतर्गत सकाळी नऊ वाजता अमळनेर महिला मंच ट्रस्टतर्फे माहेरवाशिणींचे हळद-कुंकवाने औक्षण करीत ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांना मोत्यांचे दागिने व गजरे भेट देण्यात आले. त्यानंतर श्री मंगळग्रह देवांची सामूहिकरित्या महाआरती झाली. साडेनऊ वाजता सर्व माहेरवाशिणींनी एकत्रित येत स्वयंपरिचय करून दिला. त्यानंतर सर्वांच्या हातावर कु. आकांक्षाताई, मयुरीताई व दीप्तीताई यांनी मेंदी रेखाटून त्यांना सौ. पूजाताई मोराणकर यांनी बांगड्यांसह सौभाग्याचे वाण देण्यात आले. दुपारी सव्वाबारा वाजता सर्व माहेरवाशिणींनी श्री मंगळग्रह देवांचा सामूहिक महाअभिषेक केला. तसेच पाहुणचार अर्थात खानदेशची खासियत असलेले पुरणपोळीचे भोजन घेतले. त्यानंतर दोन ते तीन या वेळेत सागर गोटे, काचा-कवड्या, चौपट, आट्यापाट्या, तळ्यात-मळ्यात, उभा खो-खो आदी पारंपरिक खेळ खेळण्यात आले. यावेळी माहेरवाशिणींनी झोक्यांवर बसून गाणी गात खऱ्या अर्थाने माहेरचा आनंद लुटला. सायंकाळी साडेपाच वाजता सामूहिक चहापानानंतर श्री मंगळग्रह देवांची सामूहिक सायंआरती करण्यात आली. त्यानंतर खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, शहर विकास आघाडीच्या गटनेत्या सौ. जयश्रीताई पाटील व मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या प्रमुख उपस्थितीत अमळनेरच्याच माहेरवाशिणी सहाय्यक कर निरीक्षक सौ. हर्षाताई साळुंखे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यानंतर सामूहिकरित्या मंगळागौरचे खेळ खेळण्यात आले. त्यानंतर रात्री उशिरा सामूहिक भोजनानंतर आजच्या दिवसाची सांगता झाली. 

 यावेळी अमळनेर महिला मंच ट्रस्टच्या अध्यक्षा सौ. कांचनताई शहा, उपाध्यक्षा सौ. तिलोत्तमाताई पाटील, सौ. सरोजताई भांडारकर, सचिव सौ. वसुंधराताई लांडगे व कोशाध्यक्षा प्रा. सौ. शीलाताई पाटील यांच्यासह कार्यकारी मंडळातील सदस्या उपस्थित होते.