ब्रेकिंग
🌸 शिक्षक दिन उत्साहात साजरा 🌸 सी. आर. पाटील इंटरनॅशनल स्कूल, तांबेपुरा, अमळनेर येथे शिक्षक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

 

अमळनेर : सी. आर. पाटील इंटरनॅशनल स्कूल, तांबेपुरा, अमळनेर येथे ५ सप्टेंबर – शिक्षक दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. भारताचे माजी राष्ट्रपती, महान तत्त्वज्ञ व शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.

 

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती आदर, कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त केले.

या प्रसंगी विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिकेत शाळेतील विविध वर्गांचे अध्यापन केले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांची जबाबदारी समजून घेत आत्मविश्वासाने वर्ग हाताळले. काही विद्यार्थ्यांनी सुंदर भाषणे, कविता, गीते व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून शिक्षकांप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या.

कार्यक्रमादरम्यान शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे आणि विद्यार्थ्यांच्या जीवनातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचे कौतुक करण्यात आले. शिक्षक हे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देत नाहीत, तर त्यांच्यामध्ये शिस्त, संस्कार, आत्मविश्वास, प्रामाणिकपणा आणि चांगल्या मूल्यांची रुजवणूक करतात, असा संदेश यावेळी देण्यात आला.

विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी विविध मनोरंजक उपक्रम व खेळ आयोजित करून शिक्षकांना आनंदाचे क्षण दिले. संपूर्ण शाळेचे वातावरण उत्साह, आनंद आणि आपुलकीने भरून गेले होते.

शाळेच्या मुख्याध्यापकांनी शिक्षक दिनाचे महत्त्व सांगून सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती कायम आदर ठेवावा आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा योग्य उपयोग करून जीवनात यशस्वी व्हावे, असे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे व्यवस्थापन, मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शिक्षक दिनाचा कार्यक्रम अत्यंत सुंदर व संस्मरणीय ठरला.

“शिक्षक म्हणजे ज्ञानाचा दीप प्रज्वलित करून विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देणारे मार्गदर्शक.” या भावनेने शिक्षक दिनाचा कार्यक्रम आनंदात आणि उत्साहात संपन्न झाला.

🪔 दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा सी. आर. पाटील इंटरनॅशनल स्कूल, तांबेपुरा, अमळनेर येथे दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

 

अमळनेर : सी. आर. पाटील इंटरनॅशनल स्कूल, तांबेपुरा, अमळनेर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती व परंपरांविषयी आवड निर्माण व्हावी आणि एकतेचे महत्त्व समजावे, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

 

कार्यक्रमाची सुरुवात श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण, राधा व गोप-गोपींच्या वेशभूषेत सहभागी होत कार्यक्रमाची शोभा वाढवली. विद्यार्थ्यांनी सुंदर कृष्ण-राधा नृत्य, गाणी आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

यानंतर उत्साहपूर्ण वातावरणात दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन मानवी मनोरा तयार करण्याचा प्रयत्न केला. “गोविंदा आला रे आला!”च्या जयघोषाने संपूर्ण शाळेचा परिसर दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांमध्ये सहकार्य, संघभावना, शिस्त आणि आत्मविश्वास यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला.

शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना श्रीकृष्णाच्या जीवनातील मूल्ये, मैत्री, प्रेम, धैर्य, कर्तव्य आणि एकतेचे महत्त्व याबद्दल मार्गदर्शन केले. उत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये आनंद, उत्साह आणि भारतीय संस्कृतीबद्दल अभिमानाची भावना निर्माण झाली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे व्यवस्थापन, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे दहीहंडी उत्सव अविस्मरणीय ठरला.

“एकता, आनंद आणि संस्कृतीचा सुंदर मिलाफ” ठरलेल्या या दहीहंडी उत्सवाची सांगता आनंदी वातावरणात झाली.

बालविवाह निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवसाची घोषणा संयुक्त राष्ट्र संघाकडून बालविवाह निर्मूलनासाठी ऐतिहासिक जागतिक दिनाची घोषणा;  आधार बहुउद्देशीय संस्थेकडून स्वागत २७ नोव्हेंबर हा दिवस ‘बाल, अल्पवयीन आणि सक्तीच्या विवाह निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस’ म्हणून घोषित

 

अमळनेर, जि. जळगाव | 

५ सप्टेंबर २०२६ : 

संयुक्त राष्ट्रसंघाने २७ नोव्हेंबर हा दिवस ‘बाल, अल्पवयीन आणि सक्तीच्या विवाह निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस’ म्हणून घोषित केल्याच्या ऐतिहासिक निर्णयाचे आधार बहुउद्देशीय संस्था, अमळनेर यांनी स्वागत केले आहे.

