ब्रेकिंग
बसस्थानकात सायबर सुरक्षिततेबाबत जनजागृती

 

जळगाव | प्रतिनिधी

डिजिटल व्यवहारांचा वाढता वापर आणि त्यासोबत वाढणाऱ्या सायबर फसवणुकीच्या घटनांबाबत नागरिकांना सतर्क करण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (KBCNMU), जळगाव आणि Quick Heal Foundation यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव बसस्थानकात सायबर सिक्युरिटी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमात बस वाहकांना विविध सायबर फ्रॉडबाबत माहिती देण्यात आली. फसवणुकीपासून वाचण्यासाठी आवश्यक खबरदारी, संशयास्पद कॉल्स आणि लिंक ओळखण्याचे मार्ग तसेच सायबर गुन्ह्याची घटना घडल्यास कोणती तातडीची पावले उचलावीत, याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान बस वाहकांना डिजिटल व्यवहार सुरक्षितपणे करण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. तसेच OTP, PIN, पासवर्ड आणि बँक खात्याशी संबंधित गोपनीय माहिती कोणासोबतही शेअर करू नये, याबाबत जागरूक करण्यात आले.

या उपक्रमात स्नेहल पाटील आणि वैष्णवी पाटील यांनी सक्रिय सहभाग घेत जनजागृती केली. बस वाहकांनीही या उपक्रमाला चांगला प्रतिसाद देत सायबर सुरक्षेबाबत माहिती जाणून घेतली. या कार्यक्रमासाठी Dr. R. B. Amale Sir यांचे मार्गदर्शन लाभले.

मयत सासऱ्यांच्या वाढदिवशी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी ५० हजारांची मदत अर्चना सूर्यवंशी यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी 

अमळनेर : सामाजिक बांधिलकी जपत आपणही समाजाचे काही देणे लागतो, या भावनेतून पाळधी येथील सूर्या फाउंडेशनच्या अध्यक्षा तसेच पाळधी नोबल इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका डॉ. सौ. अर्चना प्रशांत सूर्यवंशी यांनी आपल्या दिवंगत सासऱ्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ समाजहिताचा आदर्श निर्माण केला आहे.

त्यांचे सासरे कै. भगवानराव सूर्यवंशी यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या दहाव्या व इतर कार्यक्रमांसाठी होणारा खर्च टाळून तोच निधी सामाजिक कार्यासाठी देण्याचा निर्णय डॉ. अर्चना सूर्यवंशी यांनी घेतला. कै. भगवानराव सूर्यवंशी यांच्या ८६व्या वाढदिवसानिमित्त आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शैक्षणिक मदतीसाठी ५० हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

यावेळी डॉ. अर्चना सूर्यवंशी यांचे पती प्रशांत सूर्यवंशी, भरारी फाउंडेशनचे दीपकदादा परदेशी, रत्नाकर पाटील, पर्यावरणप्रेमी वसंत पाटील यांच्यासह इतर सहकारी उपस्थित होते.

या उपक्रमाचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी विशेष कौतुक केले. वाढदिवस अथवा कौटुंबिक कार्यक्रमांवरील खर्चाला सामाजिक कार्याची जोड देत गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात पुढे करणे ही निश्चितच प्रेरणादायी बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी डॉ. अर्चना सूर्यवंशी यांनी “समाजहितासाठी आम्ही सदैव सोबत राहू”, असे आश्वासन दिले. त्यांच्या या उपक्रमातून दिवंगत व्यक्तीच्या स्मृती जपत समाजातील गरजू विद्यार्थ्यांच्या भवितव्याला हातभार लावण्याचा संवेदनशील संदेश देण्यात आला आहे.

स्मिताताई वाघ यांना सलग दुसऱ्यांदा ‘संसद रत्न’ पुरस्कार प्रभावी संसदीय कामगिरीची दखल; दिल्लीतील सोहळ्यात सन्मान

 

अमळनेर: जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिताताई वाघ यांना त्यांच्या प्रभावी संसदीय कामगिरीची दखल घेत सलग दुसऱ्यांदा ‘संसद रत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. दिल्ली येथे झालेल्या सोहळ्यात माजी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती.

