आमदारांच्या मुळगावीच बससेवा विस्कळीत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळ; NSUIचे आगार व्यवस्थापकांना निवेदन
अमळनेर, दि. 5 सप्टेंबर 2026 :
अमळनेर तालुक्याचे आमदार तथा माजी मंत्री अनिल भाईदास पाटील यांचे मुळगाव असलेल्या हिंगोणे येथेच एसटी बससेवा मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाल्याने विद्यार्थी, नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्णांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी NSUI जळगाव जिल्हाध्यक्ष ॲड. कौस्तुभ पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज आगार व्यवस्थापकांची भेट घेऊन बससेवा तातडीने सुरळीत करण्याची मागणी केली.
मागील अनेक महिन्यांपासून हिंगोणे गावातील विद्यार्थ्यांना नियमित व वेळेवर एसटी बस उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी शिष्टमंडळासमोर मांडल्या. नियोजित वेळापत्रकानुसार बस उपलब्ध न होणे, काही वेळा दोन-दोन तास उशिराने बस सुटणे, तसेच अचानक फेऱ्या रद्द होणे यामुळे विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयात वेळेवर पोहोचता येत नाही. परिणामी विद्यार्थ्यांचे लेक्चर, प्रॅक्टिकल, परीक्षा, स्पर्धा परीक्षा तसेच महत्त्वाचे शैक्षणिक तास बुडत आहेत.
विशेषतः सकाळच्या वेळेत नियमित बस उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. अनेक विद्यार्थ्यांच्या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने दररोजचा अतिरिक्त प्रवासखर्च त्यांच्या पालकांवर आर्थिक भार टाकत आहे. काही विद्यार्थ्यांना बसच्या प्रतीक्षेत तासन्तास बसस्थानकावर थांबावे लागते.
याशिवाय रुग्णांना दवाखान्यात जाण्यासाठी, महिलांना दैनंदिन कामांसाठी, ज्येष्ठ नागरिकांना शासकीय कार्यालये व आरोग्यसेवेसाठी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना अमळनेर शहराशी संपर्क साधण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वेळेवर बस न मिळाल्याने अत्यावश्यक वैद्यकीय उपचारांसाठी जाणाऱ्या रुग्णांचीही गैरसोय होत आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एसटी बस ही केवळ प्रवासाची सुविधा नसून त्यांच्या शिक्षणाची जीवनवाहिनी आहे. बससेवा विस्कळीत राहिल्यास त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर आणि भवितव्यावर होतो. त्यामुळे हिंगोणे गावासाठी पुरेशा बसफेऱ्या सुरू करून त्यांचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळावे, बंद असलेल्या फेऱ्या पूर्ववत कराव्यात आणि विद्यार्थ्यांच्या शाळा-महाविद्यालयाच्या वेळेनुसार विशेष बसफेऱ्यांचे नियोजन करावे, अशी मागणी NSUIने केली.
यावेळी ॲड. कौस्तुभ पाटील यांनी आगार प्रशासनाला आठ दिवसांचा कालावधी देत, “हिंगोणे येथील बससेवेचा प्रश्न तातडीने मार्गी लावून विद्यार्थ्यांना व नागरिकांना नियमित आणि वेळेवर वाहतूक सुविधा उपलब्ध करून द्यावी. आठ दिवसांत ठोस कार्यवाही झाली नाही, तर विद्यार्थ्यांना सोबत घेऊन NSUIच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी कोणत्याही परिस्थितीत तडजोड केली जाणार नाही,” असा इशारा दिला.
यावेळी NSUI अमळनेर तालुकाध्यक्ष उमेश संदानशिव जयेश संभाजी पाटील, कुणाल कोळी, तेजस भोई, मयंक चव्हाण, रोहित कोळी, महेश कोळी,यश पाटील, महेश भोई, प्रवीण पाटील व असंख्य विद्यार्थी उपस्थित होते.