जळगाव जिल्ह्यात बालविवाह निर्मूलनासाठी तळागाळात जनजागृती व प्रतिबंधात्मक कार्य करणारी आधार बहुउद्देशीय संस्था ही Just Rights for Children (JRC) या बालहक्कांसाठी कार्यरत असलेल्या देशातील प्रमुख संस्थांच्या नेटवर्कची भागीदार संस्था आहे. बालविवाह निर्मूलनासाठी स्वतंत्र आंतरराष्ट्रीय दिवस घोषित करण्याच्या JRC च्या दीर्घकालीन अभियानाला या निर्णयामुळे जागतिक स्तरावर ऐतिहासिक मान्यता मिळाल्याचे संस्थेने म्हटले आहे.

आधार बहुउद्देशीय संस्थेच्या प्रतिनिधी डॉ. भारती पाटील, रेणू प्रसाद आणि प्रा. डॉ. विजयकुमार वाघमारे यांनी या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत केले. “भारतातून निर्माण झालेला बालविवाह निर्मूलनाचा आवाज आज जागतिक संकल्प बनला आहे. आपल्या देशातील आणि तळागाळातील कार्याला जागतिक स्तरावर मान्यता मिळणे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे,” असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, “२७ नोव्हेंबर हा दिवस जागतिक स्तरावर बालविवाह निर्मूलनासाठी समर्पित करण्याचा निर्णय भारतासाठी विशेष अभिमानाचा आहे. याच दिवशी २०२४ मध्ये भारत सरकारने JRC आणि त्याच्या भागीदार संस्थांच्या सहकार्याने ‘बाल विवाह मुक्त भारत’ अभियानाची सुरुवात केली होती. मात्र, हा केवळ उत्सव साजरा करून थांबण्याचा क्षण नसून आपली जबाबदारी अधिक दृढ करण्याची वेळ आहे.”

तळागाळातील संघर्ष सुरूच राहणार

जागतिक स्तरावरील या संकल्पाचे रूपांतर गावपातळीवरील प्रत्यक्ष कृतीमध्ये करणे हे आता प्रमुख आव्हान असल्याचे संस्थेच्या प्रतिनिधींनी सांगितले. “जिल्ह्यातील कोणत्याही गावात एखादे मूल बालविवाहाच्या धोक्यात असेपर्यंत आमचा संघर्ष अपूर्ण आहे. केवळ कायदे करून बालविवाह पूर्णपणे थांबविता येणार नाहीत. त्यामुळे शाळा, ग्रामपंचायती आणि गावांमध्ये व्यापक जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे,” असे त्यांनी सांगितले.

संस्थेच्या माध्यमातून नागरिकांना बालविवाह विरोधी प्रतिज्ञा घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व बाल विवाहाच्या जोखमीतील कुटुंबांना विविध शासकीय योजनांशी जोडण्याचे प्रयत्न केले जात आहेत. तसेच शिक्षणातून बाहेर पडलेल्या मुला-मुलींना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठीही प्रयत्न करण्यात येत आहेत.

आधार बहुउद्देशीय संस्थेने जळगाव जिल्ह्यात प्रशासन, कायदा अंमलबजावणी यंत्रणा आणि स्थानिक समुदायांच्या सहकार्याने बालविवाह प्रतिबंधासाठी सातत्याने कार्य केले असून, अनेक प्रकरणांमध्ये सामाजिक व कायदेशीर हस्तक्षेप करण्यात आले आहेत.

जागतिक अभियानाची ऐतिहासिक वाटचाल

Just Rights for Children चे संस्थापक भुवन ऋभू यांनी बालविवाह निर्मूलनासाठी स्वतंत्र जागतिक दिवसाची मागणी आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने मांडली. मार्च २०२६ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघातील आपल्या भाषणात त्यांनी या मागणीचा पुनरुच्चार केला. सिएरा लिओनच्या फर्स्ट लेडी डॉ. फातिमा मादा बायो यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय नेत्यांनी या उपक्रमाला पाठिंबा दिला.

त्यानंतर सिएरा लिओनने भारतासह सुमारे ५० देशांच्या पाठिंब्याने संयुक्त राष्ट्रांच्या महासभे समोर २७ नोव्हेंबर हा दिवस बालविवाह निर्मूलनासाठी जागतिक दिवस म्हणून घोषित करण्याचा ठराव सादर केला. ४ सप्टेंबर २०२६ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने हा ऐतिहासिक ठराव मंजूर केला.

भारतातील व्यापक जनआंदोलन

JRC हे जगातील मोठ्या बाल संरक्षण नेटवर्कपैकी एक असून, ‘Child Marriage Free World’ अभियानांतर्गत जागतिक स्तरावर बाल विवाहाविरोधात व्यापक चळवळ उभारण्यासाठी कार्यरत आहे.

भारतात JRC च्या भागीदार संस्था विविध राज्यांमध्ये आणि देशातील ७८२ जिल्ह्यांमध्ये शासन व प्रशासनाच्या सहकार्याने कार्यरत आहेत. समुदाय, शाळा, ग्रामपंचायती, आदिवासी व वंचित समाजघटक, महिला, पोलीस कर्मचारी, धार्मिक नेते आणि लोकप्रतिनिधींना या अभियानात सहभागी करून बाल विवाहाविरोधात व्यापक जनजागृती करण्यात येत आहे.

JRC च्या माहितीनुसार, या सामूहिक प्रयत्नांमुळे भारतात ५ लाख ५० हजारांहून अधिक बालविवाह रोखण्यात योगदान मिळाले असून, लाखो नागरिकांनी बाल विवाहाविरोधी प्रतिज्ञा घेतल्या आहेत.

बालविवाह निर्मूलनासाठी करण्यात आलेली ही जागतिक बांधिलकी संयुक्त राष्ट्रसंघाच्या शाश्वत विकास उद्दिष्ट क्रमांक ५ – लैंगिक समानता (SDG-5) मधील लक्ष्य ५.३ शी सुसंगत आहे. या उद्दिष्टानुसार बालविवाह, अल्पवयीन विवाह आणि सक्तीच्या विवाहासह सर्व प्रकारच्या हानिकारक प्रथांचे निर्मूलन करण्याचे जागतिक लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.

आधार बहुउद्देशीय संस्थेने सर्व नागरिक, पालक, शिक्षक, ग्रामपंचायत सदस्य, युवक, महिला, सामाजिक संस्था आणि शासकीय यंत्रणांना बाल विवाहमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले आहे.

“प्रत्येक बालकाला शिक्षण, सुरक्षितता, आरोग्य आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. बाल विवाहमुक्त भारत आणि बाल विवाहमुक्त जग निर्माण करण्यासाठी आता जागतिक संकल्पाला स्थानिक कृतीची जोड देणे आवश्यक आहे,” असे संस्थेने म्हटले आहे.

या प्रसंगी आधार बहुउद्देशीय संस्थेचे आनंद पगारे, मोहिनी धनगर आणि सुनील हिवाळे उपस्थित होते.

— आधार बहुउद्देशीय संस्था, अमळनेर

जिल्हा जळगाव, महाराष्ट्र

Just Rights for Children (JRC) भागीदार संस्था

आमदारांच्या मुळगावीच बससेवा विस्कळीत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळ; NSUIचे आगार व्यवस्थापकांना निवेदन

 

 

अमळनेर, दि. 5 सप्टेंबर 2026 :

अमळनेर तालुक्याचे आमदार तथा माजी मंत्री अनिल भाईदास पाटील यांचे मुळगाव असलेल्या हिंगोणे येथेच एसटी बससेवा मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाल्याने विद्यार्थी, नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्णांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी NSUI जळगाव जिल्हाध्यक्ष ॲड. कौस्तुभ पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज आगार व्यवस्थापकांची भेट घेऊन बससेवा तातडीने सुरळीत करण्याची मागणी केली.

मागील अनेक महिन्यांपासून हिंगोणे गावातील विद्यार्थ्यांना नियमित व वेळेवर एसटी बस उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी शिष्टमंडळासमोर मांडल्या. नियोजित वेळापत्रकानुसार बस उपलब्ध न होणे, काही वेळा दोन-दोन तास उशिराने बस सुटणे, तसेच अचानक फेऱ्या रद्द होणे यामुळे विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयात वेळेवर पोहोचता येत नाही. परिणामी विद्यार्थ्यांचे लेक्चर, प्रॅक्टिकल, परीक्षा, स्पर्धा परीक्षा तसेच महत्त्वाचे शैक्षणिक तास बुडत आहेत.

विशेषतः सकाळच्या वेळेत नियमित बस उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. अनेक विद्यार्थ्यांच्या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने दररोजचा अतिरिक्त प्रवासखर्च त्यांच्या पालकांवर आर्थिक भार टाकत आहे. काही विद्यार्थ्यांना बसच्या प्रतीक्षेत तासन्तास बसस्थानकावर थांबावे लागते.

याशिवाय रुग्णांना दवाखान्यात जाण्यासाठी, महिलांना दैनंदिन कामांसाठी, ज्येष्ठ नागरिकांना शासकीय कार्यालये व आरोग्यसेवेसाठी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना अमळनेर शहराशी संपर्क साधण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वेळेवर बस न मिळाल्याने अत्यावश्यक वैद्यकीय उपचारांसाठी जाणाऱ्या रुग्णांचीही गैरसोय होत आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एसटी बस ही केवळ प्रवासाची सुविधा नसून त्यांच्या शिक्षणाची जीवनवाहिनी आहे. बससेवा विस्कळीत राहिल्यास त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर आणि भवितव्यावर होतो. त्यामुळे हिंगोणे गावासाठी पुरेशा बसफेऱ्या सुरू करून त्यांचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळावे, बंद असलेल्या फेऱ्या पूर्ववत कराव्यात आणि विद्यार्थ्यांच्या शाळा-महाविद्यालयाच्या वेळेनुसार विशेष बसफेऱ्यांचे नियोजन करावे, अशी मागणी NSUIने केली.

यावेळी ॲड. कौस्तुभ पाटील यांनी आगार प्रशासनाला आठ दिवसांचा कालावधी देत, “हिंगोणे येथील बससेवेचा प्रश्न तातडीने मार्गी लावून विद्यार्थ्यांना व नागरिकांना नियमित आणि वेळेवर वाहतूक सुविधा उपलब्ध करून द्यावी. आठ दिवसांत ठोस कार्यवाही झाली नाही, तर विद्यार्थ्यांना सोबत घेऊन NSUIच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी कोणत्याही परिस्थितीत तडजोड केली जाणार नाही,” असा इशारा दिला.

यावेळी NSUI अमळनेर तालुकाध्यक्ष उमेश संदानशिव जयेश संभाजी पाटील, कुणाल कोळी, तेजस भोई, मयंक चव्हाण, रोहित कोळी, महेश कोळी,यश पाटील, महेश भोई, प्रवीण पाटील व असंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

*जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने २५ आदर्श शिक्षक सन्मान* *अमळनेरचे प्रा. हिरालाल पाटील यांचा सन्मान*

 

 

अमळनेर :–

  शिक्षक दिनानिमित्त जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे आयोजित विशेष कार्यक्रमात जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या २५ आदर्श शिक्षक बांधवांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. अविनाश भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष योगेंद्र पाटील, प्रदेश सरचिटणीस हाजी मुक्ती हारून, प्रदेश सचिव प्रवीण सुरवाडे, अखिल भारतीय सेवा दलाचे सचिव विनोद कोळपकर, प्रदेश सरचिटणीस ॲड. सलीम पटेल, ओबीसी सेलचे उपाध्यक्ष विजय महाजन, प्राचार्य एस. एस. राणे, माजी शहर जिल्हाध्यक्ष श्याम तायडे, काँग्रेस उपाध्यक्ष अशोक खलाणे, पंचायत समितीचे माजी सभापती धनगर अण्णा पाटील, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष किरण महाजन, जिल्हा उपाध्यक्ष विजयकुमार कोसोदे, जिल्हा खजिनदार राहुल बाहेती, वरिष्ठ नेते श्रीधर चौधरी, विजय वाणी, एससी सेलचे अध्यक्ष कटारे, किसान काँग्रेसचे अमळनेर तालुकाध्यक्ष प्रा. दिनेश पवार,काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष गोकुळ आबा बोरसे, मगन पाटील,रोहिदास दाजी, रज्जाक शेख,यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

अमळनेर तालुक्याचे प्रा. हिरालाल पाटील यांचाही यावेळी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. प्रा. हिरालाल पाटील हे वसंतनगर ता. पारोळा येथे गेल्या सोळा वर्षापासून जुनिअर कॉलेजला कार्यरत आहेत.त्यांच्या शैक्षणिक योगदानाबद्दल जिल्हा काँग्रेसच्या वतीने सन्मान करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सुभाष जाधव, प्राचार्य के. आर. पाटील, मुख्याध्यापक आर. सी. चौधरी, जेष्ठ शिक्षक एस. जे. भामरे, एम. डी. सूर्यवंशी, डी. एस पाटील यांच्यासह सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रा. हिरालाल पाटील यांचे अभिनंदन केले.

अमळनेरात गोकुळाष्टमीनिमित्त गोशाळेत गोसेवा;  गोविंद अग्रवाल व गार्डन ग्रुपचा स्तुत्य उपक्रम

 

अमळनेर :- श्रीकृष्ण जन्माष्टमी अर्थात गोकुळाष्टमीनिमित्त शहरातील पळासदडे रोडवरील श्रीमती भानुबेन बाबूलाल शाह गोशाळेत गोसेवा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

      श्री छत्रपती शिवाजी महाराज गार्डन ग्रुप, अमळनेर आणि मोहन कृषी उद्योगाचे संचालक उद्योजक गोविंद अग्रवाल यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते गोमातेचे पूजन व आरतीने करण्यात आली. यानंतर उपस्थित मान्यवर व भाविकांच्या हस्ते गोशाळेतील प्रत्येक गोमातेला ओला चणा, ओले मूग, गूळ व हिरव्या कुट्टीचे खाद्य वाटप करून सेवा करण्यात आली. गोशाळेत यावेळी अतिशय भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

      श्रीकृष्ण भगवान यांना गोमाता अतिशय प्रिय असल्याने जन्माष्टमीनिमित्त हा सेवा उपक्रम राबविण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. गोपालन व गोसेवेचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे व गोसेवेला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमामागचा मुख्य हेतू होता.

       यावेळी गोशाळेचे संचालक चेतन शाह व सौ. मीना शाह या दाम्पत्याच्या गेल्या अनेक वर्षांपासूनच्या निरपेक्ष व सेवाभावी कार्याबद्दल गार्डन ग्रुपतर्फे विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी गोशाळेला उदार मनाने देणगी देखील दिली. भाविकांसाठी फलाहाराची व्यवस्था करण्यात आली होती.या उत्कृष्ट आयोजनाबद्दल उद्योजक गोविंद अग्रवाल व श्री छत्रपती शिवाजी महाराज गार्डन ग्रुपचे सर्वत्र कौतुक होत आहे. कार्यक्रमास महिला भगिनी, पुरुष बांधव, व्यापारी बांधव, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व गार्डन ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रताप महाविद्यालयात पूज्य साने गुरुजी राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन        (१६ व १७ सप्टेंबरला रंगणार राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा; विजेत्यांना आकर्षक पारितोषिकांसह चषक)

 

अमळनेर, प्रतिनिधी: खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथे पूज्य साने गुरुजी राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धा दिनांक १६ व १७ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे. अशी घोषणा महाविद्यालयाच्या CCMC विभागाचे प्रमुख डॉ. धनंजय चौधरी यांनी केली आहे. महाविद्यालयाच्या पूज्य साने गुरुजी सभागृहात सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत दोन दिवस ही स्पर्धा रंगणार आहे. 

या राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी विविध ज्ञानशाखांचा समावेश असलेला व्यापक अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला आहे. त्यामध्ये साहित्य व कला, भारताचा इतिहास, भूगोल, सामान्य विज्ञान व आरोग्य, महाराष्ट्रातील समाजसुधारक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार व त्यांचे स्वरूप, भारतीय अर्थव्यवस्था, क्रीडा, पर्यावरण, राज्यव्यवस्था व शासन, वाणिज्य, माहितीचा अधिकार, विज्ञान व तंत्रज्ञान, मानव संसाधन विकास व मानवी हक्क, चालू घडामोडी, कृषी, पूज्य साने गुरुजी तसेच इतर समाजसुधारक या विषयांचा समावेश या स्पर्धेत करण्यात आला आहे. या स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानाबरोबरच विविध विषयांवरील आकलन, तर्कशक्ती, चिकित्सक विचार आणि तत्परता यांचीही कसोटी लागणार आहे. या स्पर्धेच्या तीन फेऱ्या होणार असून पहिल्या फेरीत सामान्य ज्ञानावर प्रश्न विचारले जातील, दुसऱ्या फेरीत ऑडिओ व्हिडिओ प्रश्नांची बझर फेरी होईल. तर तिसऱ्या व अंतिम फेरीत पूज्य. सानेगुरुजी व अन्य समाज सुधारकांवर प्रश्न विचारले जातील अंतिम फेरीत यशस्वी झालेल्या संघांना पारितोषिके दिले जातील.

स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक पारितोषिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रथम क्रमांकास १०,००० रुपये व चषक, द्वितीय क्रमांकास ७,००० रुपये व चषक, तर तृतीय क्रमांकास ५,००० रुपये व चषक देण्यात येणार आहे. तसेच उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक २,००० रुपये व चषक आणि उत्तेजनार्थ द्वितीय पारितोषिक १,००० रुपये व चषक देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील या स्पर्धेचे समन्वयक डॉ. किरण गावित, तर सह-समन्वयक प्रा. भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे संयोजन करण्यात येणार आहे. पूज्य साने गुरुजी यांच्या विचारांचा, साहित्याचा आणि सामाजिक कार्याचा विद्यार्थ्यांना परिचय व्हावा, तसेच विद्यार्थ्यांमध्ये व्यापक वाचन, सामाजिक भान आणि विविध विषयांचे ज्ञान विकसित व्हावे, या उद्देशाने आयोजित करण्यात येणाऱ्या या स्पर्धेला महाराष्ट्रातील महाविद्यालयांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.

खानदेश शिक्षण मंडळाच्या सर्व संचालक मंडळाने या राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेला शुभेच्छा दिल्या असून प्रताप महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव, अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्ष समन्वयक डॉ. मुकेश भोळे, CCMC विभागाचे माजी समन्वयक डॉ. विजय तुंटे, सध्याचे CCMC समन्वयक डॉ. धनंजय चौधरी, सह-समन्वयक डॉ. ज्ञानेश्वर कांबळे यांनी या राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेला शुभेच्छा दिल्या असून महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयांतील विद्यार्थी स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. प्रस्तुत स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विविध समित्यांचे सर्व सदस्य तन्मयतेने सहकार्य करीत आहेत.

राज्यशास्त्र’ विषय बहुविद्याशाखीय दृष्टीने महत्त्वाचा — प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव ‘प्रताप’मध्ये राज्यशास्त्र विभागाचा परिचय व स्वागत समारंभ उत्साहात एन.ई.पी.ची संरचना समजून घेणे काळाची गरज — डॉ. मुकेश भोळे १०० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

 

अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागातर्फे विभागाचा परिचय (Induction) व स्वागत समारंभ (Welcome) उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कै. शंकरराव राणे सभागृहात ३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तब्बल १०० विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विजय तुंटे होते. व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव, सिनेट सदस्य डॉ. धिरज वैष्णव, उपप्राचार्य डॉ. डी. आर. चौधरी, अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्षाचे प्रमुख डॉ. मुकेश भोळे, पदार्थ विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. अमित पाटील, ज्ञान संसाधन केंद्राचे प्रमुख प्रा. दिपक पाटील, सिनेट सदस्य डॉ. संदीप नेरकर, डॉ. सुनिल राजपूत, डॉ. राखी घरटे, डॉ. हर्ष नेतकर, प्रा. निर्भय सोनार, प्रा. रुपाली महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती देवी, कर्मयोगी श्रीमंत प्रताप शेठजी आणि पूज्य साने गुरुजी यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर डॉ. हर्ष अरुण नेतकर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याणी महाजन, रुपाली संसारे आणि जोया पिंजारी यांनी सुमधुर स्वागतगीत सादर केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कावेरी भोई यांनी केले.

राज्यशास्त्राच्या अभ्यासातून आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन विकसित होतो

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांची ओळख आणि विषयाची ओळख या दोन्ही दृष्टीने हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांची प्रगती ही त्यांच्या विषयातील आवड आणि अभ्यासावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. आजच्या काळात प्रत्येक विषयाला स्वतःचे महत्त्व आहे. त्यामुळे एका विषयाचे महत्त्व अधोरेखित करताना अन्य विषयांचे महत्त्व कमी होत नाही.”

राज्यशास्त्रासारख्या विषयाचा अभ्यास विद्यार्थ्यांना आंतरविद्याशाखीय व बहुविद्याशाखीय दृष्टिकोन देतो. विविध विषयांशी सांगड घालत ज्ञानाचा विस्तार करणे ही आजच्या उच्च शिक्षणाची गरज आहे. राज्यशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीत यापूर्वीही महत्त्वपूर्ण योगदान दिले असून, ही परंपरा पुढेही कायम राहावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

एन.ई.पी. २०२३ समजून घेणे विद्यार्थ्यांसाठी आवश्यक

विशेष व्याख्याते म्हणून मार्गदर्शन करताना IQAC प्रमुख डॉ. मुकेश भोळे यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (NEP 2023) रचना समजून घेण्याचे आवाहन केले.

ते म्हणाले की, “आपण एका प्रतिथयश महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. त्यामुळे उच्च शिक्षणाची संपूर्ण रचना सूक्ष्मपणे समजून घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर एन.ई.पी. २०२३ अंतर्गत करण्यात आलेल्या बदलांचेही आकलन विद्यार्थ्यांनी करून घेतले पाहिजे.”

३+२, ४+१ पॅटर्न तसेच प्रमाणपत्र, डिप्लोमा आणि डिग्री अभ्यासक्रमांची रचना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक जडणघडणीसाठी उपयुक्त असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांचा ज्ञानात्मक प्रवास निरंतर सुरू राहिला पाहिजे. त्याचबरोबर ऑनर्स व संशोधन पदवीची पद्धत विद्यार्थ्यांनी समजून घेणे आणि आत्मसात करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

अपयशाने खचू नका; सकारात्मक दृष्टिकोन जोपासा

अध्यक्षीय भाषणात डॉ. विजय तुंटे यांनी विद्यार्थ्यांचे लक्ष दोन महत्त्वपूर्ण मुद्द्यांकडे वेधले. राज्यशास्त्र विभागाची वैभवशाली परंपरा अबाधित राखणे ही प्रत्येक विद्यार्थ्याची जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले.

तसेच जीवनातील अपयशाने खचून न जाता ताण-तणावाचा सकारात्मक दृष्टिकोनातून सामना करण्याची मानसिकता विद्यार्थ्यांनी विकसित करावी. प्रत्येकाने आपल्या जीवनात ‘मानसिकसूत्र’ जोपासणे अत्यंत आवश्यक आहे, असा मौलिक संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

विद्यार्थ्यांच्या बौद्धिक कौशल्याचे प्रभावी सादरीकरण

दुपारी १ ते २ या वेळेत विद्यार्थ्यांनी आपल्या विविध बौद्धिक कौशल्यांचे सादरीकरण केले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांना, विचारांना आणि सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळाले.

कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ. राखी घरटे आणि प्रा. रुपाली महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली साक्षी पाटील, लक्ष्मी पाटील, कल्याणी महाजन आदी विद्यार्थिनींनी आकर्षक व कौशल्यपूर्ण रांगोळी साकारली.

समारंभाच्या यशस्वी आयोजनासाठी साक्षी पाटील, लक्ष्मी पाटील, अमोल अहिरे, मनीष पाटील, गौरव सोनवणे, आकाश अहिरे, तुषार शिरसाठ, समाधान पाटील, योगिता पाटील आणि खुशी पाटील यांनी परिश्रम घेतले.

या परिचय व स्वागत सोहळ्यास १०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत कार्यक्रमाला विशेष रंगत आणली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आफ्रिन पठाण आणि श्वेता माळी यांनी प्रभावीपणे केले, तर रमा चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले.

विद्यार्थ्यांमध्ये विषयाची आवड, उच्च शिक्षणाबाबतची जाणीव आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणारा हा परिचय व स्वागत समारंभ उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

अमळनेरात लोककलेचा जागर; ८५ बालकलाकारांचा उत्स्फूर्त सहभाग बालप्रतिभेला मिळाले लोककलेचे व्यासपीठ; संस्कृतीचा समृद्ध वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा स्तुत्य उपक्रम

 

अमळनेर : मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेरच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बालरंगभूमी परिषद, जळगाव जिल्हा शाखा आणि मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या लोककला प्रशिक्षण शिबिराला अमळनेरातील विविध शाळांमधील तब्बल ८५ बालकलाकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. लोककलेच्या माध्यमातून बालमनाला संस्कृतीशी जोडणाऱ्या या उपक्रमामुळे अमळनेरच्या सांस्कृतिक क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे, बालकलाकारांना विविध लोककलांची ओळख करून देणे, त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणे तसेच त्यांना आपल्या कलाविष्काराचे प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा या प्रशिक्षण शिबिराचा प्रमुख उद्देश आहे. या उपक्रमातून बालकलाकारांना लोककलेच्या विविध पैलूंचा परिचय करून देतानाच आपल्या मातीत रुजलेल्या सांस्कृतिक परंपरांशी नाते जोडण्याची संधी मिळाली.

कार्यक्रमाचे उद्घाटन मराठी वाङ्मय मंडळाचे सांस्कृतिक समिती प्रमुख डॉ. रवींद्र कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. यावेळी मंडळाचे संचालक संदीप घोरपडे यांनी प्रास्ताविकातून शिबिरामागील भूमिका, उद्देश आणि लोककलेचे जतन व संवर्धन करण्याची गरज याबाबत सविस्तर विवेचन केले.

यावेळी लोककलेच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे शाहीर विनोद ढगे, शाहीर नाना पाटील, सचिन महाजन, मोहित पाटील, हर्षल पवार व अवधूत दलाल यांचा मंडळाचे संचालक बन्सीलाल भागवत व सौ. वसुंधरा लांडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास बापूराव पाटील (ठाकरे सर), प्रशांत कापडणे सर व सौ. शीला पाटील मॅडम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी सर यांच्या प्रेरणेतून तसेच मराठी वाङ्मय मंडळाच्या संचालक मंडळाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला अमळनेरातील सर्वच शाळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे कार्यवाह भैय्यासाहेब मगर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे ग्रंथपाल हेमंत बाळापुरे व जगदीश कुलकर्णी यांनी विशेष सहकार्य केले.

लोककला, संस्कृती आणि बालप्रतिभेचा सुंदर संगम घडवून आणणाऱ्या या उपक्रमातून अमळनेरच्या सांस्कृतिक चळवळीला नवी ऊर्जा मिळाली असून, लोककलेचा समृद्ध वारसा जपण्यासाठी आणि तो नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी हे एक प्रेरणादायी व कौतुकास्पद पाऊल ठरले आहे.

अवघ्या तासाभरात संशयित पोलिसांच्या ताब्यात;अमळनेर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी विजय बडगुजर यांच्या बोटाला गंभीर दुखापत करणाऱ्या संशयिताचा पोलिसांनी घेतला शोध; मातोश्री नगरातील घटनेनंतर नागरिकांना

 

अमळनेर : मातोश्री नगर परिसरातील चामुंडा माता मंदिराजवळ बांधकामाच्या ठिकाणी साहित्य घेऊन जाण्याच्या कथित प्रयत्नादरम्यान झालेल्या झटापटीत विजय बडगुजर यांच्या हाताच्या बोटाला चावा घेऊन गंभीर दुखापत करणाऱ्या संशयिताचा अमळनेर पोलिसांनी अवघ्या तासाभरात शोध घेऊन त्याला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या या जलद आणि तत्पर कारवाईचे परिसरातून कौतुक होत असून, नागरिकांनी पोलिसांचे अभिनंदन केले आहे.

२ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ६ वाजता चामुंडा माता मंदिराजवळ सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी एक व्यक्ती साहित्य घेऊन जात असल्याचे विजय बडगुजर व रमेश पाटील यांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्याला अडवून विचारणा केली असता त्याने आपणास मिस्त्रीने पाठविल्याचे सांगितल्याची माहिती आहे. मात्र त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याला थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

यावेळी झालेल्या झटापटीत संबंधित संशयिताने विजय बडगुजर यांच्या हाताच्या बोटाला चावा घेतल्याचा आरोप आहे. या घटनेत त्यांच्या बोटाला गंभीर दुखापत झाली असून, बोटाचा काही भाग तुटल्याने त्यांच्यावर धुळे येथे उपचार व शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती आहे.

पोलिसांची तत्परता; अवघ्या तासाभरात संशयिताचा शोध

घटनेची माहिती मिळताच अमळनेर पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने घेत तातडीने तपासाची चक्रे फिरवली. घटनास्थळाची पाहणी, उपलब्ध माहिती व परिसरातील हालचालींच्या आधारे पोलिसांनी संशयिताचा माग काढण्यास सुरुवात केली.

पोलिसांच्या प्रयत्नांना अल्पावधीतच यश आले. घटना घडल्यानंतर अवघ्या तासाभरात संशयिताचा शोध घेऊन त्याला पोलिसांच्या ताब्यात आणण्यात आल्याची माहिती आहे. पोलिसांच्या या वेगवान कारवाईमुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या कारवाईत पीएसआय शरदजी काकळीजी साहेब, हेडकॉन्स्टेबल सुनील तेली, विनोद संदानशीव यांच्यासह पोलिस पथकाने तत्परतेने काम केल्याची माहिती आहे.

नागरिकांकडून पोलिसांचे अभिनंदन

घटनेनंतर संशयित पोलिसांच्या हाती लागल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. परिसरात चोरीच्या घटनांबाबत चिंता व्यक्त होत असताना पोलिसांनी तातडीने कारवाई करून संशयिताला ताब्यात घेतल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

विशेषतः, जखमी विजय बडगुजर यांच्या गंभीर दुखापतीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विलंब न करता तपासाला गती देत संशयिताचा शोध घेणे ही बाब कौतुकास्पद असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

पुढील तपास सुरू

ताब्यात घेतलेल्या संशयिताची अधिकृत ओळख, त्याचा घटनेतील नेमका सहभाग, बांधकाम साहित्य नेण्यामागील उद्देश तसेच त्याच्याकडे धारदार कोयता व सायकल असल्याबाबतच्या माहितीची पोलिसांकडून पडताळणी केली जात आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुढील तपास सुरू आहे.

मातोश्री नगर परिसरात घडलेल्या या घटनेत अवघ्या तासाभरात संशयिताला शोधून ताब्यात घेणाऱ्या अमळनेर पोलिसांच्या तत्परतेचे नागरिकांकडून विशेष कौतुक होत आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी दाखविलेली ही तत्परता नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आश्वासक असल्याची भावना परिसरातून व्यक्त होत आहे.