खासदार स्मिताताई वाघ यांनी लोकसभेत जनहिताचे प्रश्न सातत्याने मांडत मतदारसंघाच्या विकासासाठी सक्रिय भूमिका बजावली आहे. संसदेत उपस्थित केलेले प्रश्न, विकासकामांसाठी केलेला पाठपुरावा तसेच जनहितासाठी घेतलेल्या विविध मुद्द्यांची दखल या पुरस्काराच्या माध्यमातून घेण्यात आली.

मार्गदर्शन, विश्वासाबद्दल कृतज्ञता

पुरस्कार स्वीकारल्यानंतर खासदार वाघ यांनी आपल्या यशामागे मिळालेल्या मार्गदर्शनाबद्दल आणि विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेते, सहकारी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार मानले.

सलग दुसऱ्यांदा मिळालेला हा पुरस्कार जनतेने दिलेल्या जबाबदारीची जाणीव अधिक दृढ करणारा असून, भविष्यातही मतदारसंघातील प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी प्रेरणा मिळाल्याचे खासदार स्मिताताई वाघ यांनी सांगितले.

असंख्य भाविकांनी घेतली परम पवित्र भव्य महारुद्र पूजा पूर्णाहुतीची अनुभूती मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे प्रथमच आयोजन : तीन दिवसीय सोहळ्याची ‘मंगलमय’ वातावरणाने सांगता आमदार अनिलदादा पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांचीही लाभली उपस्थिती

 

अमळनेर : येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिरात बुधवार, दि. ९ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजेपासून सुरू झालेल्या श्री मंगळग्रह देवांच्या परम पवित्र तीन दिवसीय भव्य महारुद्र पूजेची आज शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास भक्ती, चैतन्य आणि मंगलमय वातावरणात पूर्णाहुतीने सांगता झाली.

यावेळी आमदार अनिलदादा पाटील व त्यांच्या धर्मपत्नी सौ. जयश्रीताई पाटील, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम व सहाय्यक निरीक्षक शरद काकळीज यांच्यासह आणि समाजातील विविध पक्ष, संस्था, संघटना, समाजांचे अनेक पदाधिकारी, सदस्य, विविध महिला मंडळांच्या पदाधिकारी, सदस्या यांच्यासह असंख्य भाविक उपस्थित होते. प्रधान आचार्य तथा वेदमूर्ती श्री. केशव पुराणिक गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रकल्याण, संरक्षण, समृद्धी तसेच संस्थेच्या विविध संकल्पपूर्तीनिमित्त हा भव्य महारुद्र अभिषेक पूजा सोहळा आयोजित करण्यात आला.

मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले व त्यांच्या धर्मपत्नी सौ. आशाताई महाले या विशेष धार्मिक सोहळ्याचे यजमान होते. त्यांच्या शुभहस्ते या तीन दिवसीय परम पवित्र भव्य महारुद्र अभिषेक पूजेचे अनुष्ठान कार्य झाले. आज शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर रोजी या भव्य महारुद्र अभिषेक पूजेच्या पूर्णाहुतीपूर्वी सकाळी साडेनऊच्या सुमारास सर्व स्थापित देवतांची पूजा झाली. ‘अष्टोत्तरशत लिंगतो भद्र मंडलावर’ भगवान महादेवांची व श्री मंगळग्रह देव, भूमिमाता, पंचमुखी हनुमानजी यांनाही आवाहन करत त्यांची स्थापना करण्यात आली. त्यानंतर अरणीमंथन करून अग्नी प्रज्वलित करण्यात आला. नवग्रह रुद्र स्थापन करून त्यांचे हवन झाले. प्रधान देवता श्री मंगळग्रह देव व भगवान महादेव वांच्याप्रीत्यर्थ रुद्राच्या १२१ आवर्तनांनी हवन (अंदाजे २००० आहुत्या) यज्ञात टाकण्यात आल्या. भगवान शंकरांच्या जल्लोषपूर्ण तांडवस्तोत्राने पूर्णाहुतीसाठीची वातावरणनिर्मिती झाली. त्यानंतर विशेष हवन, बलिदान व पूर्णाहुती झाली. पूर्णाहुतीनंतर महाआरती, मंत्रपुष्पांजली झाली. त्यानंतर पुरोहितांनी फडकत्याचालीवर शिवशंकरांचे संगीताच्या साथीने भक्तीगित म्हटले. त्यावर डॉ. डिगंबर महाले व त्यांच्या धर्मपत्नी सी. आशाताई महाले, आमदार अनिलदादा पाटील व त्यांच्या धर्मपत्नी सौ. जयश्रीताई पाटील यांच्यासह उपस्थित भाविकांनी नृत्याचा आनंद घेतला. भक्तीमय, चैतन्यमय आणि मंगलमय वातावरणात अतिशय जल्लोषपूर्ण या धार्मिक सोहळ्याची सांगता झाली. रात्री उशिरापर्यंत भाविकांनी दर्शन व प्रसादाचा लाभ घेतला. सदर तीन दिवसीय परम पवित्र महारुद्र अभिषेक पूजेसाठी वेदमूर्ती व्यंकटेश कळवे गुरुजी, सारंग पाठक, शुभम वैष्णव, प्रसाद भंडारी, परशुराम शर्मा, पवन शर्मा, यश जोशी, चंद्रकांत जोशी, तुषार दीक्षित, जयंद्र वैद्य, मंदार कुलकर्णी, अक्षय जोशी, वैभव लोकाक्षी, गणेश जोशी, विनोद पाठक, दिव्येश जोशी, शैलेश जोशी, उमेश पंचभाई, निलेश रोडे, हेमंत गोसावी यांच्यासह अयोध्या व प्रयागराज येथून खास निमंत्रित गौरव मिश्रा, सूरज मिश्रा, मनजीत मिश्रा व हरिओम शुक्ल यांनी पौरोहित्य केले. त्यांना उमेश पाठक, प्रवीण भंडारी व चेतन नाईक यांच्यासह मंदिरातील सेवेकऱ्यांनी सहकार्य केले. मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, डी. ए. सोनवणे यांच्यासह मंगल सेवेकरी प्रकाश मेखा, व्ही. व्ही. कुलकर्णी, उमाकांत हिरे, बाळा पचार, पुषंद ढाके आदींनी परिश्रम घेतले

आमदार अनिलदादांकडून टाळ वादन सेवा

श्री मंगळग्रह मंदिरात आयोजित तीन दिवसीय परम पवित्र महारुद्र अभिषेक पूजेच्या पूर्णाहुतीपूर्वी दुपारी आमदार अनिलदादा पाटील ‘अष्टोत्तरशत लिंगतो भद्र मंडल स्थानी काही वेळ बसले. यावेळी वाद्यवृंदाच्या साथीत म्हटल्या गेलेल्या श्री मंगळग्रह देव आणि भगवान शंकर यांच्या स्तुतीपर भजनांवर टाळ वादन करीत मंत्रमुग्ध होऊन साथसंगत केली. याप्रसंगी उपस्थित असंख्य भाविकांनीही या स्तुतीपर भजनांचा आत्मानंद घेतला.

जागरूक नागरिक, सुरक्षित डिजिटल भारत! जळगावात सायबर अवेअरनेस इम्पॅक्ट

 

जळगाव : प्रतिनिधी

सायबर गुन्ह्यांविरोधातील लढाईत जागरूक नागरिक हीच सर्वात मोठी ताकद असून, डिजिटल युगात प्रत्येकाने सतर्क आणि सजग राहणे गरजेचे आहे, असा महत्त्वपूर्ण संदेश ब्राह्मण सभागृह येथे आयोजित सायबर सिक्युरिटी अवेअरनेस इम्पॅक्ट कार्यक्रमातून देण्यात आला.

या कार्यक्रमात सायबर वॉरियर विद्या विशाल सोनवणे आणि साक्षी तानाजी पाटील यांनी उपस्थित नागरिकांना सायबर सिक्युरिटी, ऑनलाइन फ्रॉड आणि डिजिटल सुरक्षिततेबाबत सविस्तर व प्रभावी मार्गदर्शन केले. वाढत्या ऑनलाइन फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत विविध उदाहरणांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.

सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांना फसविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध पद्धतींची माहिती देत अनोळखी व्यक्ती, लिंक, कॉल किंवा संदेशांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच वैयक्तिक माहिती, बँकिंग तपशील आणि OTP सुरक्षित ठेवण्याचे महत्त्व उपस्थितांना स्पष्ट करण्यात आले.

सायबर फसवणूक टाळण्यासाठी केवळ तंत्रज्ञानाचा वापर पुरेसा नसून नागरिकांची जागरूकता आणि सतर्कता हीच डिजिटल सुरक्षेची पहिली पायरी असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

या उपक्रमासाठी कार्यालय सचिव गणेश भगवान माळी यांनी मोलाचे सहकार्य केले. संपूर्ण कार्यक्रम डॉ. आर. बी. आमले यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला.

यावेळी नागरिकांना क्विक हील फाउंडेशनच्या अँटी फ्रॉड ॲपविषयी माहिती देण्यात आली. सायबर फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांच्या मोबाईलमध्ये हे ॲप डाउनलोड करून घेण्यात आले, तसेच त्याच्या उपयोगाबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

डिजिटल व्यवहारांचा वाढता विस्तार लक्षात घेता सायबर सुरक्षेचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज आहे. नागरिकांमध्ये सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता निर्माण करून सुरक्षित डिजिटल वातावरण निर्माण करण्यासाठी अशा जनजागृतीपर उपक्रमांची मालिका पुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

जागरूक नागरिक — सुरक्षित समाज — सुरक्षित डिजिटल भारत! हा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला.

सायबर सुरक्षेचा संकल्प; सारा मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये विशेष जनजागृती

जळगाव | प्रतिनिधी

डिजिटल युगात वाढत्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे काळाची गरज बनली आहे. याच उद्देशाने नागरिकांना डिजिटलदृष्ट्या सक्षम, सतर्क आणि सुरक्षित बनविण्याच्या संकल्पातून ८ सप्टेंबर रोजी जळगावातील सारा मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये सायबर सिक्युरिटी अवेअरनेस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या विशेष जनजागृती उपक्रमादरम्यान हॉस्पिटलमधील स्टाफ तसेच पेशंटना सायबर फ्रॉडच्या विविध प्रकारांची सविस्तर माहिती देण्यात आली. सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांना कोणकोणत्या पद्धतीने जाळ्यात ओढले जाते, ऑनलाइन व्यवहार करताना कोणती खबरदारी घ्यावी, तसेच मोबाईल, बँकिंग आणि वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

फसवणूक झाल्यानंतर घाबरून न जाता तातडीने योग्य मदत घेणे आणि संबंधित यंत्रणेकडे तक्रार नोंदविणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले. डिजिटल व्यवहारांमध्ये सतर्कता, अनोळखी लिंकपासून सावधगिरी आणि वैयक्तिक माहिती कोणाशीही शेअर न करण्याबाबत विशेष सूचना देण्यात आल्या.

यावेळी क्विक हील फाउंडेशनच्या अँटी-फ्रॉड ॲपचे अॅक्टिवेशन करून त्याचा उपयोग, कार्यपद्धती आणि सायबर फसवणुकीपासून बचावासाठी त्याचे महत्त्व याबाबतही उपस्थितांना माहिती देण्यात आली.

डॉ. पटेल सर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या जनजागृती उपक्रमात सायबर वॉरियर विद्या सोनवणे आणि साक्षी तानाजी पाटील यांनी प्रभावी भूमिका बजावत उपस्थितांना सायबर सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.

या उपक्रमासाठी डॉ. आर. बी. आमले सरांचे मार्गदर्शन लाभले. डिजिटल व्यवहारांचा वाढता वापर लक्षात घेता अशा प्रकारचे सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम नागरिकांना अधिक सजग आणि सुरक्षित बनविण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

टाकरखेडा गावात सायबर सुरक्षिततेबाबत जनजागृती

 

टाकरखेडा | तालुका एरंडोल : (प्रतिनिधी)

डिजिटल व्यवहारांचा वाढता वापर आणि त्यासोबत वाढणाऱ्या सायबर फसवणुकीच्या घटनांबाबत नागरिकांना सतर्क करण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (KBCNMU), जळगाव आणि Quick Heal Foundation यांच्या संयुक्त विद्यमाने ताकरखेडा गावात आज सायबर सिक्युरिटी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आली.

 

या कार्यक्रमात गावातील नागरिकांना विविध प्रकारच्या सायबर फसवणुकीबाबत माहिती देण्यात आली. संशयास्पद फोन कॉल्स, मेसेज, लिंक तसेच ऑनलाइन व्यवहार करताना घ्यावयाची खबरदारी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सायबर फसवणूक झाल्यास तातडीने कोणती पावले उचलावीत, याची माहितीही देण्यात आली.

 

कार्यक्रमादरम्यान नागरिकांना डिजिटल व्यवहार सुरक्षितपणे करण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले.

या जनजागृती उपक्रमात स्नेहल पाटील, वैष्णवी पाटील, जय ठाकूर आणि राहुल चोपडे यांनी सक्रिय सहभाग घेत नागरिकांना सायबर सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी डॉ. आर. बी. आमले सर यांचे मार्गदर्शन लाभले. गावातील नागरिकांनीही कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सायबर सुरक्षेबाबत माहिती जाणून घेतली.

अमळनेर तालुका व शहर युवासेना कार्यकारणी जाहीर  मा.आ.श्री.शिरीषदादा चौधरी यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्त पत्र वाटप

 

 

अमळनेर – आज शिवसेनेची युवा आघाडी म्हणजेच युवासेनेची अमळनेर तालुका व शहर जंबो कार्यकारणी शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे साहेब, संसदरत्न खासदार डॉ श्रीकांत शिंदे साहेब यांच्या आदेशाने पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, माजी आमदार श्री.शिरीषदादा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली, युवासेना प्रमुख श्री.पूर्वेश सरनाईक, उत्तर महाराष्ट्र सचिव (युवासेना) श्री. आविष्कार भुसे, जळगाव लोकसभा संपर्क प्रमुख (युवासेना) श्री. निखिल चौधरी यांच्या सुचनेनुसार जिल्हाप्रमुख शिवसेना श्री.वासुदेव पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख रोहित कोगटा यांच्या संमतीने व शिवसेना तालुका प्रमुख गुलाब काशिनाथ पाटील, युवासेना तालुका प्रमुख राहुल कंजर, उपजिल्हाप्रमुख प्रविण पाटील यांच्या नेतृत्वात जाहीर करण्यात आली.

पुढीलप्रमाणे अमळनेर शहर व तालुका युवासेना जंबो कार्यकारणी   

विधानसभा क्षेत्र प्रमुख(तालुका) निखिल शेखर महाले- पाटील (अमळगाव), विधानसभा क्षेत्र प्रमुख (शहर) पंकज शेटे,

उपतालुका प्रमुख पदी मनोज सुरेश पाटील (टाकरखेडा), जयेश रविंद्र चव्हाण (जवखेडा), अधिकार वाल्मिक पाटील (द.सबगव्हाण), मच्छिंद्र केळकर जाधव (वसंतनगर), राहुल साहेबराव पाटील (गळवाडे), प्रविण राजेंद्र चौधरी (कळमसरे), भुषण गोपीचंद कोळी (हिंगोणे प्र ज), गटप्रमुख पदी विपुल शिवाजी पाटील (दहिवद), रणजित राजपुत (खेडी ढोक), सागर चंद्रकांत चौधरी (मांडळ), नरेंद्र चौधरी (अमळगाव), नितीन अनिल पाटील (वाघोदे), भिमराज शिवाजी निकम (जिराळी), प्रफुल्ल अशोक पाटील (मारवड), गण प्रमुख पदी भुषण पाटील (म्हसले), प्रकाश चिंधा पाटील (एकलहरे), संजय (खली) बळीराम भील (सावखेडा), मनोहर भटू चौधरी (बहादरपूर), समाधान भिकन पारधी (पिंगळवाडे), सचिन विलास पाटील (पाडळसरे), युवासेना अल्पसंख्यांक तालुका प्रमुख रिझवान खान वहाब खान (सारबेटे बु.), शहर प्रमुख शेख अल्ताफ राजा फारुख, तीर्थक्षेत्र तालुका प्रमुख मुकेश चौधरी (अमळगाव), तिर्थक्षेत्र शहर प्रमुख मनिष हरीचंद्र चौधरी, कॉलेज कक्ष सचिव गौरव रविंद्र पाटील, उपशहरप्रमुख पदी सनी चव्हाण, तुषार महेंद्र सोनार, अमन जाकीर खाटीक, शहर संघटक पदी पंकज अरुण चौधरी, अजय कुंदन पवार, उपशहर संघटक यश मोहन साळुंखे, मोहित नितीन पाटील यांना जबाबदारी देण्यात आली.

त्यांना माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करतांना शिरीषदादा चौधरी यांनी युवासेनेच्या माध्यमातुन नवमतदार व युवकांना शिवसेनेसोबत जोडण्याचे व पक्षाच्या माध्यमातुन युवकांच्या, नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे व त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे आवाहन केले. याप्रसंगी लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परिक्षीत बाविस्कर, तालुका प्रमुख शिवसेना गुलाब काशिनाथ पाटील, शहरप्रमुख भरत पवार, विलास कंखरे व शिवसेनेचे सर्व सन्मा.नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

महापुरात सर्वस्व गमावलेल्या फोटोग्राफर बांधवाला मिळाली आपुलकीची साथ;  ‘एआय पी एच एच ऑल इंडिया फोटोग्राफर हेल्पिंग हँड’ने उचलला मदतीचा हात

 

अमळनेर, ३१ जुलै रोजी शहराला आलेल्या महापुराचा मोठा फटका विविध व्यावसायिकांना बसला. गळवाडे रोडवरील मुंदडा रेसिडेन्सीच्या शॉपिंग कॉम्प्लेक्समधील फोटोग्राफर प्रेम पाटील यांच्या स्टुडिओमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. नुकसानीचे फोटो व व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर प्रसारित केले. ते पाहून फोटोग्राफर बांधवांनी मदतीसाठी पुढाकार घेतला.

‘ऑल इंडिया फोटोग्राफर हेल्पिंग हँड फाऊंडेशन’चे महाराष्ट्र सचिव पवन बन्सल यांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रेम पाटील यांच्याशी संपर्क साधून नुकसानीची माहिती घेतली. प्रेम पाटील हे संघटनेचे सदस्य नसतानाही केवळ फोटोग्राफर बांधव असल्याच्या भावनेतून **‘एआय पी एच एच ऑल इंडिया फोटोग्राफर हेल्पिंग हँड’**ने मदतीचा हात पुढे केला. संस्थापक व अध्यक्ष धरम सरोज, उपाध्यक्ष अशोक कोटियन, महाराष्ट्र खजिनदार नितीन पाटील, महाराष्ट्र सचिव पवन बन्सल आणि दिलीप सोनार यांनी दिनांक ९ सप्टेंबर रोजी आपल्या सहकाऱ्यांसह अमळनेर येथे स्वतः येऊन भेट घेत प्रेम पाटील यांना ३० हजार रुपयांचा मदतीचा धनादेश दिला.

या वेळी **‘ऑल इंडिया फोटोग्राफर हेल्पिंग हँड फाऊंडेशन’**चे संस्थापक व अध्यक्ष धरम सरोज यांनी फोटोग्राफर बांधवांना मार्गदर्शन केले. स्टुडिओमध्ये महत्त्वाची उपकरणे तसेच ग्राहकांचा डेटा असतो, त्यामुळे नैसर्गिक आपत्तीच्या काळात उपकरणे व डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. फोटोग्राफी व्यवसायात स्पर्धेपेक्षा एकमेकांना सहकार्याची भावना अधिक महत्त्वाची आहे. सहकाऱ्याला प्रतिस्पर्धी न मानता मित्र समजून त्याच्या अडचणीच्या काळात मदतीला धावून गेल्यासच व्यवसायाची प्रगती होईल. ‘संकटात मदत हीच खरी एकजूट’ असल्याचेही त्यांनी सांगितले.

अमळनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र पाटील यांनी असोसिएशनच्या माध्यमातून फोटोग्राफर बांधवांसाठी आतापर्यंत करण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. संघटनेच्या माध्यमातून फोटोग्राफर बांधवांच्या अडचणी सोडविण्यासाठी तसेच गरजेच्या वेळी परस्पर सहकार्य करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

या वेळी संस्थापक अध्यक्ष भगवान पाटील, खजिनदार मनोज चित्ते, अनंत पाटील, नितीन भावसार, गौरव शुक्ल, वरुण पाटील, प्रणव महाजन, राहुल भोई, विपुल पाटील, कुणाल पाटील यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य आणि तालुक्यातील मोठ्या संख्येने फोटोग्राफर बांधव उपस्थित होते.

महापुरात नुकसान झालेल्या सहकाऱ्याच्या मदतीला धावून येत फोटोग्राफर बांधवांनी ‘आपत्तीच्या काळात संघटितपणे उभे राहणे’ हाच खरा जागतिक छायाचित्रण दिनाचा संदेश असल्याचे दाखवून दिले.

ताडेपुराचे ‘नमो गार्डन’ पळवून मध्यवर्ती शहरात भूमिपूजन! पैलाड, शनीपेठ, सिंधी कॉलनी, ताडेपुरातील नागरिकांचा संताप; “जाब विचारल्याशिवाय राहणार नाही!” — नगरसेविका शोभाबाई गढरे

 

अमळनेर (प्रतिनिधी) : ताडेपुरा परिसरासाठी प्रस्तावित असलेले ‘नमो गार्डन’ मध्यवर्ती शहरात नेऊन थाटात भूमिपूजन करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

या ताडेपुरा येथे गार्डन होऊ नये निर्णयाला सर्वप्रथम सत्ताधाऱ्यांनी विरोध केला होता. तसेच प्रभाग क्रमांक ३ च्या नगरसेविका शोभाबाई गढरे, राष्ट्रवादी युवक शहरध्यक्ष दुर्गेश पाटील यांच्यासह नागरिकांनी ताडेपुराच्या विकासासाठी आवाज उठविला होता.

आता पैलाड, शनीपेठ, सिंधी कॉलनी, ताडेपुरा आणि परिसरातील नागरिकांचा सवाल आहे—“ताडेपुराचा विकास पळवून मध्यवर्ती शहरात नेण्याचा निर्णय घेतलाच कुणी? या निर्णयाचा जाब सत्ताधाऱ्यांना विचारल्याशिवाय जनता शांत बसणार नाही,” असा इशारा नगरसेविका शोभाबाई गढरे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी दिला आहे.