ब्रेकिंग
DL Social Foundation तर्फे महिला व विद्यार्थ्यांसाठी मोफत संगणक प्रशिक्षण* *महिला व विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल कौशल्य विकसित होण्यासाठी संस्थेचे पाऊल*

 

*अमळनेर :* डिजिटल युगात संगणकाचे ज्ञान ही काळाची गरज बनली असून, महिला व विद्यार्थ्यांना संगणकाचे मूलभूत ज्ञान मिळावे आणि त्यांच्यात डिजिटल कौशल्य विकसित व्हावे, या उद्देशाने DL Social Foundation, Amalner यांच्या वतीने मोफत संगणक प्रशिक्षण उपक्रम सुरू करण्यात येत आहे.

Community Development & Empowerment Project अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा कालावधी एक महिना असून, सुरुवातीच्या पहिल्या बॅचमध्ये फक्त 10 प्रशिक्षणार्थींना प्रवेश दिला जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून महिला व विद्यार्थ्यांना संगणकाच्या वापरासोबतच डिजिटल जगाशी आत्मविश्वासाने जोडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. “डिजिटल ज्ञान — स्वावलंबी जीवनाची पहिली पायरी” या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

मोफत संगणक प्रशिक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या महिला व विद्यार्थ्यांनी प्रवेश मर्यादित असल्याने आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी DL Social Foundation कार्यालय, समर्थ नगर, धुळे रोड, अमळनेर येथे प्रत्यक्ष भेट देऊन नाव नोंदणी करावी, किंवा अधिक माहितीसाठी 7796112894 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Loading

लोककल्याणासाठीच्या भव्य महारुद्र पूजेला सुरूवात मंगळग्रह सेवा संस्थेचा उपक्रम; तीन दिवस भाविकांसाठी मंगलमय पर्वणी

 

अमळनेर : येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिरात राष्ट्रकल्याण, संरक्षण, समृध्दी तसेच संस्थेच्या विविध संकल्पपूर्तीनिमित्त आयोजित तीन दिवसीय भव्य महारुद्र अभिषेक पूजेला बुधवार, दि. 9 सप्टेंबर रोजी येथील प्रधान आचार्य वेदमूर्ती केशव पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चैतन्यमय, भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सकाळी साडेनऊच्या सुमारास सुरूवात झाली. मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले व त्यांच्या धर्मपत्नी सौ. आशाताई महाले यांच्या शुभ हस्ते या विशेष धार्मिक सोहळ्यातील परम पवित्र अनुष्ठान कार्य सुरू झाले. मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे प्रथमच सदर तीन दिवसीय भव्य महारुद्र अभिषेक पूजा होत आहे.

महापूजेत प्रारंभी भूतशुद्धी व मंगलाचरण करण्यात आले. त्यानंतर मंदिरातील पंचधातूंच्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात आला. पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदीश्राद्ध आदी मंडलांचे पूजन झाले. सर्व देव-देवतांना महारुद्र पूजेदरम्यान उपस्थितीसह कृपादृष्टीचे आवाहन करण्यात आले. तसेच या महापूजेंतर्गत मानव कल्याण, देशाचे संरक्षणास अनुसरून विशेष संकल्प पूजा करण्यात आली. श्री मंगळग्रह देवांचा 594 आवर्तनांनी अभिषेक करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता विशेष महाआरती झाली यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. अशातऱ्हेने प्रथम दिवसाच्या महापूजेची सांगता झाली. 

सारंग पाठक, अथर्व कुलकर्णी, शुभम वैष्णव, यश जोशी, चंद्रकांत जोशी, परशुराम शर्मा, तुषार दीक्षित, प्रसाद भंडारी, जयेंद्र वैद्य, मंदार कुलकर्णी, वैभव लोकाक्षी, अक्षय जोशी, गणेश जोशी, पवन शर्मा, विनोद पाठक, दिव्येश जोशी, शैलेश जोशी, उमेश पंचभाई, निलेश रोडे, हेमंत गोसावी, गौरव मिश्रा, हरिओम शुक्ल, मनजीत मिश्रा, सूरज मिश्रा हे पौरोहित्य करीत आहेत. त्यांना उमेश पाठक, चेतन नाईक, प्रवीण भंडारी सहकार्य करीत आहेत.

 या महारुद्र अभिषेक पूजेत श्री मंगळग्रह मंदिरातील स्वयंभू अतिजागृत मूर्तीवर 11 लघुरुद्र (1331 रुद्र आवर्तने) होतील. गुरुवारी उर्वरीत आवर्तने होतील. शुक्रवार, दि. 11 सप्टेंबर रोजी श्री मंगळग्रह देव मंदिरातील स्थापित सर्व देवतांसाठीचे हवन बलिदान व पूर्णाहुती होईल.

 

शुक्रवारी पूर्णाहुतीत सहभागी व्हा!

भगवान श्री मंगळग्रह देवांची आपल्यावर पूर्ण कृपा व्हावी, सर्वांचे रक्षण व भले व्हावे या मुख्य उद्देशाने श्री मंगळग्रह मंदिरात अलौकिक अशी महापूजा सुरू आहे. हल्ली जगामध्ये अनावृष्टी सुरू आहे. कुठे पाऊसच पडत नाही. तर कुठे अति पाऊस पडून जलप्रलय होत आहे. तर अनेक ठिकाणी भयंकर आगींमध्ये अनेकजण होरपळत आहेत. काही ठिकाणी भूकंप, ज्वालामुखी आणि उल्कापाताने अनेकांना जीव गमवावे लागत आहे. जगावर तिसऱ्या महायुद्धाचे सावट आले आहे. अतिरेकी व देशद्रोह्यांमुळे देशाचे मोठे नुकसान होत आहे. हे जे सर्व इतिभय चालले आहे त्यातून आपल्या परमपवित्र मातृभमिचे रक्षण व्हावे तसेच जगाचेही कल्याण व्हावे, यासाठी या ‌‘महारुद्र स्वाहाकारा‌’मध्ये श्री मंगळग्रह देव आणि भगवान शंकर यांची आपण आराधना करीत आहोत. मंगळग्रह सेवा संस्था नेहमी विविध स्तुत्य उपक्रम या ठिकाणी राबवत असते. त्यातीलच हा दि. 9, 10 व 11 सप्टेंबर 2026 असा तीन दिवसीय उपक्रम आहे. शुक्रवार, दि. 11 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता महारुद्र स्वाहाकाराची पूर्णाहुती आहे. पूर्णाहुतीसाठी सर्वांनी अवश्य यावे. आपण या दिवशी पूर्ण दिवसभर आलात तर उत्तमच. कारण पूर्ण दिवसभर त्या दिवशी हवन कार्यक्रम आहे. भाविकांनी या हवनामध्ये दहा मिनिटे का होईना वेळात वेळ काढून या ठिकाणी सहभागी व्हावे, असे मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे सर्व भाविकांना कळकळीचे आवाहन आहे.

– श्री. केशव प्रभाकर पुराणिक गुरूजी

(प्रधान आचार्य तथा वेदमूर्ती, अमळनेर).

अमळनेर मतदारसंघ कोरडा दुष्काळसदृश्य जाहीर करा, आमदार अनिल भाईदास पाटील यांची शासनाकडे आग्रही मागणी..!

 

अमळनेर विधानसभा मतदारसंघातील अमळनेर व पारोळा तालुक्यांमध्ये गेल्या महिनाभरापासून पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिके करपू लागली असून, शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी बँका, पतसंस्था तसेच विविध वित्तीय संस्थांकडून पीक कर्ज घेऊन शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. मात्र पावसाने पाठ फिरवल्याने शेतीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असून, कर्जाचा वाढता भार आणि उत्पादनाची अनिश्चितता यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे.

या गंभीर परिस्थितीची तातडीने शासनाने दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी आमदार अनिल भाईदास पाटील यांनी शासनातील वरिष्ठ मंत्र्यांची भेट घेऊन निवेदने सादर केली. यामध्ये मा.ना.श्री देवेंद्र फडणवीस साहेब (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य), मा.ना.श्रीमती सुनेत्राताई अजितदादा पवार, (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य), तसेच मा.ना.श्री दत्तात्रय भरणे, (कृषी मंत्री) आणि मा.ना.श्री मकरंद आबा पाटील (मदत व पुनर्वसन मंत्री) यांना निवेदन देऊन अमळनेर व पारोळा तालुक्यांतील सद्यस्थितीची माहिती देण्यात आली.

*तातडीने पंचनामे करून मदतीची मागणी-*

अमळनेर व पारोळा तालुक्यांमध्ये पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीचा तातडीने सर्वेक्षण करून पिकांचे पंचनामे करावेत, तसेच दोन्ही तालुक्यांना कोरडा दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करून शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीचा लाभ मिळवून द्यावा, अशी आग्रही मागणी आमदार अनिल भाईदास पाटील यांनी केली. शेतकऱ्यांना आर्थिक मदत, आवश्यक त्या शासकीय सवलती, पीक नुकसानभरपाई आणि इतर योजनांचा लाभ मिळावा, यासाठी शासनाने त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.

“शेतकरी अडचणीत असताना त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हीच आपली प्राथमिकता आहे,” या भावनेतून आमदार अनिल भाईदास पाटील यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शासनदरबारी पाठपुरावा सुरू केला आहे. पावसाअभावी संकटात सापडलेल्या अमळनेर व पारोळा तालुक्यातील शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळावा, तसेच शासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन संवेदनशीलतेने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

 

अमळनेर अर्बन बँकेच्या चेअरमन पदी अभिषेक पाटील, व्हॉ. चेअरमन वसुंधरा लांडगे यांची निवड

 

अमळनेर ( प्रतिनिधी) येथील दि. अमळनेर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेच्या चेअरमन पदी अभिषेक विनोद पाटील ( मोना) यांची तर व्हॉइस चेअरमन पदी वसुंधरा दशरथ लांडगे यांची सोमवारी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणुका अधिकारी व्ही एम जगताप आणि त्यांचे सहाय्यक म्हणून सुनील महाजन यांनी निवड प्रक्रिया पूर्ण केली.

             मावळते चेअरमन भरतकुमार सुरेश ललवाणी आणि लक्ष्मण पांडुरंग महाजन यांचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनी राजीनामा दिल्यामुळे नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.

               बँकेच्या सभागृहात पार पडलेल्या या निवडी प्रसंगी बँकेचे सर्व संचालक, कार्यकारी अधिकारी, कर्मचारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, व्यापारी, प्रतिष्ठित नागरिक यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

अमळनेरात एक कोटींच्या नमो गार्डनचे भूमिपूजन  नागरिकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही- माजी आमदार शिरीष चौधरी

 

अमळनेर : चांगल्या कामांना वेळ लागतो विरोधकांनी आमच्यावर टीका केल्या मात्र आम्ही संयम ठेवून पाणी पुरवठा देखील तीन दिवसाआड नियमित सुरू केला आणि पहिलेच काम प्रभाग ८ मध्ये लहान मुलांपासून , तरुण , महिला व वृद्धांसाठी तब्बल एक कोटींचे तिरुपती बालाजी नमो गार्डन पासून विकास कामांना सुरुवात झाली आहे असे प्रतिपादन माजी आमदार शिरीष चौधरी यांनी नमो गार्डन च्या भूमिपूजन प्रसंगी केले.

      प्रभाग आठ मध्ये अत्याधुनिक , योगा हॉल , सुरक्षारक्षक खोली , वृद्धांना बसण्यासाठी शेड , बाक , ओपन जिम , कार्यक्रम घेण्यासाठी स्टेज , फिरण्यासाठी पाथ वे , लाईट व्यवस्था ,मुलांसाठी खेळणे , मध्यभागी तिरुपती बालाजीचा पुतळा अशा सुविधांसह तिरुपती बालाजी नमो गार्डन होत आहे.

     माजी आमदार शिरीष चौधरी म्हणाले की , या प्रभागातील लोकांनी मोठ्या फरकाने अपूर्वा चौधरी व नगराध्यक्ष डॉ परीक्षित बाविस्कर याना निवडून दिल्याने तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. विरोधक म्हणतात गार्डन ची गरज काय पण राजकीय क्षेत्रात मैदान अपूर्ण पडू लागल्याने नेत्यांना शांत करण्यासाठी नमो गार्डन होत आहे. विरोधकांना कामाने उत्तर दिले जाईल. 

     यावेळी लोकनियुक्त डॉ परीक्षित बाविस्कर म्हणाले की तिरुपती सोन्याचा देव आहे त्या नावाचे गार्डन इथे होत आहे म्हणजे सोन्यासारखा विकास होत आहे. घरात काम करणाऱ्या महिला , वृद्ध , नागरिक आणि मुलांना चांगल्या आरोग्यासाठी नैसर्गिक वातावरण आणि खेळती हवा पाहिजे या गार्डन साठी ५ कोटींचे बक्षीस आहे तेही आपल्याला जिंकायचे आहे. यावेळी उपनगराध्यक्ष प्रशांत निकम , पी डी साळुंखे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाटील यांनी तर आभार प्रदर्शन नगरसेविका अपूर्वा चौधरी यांनी केले.

      कार्यक्रमास माजी आमदार शिरीष चौधरी , नगराध्यक्ष डॉ परीक्षित बाविस्कर , उपनगराध्यक्ष प्रशांत निकम , बांधकाम सभापती साहेबराव पवार , शिक्षण सभापती नावेद शेख , पाणी पुरवठा सभापती कैलास पाटील , आरोग्य सभापती रामकृष्ण पाटील , शिवसेना तालुका प्रमुख गुलाब पाटील , गटनेते पंकज चौधरी , अपक्ष गटनेते महेश देशमुख , अनिल महाजन , श्रीराम चौधरी, मोहन सातपुते, प्रा भरतसिंग परदेशी, दिपक चौगुले , बाळासाहेब संदांनशीव , सुरज परदेशी, मुन्ना शर्मा, पंकज भोई, मंगलाताई देसले, शहर प्रमुख भरत पवार, विलास कंखरे, युवासेनेचे राहुल कंजर हजर होते.

मुलाबाळांचा संसार सांभाळत सुवर्णा धनगर यांची उल्लेखनीय यशोगाथा A.N.M. Promotional (L.H.V.) परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवत मिळविला ‘डिस्टिंक्शन’चा मान

 

अमळनेर: घर-संसार, मुलाबाळांची जबाबदारी आणि कौटुंबिक कर्तव्ये समर्थपणे सांभाळत शिक्षणाची जिद्द कायम ठेवणाऱ्या सौ. सुवर्णा कौतिक धनगर यांनी आपल्या मेहनतीचे आणि चिकाटीचे शानदार उदाहरण निर्माण केले आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ नर्सिंग अँड पॅरामेडिकल एज्युकेशन, मुंबई अंतर्गत A.N.M. Promotional (L.H.V.) 2026-27 परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक (First Number) मिळवत Distinction प्राप्त केले आहे.

कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून अभ्यासासाठी वेळ काढणे हे निश्चितच आव्हानात्मक होते. मात्र, “परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यश मिळवता येते,” हे त्यांनी आपल्या यशातून सिद्ध केले आहे.

संसाराची जबाबदारी, मुलाबाळांचे संगोपन आणि अभ्यास यांचा समतोल साधत त्यांनी मिळविलेले हे यश विशेष कौतुकास्पद आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार, सहकारी तसेच विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सुवर्णा धनगर यांचे हे यश अनेक महिलांसाठी प्रेरणादायी असून, “जबाबदाऱ्या असल्या तरी स्वप्नांना मर्यादा नसतात” हा संदेश त्यांच्या यशातून मिळतो.

मनःपूर्वक अभिनंदन! 💐🏆

आपल्या या ‘Big Achievement’चा आम्हाला मनापासून अभिमान आहे.

*लोंढवे विद्यालयात साक्षरता दिनानिमित्त चित्रकला स्पर्धा संपन्न* 

 

लोंढवे, ता. अमळनेर : स्व. आबासो एस. एस. पाटील माध्यमिक विद्यालय, लोंढवे येथे साक्षरता दिनानिमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कला शिक्षक डि. आर. वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध विषयांवर चित्रे साकारली.

या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांना वाव देत साक्षरतेचे महत्त्व, शिक्षणाचा प्रसार आणि सामाजिक जागृती यांसारख्या विषयांवर आकर्षक चित्रे काढली. विद्यार्थ्यांनी रंगसंगती, रेखाटन व कल्पकतेचा सुंदर आविष्कार सादर केला.

स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या कलाकृतींचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना मिळते तसेच सामाजिक विषयांबाबत जागरूकता निर्माण होते.

या उपक्रमासाठी विद्यालयातील शिक्षक, शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.

मुख्याध्यापक बाळासाहेब पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

अमळनेर: आम आदमी पार्टीची महत्वपूर्ण बैठक; संघटन विस्तारावर भर

 

अमळनेर: आज, दिनांक ०६/०९/२०२६ रोजी अमळनेर येथे आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष श्री. महेंद्र नाना साळुंखे यांच्या निवासस्थानी पक्षाची एक विशेष मीटिंग पार पडली. अमळनेर शहरात आम आदमी पार्टीची वाढती लोकप्रियता आणि सुरू असलेली विकासकामे यांच्या जोरावर पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

प्रमुखांची उपस्थिती आणि मार्गदर्शन:

या बैठकीत जळगाव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष ॲड. राहुल जाधव आणि महाराष्ट्र राज्याचे संघटन सचिव नविंदर अहलूवालिया यांनी विशेष उपस्थिती दर्शवून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी आम आदमी पार्टीची ध्येय-धोरणे, संघटन वाढीसाठी करावयाचे काम, आणि स्थानिक प्रश्नांना वाचा फोडण्याच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. पक्षाचे कार्य तळमळीने लोकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी केले.

उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्ते:

या बैठकीसाठी पक्षाचे प्रमुख मार्गदर्शक, पदाधिकारी आणि सक्रिय कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. यामध्ये प्रामुख्याने खालील व्यक्ती उपस्थित होत्या:

 * ॲड. राहुल जाधव (जिल्हाध्यक्ष, आम आदमी पार्टी)

 * नविंदर अहलूवालिया (राज्य संघटन सचिव)

 * श्री. महेंद्र नाना साळुंखे (तालुकाध्यक्ष)

 * रामकृष्ण चिंतामण पाटील (उपाध्यक्ष)

 * मोहन मनोरे (मुख्य सल्लागार)

 * राजेंद्र बाळकृष्ण जाधव (तालुका सचिव)

 * सुधाकर सजन गजरे (तालुका सह सचिव)

 * धर्मेश भगवान निकुंभ (सोशल मीडिया अध्यक्ष)

 * नामदेव महाराज सीनियर

 * रियाज बागवान

 * अभिमन्यू नाना पाटील

 * विजय भालेराव

 * विजय संदानशिव

 * गोटू पाटील सर

अमळनेर शहरामध्ये आम आदमी पार्टीच्या विविध विकासकामांचे आणि जनहितार्थ उपक्रमांचे कौतुक करण्यात आले. कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह आणि जोश निर्माण करण्यासाठी ही बैठक अत्यंत महत्वपूर्ण ठरली.

भविष्यातील वाटचाल:

पक्षाच्या संघटन विस्तारासाठी गावोगावी शाखा स्थापन करणे, तरुणांना पक्षाशी जोडणे आणि लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणे, असे उद्दिष्ट यावेळी कार्यकर्त्यांसमोर ठेवण्यात आले. आम आदमी पार्टी येणाऱ्या काळात अमळनेर आणि परिसरात आपली पकड अधिक मजबूत करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

अमळनेरमधील या महत्त्वपूर्ण घडामोडीची सविस्तर माहिती घेण्यासाठी तुम्ही ‘आम आदमी पार्टी अमळनेर’ च्या सोशल मीडिया पेजला भेट देऊ शकता.

अस्थी विसर्जनाऐवजी शेतात वृक्षारोपण; प्रमिलाताईंच्या स्मृतींना पर्यावरण संवर्धनाची अनोखी आदरांजली

 

अमळनेर : श्री भद्रा प्रतीक उद्योग समूहाच्या प्रवर्तक संचालिका सौ. प्रमिलाताई सुरेश साळी यांचे ३ सप्टेंबर रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या स्मृतींना अनोखी आणि पर्यावरणपूरक आदरांजली वाहत पारंपरिक अस्थी विसर्जनाला फाटा देत त्यांच्या अस्थींचे विसर्जन न करता शेतजमिनीत वृक्षलागवड करून त्या मातीत पेरण्यात आल्या. या अनोख्या उपक्रमातून ‘मृत्यूनंतरही निसर्गाशी नाते कायम’ असा प्रेरणादायी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

प्रमिलाताईंच्या अस्थींचे नदी अथवा जलाशयात विसर्जन करण्याऐवजी शेतात वृक्षारोपण करून त्या वृक्षाच्या मातीत अस्थी पेरण्याचा संकल्प त्यांच्या परिवाराने केला. या माध्यमातून त्यांच्या स्मृती कायमस्वरूपी जपण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा विधायक विचार समाजासमोर ठेवण्यात आला.

हा स्तुत्य उपक्रम त्यांचे बंधू नगरसेवक प्रताप साळी, अर्बन बँकेचे संचालक दीपक साळी, संदीप साळी तसेच साळी परिवाराच्या संकल्पनेतून साकारण्यात आला. कुटुंबीयांनी दुःखाच्या प्रसंगीही सामाजिक आणि पर्यावरणीय बांधिलकी जपत घेतलेला हा निर्णय विशेष कौतुकास्पद ठरत आहे.

एका व्यक्तीच्या स्मृती वृक्षाच्या रूपाने जिवंत ठेवण्याची ही संकल्पना भावनिकतेसोबतच पर्यावरण संवर्धनाचा आदर्श संदेश देणारी आहे. भविष्यात हा वृक्ष वाढत असताना त्याच्या सावलीत, हिरवाईत आणि प्राणवायूत प्रमिलाताईंच्या स्मृती जिवंत राहतील, अशी भावना परिवाराकडून व्यक्त करण्यात आली.

अस्थी विसर्जनाच्या पारंपरिक प्रथेला पर्यावरण संवर्धनाची सकारात्मक दिशा देणाऱ्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत असून, ‘अंत्यसंस्कारानंतरही निसर्गासाठी काहीतरी देऊया’ हा विचार समाजात रुजविण्यास या उपक्रमाची प्रेरणा मिळणार आहे.

डि. आर. कन्या शाळेत शिक्षक दिन उत्साहात; विद्यार्थिनींनी साकारल्या शिक्षकांच्या भूमिका स्वयंशासन दिनातून विद्यार्थिनींना अध्यापनाचा प्रत्यक्ष अनुभव; सहभागी विद्यार्थिनींचा बक्षिसांनी गौरव

 

 

अमळनेर | प्रतिनिधी : खा.शि.मं संचलित श्रीमती डि. आर. कन्या शाळेत भारताचे पहिले उपराष्ट्रपती व थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त ५ सप्टेंबर शिक्षक दिन सकाळ व दुपार विभागात मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या तसेच विद्यार्थी प्रतिनिधींच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी मॅडम व उपमुख्याध्यापक श्री. एस. आर. शिंगाणे सर होते. यावेळी मंचावर पर्यवेक्षक श्री. एस. पी. वाघ, शिक्षक प्रतिनिधी सौ. पी. पी. जोशी, ज्येष्ठ शिक्षक श्री. एस. एस. माळी, ज्येष्ठ क्रीडा शिक्षिका श्रीमती आर. एस. सोनवणे, विद्यार्थी संघाच्या श्रीमती प्रतिभा साबे, श्रीमती एस. एस. देवरे, श्री शाम पवार यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सकाळ विभागात आरोहि गोसावी, तर दुपार विभागात निकिता पाटील यांनी केले.

विद्यार्थिनींनी घेतला शिक्षक होण्याचा प्रत्यक्ष अनुभव

शिक्षक दिनाचे औचित्य साधून विद्यालयात ‘स्वयंशासन दिन’ उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेत शिक्षक व शिक्षिकांच्या भूमिका साकारत दिवसभर प्रत्यक्ष अध्यापनाचे कार्य केले. दुपार विभागाच्या मुख्याध्यापिका म्हणून यशस्वी शिंगारे, तर सकाळ विभागाच्या मुख्याध्यापिका म्हणून जान्हवी साळुंखे यांनी जबाबदारी पार पाडली.

तसेच रोशनी पाटील, अश्मीरा शेख, अर्पिति अहिरराव, प्रांजल पवार, खुशी पाटील, माहेश्वरी न्याहाळले, प्रांजल पाटील या विद्यार्थीनींनीही शिक्षक-शिक्षिकांच्या भूमिका साकारत विद्यार्थ्यांना अध्यापन केले. त्यामुळे विद्यार्थिनींना शिक्षकाची जबाबदारी, अध्यापनातील बारकावे, विद्यार्थ्यांशी संवाद आणि वर्ग व्यवस्थापन यांचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला.

डॉ. राधाकृष्णन यांच्या कार्याचा गौरव

अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी मॅडम यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे योगदान, शिक्षक म्हणून त्यांनी बजावलेली भूमिका तसेच देशाच्या जडणघडणीत शिक्षणाचे महत्त्व याविषयी त्यांनी आपल्या अलंकारिक व प्रेरणादायी शब्दांत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी शिक्षकांच्या भूमिका साकारलेल्या विद्यार्थिनींनी दिवसभरातील अध्यापनाचा अनुभव आपल्या मनोगतातून व्यक्त केला. या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेणाऱ्या विद्यार्थिनींना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

शिक्षक दिनाचा हा उपक्रम विद्यार्थिनींसाठी केवळ मनोरंजनाचा नव्हे, तर शिक्षकाच्या जबाबदारीची जाणीव करून देणारा आणि नेतृत्वगुण विकसित करणारा प्रेरणादायी अनुभव ठरला.

संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.