ब्रेकिंग
ढोल-ताशांच्या गजरात माहेरवाशिणींचे औक्षणासह स्वागत! गजरा, मेंदी, बांगड्यांच्या साजशृंगाराने नटल्या अमळनेरच्या लेकी

 

अमळनेर : माहेरच्या अंगणातील बालपणीच्या आठवणींना उजाळा देत, सासर-माहेर दोन्ही कुटुंबांना आपल्या कर्तृत्वाने आणि मायेने समृद्ध करणाऱ्या अमळनेरच्या लेकींचा स्नेहमेळा अर्थात ‌‘माहेरचा पारिजात‌’ या उपक्रमाची आज शनिवार, दि. 29 ऑगस्ट रोजी श्री मंगळग्रह मंदिरात सकाळच्या मंगलमय आणि अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात सुरूवात झाली. आजपासून तीन दिवस अर्थात सोमवार, दि. 31 ऑगस्ट 2026 पर्यंत रंगणाऱ्या या स्नेहमेळ्याचे येथील अमळनेर महिला मंच ट्रस्टतर्फे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी मंगळग्रह सेवा संस्थेचे त्यांना विशेष सहकार्य लाभले आहे.

 माहेरच्या अंगणात जाऊन पुनश्च बालपण अनुभवता यावे, जुन्या आठवणींना उजाळा मिळावा आणि मैत्रिणींसोबत मनमोकळेपणाने गप्पागोष्टींची मैफल रंगावी, हा या स्नेहमेळ्याचा मुख्य उद्देश आहे.

 या स्नेहमेळ्यांतर्गत सकाळी नऊ वाजता अमळनेर महिला मंच ट्रस्टतर्फे माहेरवाशिणींचे हळद-कुंकवाने औक्षण करीत ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांना मोत्यांचे दागिने व गजरे भेट देण्यात आले. त्यानंतर श्री मंगळग्रह देवांची सामूहिकरित्या महाआरती झाली. साडेनऊ वाजता सर्व माहेरवाशिणींनी एकत्रित येत स्वयंपरिचय करून दिला. त्यानंतर सर्वांच्या हातावर कु. आकांक्षाताई, मयुरीताई व दीप्तीताई यांनी मेंदी रेखाटून त्यांना सौ. पूजाताई मोराणकर यांनी बांगड्यांसह सौभाग्याचे वाण देण्यात आले. दुपारी सव्वाबारा वाजता सर्व माहेरवाशिणींनी श्री मंगळग्रह देवांचा सामूहिक महाअभिषेक केला. तसेच पाहुणचार अर्थात खानदेशची खासियत असलेले पुरणपोळीचे भोजन घेतले. त्यानंतर दोन ते तीन या वेळेत सागर गोटे, काचा-कवड्या, चौपट, आट्यापाट्या, तळ्यात-मळ्यात, उभा खो-खो आदी पारंपरिक खेळ खेळण्यात आले. यावेळी माहेरवाशिणींनी झोक्यांवर बसून गाणी गात खऱ्या अर्थाने माहेरचा आनंद लुटला. सायंकाळी साडेपाच वाजता सामूहिक चहापानानंतर श्री मंगळग्रह देवांची सामूहिक सायंआरती करण्यात आली. त्यानंतर खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, शहर विकास आघाडीच्या गटनेत्या सौ. जयश्रीताई पाटील व मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या प्रमुख उपस्थितीत अमळनेरच्याच माहेरवाशिणी सहाय्यक कर निरीक्षक सौ. हर्षाताई साळुंखे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यानंतर सामूहिकरित्या मंगळागौरचे खेळ खेळण्यात आले. त्यानंतर रात्री उशिरा सामूहिक भोजनानंतर आजच्या दिवसाची सांगता झाली. 

 यावेळी अमळनेर महिला मंच ट्रस्टच्या अध्यक्षा सौ. कांचनताई शहा, उपाध्यक्षा सौ. तिलोत्तमाताई पाटील, सौ. सरोजताई भांडारकर, सचिव सौ. वसुंधराताई लांडगे व कोशाध्यक्षा प्रा. सौ. शीलाताई पाटील यांच्यासह कार्यकारी मंडळातील सदस्या उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *